हिमालयसदृश्य पर्वतराजीवर तो एका सरत्या उन्हाळ्यातील संध्याकाळी आपल्या प्रेयसीच्या साथीने बसला होता. वातावरणात येणाऱ्या दीर्घ हिवाळ्याची चाहूल लागली होती. वृक्षांनी आपल्या पर्णसंभाराला पिवळ्या, सोनेरी रंगांनी सजविण्यास सुरुवात केली होती. समोरील पश्चिम दिशेला असलेल्या महाकाय पर्वतामध्ये सूर्य आसरा शोधू पाहत होता. सूर्याच्या त्या मावळत्या किरणांमध्ये सोनेरीपणा ओतप्रोत भरला होता. मुळचे पांढरेशुभ्र असणारे ढग ह्या किरणांनी प्राप्त झालेल्या आपल्या सोनेरी कडा निळ्या आकाशात मिरवीत होते. पर्वतातून वेगाने खाली धावणारी आणि शुभ्र पाण्याचा ओसंडून वाहणारा प्रवाह मिरवणाऱ्या नदीचा गर्व काही तिला लपविता येत नव्हता. तिच्या अस्तित्वाने तिच्या अवतीभोवती फुललेले वन्यजीवन जीवनातील ह्या आनंदी क्षणाचा मनसोक्त आनंद लुटत होते. महाकाय हत्तींचा आपल्या शक्तीने उन्मत्त झालेला एक कळप ह्या नदीच्या पाण्यात येथेच्छ स्नान करीत होता.
त्याने ज्यावर बैठक घेतली होती तो पर्वत अत्यंत वेगाने भूमातेला भेटण्यासाठी धावला होता. अशा हा पर्वत घनदाट वृक्षराजीबरोबर हिरव्यागार गवतालाही मिरवीत होता. त्याची नजर अशा ह्या पर्वतावरून खाली उतरत पायथ्याशी असलेल्या गावापर्यंत पोहोचली होती. गावात उत्सवाची तयारी सुरु होती. गावाच्या मध्यभागी एक मोठा गोल भाग सजवून ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेले धान्य, फळे बाजूला सजवून ठेवले होते. अलंकारांनी नटलेल्या सुंदर ललनांनी नृत्याची तयारी सुरु केली होती. गावातील तरुण आपले संगीत साधनांवर अखेरचा हात फिरवून घेत होते. गावातील बालके रस्ता चुकलेल्या सशांच्या पिल्लांची पाठ काढण्याचा खेळ खेळण्यात मग्न होती.
त्याला दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य प्रेयसीच्या साथीमुळे अधिकच प्रसन्नकारी बनले होते. भोवतालच्या उद्यानातील फुललेल्या विविधरंगी सुंदर फुलांवर बागडणाऱ्या फुलपाखरांकडे ते दोघेही मोठ्या समाधानी नजरेने पाहत होते. विधात्याने रचलेल्या ह्या आभासी जगातील एका सर्वोत्तम क्षणी प्रेमात बुडलेल्या त्या युगुलाकडे त्या बागेतील एक हरीण टक लावून पाहत होते.
No comments:
Post a Comment