Sunday, March 27, 2011

न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - सामनावृत्तांत

न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - मर्यादित षटकाचा क्रिकेट सामना दिनांक ३० जानेवारी २०११ वेळ - सकाळी ७ - ८:३० तापमान - १६ डिग्री सेल्सिअस पंच - विवेक काणे आणि संजिव पाटील धावसंख्या न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - ८ षटकात ६ बाद ६० न्यू इंग्लिश स्कूल १९८८ - ७.३ षटकात ४ बाद ६१ विजयी संघ - न्यू इंग्लिश स्कूल १९८८ पहिला डाव सामना निर्धारित वेळेच्या थोडाच वेळ नंतर म्हणजे सव्वासात वाजता सुरु झाला. संजय राऊत यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सचिन पाटणकर आणि गट्टू यांनी डावाची सुरुवात केली. १९८८ batch तर्फे सचिन याने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिलाच चेंडू ८८ चे कसलेले यष्टीरक्षक सुजित देवकर यांना चुकवून सीमारेषेबाहेर गेला. पुढील चेंडूदेखील मागे जाऊन २ धावा मिळाल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सचिन यांनी एक सुंदर चौकार ठोकून संघाची धावसंख्या ११ वर नेली. दुसर्या षटकात अरुण गोईलकर यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली. या षटकात समीर कंक यांनी सचिन यांना जीवदान दिले. या षटकात देखील सचिन यांनी लॉंगऑन दिशेने एका चौकाराची नोंद केली. कर्णधार सुजित यांनी गोलंदाजीत बदल करीत राकेश यांना गोलंदाजीस पाचारण केले. राकेश यांनी चेंडूच्या टप्प्यावर योग्य नियंत्रण ठेवीत या षटकात मात्र केवळ चार धावा देत धावसंख्येचा वेग एका आकड्यावर (प्रती षटकामागे ९) असा आणला. त्यानंतर आदित्याकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. त्यांच्या पहिल्याच चेंडूवर गट्टू हे दुसरी धाव पळून काढण्याच प्रयत्नात धावबाद झाले. लेग अम्पायर संजिव पाटील यांनी क्षणभर विचार करून त्यांना बाद घोषित केले. दुसर्या चेंडूवर विवेक काणे यांनी आदित्याचा चेंडू साईड नो म्हणून पुकारला. सचिन पाटणकर यांनी संयमी फलंदाजी करीत दोन दोन धावा पळून काढण्याचे सत्र सुरु ठेवले. आदित्याचे हे षटक एकूण ९ चेंडू चालले. नवीन आलेले फलंदाज संजय यांनी आपला जम बसविण्यास थोडा वेळ घेतला. चार षटकानंतर ८५ ची धावसंख्या १ बाद ३८ इतकी झाली. त्या नंतर मात्र ८८ च्या गोलंदाजांनी आपल्या कुशल गोलंदाजीचे पाश आवळण्यास सुरुवात केली. राकेश यांनी संजय राऊत यांना आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने जखडून ठेवले. ५ व्या षटकात केवळ ५ धावा आल्या. ५ षटकानंतर ८५ - १ बाद ४३. सहाव्या षटकाच्या सुरुवातीस चेतन चव्हाण यांनी सचिन पाटणकर यांना त्रिफळाचीत करून ८५ च्या संघास मोठा धक्का दिला. त्यांच्या या षटकात केवळ ७ धावा आल्या. ६ षटकानंतर ८५ - १ बाद ५०. या कालावधीत सुजित देवकर यांनी यष्टीमागे धावा देण्याचा सपाटा चालूच ठेवला. समीर ठाकूर यांनी फलंदाजीची धुरा सांभाळण्याचा थोडाफार प्रयत्न केला. परंतु सचिन संख्ये आणि चेतन चव्हाण यांनी शेवटच्या दोन षटकात केवळ १० धावा दिल्या. ८५ ची batch ८ षटकानंतर ६० धावा जमवू शकली. डावाच्या मध्यावर ३८ धावा असतांना ही एकूण धावसंख्या काहीशी निराशाजनक अशी होती. ८८ च्या तंबूत मध्यंतराच्या वेळी चिंतेचे वातावरण होते.. दुसरा डाव ८८ तर्फे सचिन संख्ये आणि राकेश राऊत हे फलंदाजीस उतरले. सचिन पाटणकर यांनी अचूक टप्प्यावरून चेंडू उसळवीत ह्या दोघांना जखडवून ठेवले. ८८ च्या एका प्रेक्षकाने सचिन पाटणकर यांना डेरील स्टेन यांची उपमा दिली. पहिल्या षटकात केवळ तीन धावा जमविल्या गेल्या. संजय पाटील यांनी दुसर्या षटकात देखील अचूक गोलंदाजीचा क्रम चालू ठेवीत धावसंख्येवर अकुंश ठेवला. ह्या मुळे दडपणाखाली येत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राकेश राऊत हे धावचीत झाले. त्यानंतर सुजीत देवकर हे फलंदाजीस उतरले. त्यांनी मैदानातील क्षेत्ररक्षकांची संख्या मोजली असता एकूण १२ जण क्षेत्ररक्षण करीत असल्याचे आढळले. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्ररक्षक परांजपे यांना विशाल पाटील यांच्या सोबत गुणलेखनाच्या जबाबदारीसाठी पाठविण्यात आले. सामन्याचा हा कलाटणीचा क्षण ठरला. सुजित देवकरने एका उत्तुंग षटकाराची नोंद केली. या वेळी पंच विवेक यांचा षटकार घोषित करण्याचा आविर्भाव लाजबाब होता. चार षटकानंतर ८८ batch २४ धावांवर होती. सचिन पाटणकर यांची दोन षटके संपली.आणि मग त्यानंतर मात्र ८८ च्या फलंदाजांनी मुक्त खेळ करण्यास सुरुवात केली. ८५ batch ने आपल्या वयोमानानुसार ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. याला अपवाद यष्टीरक्षक जयदीप वाकणकर आणि लॉंगऑनला क्षेत्ररक्षण करीत असलेले हेमंत डोंगरे यांचा (सामन्याच्या वर्णनाच्या ह्या वाक्याचे प्रायोजक आहेत हेमंत डोंगरे ). ८८ batch ने एका वेळी तर ५ धावा धावून काढल्या. समीर ठाकूर यांच्या पहिल्या षटकात १२ धावा चोपल्या गेल्या. हेमंत डोंगरे यांनी सुजित देवकर यांचा एक कठीण झेल दुसर्या प्रयत्नात टिपला. परंतु त्यानंतर आलेले फलंदाज अतुल शिंदे यांनी जोरदार फटके मारले. सचिन संख्ये बाद झाल्यावर अरुण गोईलकर हे मैदानात आले. त्यांनी आणि अतुलने व्यावसायिकरित्या फलंदाजी करीत उत्तमरीत्या धावा पळून काढल्या. हेमंत डोंगरे यांनी अतुलचा झेल दुसर्या प्रयत्नात सोडला. शेवटच्या दोन षटकात ८८ batch ला १० धावांची गरज होती.अतुल यांचा पाय दुखावला गेल्यामुळे सुजित हे रनर म्हणून उतरले. परंतु अतुल थोड्याच वेळात बाद झाले. आदित्य १ धावा काढून समीर ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या नंतर दीपक कदम यांनी विजयी धावा काढल्या. आणि मग ८८ batch ने आपल्या विजयोत्सवाने मैदान दणाणून सोडले.Quotes of the Day! विवेक काणे - आज रात्री ८५ चा गुणलेखक ८८ च्या संघाबरोबर पार्टी करतानाचे sting operation फेसबुकवर झळकणार! ८८ चा न निवडला गेलेला खेळाडू - ८८ च्या संघनिवडीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. ८८ चा गोलंदाजी न मिळालेला खेळाडू - ८८ च्या गोलंदाजीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. हेमंत डोंगरे - इतिहासात मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले! ८५ ची batch मैदानात जिंकली पण गुणतक्त्यावर हरली!

Friday, March 18, 2011

चंद्र


चंद्र भूतलावरच किंवा आकाशातला, तसा प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करून असतो. तसे मलासुद्धा चंद्राचे आकर्षण! लहानपणी चंद्रग्रहण होणार अशी बातमी ऐकून मी गोंधळून गेलो. पण त्यात काय, फक्त पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार अशी समजूत काढताच, आपल्या मुंबईला राहणाऱ्या आपल्या मामाची सुद्धा सावली मला चंद्रावर दिसणार असा विचार माझ्या डोक्यात आला.

गणपतीच्या दिवशी चंद्र बघायचा नाही, पाण्यातील किंवा दुधातील त्याचे प्रतिबिंब तर अजूनही वर्ज्य अशी शिकवण लहानपणापासून मला मिळालेली! पण बर्याच वेळा हा नियम माझ्याकडून मोडलेला. बारावीला असताना गणपतीच्या दिवशी संध्याकाळी रुपारेलच्या होस्टेलला जाताना वांद्र्याला गाडी बदलून माटुंग्याला उतरण्यासाठी पश्चिमेला तोंड उभ्या करून असलेल्या मला चंद्राने हसून दर्शन दिले. बाकी ढगाळ वातावरण असताना, अचानक चंद्रास्त व्हायच्या वेळी एकदा चान्दोबाबा माझ्यासमोर प्रकट झाले. अगदी गेल्या वर्षी हेमंतकडून गणपती पाहून येत असताना, शनीदेवळानंतर डावीकडे वळण घेताच चंद्र दिसला.

बाकी पृथ्वीला एकच चंद्र असल्याचे मला सदैव दुःख होते. आतापर्यंत मला कित्येक वेळा पृथ्वीला दोन चंद्र असल्याचे स्वप्न पडले. प्रत्येक स्वप्नात खूप खुश झाल्यावर जाग आल्यानंतरचे दुःख मात्र अतोनात! हेच स्वप्न पुढे खेचून, पृथ्वीला ३० चंद्र असावेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी तिथी असावी अशी इच्छा मी मनात बाळगली. म्हणजे काय तर, कोणत्याही दिवशी आकाशात प्रत्येक तिथीचा एक चंद्र असणार! संकष्टी पाळणारे एकदम धर्मसंकटात!

ह्या चंद्राची काही रूपे एकदम लक्षात राहिलेली. न्यू जर्सीच्या पहिल्या बर्फवृष्टीनंतर ह्या बर्फावर चकाकणारा आकाशातील चांदोबा, पहिल्या परदेशवारीनंतर परत येताना दुबईवरून विमानाने उड्डाण केल्यावर ढगातून डोकावणारा चांदोबा लक्षात राहिलेत! बाकी वसईच्या शुद्ध वातावरणातल्या चंद्राचे सौंदर्य काही औरच!

चंद्र दररोज आधीच्या दिवसापेक्षा ५२- ५३ मिनटे उशीरा उगवतो. आता ही ५२- ५३ मिनटे भारतात खरी, ती बहुदा अक्षांशानुसार आणि रेखांशानुसार बदलत असावी असा माझा समज आहे. ते नक्की गणित एकदा समजून घ्यायचे आहे. पूर्णिमेला सूर्य मावळल्यानंतर उगवणारा चंद्र कृष्ण अष्टमीच्या वेळी मध्यरात्री उगवतो. आणि असे करीत करीत अमावास्येला सूर्याबरोबर उगवतो. चन्द्रोदयावेळी आणि चंद्रास्तावेळी ओहोटी असते आणि ज्यावेळी चंद्र बरोबर डोक्यावर किंवा पायाखाली असतो त्यावेळी भरती असते. हे तत्व बोर्डीच्या आजोबांनी लहानपणी सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. हे आता रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जायच्या वेळी लक्ष्यात ठेवायचे!

असा हा चंद्र उद्या पृथ्वीच्या अगदी जवळ येतोय! लक्षात ठेवा एक नजर टाकायला त्याच्यावर!

Sunday, March 13, 2011

आत्मकेंद्रित


आताच एक फेसबुकवर स्टेटस वाचले
प्रत्येकजण आत्मकेंद्रित असतो
फक्त वर्तुळाच्या त्रिज्या मात्र बदलत असतात!

अप्रतिम, लाजबाब
आपण आपल्या कळत नकळत आपल्याभोवती एक आपल्या सुखकारक वातावरणाचे वर्तुळ आखून घेतो. त्या आरामदायीपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यक्ती, समारंभ, स्थळ यांनाच ह्या वर्तुळात प्रवेश असतो. जसजसा माणुस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत जातो तसतसा तो ह्या वर्तुळाच्या निवडीविषयी एकदम चोखंदळ होत जातो. काही माणसे मात्र आपली त्रिज्या फार मोठी आखतात, वसुधैव कुटुम्बकम् अशीच त्यांची धारणा असते. आजकाल अशी निस्वार्थी माणसे मिळणे जरा दुर्मिळच झाले आहे.

हीच कल्पना पुढे नेत असा विचार करूया की दैनंदिन जीवन प्रत्येकजण आपले हे वर्तुळ घेवून फिरत असतो. ज्या ज्या वेळी व्यक्तीच्या ह्या वर्तुळात एखाद्या आगन्तुकाचे आगमन होते त्यावेळी संघर्ष निर्माण होतो! बाकी फेसबुकाचे मात्र बरे आहे, आपले वर्तुळही आपणच आखायचे आणि या वर्तुळातील कोणी मनाजोगता वागला नाही तर त्याला unfriend करून टाकायचे!

Saturday, March 12, 2011

क्रिकेट आणि निराशा


कालचा सामना आपण हरला. काही वर्षापूर्वी मला ह्याचा खूप त्रास बराच वेळ व्हायचा. जावेद मियांदादचा शारजाह मधील शेवटच्या चेंडूवरचा षटकार, तेंडूलकरने पाकिस्तान विरुद्ध १३६ धावांची खेळी केल्यावर विजयासाठी १६ धावा हव्या असताना तो बाद झाला आणि मग बाकीचे चार गडी १० धावात बाद झाले. ह्या दोन प्रसंगांनी माझ्या निराशेची परिसीमा गाठली होती.

हल्ली खूप त्रास होतो पण त्या मनःस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी मी वापरत असलेले उपाय थोडेसे टोकाचे असतात, पण ते मला उपयोगी पडतात. पहिला मार्ग म्हणजे देवाने आपल्याला आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींचे स्मरण करणे आणि ह्या पराभवानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची स्वतःला आठवण करून देणे. दुसरा मार्ग म्हणजे किशोरकुमारची ७० च्या सुमारातील गाणी लावून ऐकणे. तिसरा मार्ग म्हणजे कार्यालयातील किचकट कामाची स्वतःला आठवण करून देणे. अशा गोष्टींचा विचार करता करता पराभवाची तीव्रता थोडी कमी होते. मग मी साखळीचा गुण तक्ता घेवून बसतो आणि अजून सुद्धा भारत कसा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो ह्याचे गणित मांडू लागतो.

अशा पराभवानंतर मी दोन गोष्टी टाळतो आणि त्या म्हणजे थिल्लर हिंदी बातमी वाहिन्या आणि दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील क्रीडा सदर. हल्ली प्रत्येकजण समीक्षक बनला आहे. मी सुद्धा समीक्षा करतो परंतु मी मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंची क्षमता, कप्तानाला निर्णय घेण्याचे असलेले स्वातंत्र्य याचा आदर करतो. ८५ च्या batch बरोबर झालेल्या ८ षटकाच्या सामन्यानंतर प्रत्यक्ष सामना खेळणे आणि बाहेरून टीका करणे यातील जमीन आसमानाचा फरक मला जाणवला.

असो ह्या निराशेच्या परीसीमेवरून आठवले की आपण निराश झालो हे स्वतःशी किंवा जवळच्या कोणाशी तरी मान्य करणे ही निराशेतून बाहेर पडण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हल्लीच्या जगात बरेचजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले पण यातील एक तरी पूर्णपणे सुखी झाला का? बहुतांशी सर्वांना कोणत्या तरी चिंतेने, निराशेने ग्रासलेले आहे. आपण जर दुसर्या एखाद्याच्या परिस्थितीशी स्वतःशी तुलना करून जर निराश होत असाल तर नीट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या निराशा तुम्हाला माहीत नाहीयेत. योग्य मार्गाने निराशेवर मात करा आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघा, चांगल्या गोष्टींचे महत्व त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर कळल्या अशी वेळ येवून देवू नका!

Sunday, March 6, 2011

Switching techniques आणि बहुरूपीकार्यालयात काम करताना एखादी उच्चपदस्थ व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. ह्या प्रत्येक भूमिकेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कधी कधी मला असे वाटते की अशा एकच व्यक्तीच्या आत त्याच माणसाची अनेक रूपे दडलेली असतात आणि भूमिकेनुसार ती व्यक्ती आपले योग्य रूप बाहेर काढत असते.
आता रूप म्हणजे काय?
प्रत्येक भूमिकेनुसार त्या व्यक्तीला आपल्या मेंदूतील आवश्यक माहितीचा साठा access करावा लागतो.
त्या भूमिकेत ज्या व्यक्तींशी संपर्क साधावा लागतो त्या व्यक्तीविषयीची माहिती ताजी करावी लागते
आणि त्या त्या प्रसंगानुसार योग्य धोरण स्वीकारावे लागते.
जसे जसे जबाबदारीच्या शिडीवर वर जात जावे, तसतसे व्यक्तीला वठवाव्या लागणाऱ्या रूपांची संख्या आणि वारंवारता वाढत जाते. त्यामुळे एका रूपांतून दुसर्या रुपात शिरण्यासाठी मिळणारा वेळ जवळजवळ शून्यावर येतो. ह्या प्रत्येक स्थित्यंतरात ह्या बहुरूप्याची शक्ती त्याच्या नकळत कामी येत असते.
दिवसाअखेरी हा बहुरूपी एका वेगळ्या प्रकारच्या रूपांच्या पोतडीला सामोरा जाणारा असतो, ती असतात आदर्श पालकाची, सह्चार्याची! बहुरूप्याची ह्या वेगवेगळ्या रूपांमधील तारेवरची कसरत त्याच्या मनाच्या एका कोपर्यात बसून शांतपणे पाहत असतो बालपणाचा बहुरूपी! बहुरुप्याला माझे एकच सांगणे, ह्या बाल बहुरुप्याला जिवंत ठेव रे बाबा!

प्रगल्भता


आता पर्यंतचे ब्लॉग आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचता वाचता एक अस्पष्टशी शंका मनात डोकावून गेली. माझी मते एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात काय? आधींच्या पिढ्यांनी शेतीचा व्यवसाय केला. शिक्षणाचा आमच्या कुटुंबातील म्हणण्याजोगा प्रवेश वडीलांच्या पिढीपासूनचा! शिक्षण क्षेत्रातील माझी ही दुसरी पिढी. व्यावसायिक क्षेत्रातील मुरब्बीपणा अजून अंगात न भिनलेला. प्रत्येक माणसाला काही स्वभाववैशिष्ट्य अनुवांशिकरित्या मिळतात, माझी ही अनुवांशिकरित्या मिळालेली स्वभाववैशिष्ट्य ज्ञानाच्या ह्या सामर्थ्याने भारावून गेली. मला आलेले हे ज्ञानाच्या सामर्थ्यांचे हे अनुभव कुणाबरोबर तरी वाटून घ्यावेत असे मला वाटले आणि मी ब्लॉग लिहण्यास सुरुवात केली. ह्यातील कित्येक अनुभव साधे साधे, पण माझ्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भतेच्या प्राथमिक पातळीमुळे मला त्यावर सुद्धा लिहावयास वाटले.
दुसरा एखाद्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भ झालेल्या एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर तो ह्या विषयांवर लिहिणार सुद्धा नाही कारण ते विषय त्याच्या दृष्टीने एकदम प्राथमिक पातळीवरचे असतील. ती व्यक्ती आपली उर्जा, शक्ती एखाद्या अधिक प्रगत विचारांवर खर्च करेल.
हा साक्षात्कार झाल्यावर मला जरा बरे वाटले. एकंदरीत मोठ्या चित्रात आपला ब्लॉग कोठे बसतो हे समजल्याचे समाधान लाभले!