Sunday, April 21, 2013

एका तळ्यात होती …


सकाळी FM रेडीओच्या रेनबो स्टेशनवर सुंदर गाणी त्यांच्या इतिहासाबरोबर ऐकवली जातात. सकाळी मन प्रसन्न असल्याने निवेदकांचे बोलणे जरा लक्ष देवून ऐकले जाते. आणि मग मन त्यावर आपल्या कल्पना रचते. असेच आज ग. दि. माडगुळकर ह्यांचे एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख हे गीत ऐकताना झालं.

हे गीत लिहताना कोणता संदर्भ महाकवी गदिमांच्या मनात होता हे जाणून घेण्याची क्षमता ह्या पामराकडे नाही. परंतु मी असाच विचार करू लागलो. ह्या भूलोकी सामान्य लोकांत जन्मलेले काही असामान्य लोक असतात. असामान्य लोकांना त्यांचे असामान्यत्व काही जन्मतः मिळत नाही. त्यांची प्रतिभा, त्यांचे कौशल्य जगाला कळावयास बराच वेळ जावा लागतो. काहींच्या बाबतीत त्यांचे असामान्यत्व जगास त्यांच्या मृत्युनंतर जगास कळते. अशा ह्या असामान्य लोकांची प्रतिभा लोकांना कळेपर्यंत त्यांना स्वतःवरच विश्वास ठेवावा लागतो.

हल्लीच्या जगात हेच दुसऱ्या एका बाबतीत लागू पडतं. भोवतालच्या जगाने आखून दिलेल्या यशाच्या व्याख्येच्या मागे धावताना सर्व जण दिसतात परंतु आपले ध्येय ठरवून जगाची पर्वा न करता त्यासाठी तपस्या करणारे फार थोडे आज अवतीभोवती दिसतात. आजचा हा ब्लॉग अशा राजहंसांना समर्पित!

असो वरच्या गडबडीकडे लक्ष न देता ह्या अप्रतिम गीताचा एक काव्यात्मक नजरेतून आस्वाद घ्या!

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
 

No comments:

Post a Comment