Wednesday, September 1, 2010

Ownership

शनिवारी सकाळी वर्तमानपत्र उघडले. चतुरंगमध्ये ‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’ या स्पर्धेचा निकाल लागल्याचे जाहीर झाले होते. सर्व प्रथम विजयी लेखकांच्या यादीत माझे नाव आहे का हे पाहिले. तिथे नाव नसल्याने स्पर्धेतील लेखांचा आढावा घेणाऱ्या लेखाकडे माझी नजर वळली. त्यातही माझे नाव नव्हते, पण एक दोन संदर्भ माझ्या लेखाशी संबंधित असल्याची शंका मला आली. निराशेचे काळे ढग मनावर दाटून आले. आता ही लेखणी कायमची म्यानात बंद करून ठेवावी असे विचार येवू लागले. अशा या बिकट प्रसंगी धर्मपत्नी गरम चहाचे कप घेवून दिवाणखान्यात प्रवेश करत्या झाल्या. एकंदरीत वातावरण गंभीर असल्याचे तिच्या ध्यानात आले. काही क्षणात निराशेचे कारण कळताच तिने पुरवणी हातात घेतली. विजेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकून ती बोलती झाली, अरे या तर सर्व स्त्रियाच आहेत. परीक्षक पण स्त्री आणि विजेत्या पण स्त्रियाच! एका स्त्रीकडून हे उदगार ऐकताच अस्मादिक धन्य झाले. लेखणी बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय रद्द झाला. मराठी साहित्य एका उभारत्या लेखकास मुकण्याची शक्यता त्या वेळेपुरता तरी टाळली गेली.

असो! आजचा विषय आहे ownership अर्थात स्वामित्वाची भावना. हा शब्द आधुनिक कार्यालयात बर्याच वापरला जातो. प्रत्येक कर्मचार्याला एक भूमिका (role) दिली गेली असते आणि त्यानुसार त्याला जबाबदार्या (responsibilities) दिल्या जातात. भूमिका आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या या लेखी स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला जातो. बर्याच वेळा हा लेखी कागद दैनंदिक व्यवहार सुरुळीत पणे पार पडण्यास पुरेसा असतो. Boss आणि Team Member दोघेही ह्या लिखित कागदाकडे पाहून आपापले कामकाज पार पडत असतात. काही क्षण मात्र असे येतात की ज्यावेळी Team Member ला या लिखित जबाबदार्यांच्या पलीकडे जावून काम करावे लागते. एखादा प्रश्न सुटेपर्यंत दिवस रात्रीची पर्वा न करता कार्यालयात थांबणे, एखादा सहकारी काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास त्याची कामे पार पाडणे ही काही उदाहरणे ownership ची! वार्षिक appraisal च्या वेळी ह्या गोष्टी चर्चिल्या जातात.

कार्यालयाच्या बाहेर ही संकल्पना अस्तित्वात आहे काय? उत्तर आहे होय. आपल्या batch चे काही जण स्नेहसंमेलनासाठी जी मेहनत घेतात त्यात असते ही ownership ची भावना. सार्वजनिक गणेशउत्सवात काम करणारा कार्यकर्ता हा ownership चे प्रतिक असतो. प्रत्येक नात्याला असतो एक owner. काही नाती केवळ त्या नात्याला owner नसल्याने फुलण्याआधीच मिटतात.