Wednesday, December 25, 2019

ययाति - वि. स. खांडेकर



 गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट कादंबऱ्यांद्वारे ह्या सुवर्णकाळाचा अनुभव आजही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. वि. स. खांडेकर ह्यांच्या अश्रू ह्या कादंबरीचे मला झालेलं आकलन ह्या आधी एका पोस्टद्वारे केलं होतं. ह्या सिद्धहस्त लेखकाच्या ययाती ह्या अविस्मरणीय कादंबरीविषयीच माझं मनोगत मी इथं मांडत आहे. ह्या कादंबरीस १९७६ सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 

वि. स. खांडेकर हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतुन आणि पार्श्वभुमी ह्या विभागातुन कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ह्या कादंबरीतुन सद्य समाजानं शिकण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. 

ययाती 

स्त्रीसुखासाठी आंधळा होऊन स्वतःच्या पुत्राकडं तारुण्याची मागणी करणारा एक निर्दयी पिता अशी ययातीची ओझरती ओळख घेऊन ह्या कादंबरी वाचनास मी आरंभ केला होता. कादंबरीच्या पुर्वार्धात ययातीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु खांडेकरांनी उलगडुन दाखविले आहेत. प्रत्यक्ष इंद्राला पराभुत करणाऱ्या पराक्रमी नहुष  राजाचा हा पुत्र. परंतु आपल्या पित्याकडुन विजयाच्या एक उन्मत्त क्षणी घडलेल्या चुकीमुळं मिळालेल्या शापाचे ओझे सदैव घेऊन वावरणारा! "नहुष राजाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" हा तो शाप ! स्वतः खुप पराक्रमी. अश्वमेधाच्या घोड्यासोबत स्वतः स्वारी करत मोठमोठ्या राजे - महाराजांना स्वतःसमोर लोटांगणे घालावयास भाग पाडणारा ! आपल्या जन्माआधी राजमहालातील वैभवाचा त्याग करुन गेलेल्या आपल्या थोरल्या भावाशी म्हणजेच यतीशी त्याची ह्या प्रवासात अचानक भेट होते. यतीचं आपलं आयुष्य पुर्णपणे तपश्चर्येला वाहुन देणं ययातीला विचारात पाडतं. हे वादळ संपतं तितक्यात अंगिरस ऋषींच्या शांतीयज्ञात  राक्षसांकडुन होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासुन संरक्षणासाठी ययाती काही काळ त्या ऋषींच्या आश्रमात घालवितो. तिथं त्याची भेट कचाशी होते! ययातीच्या पत्नीचं म्हणजेच देवयानीचे पहिलं प्रेम हा कच ! परंतु एकंदरीत देवयानी प्रेमापेक्षा सामर्थ्याला महत्व देणारी ! त्यामुळं योगायोगानं भेटलेल्या ययातीला तो केवळ एका बलवान साम्राज्याचा चक्रवर्ती आहे म्हणुन पती म्हणुन स्वीकारण्यात तिला कोणताही संदेह नव्हता. परंतु ह्याच कारणामुळं ती ययातीची प्रेयसी केव्हाच बनु शकली नाही! म्हणुनच की काय ययाती मग शर्मिष्ठेकडं आकर्षिला गेला! ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणं प्रेमाच्या भुकेखातर असं जरी क्षणभर मानलं तरी त्याआधी आणि त्यानंतर त्यानं केलेल्या अनेक स्त्रियांच्या सहवासाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही! 

इथं खांडेकर ययातीची तुलना आधुनिक काळातील मानवाशी करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीनं निर्माण केलेलं आधुनिक सुंदर व संपन्न जगआजच्या ययातीपुढं पसरलं आहे. सुखोपभोगांची विविध साधने घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे!" १८५७ ते १९४७ च्या काळात पेटलेल्या पवित्र यज्ञकुंडांच्या ज्वाला विझुन गेल्या आहेत आणि मोठमोठे ऋत्विज यज्ञभूमी सोडुन गेले आहेत! - 

पहा किती सौंदर्यपुर्ण अशी ही उपमा! 

देवयानी 

देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या ! पित्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिच्यात उतरलेला! आपल्या बालपणात शर्मिष्ठेचं वैभव तिनं अगदी जवळुन पाहिलेलं. आपल्या पित्याला, त्याच्या विद्वतेला कितीही मान असला तरी प्रत्यक्ष राजाकडे असणाऱ्या सत्तेविषयी तिच्या मनात सुप्त आकर्षण कायम वसलेलं असतं. त्यामुळं कचाविषयी तिच्या मनात आकर्षण असलं तरी त्याच्याशी विवाह करण्याचा विचार ती कधीच करत नसते. ययातीसोबत योगायोगानं झालेल्या एका भेटीमुळं तिला आपल्या महत्वाकांक्षांना मुर्त रुप देण्याची संधी आपसुक गवसते. जिच्या वैभवाच्या सावलीत आपलं बालपण घालवलं त्या शर्मिष्ठेविषयी असणाऱ्या असुयेमुळं ती तिला आपली दासी बनवुन आपल्यासोबत हस्तिनापुरात घेऊन येते. इथं तिला हवं असलेलं सत्तासामर्थ्य लाभतं. एक सम्राज्ञी म्हणुन देवयानी यशोगाथा बनली असली तरी एक पत्नी म्हणुन एक जिवंत शोकांतिका बनुन वावरत राहते! खांडेकरांनी ही कादंबरी लिहिताना ज्या स्रोतांचा संदर्भ घेतला आहे तिथं एका ठिकाणी ती ययातीने शर्मिष्ठेला तीन पुत्र दिले आणि आपल्याला दोनच पुत्र दिले अशी तक्रार करत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तिला ययातीने आपल्याशी केलेल्या प्रतारणेविषयी खंत नाही. पण तत्कालीन संदर्भानुसार स्त्रीला समाजात ज्या बाबींमुळं मान मिळायचा त्या पुत्रांच्या बाबतीत ययातीने दुजाभाव केल्याची खंत ती बाळगुन आहे.  

सद्यकालीन समाजाशी तुलना करता येनकेनप्रकारे प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजातील मनोवृत्तींसोबत देवयानीची तुलना होऊ शकते. इथं ह्या प्रतिष्ठेच्या मागं धावताना जीवनातल्या गमावलेल्या अनेक अमुल्य गोष्टींचं भान अशा मनोवृत्तींना राहत नाही !

शर्मिष्ठा 

केवळ एका दुर्दैवी घटनेमुळं आपलं राजकन्यापद सोडुन देऊन शर्मिष्ठेला देवयानीचं दासीत्व पत्करावं लागतं. शुक्राचार्यांच्या रागीट स्वभावाची पुर्ण कल्पना असल्यानं त्यांच्या मुलीचा हा दुराग्रह पुर्ण न करण्यामुळं होऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांचा तिला पुर्ण अंदाज आहे. आपल्या ज्ञातीसाठी स्वतःच्या जीवनातील सर्व सुखांचा ती त्याग करण्यास तयार होते. तिनं केलेल्या ह्या त्यागासाठी सद्यकालीन समाजात समांतर उदाहरण मिळणं तसं कठीणच! परंतु शर्मिष्ठा हस्तिनापुरात आल्यावर पुर्णपणे आपल्या नशिबाला दोष देत बसलेली दिसत नाही! ययातीने शर्मिष्ठेला वश केलं की त्यासाठी शर्मिष्ठेनं स्वतःहुन काही पावलं उचलली असावीत ह्याची खोलवर मीमांसा करण्याइतका  माझा अभ्यास नाही ! परंतु शेवटी ययातीच्या हृदयातील स्थानाच्या बाबतीत देवयानीवर कुरघोडी करण्यात ती यशस्वी होते! इतकंच नव्हे तर तिचा पुत्र पुरु अत्यंत सुस्वभावी आणि कर्तृत्ववान निघतो. पित्यासाठी आपलं तारुण्याच नव्हे तर देवयानीच्या मुलासाठी राज्यावरील आपला अधिकार सोडुन देण्यास तो तयार होतो. त्याच्या ह्या वागण्यानं देवयानीसारख्या स्त्रीचं हृदयपरिवर्तन करण्यात त्याला यशही मिळतं ! 

सद्यकालीन समाजातील आपल्या मेहनतीनं अधिकारपदाकडं वाटचाल करणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व शर्मिष्ठा करते असं ढोबळमानाने विधान आपण करु शकतो ! कठोर तपस्या करणारा कच बहुदा समाजातील ज्ञानपूजक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो.

मुकुलिका, अलका या दासींची वर्णनं ह्या कादंबरीत विस्तारानं येतात. ह्या दासी कुशाग्र बुद्धीच्या असाव्यात. स्वपराक्रमावर मोठाली युद्धं जिंकुन आणणाऱ्या ययातीसारख्या यशस्वी सम्राटाला सर्वपरीनं त्या समाधानी ठेवतात! इथं एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. देवयानी असो की ययातीची आई असो; सम्राज्ञीपणाच्या भूमिकेच्या ओझ्याखाली कुठंतरी ह्या स्त्रिया एक पत्नी म्हणुन कमी पडत असाव्यात !  आणि म्हणुनच ह्या बुद्धिमान दासींची ह्या कथांमध्ये आणि सम्राटांच्या आयुष्यात महत्वाची भुमिका ठरते !

खांडेकरांच्या प्रतिभेचा  मेरु ह्या कादंबरीत चौखेर उधळला आहे! आपल्या ह्या काळातील जीवनाचं हुबेहूब वर्णन ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. मी पुर्णपणे ह्या कादंबरीशी आणि तात्कालीन व्यक्तिरेखांसोबत समरस होऊन गेलो ! एक अजरामर पौराणिक कथा आणि त्या कथेला यथायोग्य न्याय देणारा तितक्याच ताकदीचा प्रतिभाशाली साहित्यिक असा दुग्धशर्करायोग ह्या कादंबरीच्या निमित्तानं जुळून आला आहे. ह्या कादंबरीतील प्रत्येक वाक्य साहित्यिक श्रीमतीनं ओथंबुन भरलं आहे! ह्या रसाचा अत्यंत शांत मनःस्थितीत आस्वाद घेण्यासाठी ह्या कादंबरीचं पुन्हा सखोल वाचन करणं अनिवार्य आहे असा माझा समज आहे ! खांडेकरांना आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला माझा सादर प्रणाम! सद्यकाल AI, ML, Cloud ह्या दिशेनं कितीही वेगानं जात असला तरी साहित्यातील अशा अमुल्य ठेव्यांचा आपण स्वतः आनंद घ्यावा आणि जमल्यास पुढील पिढीपर्यंत सुद्धा ह्या ठेव्यांचं हस्तांतरण करावं ही माझी कळकळीची विनंती!

Thursday, December 19, 2019

तु असा / अशी ऐकत रहा !




आधुनिक काळात अनेक सुखं आहेत, तशा समस्याही आहेत! सोशल मीडिया वगळता आपण सहसा आपल्या आनंदी क्षणांची वाच्यता करण्याचं टाळतो. आपल्या समस्या एकंदरीत आपल्या विचारप्रक्रियेचा मोठा हिस्सा व्यापुन टाकतात. ह्यातील बऱ्याच समस्या त्वरित सुटणे शक्य नसते; त्यांच्यावर विचार करुन त्यांच्या उत्तरांच्या दिशेनं वाटचाल होईल हा ही ग्राह्य पर्याय नसतो. सतत आपल्या समस्यांचा विचार करत राहिल्यानं आपल्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत राहतो. 

समस्यांनी त्रस्त झाल्यानं आपण सारासार विचार करत नाही आहोत हे ही आपल्यातील बऱ्याच जणांना उमगतं. त्यामुळं लवकरात लवकर ह्या मनःस्थितीतुन बाहेर कसं पडता येईल ह्याकडे सर्वांचा कल असतो. ह्यावर जालीम उपाय असा नाही. काळ हा सर्व समस्यांवर उपाय आहे हे आपण म्हणत असलो तरी काळाने एक समस्या आपल्या नजरेसमोरुन दूर करेपर्यंत बऱ्याच वेळा दुसऱ्या समस्येनं आपलं मनःपटल व्यापुन टाकलेलं असतं. 

ह्या सर्व प्रकारात हल्ली एक आशेचा किरण दिसु लागला आहे, तो म्हणजे आपल्या समस्या ऐकुन घेणारी, त्यावर योग्य सल्ला देणारी अशी मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती बऱ्याच वेळा अशी मंडळी असतात. पण ती आपल्याला गवसली पाहिजेत! ह्या मंडळींची वैशिष्टयं कोणती हे पाहुयात. 

१) ही मंडळी प्रथम तुम्हांला पुर्णपणे व्यक्त होऊ देतात. आपल्याला व्यक्त होताना विचार आणि शब्द ह्यांची योग्य सांगड घालावी लागते. ही सांगड घालण्यासाठी ही मंडळी तुम्हांला मदत करतात. तुम्ही बोलायला आरंभ केल्यापासुन तुमच्या अंतिम मुद्दयापर्यंत प्रवास करताना तुम्ही भरकटत जाण्याची शक्यता निर्माण होते. ही मंडळी शांतपणे तुम्हांला मुळ रस्त्यावर आणुन सोडतात. 

२) तुमचे मुद्दे मांडत असताना तुमच्या भावनांचे चढउतार होत असतात; ही मंडळी तुम्हांला समजुन घेतात. तुमच्या बाह्यदर्शनी कठोर व्यक्तिमत्त्वाचे कोमल , हळवे कंगोरे ह्या मंडळींसमोर उघड करताना तुम्हांला कसलाही संकोच वाटत नाही, कारण ह्यांच्यावर तुमचा पुर्ण विश्वास असतो! 

३) अशा प्रकारे तुम्ही पुर्णपणे व्यक्त झालात की ह्या व्यक्ती तुम्हांसोबत  त्यांची मते शेयर करतात. ह्यात कोणत्याही प्रकारचं मतं लादणं हा प्रकार नसतो, असतो तो फक्त उपलब्ध माहितीचं विश्लेषण करुन शक्य असलेल्या विविध पर्यायांचा निरपेक्ष उहापोह! त्यात शक्य असल्यास ही मंडळी तुम्हांला अशाच मिळत्याजुळत्या अनुभवांची उदाहरणं देऊन तुमच्या चिंतेची तीव्रता कमी करतात. 


अर्थात सर्वांनाच अशा मंडळींची गरज असते असंही नाही ! काही कणखर व्यक्तिमत्वांमध्ये जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगांना एकटेपणाने सामोरे जाण्याची क्षमता असते! अशा लोकांच्या मेंदुचे विश्लेषण कोणी मला पाठवाल का हो? 


बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी भुमिका बजावत आहेत ह्याविषयी आपण पुर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळं कधी त्यांना औपचारिकपणानं Thank You म्हणण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही! त्यांनाही ह्याची म्हणा अपेक्षा नसतेच! 

कधीकाळी ह्या मंडळींना सुद्धा कोणत्यातरी समस्येने ग्रासु शकते. पण होतं काय की आपण आपल्याच विश्वात रममाण असतो; त्यांनाही त्यांच्या समस्या आपणासोबत शेयर करण्याची कदाचित सवय नसते! कदाचित त्यांची नजर, सुप्त संदेश  आपल्याला हे सांगुन जात असावी! पण आपण हे सारं ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नसतो. 

विश्वाचा प्रवास आपल्या नजरेतुन असाच पुढे चालु राहतो !!

Tuesday, December 17, 2019

संस्कृतीतरंग !




कालच्या पोस्टमध्ये वर्णन केलेल्या बैठकीनंतर मला एक दिवसीय प्रशिक्षणाला धाडण्यात आलं. धाडण्यात आलं हा सयुक्तिक शब्दप्रयोग अशासाठी की अशा प्रशिक्षणांना हजेरी लावण्याबाबत मी फारसा उत्सुक नसतो. जगभरातील विविध संस्कृतीच्या लोकांसोबत काम करताना कोणत्या मनोवृत्तीची (Mindset) आवश्यकता आहे ह्याविषयी हे प्रशिक्षण होते. ह्या प्रशिक्षणांची एक गंमत असते. आम्ही संवादाद्वारे प्रशिक्षण करतो असं म्हणत ही मंडळी आपल्याकडूनच बरंचसं वदवून घेतात. अधुनमधुन चर्चेला मार्गावर आणण्याचं काम ही मंडळी चोख बजावतात. 

ह्या प्रशिक्षणात एक मजेशीर मुद्दा प्रशिक्षकांनी मांडला. आपण भारतीय लोक कसे भावनिकरित्या सगळीकडे गुंतत राहतो हा तो मुद्दा !पाश्चात्य देशातील सहकारी आला की कंपनीच्या प्रवेशद्वाराशी रांगोळ्या काढतो. त्यांना कुर्ता, साड्या नेसवुन रंगीबेरंगी कपड्यात छायाचित्रे काढतो. हल्ली तर त्यांना बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्यसुद्धा करावयास लावतो! पण हेच आपण तिथं अमेरिकेत एका आठवड्यासाठी गेलो तर बऱ्याच वेळा आपले आपण असतो. एखादया सायंकाळी सर्वांसोबत डिनरला जाऊन आलो की सामाजिक बांधिलकीचं ओझं बहुदा संपते. अर्थात ह्याला हल्ली बरेच सन्माननीय अपवाद निर्माण झाले असावेत. 

अजून एक मुद्दा समजा आपले आणि ह्या परदेशी सहकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले की बऱ्याच वेळा त्यांच्या बाजुनं वैयक्तिक ऋणानुबंध कमी होतात. पुन्हा एकदा कदाचित ही निरीक्षणे काही वर्षापुर्वी खरी असावीत. हल्ली ह्यात खुप बदल घडुन आला आहे. मुख्य मुद्दा आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतींमध्ये कसा फरक होता हे समजुन घेऊन त्यानुसार आपल्या व्यावसायिक अपेक्षांमध्ये, वागणुकीत योग्य बदल घडवून आणण्याविषयी होता. काही प्रशिक्षणार्थी पूर्वेच्या आणि युरोपातील सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव मांडले. 

ह्यातील आपल्या संस्कृतीतील भावनिक गुंतवणुकीच्या मुद्द्याचा धागा पकडुन पुढे सरकूयात. ह्या सोशल मीडियाचा उद्रेक ज्या वेळी सर्वप्रथम झाला त्यावेळी काही काळातच आपण सर्वांनी ह्याच्या माध्यमातुन जुन्या काळाकडे धाव घेतली. जुन्या संस्कृतीला, गाण्यांना, मित्रमंडळींना एकत्र आणलं! आपण सर्व अगदी भावनाविवश होत ह्या जुन्या काळाच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो. चाळिशीनंतर करिअर वगैरे गौण बाब आहे, ज्याच्या भोवताली मित्रमंडळी तोच खरा  श्रीमंत वगैरे वाक्य ऐकावयास आली! 

पण काही मंडळींनी मात्र ह्याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्या करियरला नवचैतन्य दिलं. नव्यानं झेप घेतली. सत्तरीच्या पलीकडं सुद्धा व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचा चंग बांधला. 

वरील दोन परिच्छेदात मांडलेल्या दोन भिन्न मतप्रवाहांपैकी कोणता एक बरोबर आणि दुसरा  चुकीचा असं मी म्हणत नाही. दोन्हींच्या आपल्या परीनं चांगल्या वाईट बाजु आहेत. गेल्या महिन्यातील माझ्या अनुभवावरुन मी दुसऱ्या पर्यायाकडे काहीसा झुकला गेलो असलो तरी ही तात्कालिक स्थिती असु शकते. 

सारांश इतकाच की सांस्कृतिकदृष्या पाहायला गेलं तर आपण भावनिक मंडळी! त्यामुळं आपले बरेचसे निर्णय भावनेच्या भरात घेतले जाण्याची शक्यता अधिक असते. ह्या गोष्टीचे भान राखत योग्य ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे सारासार विचार करुन बौद्धिक निर्णय घ्यावा ही विनंती!

रस्सीखेच



जवळपास दोन महिन्यानंतर आजची ही पोस्ट ! डिसेंबराच्या पहिल्या सोमवार - मंगळवारी एक वरिष्ठ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. अमेरिकेहुन उच्च अधिकारी आले होते. आपला देश का व्यवस्थित चालतो हे जाणुन घ्यायला अशा बैठकी उपयोगी पडतात. दोन दिवसाच्या ह्या बैठकींमध्ये एकेका मिनिटाचा हिशोब ठेवून सादरीकरण केलं गेलं. पुढील वर्षाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्यानं उपस्थित मंडळी अगदी तन्मयतेनं सर्व सादरीकरणात सहभागी होत होती. व्यावसायिक पातळीवरील जोशात येऊन प्रश्नोत्तरे होत होती. 

ह्यातील एका गटाच्या सादरीकरणात माझाही सहभाग होता. तयारी अगदी बऱ्याच दिवसांपासुन सुरु होती. कोणती स्लाईड कोणी सादर करायची, तिथं नेमकं काय बोलावं ह्याची सखोल तयारी करण्यात आली होती. प्रेसेंटेशन्सना व्यावसायिक रुप देण्यासाठी एका वेगळ्या गटाची मदत घेण्यात आली. सादरीकरण बऱ्यापैकी चांगलं पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या प्रकारातील व्यावसायिक बैठका होत असतात. इथं प्रत्येक  शब्दाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायचा असतो. त्यामुळं प्रत्येक स्लाईड, स्लाईडवरील प्रत्येक वाक्य / शब्द खरोखर आवश्यक आहे का? त्यांची क्रमवारी योग्य आहे का ह्याचा सर्वागीण विचार केला जातो. हा झाला आपला प्रगतशील भारत! इथं तुमच्या कर्तृत्वावर आपलं भाग्य घडविण्याची तुम्हांला पुरेपूर संधी दिली जाते. 

ह्या भारताकडुन भोवतीच्या दुसऱ्या भारताकडं वळल्यानंतर मात्र बरीच निराशा होते. ह्या भारतात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेलच ह्याची खात्री नसते कारण इथं प्रस्थापितांचे राज्य असतं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सारासार विचार करण्याच्या वृत्तीपासून आपण अधिकाधिक दुर जात चाललो आहोत असं दिसतं. 

ब्लॉग लिहुन कोणताही प्रश्न सुटेल ह्याच्यावरील माझा विश्वास बऱ्याच आधी उडाला आहे. त्यामुळं हल्ली पूर्वीइतक्या जोमानं ब्लॉग लिहणं मी खुपच कमी केलं आहे. हल्ली सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा वडीलधारी / जाणकार माणसांचे ऐकुन घेण्याची तयारी राहिली नाही. 

व्यावसायिक जगात प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकाराची जागा दिली गेली असते. कोणी अधिकाराच्या पोस्टवर किती काळ राहावं ह्याचा निर्णय योग्य मंडळी घेत असतात. एकदा का एक व्यक्ती अधिकाराच्या जागी नियुक्त झाली की तिचे निर्णय ऐकून घेणं हे त्या व्यक्तीच्या संघातील सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळं त्या संघातील निर्णयांत, कृतीत एकवाक्यता येते. संघाच्या यशस्वी होण्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढीस लागते. 

आपल्या सार्वजनिक जीवनात सुद्धा कुठंतरी व्यावसायिक जीवनातील ह्या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. नाहीतर एकीकडं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशाला पुढे नेत राहणार परंतु बाकी क्षेत्रात योग्य व्यक्ती अधिकाराच्या जागी नसल्यानं आपल्या देशाच्या प्रगतीवर प्रचंड मर्यादा निर्माण होत राहणार ! ही रस्सीखेच थांबायला हवी ! 

Saturday, October 19, 2019

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.

ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


Sunday, October 6, 2019

बारावीच्या पाल्यांची तणावाची स्थिती !



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत बहुतांशी पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी आणि माझा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र राहुल ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीच्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेचे माहात्म्य कमी होत असलं तरी ह्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हांला किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  

या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! 

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आयआयटी मेन्स या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आयआयटी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आयआयटी मेन्स या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी मिळते.  जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यात ही परीक्षा घेण्यात येऊन ह्या दोघातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. या परीक्षेत गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPIT मध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? सध्या बऱ्याच ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्क्यांची अट घालण्यात आल्यानं तुलनेनं सोप्या असलेल्या HSC बोर्डात प्रवेश घेण्याकडं विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.  

आता महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास आहे ज्यात आपण प्रवेश घ्यायला हवा !


सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला ह्या क्षणी मात्र या क्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी ऍडव्हान्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

आपल्या मुलाची क्षमता किती आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आपल्याला आधीपासुन कळायला हवं असंच सर्व पालकांना वाटत असतं. परंतु हे माहिती करुन घेण्यासाठी खात्रीलायक असा मार्ग नाही. त्यामुळं सर्वजण सर्वात महत्वाकांक्षी पर्यायाची म्हणजेच IIT Advanced ची तयारी करुन घेणाऱ्या शिकवणी वर्गांची निवड करतात. हे क्लास घेणारे सुद्धा स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेऊन तुमच्या मुलाच्या खऱ्या क्षमतेचं चित्र केव्हाही तुम्हांला सांगत नाही. साधारणतः एका वर्षांनी वगैरे आपल्याला IIT Advanced झेपणार नाही हे उमजुन चुकलेली अनेक उदाहरणं मी ऐकली आहेत. परंतु ह्यावेळी तुमचे परतीचे सर्व मार्ग कापले गेलेले असतात. त्यामुळं भावनाविवश न होता आपल्या मुलांच्या क्षमतेचं वस्तुनिष्ठ परीक्षण करुन मगच योग्य पर्याय निवडावा !

बाकी ह्या सर्व बारावीला असणाऱ्या मुलांना इतक्या तणावातून आपण का जायला भाग पाडत आहोत? स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाची परीक्षा आणि IIT प्रवेशासाठी IIT च्या परीक्षा असा सोपा मार्ग का अवलंबु नये? अगदीच झालं तर स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाच्या परीक्षेसोबत तुम्हांला IIT मेन्स विचारात घेता येईल. जेणेकरून मुलांची एका अधिकच्या प्रवेशपरिक्षेतुन (CET) सुटका होईल. 

इथं दोन बाबी जाणवतात. पहिली म्हणजे आपण शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडला आहे. पालकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचे ह्या प्रवेशपरीक्षा हे एक साधन बनले आहे. दुसरी बाब म्हणजे आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट बनविण्यात आपला कोणी हात धरु शकणार नाही !



Saturday, September 28, 2019

लेट गो ते मायेचे पंख !


बहुदा "लेट गो" हा आजच्या जीवनांचा मुलमंत्र असावा! कार्यालय अथवा कार्यालयाबाहेरील आपले वैयक्तिक, सार्वजनिक जीवन असो! हल्ली अप्रत्यक्ष संघर्षाचे प्रसंग वारंवार येत असतात. हल्ली कोणी थेट वाद घालत नाही. मोजक्या शब्दांतुन कटु संदेश दिला जाणं, महत्त्वाच्या बैठकी, समारंभ, चर्चा ह्यातुन वगळलं जाणं किंवा आपल्या उपस्थितीची दखल घेतली न जाणं अशा प्रसंगांना बऱ्याच वेळी जनांना तोंड द्यावे लागते. दुनियेत हल्ली वाचाळ अर्थात Loud जनांचे प्रमाण वाढत चालले आहे.  आपलं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी अशा मोठ्यानं आरडाओरडा करण्याच्या संस्कृतीचा प्रसार वेगानं होऊ लागला आहे. 

बहुतांशी संवेदनशील माणसे अशा अनुभवामुळे एकतर निराश होतात किंवा काही प्रमाणात खचुन जातात. या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक तर काही काळ जाऊ देण्याची किंवा कोणाच्या मानसिक आधाराची गरज लागते.  प्रत्येक वेळी अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काळ जाऊन देणे शक्य होत नाही. कारण अशा अप्रिय प्रसंगांची आणि आपली भेट वारंवार होत असते.  त्यामुळे आपल्याला मानसिक आधार देऊ शकेल अशा व्यक्तीची आपल्याला बऱ्याच वेळा गरज भासत असते. 

पुढील काळात लोकांशी केवळ बोलून त्यांना मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींना खूपच मागणी येईल असं मला वाटतं! मुळ मुद्द्याकडे परत वळूयात!  इथं बहुदा आपल्या या संवेदनशील स्वभावाकडं आत्मपरीक्षणाच्या नजरेतुन पाहणं इष्ट! आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विचार करावा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला उत्तर देण्यात आपली शक्ती खर्च करावी. त्यापलीकडे आपण डेटा पॉईंट तत्व लक्षात घ्यावे. 

आपल्या आयुष्यात असंख्य डेटा पॉईंट असतात. ह्यातील काही कार्यालयात, काही वैयक्तिक जीवनात आणि काही तुमच्या दररोजच्या प्रवासात येतात. यातील प्रत्येक डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला विजय मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हांला जर काहीसा अप्रिय अनुभव येत असेल तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनातील आपल्या विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये.  इथे हमखास आपल्या मनातील आपली ही प्रतिमा उंचावता येईल येईल असा एखादा डेटा पॉईंट निवडावा, स्वतःला चांगल्या मनस्थितीत आणावं आणि आयुष्यात पुढं जावं! नाहीतर इतक्या संघर्षपूर्ण जीवनामध्ये तुम्हांला सतत मानसिक त्रास सहन करावा लागेल. 

आता हे झालं सध्याच्या पिढीचे! पुढच्या पिढीचं कसं होणार याबाबतीत मात्र काहीशी चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या पिढीची त्यांच्या मनामधील स्वप्रतिमा कशी आहे याविषयी बरंच संशोधन व्हायला हवं! या नवीन पिढीतील बऱ्याच मुलांच्या मनात स्वतःच्या एका अवास्तव प्रतिमेचं भुत शिरलेलं असतं. ही आभासी प्रतिमा त्यांनी आणि कदाचित त्यांच्या पालकांनी बनवून ठेवलेली असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात या आभासी प्रतिमेचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य जाते. परंतु त्यानंतर मात्र ही आभासी प्रतिमा आणि आपण वेगळे आहोत याचे खडतर जाणीव त्यांना होऊन जाते. 

आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आपल्या कठीण काळात विनाअट त्यांच्या पंखाखाली घेतलं. आपण कधीकाळी संकटात सापडलो तर कशामुळे आपण संकटात सापडलो याची अजिबात चौकशी न करता unconditionally  त्यांनी आपल्याला आधार दिला. परंतु हीच घटना आपल्या आणि पुढील पिढीच्या बाबतीत मात्र कशाप्रकारे घडेल याविषयी मी साशंक आहे.  एकतर ही पुढील पिढी ज्यावेळी त्यांना मानसिक आधाराची  गरज असेल त्यावेळी खरोखर आपल्याला साद देईल का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. कदाचित दुसऱ्यांची (यात त्यांचे पालकसुद्धा समाविष्ट ) मदत मागणे  हे त्यांना कमीपणाचे वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा प्रसंग उद्भवला असता या पिढीला पंखाखाली घेणे हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारला हवा!  

Sunday, September 22, 2019

Happening जागा, गोष्टी वगैरे वगैरे



बहुसंख्य वर्गापासुन आपणाला वेगळं दाखविण्याची मानसिकता कदाचित पुर्वीपासुन अस्तित्वात असेल. हल्ली ही मानसिकता अधिक प्रकर्षानं व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळं सहजगत्या जाणवु सुद्धा लागली आहे. 

Happening Places चे मुळ उदाहरण बहुदा  Page ३ वर अवतीर्ण होणाऱ्या पार्ट्या हे असावं. सेलिब्रिटी / वलयांकित माणसं वेगळी आणि आपण वेगळे ही मानसिकता पुर्वी अस्तित्वात असायची. मग आपण सुद्धा Happening Places च्या स्थानिक आवृत्त्या का निर्माण करु नयेत हा विचार जनमानसात जोर धरु लागला. इथं मग बहुसंख्य वर्गापासुन दुर पळता पळता बहुसंख्य वर्गच Happening Places / थिंग्स मध्ये समाविष्ट होण्याची, त्यांचं वेगळेपण नाहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली.   

Happening Places / Things ची बहुसंख्यांनी अंगिकारलेली उदाहरणे आजुबाजूला मुबलक प्रमाणात सापडतात. निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, दीर्घ पल्ल्याच्या शर्यती, सामाजिक कार्य, आपत्कालीन जनसमुदायाला मदत, विशिष्ट नैसर्गिक घटनेला भेट ह्या खरंतर खरोखरीचा निर्मळ मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टी! पण आपण Happening Places/ Things मध्ये समाविष्ट आहोत हे  दर्शविण्याचा हेतू ज्यावेळी ह्या गोष्टींत शिरतो त्यावेळी मात्र मग त्यातील निर्मलता काही प्रमाणात गढुळ बनते. ह्या गोष्टी करणारे सर्वचजण केवळ ह्या हेतूने ह्यात शिरकाव करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, तरी पण !!!

Happening Places / Things ची अजुन एक आवृत्ती म्हणजे आपल्या पाल्यांचा आयुष्यातील Happening Path !! विशिष्ट बोर्डात शालेय / महाविद्यालयीन शिक्षण, IIT किंवा तत्सम संस्थेत प्रवेश, परदेशशिक्षण वगैरे वगैरे ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश म्हणजे काय ह्याचा आपण एक बिंदु ठरवुन दिलेला आहे! ह्या विविध टप्प्यावरील बिंदूंना जोडुन काढलेली रेषा म्हणजेच हा Happening Path! ह्या रेषेपासून आपलं अंतर थोडंजरी वाढलं की बेचैन व्हायला होतं आपल्याला ! पण गंमत पहा ना ! शिक्षण संपल्यावर हा Happening Path तुम्हांला / तुमच्या पाल्याला एका शिखरावर सोडुन देतो आणि मग पुढं काय होऊ शकतं ह्याविषयी कोणीही खात्रीलायक मार्ग सांगु शकत नाही!

आपल्याला ह्या Happening गोष्टींचं इतकं वेड का असतं? आपण इतरांच्या नजरेतुन कुल व्हावं म्हणुन कदाचित ! गंमत अशी झालीय मित्रांनो, आपण सर्वचजण ह्या शर्यतीत उतरल्याने ह्यात न उतरणारे आता कुल वाटु लागलेत ! परवा एक मित्र भेटला, अगदी सहजपणे तो म्हणाला, अरे मी फेसबुक, व्हाट्सअँप, ट्विटर अगदी कुठेही नाही आणि त्यावाचुन माझं काही अगदी अडत नाही ! मला इतका कुल वाटला तो सांगु !!!

Sunday, September 8, 2019

आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील आव्हानं !


नुकत्याच येऊन गेलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील असणाऱ्या आव्हानांचा आढावा घ्यावा असे आमचे नातलग संदेश राऊत यांनी सुचविले. 

शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात हे पुर्वी म्हटलं जायचं, लोकांच्या मनात खरोखरीची ती भावना असायची! त्यावेळी शाळा-कॉलेजातील वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी याचा आपण विचार करुयात.  गुरुवर्य हा भगवंतासमान ही विचारधारणा घेऊन बहुतांशी विद्यार्थी शाळा-कॉलेजात जात असत. यामागं बहुदा घरातील शिकवण, संस्कार कारणीभुत असावेत. शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळतं त्यामुळं मुलं मार्गाला लागतात, शिक्षकांकडुन मुलांवर जीवनावश्यक संस्कार होतात ही धारणा त्यावेळी पालक बाळगुन असत.  

शिक्षकांना योग्य आर्थिक मोबदला देणं हे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हतं. परंतु आपल्या परीने शेतातील पिकणारं धान्य, आपल्या व्यवसायातील उत्पादित होणाऱ्या वस्तु ह्या शिक्षकांना भेट देऊन शिक्षकांप्रती आपल्याला असलेला आदर व्यक्त केला जात असे.  ज्ञानधारणेसाठी विद्यार्थी बहुतांशी शिक्षकांवर अवलंबुन असत. ग्रंथवाचन वगैरे मार्ग महाविद्यालयात गेल्यावर उपलब्ध होत असत, परंतु सर्वानाच ते सहजासहजी उपलब्ध नसत. शिक्षकांना फी दिली म्हणजे त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचा आपला हक्क आहे ही भावना जी आज मुळ धरु लागली आहे,  ती त्या काळी अस्तित्वात नव्हती. 

बहुतांशी शिक्षक वर्ग हा विषयाशी संबंधित संदर्भग्रंथांचं खोलवर वाचन करीत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा शालेय / महाविद्यालयीन वर्गांमध्ये मुलांना एका अमर्याद अशा ज्ञानदालनाची आनंददायी सफर घडत असे! केवळ शब्दांनी आणि शिक्षकांच्या आदर्श वर्तवणुकीच्या माध्यमातुन मुलांची आयुष्य घडत, त्यांच्यावर जन्मभराचे संस्कार होत असत. मुलांचा मेंदु हा ज्ञानग्रहणासाठी शाळा-कॉलेजात आल्यानंतरच सक्रिय होत असे.  घरी असताना त्यांच्याकडं ज्ञानग्रहणासाठी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त फारसे स्त्रोत उपलब्ध नसत. त्यामुळं शिक्षकांसमोर ज्ञानासाठी आसुसलेला विद्यार्थीवर्ग उपलब्ध असे. 

शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीतून पाहिलं असता बऱ्याचवेळा त्यांना शिक्षक ह्या भुमिकेच्या जोरावर वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांपासुन काहीशी सुटका मिळत असे. एकंदरीत शिक्षकानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायलाच हवं असं दडपण नसे ! शिक्षकांना दैवत्वाच्या गाभाऱ्यात बसवुन त्यांच्याप्रती असलेलं आपलं आर्थिक दायित्व झटकुन टाकायला समाज मोकळा होत असे. 

काळ खुप बदलला. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांची मानसिकता बदलली. 
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं  बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं.  त्यामुळे उत्तम शिक्षकांना या पेशाकडे कायमचं टिकवून धरणे कठीण होत चाललं आहे! ज्ञानधारणेपेक्षा गुण मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढु लागला. त्यामुळे शिक्षक म्हणजे गुण मिळवून देणारे एक साधन आणि आपण त्यासाठी फीचे मोल मोजणारे उपभोक्ता ही अत्यंत चुकीची भावना काही प्रमाणात निर्माण झाली.  

त्याचप्रमाणे घरामधील संवादांमधुन शिक्षकांविषयी दिसण्यात येणारी आदरभावना सुद्धा संपुष्टात येत चालली आहे.  ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असंख्य स्त्रोत निर्माण झाले आहेत. पुर्वी  शिक्षक मिळालेल्या माहितीची वैधता तपासुन घेऊन त्यानंतरच ते विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. ती अचुकतेची शक्यता विद्यार्थ्यांपुढे आज उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांच्या बाबतीत खरी ठरत नाही. इंटरनेटच्या माध्यमातुन मिळालेलं  बरेचसं ज्ञान हे जरी शंभर टक्के अचूक नसलं तरी त्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसण्याची शक्यता जास्त असते. या सहजासहजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उगाचच बळावतो.  पुर्वी एखाद्या विषयाबाबतीत कोरा करकरीत मेंदु घेऊन शिक्षकांपुढे येऊन बसणारा विद्यार्थीवर्ग आज उरला नाही. हा विद्यार्थीवर्ग आधीच काही बरोबर आणि काही चुक अशा संकल्पनांचं ओझं घेऊन शिक्षकांपुढं बसतो. अशावेळी त्यांच्या मेंदुतील चुकीच्या संकल्पनांना दुर करुन योग्य संकल्पनांना त्या मेंदुत जागा करण्याची वाढीव जबाबदारी शिक्षकवर्गापुढं आहे! 

शिक्षकांकडून आपल्याला संस्कार, जीवनज्ञान मिळतं अशा काही संकल्पना अस्तित्वात आहेत याची जाणीवच या विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांशी वर्गांमध्ये संवाद साधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे काहीसं  मित्रत्वाकडे झुकणारे असावं ह्या अधिकच्या ओझ्याचे बोजे शिक्षकवर्गावर आहे. 

कुठंतरी एक मोठी चुक घडत आहे. गुरुजनांविषयी असणारा आदर पुढील जीवनातील व्यक्तीच्या संस्कारी वर्तवणुकीचा पाया बनत असे. आयुष्यात केव्हाही आपण चुकीचं वागल्यास आपल्या शिक्षकांना काय वाटेल हा विचार सदैव मनात राही! आज ह्या विचाराचं बंधन विद्यार्थ्यांवर नाही! 

राहता राहिला शिक्षकवर्ग! दैवत्वाच्या गाभाऱ्यात अजुनही त्यांनी राहावं ही पालकवर्गाची अपेक्षा, उच्चशिक्षणाच्या आपल्या महत्वाकांक्षांना त्यांनी येनकेनप्रकारे बळ द्यावं ही विद्यार्थीवर्गाची अपेक्षा आणि शेजारच्या घरातील कमावत्या माणसाप्रमाणे त्यांनीही पैशाचा ओघ सुरु ठेवावा ही घरातल्या माणसांची अपेक्षा!  ह्या पुर्णपणे भिन्न दिशांना तोंड करुन असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत जमेल तितकं ज्ञानग्रहणाचे आणि ज्ञानदानाचे कार्य हा शिक्षकवर्ग आजच्या काळात बजावत आहे !

Friday, August 16, 2019

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

Friday, August 2, 2019

संसार से भागे फिरते हो !





एका निवांत अशा शनिवार सकाळी आज फुरसतीने जाग आली. कोणालाही शाळा ऑफिसात जायचे नसल्यामुळे जाग येऊन सुद्धा घड्याळाकडे पाहण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु ज्यावेळी उठून घड्याळाकडे पाहिलं, त्यावेळी सव्वासात वाजलेले पाहून काहीसं आश्चर्यच वाटलं. पावसाळी ढगांनी अंधार केला असल्यामुळे इतके वाजून गेले तरी कळलंच नाही. 

प्रत्येक शनिवारी सकाळी मनात काहीशी संभ्रमाची परिस्थिती असते.  पुढील दोन दिवस नक्की काय करावं म्हणजे मनाला समाधान वाटेल हा विचार शनिवार सकाळी चहा पिताना प्रकर्षानं वावरत असतो. ह्या क्षणी आपल्यासमोर काही पर्याय असतात. वसईला एखादी फेरी मारावी, सर्व कुटुंबियांना भेटुन यावे, मुंबईतील नातेवाईकांना भेटावं  हा पहिला विचार डोक्यात घोळत असतो. 

कार्यालयीन कामांमध्ये विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासारख्या काही बाबी असतात. पाचही दिवस यावर सखोल विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला नसतो.  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यासाठी काही वेगळा वेळ काढून मनातील विचार सुसंगतपणे मांडावेत, ते योग्य लोकांपुढे ई-मेल द्वारे पोहोचवावे हा विचार प्रामुख्यानं मनात येतो. 

घरातील पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत क्वालिटी टाइम व्यतित करावा हाही विचार मनात असतोच! परंतु आपण ज्यावेळी क्वालिटी टाइम व्यतित करण्याच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी त्यांनीसुद्धा त्याच मूडमध्ये असणे आवश्यक नसते. अशाप्रकारे चहा संपेपर्यंत मनामध्ये ह्या सर्व आदर्शवादी विचारांची यादी अस्ताव्यस्त स्वरुपात का होईना पण तयार झालेली असते!

शनिवार हळूहळू पुढे सरकत जातो. दैनंदिन व्यवहारातील गोष्टी बऱ्याच वेळा प्राधान्यक्रमात आदर्शवादी विचारांच्या वरती जात राहतात. या सर्व प्रकारात अजून एक गोष्ट होत राहते. शनिवारचे इतके तास गेले तरीही आपण ठरवलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट सुरु केली नाही ह्याविषयी काहीशी अस्वस्थता मनात निर्माण झालेली असते. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आधी जे काही घडून गेलं ते विसरून जाऊन उपलब्ध असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा उर्वरित प्रत्येक मिनिट आणि तास ह्यांचा आपण मुळ उत्साहाने आदर्शवादी गोष्टींवर काम करण्यासाठी वापर करू शकतो. 

या आठवड्यात एका रात्री परत येताना मीनाकुमारीची बरीचशी गाणी कारमध्ये ऐकण्याचा योग आला. त्यामध्ये आधी ऐकलेलं, पुन्हा आवडून गेलेलं "संसारसे भागे फिरते हो भगवान को क्या पाओगे " हे गाणं पुन्हा ऐकलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी ते युट्युबवर पाहिलं, व्हाट्सअप स्टेटसवर टाकून दिलं! व्हाट्सअँप स्टेटस किती दिवसांनी, मिनिटांनी बदलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? शेवटी भगवंत हा काही केवळ मंदिरात, तीर्थक्षेत्रातच वास्तव्य करत नाही. आपली जी काही कर्तव्यं आहेत ती कर्तव्यं व्यवस्थितपणे पार पाडत असताना, पार पाडल्यावर जी काही कर्तव्यपूर्तीची भावना वा समाधान मनात निर्माण होते ते सुद्धा भगवंताचे एक रूप होय! त्यामुळे आपल्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेकडे प्रत्येकाने योग्य लक्ष देणे हे आवश्यक आहे. 

आता परत वळुयात ते शनिवार सकाळच्या चहाच्या वेळी बनवलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनातून बनवलेल्या आपल्या टुडू लिस्ट मधील गोष्टींकडे! शनिवार पुढे सरकत जातो, शनिवारी रात्री थोडं उशिरा झोपुन विकेंडला अजून जास्त लांबवल्याचं समाधान मानता येतं! 
ह्या सर्वात कधी एकदाचा रविवार उजाडतो ते समजत नाही! एकदा का रविवार उजाडला की रविवारचे सर्व व्याप आटपून सायंकाळ कधी उजाडते हेही समजत नाही! मग मनात उतरते ती एक असमाधानाची भावना!! शनिवारी सकाळी बनवलेल्या आदर्शवादी यादीतील फार कमी कामे पूर्ण झालेली असतात, एका अत्यंत व्यग्र अशा सप्ताहाची चाहूल तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत राहते!

परंतु याच गोष्टीकडं तुम्हांला दुसऱ्या प्रकारे पाहता येईल. तुमच्यापुढं व्यग्र राहण्यासाठी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,  तुमच्याभोवती तुमच्याकडून अपेक्षा असणारी बरेच माणसे आहेत! हे सर्व घटक तुम्ही दुनियेतील काही सुदैवी माणसांपैकी एक असल्याचे प्रतिक आहे.  त्यामुळे रविवार संध्याकाळी केवळ एकच गाणे ऐकावे संसार से क्या भागे फिरते हो !

जाता जाता आज सकाळी पडणाऱ्या धुंद पावसाचं एक छायाचित्र ह्या पोस्टच्या सुरुवातीला ! पावसामुळं काही कामं टाकुन घरात बसणाऱ्या मला माझे ऑफिसात गेलेले मित्र कदाचित "बारिश से क्या डरके बैठे हो !" म्हणत असावेत !!

Sunday, July 21, 2019

२०१९ क्रिकेट विश्वचषक !





हा लेख विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पुर्वसंध्येला लिहिला आहे!

पावसाच्या अवकृपेमुळे दोन दिवस चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा एक अनपेक्षित पराभव झाला. ह्या पराभवामुळं अखिल भारतवर्षाचा या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील रस संपुष्टात आला.  खऱ्या क्रिकेटरसिकांनी विजय आणि पराभव यापलीकडं जाऊन खेळाचा आनंद लुटावा,  या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या काही सुखद आठवणी गोळा करता आल्या त्या मनाच्या कप्प्यात घट्ट झाकून आयुष्याच्या पुढील प्रवासास निघावे या उद्देशाने या स्पर्धेतील काही मनोरंजक क्षणांचा घेतलेला हा आढावा ! 


यश मिळवण्यासाठी गुणवत्ता आणि व्यावसायिकता याचं योग्य मिश्रण तुमच्या संघामध्ये असावं लागतं. पुर्वी निव्वळ गुणवत्तेच्या आधारे कमी प्रमाणात असलेल्या तुमच्यातील व्यावसायिकतेला झाकून ठेवून तुम्हाला यश मिळवता येणं शक्य होतं.  यशासाठीचं हल्लीच्या काळातील व्यावसायिकतेचे आवश्‍यक प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  त्यामुळेच की काय उपांत्य फेरीत व्यावसायिकतेने खेळ करणारे चार  संघ प्रवेश करते झाले. व्यावसायिकचे उदाहरण द्यायचं झालं तर विराट कोहलीच्या मुलाखतीमधील एका विधानाचा इथं संदर्भ देता येईल. त्यानं हल्ली जाणीवपुर्वक एकेरी, दुहेरी धावांवर भर दिल्याचं चित्र दिसुन येतं. आपल्या विकेटला सहजासहजी गमवायचं नाही ह्यावर त्याचा भर दिसुन येतो. 

विश्वचषक स्पर्धेची सुरुवात यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांने झाली. या विश्‍वचषक स्पर्धेच्या दरम्यान डिव्हिलियर्सने आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी अखेरच्या क्षणी केलेल्‍या विनंतीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचली. जर हा गुणवान खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघात असता तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र पहावयास मिळालं असतं. या सामन्यातील पहिल्याच षटकात इमरान ताहिरने बेयरस्टोचा बळी घेऊन आपल्या सुप्रसिद्ध अशा जोरदार धावेचा रसिकांना आनंद लुटू दिला.  इंग्लंडने  रचलेलं ३११ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाला न पेलविल्यानं ह्या संघाचा पराभव झाला. 

विश्वचषक स्पर्धेमध्ये तुमचा संघ कशी सुरुवात करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. खरंतर या स्पर्धेच्या साखळी स्वरूपामुळे एखाद्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाने खचून जायचं तुम्हाला कारण नसतं. हा संघ साखळी स्पर्धेत केव्हा न केव्हा तरी तुम्हाला भेटणारच असतो. परंतु सुरुवातीच्या दोन किंवा तीन सामन्यात जर तुमचा पराभव झाला तर मग मात्र परिस्थिती  काहीशी गंभीर स्वरूप धारण करते, तुम्ही पॅनिक बटन दाबू शकता. दक्षिण आफ्रिका संघाची परिस्थिती सुद्धा स्पर्धेत काहीशी अशीच झाली. बांगलादेशाच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या अंगाशी आला.  त्यानंतरच्या भारताविरुद्धच्या पराभवानंतर मग मात्र त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.  हा खरं तर एक गुणी संघ! परंतु देशातील क्रिडाविषयक काही धोरणांमुळे संघाच्या निवडीमध्ये घातली गेलेली कृत्रिम बंधने या संघाच्या स्वास्थ्यावर परिणाम करतात!

पाकिस्तानचा संघ दोन रुपं बाळगून असतो असं गंमतीने म्हटलं जातं! एक रुप ज्यामध्ये हा संघ अत्यंत गुणवान खेळाडूंचा समूह असतो! उत्तम गोलंदाजी, फलंदाजी यांचं बहारदार प्रदर्शन करून रसिकांची मने जिंकून घेतो.  दुसऱ्या रुपामध्ये मात्र हा संघ विनोदीपणाकडे झुकणाऱ्या अगदी प्राथमिक चुका करतो! त्यांचं हे रूप त्यांना दारुण पराभवाकडे घेऊन जातं.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या रूपाचे प्रदर्शन करीत एक मोठा पराभव स्वीकारला! हा पराभवच आणि त्यातील मोठ्या धावगतीच्या फरकामुळं शेवटी त्यांना बाद फेरीतील प्रवेशापासून वंचित ठेवून गेला. 

तिसऱ्या सामन्यांमध्ये न्युझीलँडने श्रीलंकेला 136 धावांत गुंडाळून दहा गड्यांनी एक मोठा विजय संपादन केला. न्यूझीलंडची गोलंदाजी ही आपलं एक भेदक रुप बाळगून आहे. अनुकूल परिस्थिती मिळताच ते आपलं हे भेदक रुप बाहेर काढतात.  भारतानं ह्या विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यातसुद्धा त्याचा अनुभव घेतला आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीतील सामन्यात ढगांचा मैदानावरील आवरण आणि खेळपट्टीवरील काहीसा ओलसरपणा याची साथ मिळताच त्यांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची जी काही दाणादाण उडवली ती पूर्णपणे अनपेक्षित होती असे म्हणता येणार नाही! 

चौथ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अपेक्षेनुसार अफगाणिस्तान संघाचा पराभव केला. चेंडू अयोग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल एक वर्षाची बंदी घातले गेलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन्ही गुणवान खेळाडूंच्या पुनरागमनाची ही पहिलीच स्पर्धा होती.  डेव्हिडने आपल्या बहारदार फलंदाजीने ही स्पर्धा गाजवली.  या सुंदर फलंदाजीचा श्रीगणेशा त्यानं अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात करत एक बहारदार अशी ८९ धावांची खेळी सजविली. 

पाचव्या आणि सहाव्या सामन्यांमध्ये दोन अनपेक्षित निर्णयांची नोंद झाली अन स्पर्धेत एक अत्यंत चुरसदायक स्थिती निर्माण होण्यास आरंभ झाला. पाचव्या सामन्यामध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ करून सुद्धा त्यांना केवळ 309 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

या स्पर्धेच्या आधी या स्पर्धेमध्ये एका डावात 500 धावांची मजल नक्की मारली जाईल अशा प्रकारची चर्चा जोरात होती. परंतु जाणकार खेळाडूंनी मात्र या चर्चेला जास्त प्रोत्साहन दिले नाही.  द्विपक्षीय मालिकेमध्ये ज्या वेळेस केवळ दोनच संघ सतत पाच-सहा सामने खेळत असतात त्यावेळी हे काही प्रमाणात शक्य असू शकते. परंतु ज्यावेळी एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही ही वेगवेगळ्या नऊ संघांचा मुकाबला करीत असतात त्यावेळी एकदम ५०० धावांची मजल गाठणे एक जवळपास अशक्यप्राय आहे असे जाणकारांचे आणि माझे सुद्धा मत आहे!  खरं म्हणायला गेलं तर बांगलादेश विरुद्ध ३३० धावांची मजल मारणे हे दक्षिण आफ्रिकेला शक्य व्हायला हवे होते. परंतु विश्वचषक सामन्यातील एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि त्याच्या सोबतीने प्रत्येक षटकामागे वाढत जाणारे दडपण याचा मुकाबला त्यांना करता आला नाही. त्यानंतरच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तान आपलं गुणवान खेळाडूंचं पहिलं रुप बाहेर काढलं. आणि इंग्लंडच्या संघाला वास्तवात आणून सोडले. त्यांनी केलेल्या 348 संख्येचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 334  धावाच गाठू शकला. काही खेळाडूंना मोठ्या स्पर्धेच्या मंचावर आपली कामगिरी उंचाविण्याची कला अवगत असते. वहाब रियाझने ह्या स्पर्धेत ह्या कलेचा प्रत्यय क्रिकेट रसिकांना आणुन दिला. 

ही स्पर्धा सुरू होण्याआधी अफगाणिस्तान संघाकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. हा संघ स्पर्धेच्या कालावधीमध्ये किमान दोन ते तीन धक्कादायक निर्णयांची नोंद करेल. अशी अपेक्षा या गुणवंत खेळाडूंनी भरलेल्या संघाकडून केली जात होती.  परंतु या स्पर्धेआधी संघामध्ये काहीतरी गडबड झाली असावी. कर्णधार असलेल्या अफगाणला बाजूला सारून गुलबदीनची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.  या अंतर्गत अस्थिर वातावरणाचा परिणाम म्हणून की काय हा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन तीन वेळा विजयाच्या अगदी समीप येऊन सुद्धा विजयरथ सीमारेषेपलीकडे नेऊ शकला नाही.  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला २०१ धावात रोखूनसुद्धा त्यांना ४० षटकात हे आव्हान पार पाडता आले नाही. 

जगातील सर्वाधिक रसिकसंख्येच्या अपेक्षांचे ओझे बाळगणारा भारतीय संघ शेवटी एकदाचा पाच जून रोजी मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिका या आधीचे दोन सामने हरल्यामुळे इथे दोन शक्यता निर्माण झाल्या होत्या.  पहिली म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून त्यांच्याकडून फारशा संघर्षाची अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती.  दुसरी शक्यता म्हणजे ते पेटून उठून आपली सर्वोत्तम कामगिरी पेश करतील.  परंतु क्रिकेटच्या दृष्टीने पाहिलं तर दुर्दैवी अशी पहिलीच शक्यताच प्रत्यक्षात उतरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतासमोर फारसे आव्हानात्मक लक्ष्य उभे करता आले नाही.  भारतीय संघाने शेवटी जरी काहीसा मोठा असा भासणारा विजय मिळवला असला तरी साधारण ४० व्या षटकाच्या आसपास आवश्यक असलेल्या धावगतीचे प्रमाण प्रति चेंडू एक धाव इतके झाले होते.  हार्दिक पांड्याने एक छोटीशी अशी चमकदार खेळ करून भारताची नैया पार केली. रोहितने ह्या स्पर्धेचा यशस्वी श्रीगणेशा केला !

त्यानंतर झालेल्या न्युझीलँड बांगलादेश या सामन्यामध्ये न्यूझीलंडने अपेक्षेनुसार बांगलादेशचा पराभव केला.  परंतु बांगलादेशने न्यूझीलंडच्या ८ खेळाडूंना तंबूत धाडून सामन्यांमध्ये काहीशी चुरस निर्माण केली होती.  बांगलादेश संघ तरुण खेळाडूंचा संघ असून त्याचे भवितव्य एकंदरीत उज्वल दिसते.  शकीब हसनने आपल्या फलंदाजीच्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर बांगलादेशच्या संघाला एक लक्षात राहण्याजोग्या स्पर्धेचे योगदान दिले. 

ऑस्ट्रेलिया वेस्टइंडीज हा सामना रंगतदार झाला. वेस्ट इंडिज संघामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्ण अशा तरुण खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे.  या तरुण खेळाडूंच्या सोबतीला गेल, रसेल यांच्यासारखे अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये एकावेळी वेस्ट इंडिज संघ विजयासाठी उत्तम स्थितीमध्ये होता. परंतु शेवटी मोक्याच्या क्षणी गोंधळ केल्यामुळे त्यांनी एक सुवर्ण संधी गमावली.  या गुणवत्तापूर्ण संघाच्या आपल्या गुणवत्तेला न्याय न देण्याच्या वृत्तीचे मला बऱ्याच वेळा वाईट वाटते!

त्यानंतरच्या काही सामन्यांमध्ये पावसानेच आपले वर्चस्व गाजविले. पाकिस्तान श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. 

इंग्लंडने बांगलादेश विरुद्ध ३८६ धावांचा डोंगर उभा केला.  बांगलादेशने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ते खरोखर गंभीर असे आव्हान मात्र निर्माण करु शकले नाहीत. 

पावसाच्या  व्यत्ययामध्ये न्यूझीलंडने मात्र आपल्या विजयाचा मेरू पुढे नेणं सुरु ठेवलं.  त्यांनी अफगाणिस्तानचा एका एकतर्फी लढतीमध्ये सात गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशातील क्रिकेटच्या मैदानावरील वैमनस्य आता रंग पकडू लागले आहे. भारतानं शिखर धवनच्या शतकाच्या आणि विराट कोहली, रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५२ धावांचे एक मोठाले आव्हान ऑस्ट्रेलिया पुढे उभे केले.  ऑस्ट्रेलिया संघ एव्हाना भरात आला होता.  त्यांनी स्मिथ आणि करी यांच्या मदतीने या धावसंख्येचा जोरदार पाठलाग केला. परंतु भुवनेश्वर कुमारने एका षटकामध्ये दोन बळी मिळवून त्यांच्या पाठलागाची गाडी रुळावरून घसरवुन टाकली. ह्या सामन्यात शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळं त्याला दुर्दैवानं स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. मागं वळुन पाहता भारतासाठी हा एक मोठा दुर्दैवी क्षण ठरला! 

सुरुवातीच्या चमकदार सामन्यानंतर विंडीजचा संघ एव्हाना खराब कामगिरी करू लागला होता. इंग्लंडने पुढील सामन्यात त्यांचा आठ गडी राखून पराभव केला.  आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या रसेलकडून विंडीजने फार मोठ्या अपेक्षा केल्या असणार.  परंतु दुर्दैवानं रसेल सुरुवातीच्या सामन्यांमध्ये या अपेक्षांना साजेशी अशी कामगिरी करू शकला नाही.  त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला रामराम करावा लागला. 

श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात ऍरोन फिंचने कप्तानाला साजेशी अशी कामगिरी करत दीडशतक ठोकले.  ३३४ धावांचे आव्हान श्रीलंकेला अजिबात पेलवले नाही, त्यांना एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  सतत तीन पराभवाला सामोरे जावे लागल्याने या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात्र एका मोठ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषक निराशाजनक होत असल्याची ही ग्वाही होती.  संपुर्ण आशिया खंडाचे लक्ष लागुन राहिलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी मोठा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाच्या सरफराजच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.  भारत आणि पाकिस्तान सामन्यात या दोन संघातील कामगिरीत, गुणवत्तेत आणि व्यावसायिकतेत बरीच मोठी तफावत दिसून आली. 

नंतरच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने  या पराभवामुळे आलेले नैराश्य दूर सारून उत्तम कामगिरीची नोंद केली. निराशाजनक होत चाललेल्या विश्वचषक स्पर्धेत ३२१ धावा उभारूनसुद्धा वेस्ट इंडिजला बांगलादेशने नमवले.  इथं शकीब हसन आणि लिटन दास या जोडीने चौथ्या विकेटसाठी १८९ धावांची नाबाद भागीदारी रचून विंडीजला पराभूत करण्यात मोलाचा वाटा बजावला.  स्पर्धेच्या या टप्प्यावर फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्मिती झाली होती. 

त्यानंतरच्या सामन्यात कप्तान इओन मॉर्गन याच्या विक्रमी १७ षटकाराच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील सर्वाधिक ३९७ धावांची नोंद केली. त्यानंतर अफगाणिस्तानला २४७ धावांमध्ये रोखून एका मोठ्या विजयाची प्राप्ती केली.  स्पर्धेच्या या टप्प्यावर आघाडीवर असणारे ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ आणि इतर संघ अशी स्पष्ट विभागणी दिसत होती.  त्यामुळे ही विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने एका विशिष्ट मार्गाने होतील अशी भिती वाटू लागली होती.  

उपांत्य फेरीतील प्रवेशाचे आपले आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचा आपला सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यावश्यक बनले होते.  परंतु पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात त्यांना न्यूझीलंड समोर फारसे मोठे लक्ष ठेवता आले नाही.  त्यानंतर विल्यम्सनने कप्तानाला साजेसी अशी १०६ धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला एका कमी धावसंख्येच्या सामन्यात चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. 

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरच्या १६६ धावांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर त्यांनी ३८१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.  बांगलादेशने पुन्हा एकदा लढत देत ३३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतरचा श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना एकतर्फी होईल असाच सर्वांनी अंदाज बांधला होता.  परंतु लसित मलिंगाने ४३ धावात ४ बळी घेत आपल्या संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवुन दिला आणि श्रीलंकेच्या विश्वचषक स्पर्धेतील आव्हानात नवीन जान आणली.  बेन स्टोक्सने एक अप्रतिम खेळी करत नाबाद ८२ धावा केल्या.  ४७ व्या शतकाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्याने मार्क वूडला शेवटचा एक चेंडू खेळावा लागला.  दुर्दैवानं तो तेथे बाद झाला.  जर हा त्यावेळी बाद झाला नसता तर पुढील तीन षटकात काय घडले असते याचा अंदाज बांधणे मनोरंजक ठरु शकते!

भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म बघता भारत अफगाणिस्तान ही लढत एकतर्फी होण्याची अटकळ सर्वांनी बांधली होती. परंतु ह्या सामन्यामध्ये खेळपट्टीवर मंदगतीने चेंडू येत होता असे असे म्हटले गेले. कारण काहीही असो,  भारताला अफगाणिस्तानसारख्या संघासमोर फक्त २२४ धावसंख्या उभारता आली. भारताच्या पराभवाची स्पष्ट चिन्हे मध्यंतराच्या वेळी दिसत होती.  परंतु या स्पर्धेत वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी कठीण परिस्थितीतून भारतीय संघाला बाहेर काढले आहे.  या सामन्यातसुद्धा या कमी धावसंख्येला या गोलंदाजांनी विजयी धाव धावसंख्येत परिवर्तित केले. इथं शमीने एका हॅट्ट्रिकची सुद्धा नोंद केली. हा एक गुणी गोलंदाज सातत्याने भारतीय संघात या स्पर्धेत स्थान मिळवू शकला नाही यातच भारतीय गोलंदाजांची श्रेष्ठत्वाची कल्पना येते. 

त्याच दिवशी दुपारी सुरू झालेल्या दिवसरात्र सामन्यात न्यूझीलंडने कप्तान विल्यम्सन याच्या मोठ्या १४८ धावांच्या खेळीच्या जोरावर २९१ धावा उभारल्या.  विंडीजचा डाव गडगडला असता ब्रेथव्हाईटच्या एका अभूतपूर्व खेळीने विंडीजला एका अशक्यप्राय विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते.  ब्रेथव्हाईट ज्यावेळी सीमारेषेवर झेलबाद झाला तो फटका जर सीमारेषेबाहेर गेला असता तर विंडीज हा सामना जिंकला असता! तुम्ही विजयाच्या इतक्या समीप जाऊन सुद्धा त्या पासून वंचित राहू शकता याचं हे अत्यंत दुर्दैवी असे उदाहरण होते!  मागं वळून पाहता जर हा षटकार गेला असता तर न्यूझीलंड कदाचित उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश करु शकले नसते!  भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला असता! 

उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला यापुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. त्या दृष्टीने खेळ करीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ३०८ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही त्यांना केवळ २५९ धावांपर्यंत मजल मारता आली. 1992 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाची साखळी फेरीतील कामगिरी ही या स्पर्धेतील कामगिरीशी मिळतीजुळती होती.  त्यामुळे हा संघ आता उपांत्य फेरीत मजल मारून विश्वचषक सुद्धा पटकावेल अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर एव्हाना पसरू लागले होते!

बांगलादेशने आपल्या श्रेष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करीत अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते.  आरोन फिंचच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावांचे लक्ष्य उभारले.  बॅरेनडॉफ आणि स्टार्क जोडगोळीने इंग्लंड ला इंग्लंडच्या फलंदाजांना आपला जम बसवू दिला नाही. पुन्हा एकदा स्ट्रोकने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत ८९ धावांची झुंजार खेळी उभारली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या उत्तम खेळाची पुनरावृत्ती करत पाकिस्तानने न्यूझीलंडवर सुद्धा सहा गडी राखून एका दिमाखदार विजयाची नोंद केली.  आता त्यांचे केवळ अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सामने शिल्लक असल्याने आणि न्यूझीलंडचा खेळ एव्हाना काहीसा ढेपाळल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा उंचावल्या होत्या. 

भारताने आपली विजयी वाटचाल सुरू ठेवत वेस्टइंडीज वर १२५ धावांनी दिमाखदार विजय मिळविला. पार्टी स्पॉयलर नावाची एक इंग्रजी भाषेत संज्ञा आहे.  दक्षिण आफ्रिका आपलं उपांत्य फेरीतील प्रवेश करण्याचे आव्हान जरी संपुष्टात आलं असलं तरी पार्टी स्पॉयलरची भूमिका बजावण्यासाठी एव्हाना सज्ज झाले होते.  त्यांच्या भूमिकेचा पहिला फटका बसला तो श्रीलंकेला!  श्रीलंकेवर त्यांनी एका दणदणीत विजयाची नोंद केली. या पराभवामुळे मात्र श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चुरशीचा होईल अशी अटकळ बऱ्याच जणांनी बांधली होती. सराव सामन्यात सुद्धा अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता.  227 धावांचे माफक लक्ष्य अफगाणिस्तानने उभारले होते. पाकिस्तान या धावसंख्येचा सहज पाठलाग करील असे चित्र डावाच्या सुरुवातीला होते.  परंतु डावाच्या मधल्या वेळी त्यांनी अचानक विकेट गमावून हे आव्हान खूप कठीण बनवून टाकले होते.  एका वेळी तर त्यांना चार षटकात जवळपास ५० धावांची गरज होती. अशावेळी स्पिनर चांगली गोलंदाजी करत असताना देखील कप्तान गुलबदिन  याने स्वतः गोलंदाजीला येण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. हाच निर्णय अफगाणिस्तानसाठी अत्यंत घातक ठरला. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना माफक धावसंख्येत बाद करुन सामन्यात चुरस निर्माण केली होती.  परंतु उस्मान ख्वाजा आणि कॅरी या दोघांनीही उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन करीत २४३ ही एक चांगली धावसंख्या उभारण्यात आपल्या संघाला मदत केली.  नंतर स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करीत पाच बळी देत न्यूझीलंडचा संघ १५७ धावांमध्ये गुंडाळला.  अशाप्रकारे स्टार्क हा स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या वेळी फॉर्ममध्ये येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ह्या अंतिम  टप्प्याला हल्ली Business End असे संबोधिलं जातं. यावेळी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने आघाडीचे स्थान पटकाविले होते.  भारतीय आणि इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत कसे भेटू नये यासाठी उत्सुक असावेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. 

गुणतक्त्यात आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारत आणि इंग्लंड या सामन्याकडे पाकिस्तान बांगलादेश या देशांचे लक्ष लागून राहिले होते.  भारताने जर इंग्लंडला हरविले असते हे तर या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असती.  त्यामुळे उपखंडातील सर्वच देश भारताला या सामन्यात पाठिंबा देत आहेत असे चित्र निर्माण झाले होते. परंतु इंग्लिश संघाच्या बलवान फलंदाजीच्या जोरावर त्यांनी ३३७ एक मोठी धावसंख्या उभारली.  राहुल सुरुवातीला अगदी कमी धावसंख्येवर बाद झाल्यावर सुद्धा रोहित आणि विराट यांनी संथ गतीने का होईना परंतु विकेट्स न गमावता एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. परंतु शेवटी ३३७ ही धावसंख्या भारतासाठी थोडी अधिकच डोईजड ठरली.  पांड्या जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत हीच धावसंख्या पार करण्याच्या आशा काही प्रमाणात शाबूत होत्या.  परंतु त्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांना हवा तेवढा धावसंख्येचा वेग राखता न आल्यानं भारत पराभूत झाला.  भारत पराभूत झाल्याचे दुःख भारतीय संघ आणि चाहत्यांपेक्षा आपल्या शेजाऱ्यांना जास्त झाले. 

श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २३ धावांनी पराभव केला.  या सामन्यात फर्नांडोने शतक झळकावले.  उपांत्य फेरीतील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला बांगलादेशवर विजय मिळवणे आवश्यक होते.  बांगलादेश संघ हा भारतीय संघाला हल्ली नेहमीच अटीतटीचा सामना लढा देत असतो.  इथं सुद्धा नियमित विकेट जात असताना देखील भारताला शेवटपर्यंत तणावात ठेवण्यात बांगलादेशने यश मिळवले होते.  शेवटी बुमराहनेच आपल्या शेवटच्या षटकामध्ये लागोपाठ दोन बळी मिळवत भारताला विजय मिळवून दिला.  भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.  या पराभवामुळे बांगलादेशचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. 

आता पाकिस्तानचे लक्ष इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात होणार्‍या सामन्याकडे लागले होते.  जर या सामन्यात न्युझीलँड जिंकलं असतं तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा केवळ त्यांच्या बांगलादेशवरील विजयावर अवलंबून राहिल्या असत्या.  परंतु इंग्लंडने आपल्या पुढील सामन्यात न्यूझीलंडचा ११९ धावांनी दणदणीत पराभव केला. आता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी पाकिस्तानसाठी पुढे एक केवळ अशक्यप्राय असे गणिती शक्यता उपलब्ध राहिली होती. त्यांना बांगलादेश विरुद्ध प्रथम फलंदाजी करत किमान तीनशे पंधरा/ सोळा धावांनी विजय मिळविणे आवश्यक बनले होते.  याचाच अर्थ असा की प्रथम फलंदाजी करून चारशे-पाचशे अशी मोठी धावसंख्या उभारून मोजक्या धावसंख्येत संपूर्ण बांगलादेश संघ बाद करणे त्यांना आवश्यक होते.  या सामन्याआधी इतिहासात क्रिकेट मैदानात असलेले झाड आणि त्यावर अडकलेला चेंडू यामुळे फलंदाजांनी कशा बऱ्याच धावा पळून काढल्या याविषयीची मनोरंजक माहिती ती क्रिकेट रसिकांपुढे ठेवण्यात आली. 

वेस्टइंडीजने आपल्या पुढील सामन्यात अफगाणिस्तानचा 23 धावांनी पराभव केला.  एक महान खेळाडू असलेल्या क्रिस गेलचा हा शेवटचा विश्वचषक सामना असल्याची शक्यता होती.  गणिती शक्यतांवर  अवलंबून असलेल्या पाकिस्तानला बांगलादेश विश्वर हवा तितका मोठा विजय मिळवता आला नाही.  त्या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले.  या क्षणी स्पर्धेतील केवळ दोन सामने साखळी सामने बाकी राहिले होते.  या दोन सामन्यातील निर्णयावर उपांत्य फेरीतील लढती कोणत्या संघांमध्ये दरम्यान होणार हे अवलंबून होते. भारताने तर अपेक्षेनुसार श्रीलंकेवर विजय मिळविला. याच सामन्यादरम्यान रोहित शर्माने एकाच विश्वचषक स्पर्धेत विक्रमी असे पाचवे शतक झळकाविले.  पार्टी स्पॉईलर बनलेल्या दक्षिण आफ्रिकेने एका चुरशीच्या लढ्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दहा धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील लढतीत फेरफार करून टाकला. आता उपांत्य फेरीतील लढती भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा होणार होत्या. न्यूझीलंडविरुद्ध आपला उपांत्य फेरीचा सामना होणार म्हणून एकंदरीत भारतीय रसिकांमध्ये आणि संघांमध्ये काहीसं आनंदाचे वातावरण होते. न्यूझीलंड विरुद्धचा सामना भारतासाठी खरोखर सोपा जाणार की काय हे केवळ आपल्याला भविष्यकाळ सांगू शकणार होता! 

२०१९ च्या विश्वचषक साखळी स्पर्धेतील सामन्यांचा हा थोडक्यात गोषवारा! आज ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुर्वसंध्या ! कोट्यवधी क्रिकेट रसिकांनी ह्या पुर्वसंध्येविषयी बरीच काही स्वप्नं रंगवली होती, त्यांचा स्वप्नभंग करणारी ही पुर्वसंध्या ! पण रसिकांनो माझं एकच सांगणं - उद्या क्रिकेटच्या ह्या चार वर्षातुन रंगणाऱ्या महोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील अनेक टप्पे  केलेले दोन संघ एकमेकांशी झुंजणार आहेत! निखळ मनाने त्याचा आनंद लुटा ! Tomorrow, let Cricket be the winner!