१९९५ - ९६ च्या सुमारास पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरींच्या बाबतीत काहीसे मंदीचे वातावरण होते. मुंबईतील चित्र पाहता VJTI आणि सरदार पटेल अभियांत्रिकी ह्या सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात नावाजलेल्या कंपन्या मुलाखतीसाठी येत परंतु शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे त्यांचे प्रमाण काहीसे कमी टक्के होते. त्यामुळे ज्यांना ह्या नोकऱ्या मिळत नसत त्यांना नोकरीसाठी बाहेर बऱ्यापैकी संघर्ष करावा लागत असे.आणि पगारही त्याकाळी प्रतिमहिना ८ - १० हजाराच्या आसपासच असत. त्यामुळे GRE सारख्या परीक्षा देऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाणे, GATE देऊन भारतात पदव्युत्तर शिक्षण घेणे किंवा MBA च्या परीक्षा देणे ह्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा असे.
नक्की आठवत नाही पण १९९७ च्या आसपास Y2K चा झंझावात आला आणि त्याने हे चित्र बऱ्याच प्रमाणात बदलले. ह्या बागुलबुवाने भारतीय IT कंपन्यांना अगणित प्रोजेक्ट मिळवून दिले आणि त्यांना प्राथमिक पातळीवरील संगणकीय ज्ञान असलेल्या लोकांची प्रचंड गरज भासू लागली. वर उल्लेखलेल्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक अभियंत्यांनी ही संधी साधून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चंचूप्रवेश केला. ह्यामध्ये ह्या अभियंत्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीविषयी ना त्या अभियंत्यांनी विचार केला होता न त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांनी. ह्यामुळे अजून एक घटना झाली ती म्हणजे पारंपारिक क्षेत्रातील उरलेल्या अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे गुलाबी चित्र पुढे ८ ते १० वर्षे कायम राहिले. ह्या क्षेत्रातील बहुतांशी लोकांना परदेशगमनाची संधी मिळाली. त्यातील काहींना कायमस्वरुपात राहण्याची मिळाली तर काहीना कालांतराने परत यावे लागले तर काहींनी स्वतःहून परत येण्याचा निर्णय घेतला. परदेशगमनाच्या ह्या संधींमुळे ह्या लोकांची आर्थिक स्थिती बर्याच प्रमाणात उंचावली. त्यामुळे आणि ह्या लोकांना परदेशी राहण्याच्या गरजेमुळे त्यांच्या जीवनसाथी असलेल्या सुविद्य पत्नींना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. मागील एका ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एकंदरीतच आपल्या देशाच्या कुशल मनुष्यबळाच्या नियोजनाबाबत आनंदीआनंदच आहे. आपण सद्यपरिस्थिती दीर्घकाळ कायम राहणार आहे असे मानून आपले बरेचसे निर्णय घेतो आणि मग काहीशी फसगत होते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात उच्चपदावर जाण्यासाठी पिरामिड संकल्पना लक्षात घेणे आवश्यक आहे. प्राथमिक पातळीवर बहुसंख्य लोक असतात परंतु व्यवस्थापनाच्या उच्च पातळीवर जावे तशी ह्या व्यवस्थापकांची संख्या झपाट्याने घटते. त्यामुळे केवळ अनुभवांची वर्षे वाढली म्हणून सदैव बढत्या मिळणे कठीण होत जाते. अमेरिकन लोकांना वर्षोनवर्षे आज्ञावली लिहिण्यात काही वावगे वाटत नाही. उलट ते आनंदीच असतात परंतु आपली मानसिकता इथे आड येते. सामाजिक प्रतिष्ठेच्या आपल्या भ्रामक कल्पनांनी आपणास व्यावसायिक बढती मिळविण्याचे अदृश्य दडपण येते. सर्वांनाच हे जमत नसल्याने एका प्रकारची उदासीनता अशा लोकांच्या मनात येते.
आता आपण गेल्या ४-५ वर्षात ह्या क्षेत्राकडे वळलेल्या लोकांकडे पाहूयात. आता चित्र पालटले आहे. पारंपारिक क्षेत्रात कुशल अभियंत्यांची गरज वाढल्याने त्या क्षेत्रातील पगार आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या बरोबरीचे झाले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशगमनाच्या संध्या झपाट्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे सुविद्य पत्नींनी नोकरी सोडण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक स्थितीच्या निर्माण केल्या गेलेल्या आभासी चित्राने जीवनावश्यक गोष्टींचे दर प्रमाणाबाहेर गेले आहेत आणि त्यातच ह्या क्षेत्रातील लोकांनी आपला जीवनस्तर परत वळण्याच्या पलीकडच्या पातळीवर उंचावून ठेवला आहे. ह्याचे परिणाम वैयक्तिक जीवानांवर सुद्धा होत आहेत.
एकंदरीत आपण एका नवीन स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु पुढील १० - १५ वर्षांसाठी चांगले क्षेत्र कोणते हे सांगण्याचा विश्वास आपल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे आपल्याकडे नाही. चौथीत असलेल्या माझ्या मुलासाठी चांगले क्षेत्र कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आज माझ्याकडे नाही. आणि त्यामुळेच IPL मुळे ऑस्ट्रेलियन संघांच्या कसोटी फलंदाजीवर परिणाम झाला असे टेलर जेव्हा म्हणतो तेव्हा IPL हा आपल्या मुलासाठी एक पर्याय ठेवावा असा विचार मी करू लागतो.
No comments:
Post a Comment