राजेश गेल्याच आठवड्यात एका महागड्या उपहारगृहात जावून बुफ्फे जेवण हादडून आला. जेवणाआधी रस्त्यावर गरीब मुले दिसली त्याने त्याला दुःख झाले नाही. पण जेवून आल्यावर अपचनाच्या भीतीने आणि वाढलेल्या कॅलरीच्या भीतीने राजेशला आत्मक्लेश झाला.
राजेशने आपल्या अलिशान इमारतीतील पोहण्याच्या तलावात येथेच्छ स्नान केले. आपली महागडी कार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर भरपूर पाण्याने हिरव्यागार झालेल्या मैदानावर विद्युतप्रकाशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचा त्याने आस्वाद घेतला. परत येताना ३४ सेकंद विद्युतपुरवठा खंडित झाल्याने राजेशला सिग्नल पाशी खोळंबावे लागले. त्याने राजेशला आत्मक्लेश झाला.
राजेशने एक मोठे कंत्राट व्यवस्थितपणे मिळविले. अगदी व्यवस्थितपणे त्या खुशीच्या भरात घरी परतताना त्याने सिग्नल तोडला. त्यामुळे त्याच्याकडे पोलिसाने १०० रुपयाची मागणी केली. ह्या १०० रुपयाच्या दुःखात राजेशला बराच आत्मक्लेश झाला.
असे बरेच आत्मक्लेश झाल्यावर राजेश एकदा नवसाला पावणाऱ्या देवळात जावून आला अगदी भली मोठी रांग लावून! रांगेत उभे राहून त्याला २ - ३ तास उपवास घडला. देवाचे १७ सेकंद दर्शन मिळाल्यावर राजेशला अगदी हलके हलके वाटू लागले.
राजेश आत्मक्लेशाचा नवीन डोस घेण्यास परत सज्ज जाहला!
No comments:
Post a Comment