जीवन आपल्यासमोर अनुभव, सत्य खळखळा ओतत असते. आपआपल्या क्षमतेनुसार माणूस ह्या अनुभवांनी समाधानी, अवाक, दुःखी अशा अनेक भावनांना सामोरे जातो. घाईगडबडीच्या जीवनात एखादी भावना पूर्ण अनुभवयास सुद्धा वेळ मिळत नाही. लगोलग दुसरा अनुभव आपणासमोर उभा ठाकतो.
आयुष्यात माणूस कधी कधी एखाद्या ध्येयाचा मनापासून ध्यास घेतो. कष्ट करून वा नशिबाने अथवा दोघांच्या संयोगाने माणूस त्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचतोसुद्धा! परंतु तोपर्यंत तो अगदी थकून जातो. आपण ध्येयाच्या इतक्या जवळ पोहोचलो आहोत हे त्यास कळत नाही. आणि तो हार मानतो. कालांतराने त्यास कळून चुकते की आपण ध्येयाच्या किती जवळ होतो आणि योग्य दिशेतील एक पाऊल फक्त एक पाऊल आपणास ध्येयापर्यंत घेऊन गेले असते. म्हणून केव्हाही हार मानण्याआधी एक वाक्य लक्षात ठेवा. 'आपण एक शेवटचा प्रयत्न करून बघुयात, जो आतापर्यंतच्या प्रयत्नापेक्षा काहीसा वेगळा असेल'
जगातील काही सत्ये कालातीत असतात. काळानुसार फक्त त्यांचे स्वरूप बदलते. जसे की जगात सदैव श्रीमंत आणि गरीब असे वर्ग राहणार. श्रीमंत लोक भौतिक सुखांचा अनुभव घेणार. हल्ली ह्यात थोडासा बदल झाला आहे. पूर्वी श्रीमंत लोकांना असुरक्षिततेची भावना नसायची. त्यामुळे त्यांच्यात एका प्रकारचा अहंकार असायचा. हल्लीच्या श्रीमंत लोकांना विविध कारणांनी असुरक्षितता ग्रासते. त्यामुळे त्यातील बरेचसे आध्यात्मिक मार्गाला, सामाजिक सेवेला वाहून घेतात. ह्यात अजून एक मुद्दा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तेबरोबर काही प्रमाणात नशिबाची सुद्धा साथ लागते. एखादा माणूस यशस्वी झाला की बऱ्याच वेळा तो आपल्या पुढील पिढीस थोडे शांतपणे आयुष्य घेण्यास सांगतो. जगात आपला मुलगा / मुलगी बहुतांशी लोकांहून अधिक प्रमाणात स्थिर झालेले आहेत ह्याची त्याला जाणीव असते त्यामुळे आपण कमाविलेल्या संपत्तीचा त्यांनी शांतपणे उपभोग घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. अर्थात ह्यालाही अपवाद असतातच.
आयुष्यात भरल्यापोटी तत्वज्ञान देणे कोणालाही जमते. उपाशी पोटी तत्वज्ञान फक्त पूर्वीच्या संतांनी दिले. हल्लीच्या श्रीमंतांना गुरुही पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारे लागतात.
वरिष्ठ पदावरील मनुष्याकडे १०००० मीटर उंचीवरून बघून सर्व गोष्टींचा आढावा घेता येण्याची क्षमता असणे आवश्यक असते. असा विचार करताना सर्व आवश्यक घटकांना समाविष्ट करून, त्यांना योग्य जागी बसवून एक मोठे चित्र (बिगर पिक्चर) रेखाटता आले पाहिजे. हे चित्र रेखाटताना आपला, आपल्या हितसंबंधीयाचा स्वार्थ साधण्याचा मोह टाळावा. परंतु आपण जर वरिष्ठ पदावर नसू तर उगाच जगाची चिंता करू नये. आपले कुटुंब शांतपणे चालविता आले तरी खूप. थोडक्यात म्हणजे आपली पायरी ओळखता येणे हा हल्ली सुखी होण्याचा महत्वाचा मुद्दा बनला आहे.
बाकी सोन्याचे भाव २ - ३ हजारांनी उतरले म्हणून सोनारांकडे झुंबड उडाली. काहींना हे पटते काहींना नाही. मला पटत नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा त्या भावाने खरेदी करावे, आपली जी क्षमता असेल त्या रकमेचे खरेदी करावे. इतक्या मोठ्या आयुष्यात १ - २ तोळे काही मोठा फरक पाडू शकत नाहीत. पुन्हा हा ज्याचा त्याचा प्रश्न!
शेवटी ह्या शीर्षकाने सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे ह्यांचा कोणताही हक्कभंग होत नसावा ही आशा!
No comments:
Post a Comment