Monday, December 31, 2012

पट मांडला - भाग आठवामहादेवच्या बोलण्यावर संपतरावांचा अजिबात विश्वास बसेना. आपल्या पक्षात असे कटकारस्थान आणि ते ही आपल्या गावात! संपतराव एकदम सुन्न होऊन विचारात पडले. भ्रमणध्वनीच्या कॉलच्या नोंदीत सकाळी आलेला वसंतरावांचा फोन त्यांनी एक दोनदा चाळूनही पाहिला.
सुजितकुमारांशी बोलणे आटोपल्यावर भाऊरावांना दरदरून घाम फुटला. ह्या प्रकरणातून निस्तरण्याची जबाबदारी आता तुमची, मी ह्यात अजिबात पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट बजावून सांगितले होते. आणि ह्या विषयावर पुन्हा फोनवर न बोलण्याची तंबीही दिली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. एक तर हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकावयास हवे किंवा कोणाच्या तरी ह्यात अडकवायला हवे. ह्या दोन्ही शक्यता जर जमल्या नाहीत आणि हे प्रकरण जर बाहेर पडले तर भाऊराव त्यात पूर्ण अडकणार होते. राजकारणाची ही रीत भाऊरावांना नवी नव्हती. मोठा मासा केव्हाच गळाला लागत नाही, नेहमी छोटा मासाच अडकतो आणि जमेल तसं मोठा मासा मग छोट्याला सोडवितो. परंतु छोटा मासा होण्याची भाऊरावांची अजिबात तयारी नव्हती.
दोन दिवस छातीच्या दुखण्याचे नाटक करून हणम्या अगदी वैतागला होता. आणि अचानक ज्यावेळी रमाकांतच्या मृत्यूची बातमी घेवून नर्स अतिदक्षता विभागातून बाहेर पडली तसा तो अगदी भेदरून गेला. पहिली संधी मिळताच त्याने रुग्णालयातून पलायन केले. घरात कालचा दिवस त्याने एकदम लपून काढला होता. बायकोच्या चौकश्यांना तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. त्यात भर म्हणून आता भाऊराव फोनही उचलत नव्हते.
बाजारात ज्यावेळी जाधव आणि महादेव ह्याचे बोलणे चालू होते त्यावेळी भाऊरावांचा कार्यकर्ता रमेश हॉटेलात बसला होता. त्याच्या नजरेस ही जोडगोळी गप्पा मारताना दिसली. त्यावेळी त्याला फारसे काही विशेष वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा महादेव घाईघाईने बाईक काढून निघाला तेव्हा त्याला काहीसे खटकले होते. पण नंतर तो ही गोष्ट विसरून गेला होता. भाऊरावांचा जसा फोन आला तसा तो घाईनेच त्याच्या घरी पोहचला. भाऊराव प्रचंड बेचैन दिसत होते. 'गावात सतत फिरत राहा, कोठे काय थोडे जरी घडताना दिसले तर तत्काळ मला कळवा' भाऊरावांनी त्याला आज्ञा केली. 'आता थोडे जरी म्हणजे काय?' रमेश प्रश्न विचारता झाला. कोणी निवडणुकीच्या चर्चा करताना दिसले, माझ्याविषयी बोलताना दिसले तर कळवायचे' . 'बघा आताच इन्स्पेक्टर जाधव आणि महादेव गप्पा मारताना दिसले आणि महादेव त्यानंतर अचानक घाईने बाईकवरून निघाला' आता हे ही कळवायचे का?' रमेशच्या ह्या प्रश्नाने भाऊराव हादरून गेले. त्याची कशीबशी बोळवण काढून ते खुर्चीवर बसतात तोच हणम्याचा फोन आला. भाऊरावांनी त्याचा फोन उचलण्याचे टाळले. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला. ह्या हणम्याला कसे वापरता येईल ह्याविषयी त्यांनी काही कुटील योजना आखली. हणम्याला थोड्याच वेळात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. निवडणुकीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात कार्यकर्त्याची सभा भरविण्यात आली आहे असे समोरची व्यक्ती बोलत होती.
विश्वासरावांनी कार्यकर्त्याच्या मोठ्या उपस्थितीत वाजतगाजत निवडणुकीचा अर्ज सकाळी ११ वाजता भरला. गावातील अनेक लोकही स्वेच्छेने त्यात सहभागी झाले होते. लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचा विजय एकदम नक्की आहे असेच सर्व बोलू लागले होते. अर्ज भरून घरी पोहचेपर्यंत दुपारचे २ वाजले. जेवण आटपून आणि वामकुक्षी काढून दुपारचे तीन वाजले.
आणि मग ती बातमी आली. विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात जबर जखमी अवस्थेत हणम्या सापडला होता. त्याला संपविण्याचाच मारेकऱ्यांचा हेतू होता. पण ऐनवेळी ऊसकामगार आल्याने त्यांनी तिथून पळ काढला. गावात ही बातमी पसरताच हल्लकल्लोळ माजला. विश्वासराव आणि संपतराव दोघेही एकदम अस्वस्थ झाले. अशा प्रसंगी थोड्या शांत डोक्यानेच काम केले पाहिजे हे ठरवत संपतरावांनी आपल्या सासऱ्यांना फोन लावला. पाच मिनटात वसंतराव आणि जाधवांबरोबर घडलेल्या घटनांचा सारांश त्यांनी विश्वासरावांना कथन केला. विश्वासराव अवाक झाले, पण इतक्या वर्षाचा अनुभव होता त्यांच्यापाशी. 'संपत, काहीतरी मोठे कारस्थान रचते आहे इथे! ताबडतोब वसंतरावांना फोन लावा, अर्ज भरायला दीड तास बाकी आहे. ताबडतोब अर्ज भरा.' संपतराव अवाक झाले. पण वेळेची मर्यादा लक्षात घेत त्यांनी ताबडतोब वसंतरावांना फोन लावला.

Sunday, December 30, 2012

पट मांडला - भाग सातवासंपतरावांचा राग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बराच निवळला होता. गरमागरम चहाचे घुटके घेता घेता त्यांनी विश्वासरावांना अभिनंदनाचा फोन लावला तेव्हा सगुणाबाईंच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी संपतरावांचे बोलणे आटोपता आटोपता फोन घेतला आणि वडिलाचे अभिनंदन केले. मायलेकीच्या गप्पा त्यानंतर तासभर चालल्या होत्या. संपतरावांनी आज मुद्दामच शेतीचे काम काढले. परीक्षा नापास झालेला मुलगा ज्याप्रमाणे काही दिवस तोंड लपवून बसतो त्याप्रमाणे थोडी त्यांची गत झाली होती. उसाच्या शेतीवर त्यांनी बऱ्याच दिवसांनी फेरफटका मारला होता. मालकांच्या अशा ह्या अचानक भेटीमुळे शेतावरचे मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या कामातील ढिसाळपणाचा संपतरावांनी आपल्या पद्धतीने समाचार घेतला. इतक्यात त्यांचा फोन खणखणला, अनोळखी क्रमांक न उचलण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता त्यांनी आज मोडत फोन उचलला. 'काय संपतराव काय म्हणता आहात', समोरची व्यक्ती विचारत होती. 'आपण कोण बोलत आहात?' संपतराव काहीशा त्रासिक स्वरात उद्गारले. वसंतरावांनी मग जास्त ताणून न धरता आपली ओळख करून दिली आणि आपला फोन करण्याचा उद्देश सांगितला. क्षणार्धात संपतरावांच्या मेंदूने अनेक गणिते मांडली. त्यातल्या बऱ्याचशा गणिताची उत्तरे नकारार्थी आल्याने त्यांनी नम्रपणे आपला नकार वसंतरावांना सांगितला. वसंतराव तसे लवकर हार मानणारे नव्हते. 'बघा दुपारपर्यंत विचार बदलला तर' असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
शेतकरी मोर्च्याचे काम सांभाळून आल्याने इन्स्पेक्टर जाधव काहीसे थकले होते. सकाळ थोडी आळसात घालविण्याचा त्यांचा मनसुबा होता. साहेबांनी कालच रात्री फोन करून त्यांना सुट्टीवर जायचे सुचविले होते. बायकोशी सल्लामसलत करून संध्याकाळच्या बसने गावाला जायचा त्यांनी बेत जवळजवळ पक्का केला होता. गावाला जायच्या आधी थोडी खरेदी करण्यासाठी बाजारात एक चक्कर मारण्याचे ठरवून ते निघालेही. बाजाराच्या नाक्याच्या ठिकाणी रस्ता थोडा अडला गेला होता. त्यांनी जरा कुतूहलाने नजर वळवून पाहिले, तर एक अंत्ययात्रा चालली होती. मृतात्म्याला शांती लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करीत त्यांनी आपली बाईक पुढे दामटली. जाता जाता अंत्ययात्रेतील दोन तीन चेहरे ओळखीचे असल्याचा त्यांना भास झाला. परंतु हे चेहरे नक्की कोठले हे न आठवल्याने त्यांनी तसेच पुढे जायचे ठरविले. बाजारात सामान खरेदी करता करता त्यांना अचानक आठविले की ते चेहरे गराजमधील कामगारांचे होते. आता मात्र त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी बाजारात चौकशी केली आणि त्यांचा संशय खरा ठरला. ती रमाकांतचीच अंतयात्रा होती. आता जाधव भयंकर अस्वस्थ झाले. काय करायचे हे त्यांना सुचेना. थोड्या शांत डोक्याने विचार करायचे ठरवून त्यांनी घरचा रस्ता पकडला. वाटेत विश्वासरावांच्या अभिनंदनाचे एक दोन बोर्ड त्यांच्या नजरेस पडले आणि ते अधिकच बुचकळ्यात पडले. एकंदरीत परिस्थितीनुसार त्यांनीसुद्धा संपतरावांना तिकीट मिळेल असा अंदाज केला होता. जे काही चालले आहे ते आपल्या आकलनापलीकडचे आहे असेच त्यांना वाटले. परतीच्या रस्त्यावर अचानक त्यांची गाठ महादेवशी पडली. पोलिस खात्याचा मध्यंतरी संगणकीकरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता त्यावेळी महादेवनेच त्यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर त्यांची बऱ्यापैकी दोस्ती झाली होती. दोघेही तसे सध्या मोकळेच होते. २ मिनटात आटोपतील असे वाटून त्यांनी गप्पांना सुरुवात केली परंतु अचानक जाधवांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली. महादेव एकदम आश्चर्यचकित झाला. एकंदरीत हे फार गंभीर प्रकरण आहे ह्याची त्याला खात्री पटली. जाधवांना ते न जाणवून देता गप्पा आटपेपर्यंत त्याने धीर धरला. जाधव तिथून निघताच त्याने बाईक वरून थेट संपतरावांच्या घराचा रस्ता पकडला.

Saturday, December 29, 2012

पट मांडला - भाग सहावासंपतरावांचा दिवस एकदम व्यग्र गेला होता. विजयरावांच्या गावीच त्यांचा मुक्काम होता. विजयरावांच्या घरच्या माणसांच्या जोडीला काम करत त्यांनी पुढील दिवसांच्या विधींची सोय तर लावलीच आणि विजयरावांच्या आर्थिक व्यवहाराची सोय लावण्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करून ते आले. संध्याकाळी घरी परतल्यावर ते जरा निवांतपणे पहुडले होते की महादेव धावत धावत घरी आला. त्याचे स्वागत सगुणाबाईंनी केले. 'ताई अभिनंदन, बाबांना निवडणुकीचे तिकीट मिळालेय!' महादेवचे हे अनपेक्षित शब्द सगुणाबाईंना धक्का देवून गेले. तोंडदेखले हसून त्यांनी विश्रांतीकक्षात डोकावून पाहिले तर संपतरावांची संतप्त मुद्रा त्यांच्या नजरेस पडली. महादेवचे बोल त्यांच्याही कानी पडले होते तर. त्यांनी खुणेनेच सगुणाबाईंना महादेवला नंतर येण्यासाठी सांगितले. महादेव गेल्यावर विश्रांतीकक्षात जाण्याची हिम्मत सगुणाबाईंना झाली नाही.
अभिनंदनाचे फोन घेता घेता विश्वासराव आणि इंदुमतीबाईंचा जीव मेटाकुटीला आला होता. मुली / जावयाकडून फोन आला नाही ह्याची खंत एकदा इंदुमतीबाईंनी बोलूनही दाखवली. विश्वासरावांची मनः स्थिती मात्र द्विधा झाली होती. मोठ्या जिकीरीनेच त्यांनी ह्या निर्णयाला होकार दिला होता. संपतरावांना तिकीट न मिळून देण्यासाठी भाऊरावांनी चंग बांधला आहे हे त्यांना कळून चुकले होते. आणि त्याचवेळी तुम्ही जर नाही म्हणालात तर दुसरा कोणी बाहेरचा बघू असा निरोप ज्यावेळी त्यांना मुंबईहून आला त्यावेळी त्यांनी होकार कळविला. जावयाची उमेदीची वर्षे बाकी आहेत आणि येत्या पाच वर्षात त्याच्यासाठी परिस्थिती अनुकूल करून ठेवू असेही त्यांनी मनोमन ठरविले होते. हे सर्व संपतरावांना बोलवून घेऊन स्पष्ट करून सांगण्याचे त्यांनी मनोमन ठरविलेही होते. परंतु गेल्या एक दोन दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांना अजिबात फुरसतहि मिळाली नव्हती.
सुजीतकुमारांनी भाऊरावांना चांगलेच फैलावर घेतले होते. एका दिवसाच्या अज्ञातवासानंतर आज भाऊराव फोनवर आले होते. त्यांचा आवाजही एकदम भयभीत वाटत होता. 'आपले ठरले होते काय, आणि तुम्ही काय करून बसलात? फक्त अहवाल गायब करायला मी तुम्हाला सांगितला होता आणि तुम्ही आखखा माणूसच गायब केलात?' सुजितकुमारांचा पारा एकदम वर चढला होता. चुकीच्या माणसाकडे काम सोपविल्याचा भाऊरावांना पश्चाताप होत होता. 'त्या रमाकांतचे काय करायचे आता?' भाऊरावांच्या ह्या प्रश्नाकडे सरळ दुर्लक्ष करून सुजीतकुमारांनी फोन ठेवला होता. हे प्रकरण आपल्या अंगावर एकदम मोक्याच्या क्षणी शेकणार अशी अनामिक भीती त्यांना वाटू लागली.
संध्याकाळी सातच्या सुमारास आलेला महादेवचा फोन अखेरीस संपतरावांनी उचलला. त्यांची समजूत कशी घालायची ही कला महादेवाला चांगलीच अवगत होती. 'चला नदीकाठच्या धक्क्यावर जावून बसुयात', महादेवची ही विनंती संपतरावांना अव्हेरता आली नाही. तयारी करून ते तसेच निघाले. अशा प्रसंगी शांत राहणेच शहाणपणाचे असते हे सगुणाबाई अनुभवाने शिकल्या होत्या. महादेव तोपर्यंत अंगणात येवून पोहचलाच होता. त्याच्या बाईकवर मागे बसून जोडी नदीकाठी निघाली. रस्ता बाजारातून जात होता, तिथे नेमके ओळखीचे विश्वासू कार्यकर्त्ये भेटले. त्यांनी आग्रहाने त्यांना उपहारगृहात चहासाठी नेले. उपहारगृहाच्या एका कोपऱ्यात चहाला सर्वजण बसले. ते बसले त्यावेळी आजूबाजूची बाकडी रिकामीच होती. विश्वासू कार्यकर्त्याबरोबर बोलताना हळूहळू संपतरावांच्या जखमेची खपली पूर्ण निघाली आणि त्यांनी आपल्या मनातील शल्याला मोकळी वाट करून दिली. आपण गेले कित्येक वर्षे कसे खपलो, कसा आजूबाजूच्या भागाचा आणि त्याचबरोबर पक्षाचा ग्रामीण भागात विकास केला' हे ते मोठ्या उद्वेगाने कार्यकर्त्यांच्या ह्या गटास सांगत होते. ह्या सर्व गप्पामध्ये मागच्या बाकड्यावर येवून बसलेल्या एका माणसाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.

थोड्यावेळाने सगुणाबाईंचा फोन आला तसे संपतरावांनी आपले बोलणे आटोपते घेतले आणि सर्वजण बिल चुकते करून निघाले. ते जाताच वसंतराव आपल्या जागचे उठले. हॉटेलबाहेर येताच त्यांनी मुंबईला फोन लावला. युतीच्या जागावाटपाची गणिते सोडवून शांत झालेल्या विरोधी पक्षाच्या जितेंद्ररावांनी फोन उचलला. 'दिवेपुरचा उमेदवार मिळाला आपल्याला' वसंतरावांचे बोलणे ऐकताच पुढील काही प्रश्न न विचारता हवापाण्याची चौकशी करून जितेंद्ररावांनी फोन ठेवला.

Thursday, December 27, 2012

पट मांडला भाग पाचवारमाकांत घरी सापडेल अशी जाधवांनी आशाच केली नव्हती. परंतु त्याला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केल्याची बातमी त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक होती. तातडीने ते जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. निघण्याआधी रुग्णालयावर पहाऱ्यासाठी २ हवालदार पाठवून देण्याचा फोन त्यांनी ठाण्यात केला. रुग्णालयातील निवासी डॉक्टरने त्यांचे स्वागत केले. रमाकांतला अन्नातून विषबाधा झाली असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला. जाधवांनी बाहेरूनच रमाकांतकडे नजर टाकली. दोन हवालदार तिथे पोहोचताच केवळ रमाकांतच्या पत्नीसच त्याला भेटण्याची परवानगी द्यायचे बजावून जाधव निघाले.
रुग्णालयाच्या जनरल वार्डात कालच दाखल झालेल्या एका रुग्णाकडे नर्स उषा खास लक्ष ठेवून होती. साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेला हा रुग्ण छातीत दुखल्याची तक्रार घेवून तिथे दाखल झाला होता. पण नातेवाईक दाखल झाल्याशिवाय कोणतीही तपासणी करून द्यायला नकार देत होता. आता त्याला फोनवर बोलताना पाहून मात्र तिचे माथे सणकले. कसले बोलणे चाललंय फोनवर ह्या तिच्या दामटवून विचारण्याकडे त्याने चक्क दुर्लक्ष केले. 'साहेब, रुग्णालयापर्यंत पोलिस येवून पोहोचलेत की!, तो दबल्या आवाजात पलीकडील व्यक्तीशी बोलत होता. समोरून खास ठेवणीतले शब्द ऐकल्यावर त्याने बोलणे आटोपते घेतले. पलीकडील व्यक्ती मात्र प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने ताबडतोब मुंबईला फोन लावला. तीन चार वेळा समोरून फोन कट झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेला पाचवा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. 'महत्वाची बैठक चाललेय, समजत नाही का?' समोरून रागीट आवाज आला. 'महत्वाची बातमी होती म्हणूनच फोन केला, रुग्णालयात पोलिस येऊन पोहोचलेत' हे ऐकताच मात्र मुंबईची व्यक्ती सावध झाली. 'तुम्ही कसलं झेंगट लावून दिलत असे त्रासिक स्वरात बोलत इन्स्पेक्टरचे नाव घेवून तिने फोन ठेवून दिला.
जाधवांनी घरी पोहचल्यावर झटपट जेवण आटोपले आणि आरामखुर्चीत बसत ते सर्व विखुरलेले तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीची घंटा खणखणली. मोठ्या साहेबांचा फोन होता. 'काय जाधव, एका मेकानिकच्या मागे तुम्ही इतकी शक्ती काय वाया घालविता? साहेबांनी सुरुवात केली. 'बर ते जाऊ द्यात, उद्या जामपुरला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. तिथली जबाबदारी तुमच्यावर लागली' साहेबांच्या ह्या बोलण्याने जाधव एकदम बुचकळ्यात पडले. जामपूर होते १०० किलो मीटर अंतरावर आणि त्यासाठी आपली निवड का व्हावी हे कोडे त्यांना उलगडेना. साहेबांनी फोन ठेवून दिल्यावर त्यांना निराशेने ग्रासले. त्या आरामखुर्चीतच सुन्नपणे त्यांची संध्याकाळ गेली.
तिकीटवाटपाच्या चर्चेचे काम जोरात चालले होते. स्वरुपसिंग, अण्णासाहेब, सुजीतकुमार आणि शिष्ठमंडळांची बैठक जोरात चालली होती. युवाशक्तीचा जोर तिकीटवाटपात दिसतोय की नाही ह्याची मुकुल दिल्लीहून फोन करून अधूनमधून खात्री करून घेत होते. काही जागांच्या बाबतीत एकमत होत नव्हते. त्या जागा नंतरच्या चर्चेसाठी राखून ठेवण्याचे ठरले. विजयरावांचा अहवाल हाती नसल्याने त्या जिल्ह्याचे कामही बाजूला राहिले होते. दुपारनंतर अचानक स्वरुपसिंगांनी त्या जिल्ह्याच्या चर्चेला हात घातला त्यावेळी सर्वांना जरा आश्चर्यच वाटले. सुजीतकुमार आधी थोडे बावचळले पण लगेचच त्यांनी सावरले. 'आतापर्यंत १४० जागांचा निर्णय आपण पक्का केला त्यात युवा नेते १००, म्हणजे जवळजवळ 70 टक्के युवकांना प्राधान्य. आता निवडणूक निधीचे कसे बघायचे? तेव्हा अशी काही मंडळी विचारात घेतलेली बरी' त्यांच्या ह्या अनपेक्षित विधानाने सर्वच जरा आश्चर्यचकित झाले. परंतु मग त्यांनी आणि स्वरुपसिंगांनी मिळून चर्चेला अशी कलाटणी दिली की बघताबघता दिवेपुरच्या जागेवर विश्वासरावांची निवड पक्की झाली.
सत्ताधारी पक्ष इतक्या सुसूत्रपणे काम करत असताना, विरोधकांची हालत खराब होती. युतीची अनेक समीकरणे बनली होती आणि त्यातले कोणते उद्या निश्चित होणार ह्याची भगवंतालाही खात्री नव्हती.

पट मांडला भाग ४


इन्स्पेक्टर जाधव आणि त्यांच्या हवालदारांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. जीपचा साफ चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर दुभाजक नव्हता आणि जीप आपली बाजू सोडून समोरून येणाऱ्या ट्रकला आदळली होती.आदळल्यावर जीप बाजूच्या थोड्या खोल असणाऱ्या भागात जावून पडली होती. ट्रकवाल्याने स्वतःहून पोलिसांना खबर दिली होती. त्यालाही बराच मार लागला होता. पंचनामा करून सर्व सोपस्कार आटोपल्यावर जीपचे भग्न अवशेष अधिक तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.
मुंबईत मात्र मोठे उदास वातावरण होते. स्वरुपसिंग मोठ्या विचारात पडले होते. विजयराव तसे पक्षाचे उभारते नेते. ह्या निवडणुकीनंतर त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्याचा श्रेष्ठींचा मनसुबा होता. त्यांच्या अशा ह्या अचानक जाण्याने सर्वच समीकरणे कोलमडून पडणार होती. आणि त्यांच्या जिल्ह्यातील पक्षात एक मोठी पोकळी निर्माण होणार होती. ह्या सर्व दीर्घकालीन समस्या होत्या. तत्कालीन समस्या होती ती जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीची! विजयरावांनी सर्व उमेदवारांच्या भेटी घेऊन आपला अहवाल बनविला होता. अहवालाचा विचार येताच एकदम स्वरुपसिंग उठून बसले, सुजीतकुमारांना त्यांनी हळूच विचारले, अपघातस्थळी अहवाल सापडला का? ह्या प्रश्नाने सुजितकुमारांचा चेहरा काहीसा उतरल्यासारखा त्यांना वाटला. परंतु सुजितकुमार सावरून म्हणाले, मी दिवेपुरला फोन करून विचारतो.
सुजीतकुमार बाहेरच्या कक्षात आले आणि त्यांनी तात्काळ भाऊरावांना फोन लावला. भाऊरावांनी फोन काही उचलला नाही. नाईलाजाने त्यांनी विश्वासरावांचा फोन लावला आणि इन्स्पेक्टर जाधव ह्याच्याकडे अहवालाची चौकशी करण्यास सांगितले. हे भाऊराव गेले तरी कोठे असा विचार करीत, सुजीतकुमार पुन्हा स्वरुपसिंगांच्या कक्षात आले. एव्हाना अण्णासाहेबांचे आगमन झालेच होते. निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस होता आणि सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास वेळ मिळावा म्हणून आजच यादी जाहीर करण्याचा श्रेष्ठींचा आदेश होता. एकदमच काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर मोजक्या जागांचा निर्णय दुसऱ्या दिवसावर थोपवून धरण्याची परवागनी देण्यात आली होती.
इथे इन्स्पेक्टर जाधव विजयरावांच्या बंगल्यावर पोहचले होते. अतिशय शोकाकुल वातावरण होते तिथे. विजयरावांच्या पत्नीची आणि मुलांची स्थिती तर पाहवत नव्हती. कार्यकर्त्यांची पण ही गर्दी उसळली होती. जाधव तिथे पोहचल्यावर एका कोपऱ्यात जर शांतपणे जाऊन परिस्थितीची पाहणी करीत उभे राहिले. सदैव गावात ड्यूटी लागणाऱ्या इन्स्पेक्टरच्या मानाने त्यांचा स्वभाव तसा सौम्यच. इतक्यात एक विश्वासू कार्यकर्ता त्यांच्याकडे येत झाला. त्यांना एका बैठकीच्या खोलीत नेण्यात आले. जाधवांनी त्याला विजयरावाविषयी त्यांना विचारायचे होते ते प्रश्न विचारून घेतले. थोड्या वेळाने त्यांना विजयरावांच्या पत्नी आणि मुलांशीही बोलण्यास मिळाले. पत्नी तर धाय मोकलून रडत होती. सकाळीच मी नऊ वाजता ह्यांच्याशी बोलले आणि दहा वाजता निघायचे म्हणून हे काही जास्त बोलले नाही. मला काय माहित हे शेवटचेच बोलणे असणार आहे, रडता रडता ती बोलत होती. जाधव तिची समजूत घालून निघाले. पण आता मात्र ते अस्वस्थ झाले होते. सकाळी दहा वाजता निघणारी जीप इतक्या उशीरा का निघाली हे त्यांना समजत नव्हते. जीपमधील कोणीच व्यक्ती जिवंत न राहिल्याने माहितीचा तो स्त्रोत उपलब्ध नव्हता. जाधवांनी आपला मोर्चा विजयराव ज्या हॉटेलात उतरले होते तिथे वळविला. इतक्यात त्यांच्या फोनची घंटा खणखणली. विश्वासरावांचा फोन होता, जीपमध्ये काही कागदपत्रे वगैरे सापडली का असे ते विचारात होते. जाधवांनी त्यांना नकारार्थी उत्तर देवून फोन ठेवला खरा, पण आता मात्र त्यांचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. हॉटेलच्या स्वागतकक्षात त्यांच्या आगमनाने थोडीशी धांदल उडाली. पण मग व्यवस्थापकाने येवून तो त्यांना खोलीत घेऊन गेला. विजयरावांना हॉटेलातून निघण्यास उशीर होण्याचे कारण काय? जाधवांनी थेट मुद्द्याला हात घातला. उशीर कसला उशीर? ते तर बरोबर १० वाजता इथून निघाले. व्यवस्थापक उद्गारला. जाधवांना आता मात्र एकदम संशयास्पद वातावरण वाटू लागले होते. त्यांनी हॉटेलातील नोंदींची पाहणी केली त्यातही विजयरावांनी १० वाजता हॉटेल सोडल्याची नोंद होती.
जाधव हॉटेलबाहेर उतरले. आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करू लागले. जिल्ह्यातील ठिकाणी जितकी वर्दळ दिसावसाय हवी तितकी इथेही दिसत होती. त्यांची नजर समोरच्या पानवाल्याकडे गेली. इन्स्पेक्टरचा मोर्चा आपल्याकडे येतोय हे पाहताच तो बिचारा बावरला. विजयरावांची जीप जाताना पाहिली का रे? जाधवांनी त्याला विचारले. आपल्या छोट्याशा मेंदूला ताण देत त्याने हे विजयराव कोण हे आठवण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आठवली ती कालच सकाळी आपल्या दुकानासमोरच बंद पडलेली जीप. तो म्हणाला विजयरावांची का काय माहित नाही पण एक जीप काल बंद पडलेली मी पाहिली इथे. ड्रायव्हरने कशी बशी चालू केली पण त्याने मला गराजचा पत्ता विचारला म्हणून माझ्या लक्षात राहिली ती. गराज कोठे आहे, जाधवांनी त्याला दरडावूनच विचारले. ह्या पहिल्या नाक्यावर डावे वळण घेतले कि सरळ जावा, शंभर मीटर गेलात की एक चहाची टपरी लागेल, त्याच्याच बाजूला आहे गराज, पानवाला उद्गारला. जाधव घाईघाईने गराजवर पोहचले. सर्व काही आलबेल होते. म्हणजे गाड्यांच्या दुरुस्तीची कामे जोरात चालू होती. तिथला मालक पुढे आला. जाधवांनी त्याच्याकडे कालच्या जीपविषयी विचारले आणि ती आली कधी, त्यात काय प्रॉब्लेम होता आणि तसा कसा दुरुस्त केला असा प्रश्नांचा मारा केला. 'साहेब काय सांगू, रमाकांतने गाडीवर काम केले आणि तोच काल संध्याकाळपासून बरे नाही वाटत म्हणून घरी गेला तर त्याचा काही पत्ताच नाही बघा' रमाकांतच्या घराचा पत्ता घेऊन जाधवांची बाईक सुसाट निघाली.
 

Monday, December 24, 2012

वसईचा ख्रिसमस आणि बौद्धिक


ख्रिसमसच्या आठवड्यातील वसईतील वातावरण लई भारी असते. यंदाही ते तसेच आहे. थंडी वसईच्या मानाने म्हणावी तितकी नसली तरी मुंबईपेक्षा भारीच. हल्लीच्या नोकरीत सुट्ट्या मिळतात. वर्षाच्या ह्या शेवटच्या आठवड्यातील ही सुट्टी मला खूप आवडते. कुठे काही लांब फिरायला जायची गरज नाही. शांतपणे घरात बसावे, ताज्या भाज्या, मासे - मटण ह्यांचा आस्वाद घ्यावा आणि २६ तारखेपासून सुरु होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाला भेट द्यावी. असा माझाच नव्हे तर कित्येक वसईकरांचा बेत असतो. ख्रिसमस निमित्ताने ख्रिस्ती  बांधव सुंदर गोठे आणि क्रिसमस ट्री बनवून त्यावर नयनरम्य दिव्यांची आरास करतात. ती पाहणे सुद्धा सुंदर अनुभव असतो. ह्या आठवड्यात वसईतील अनेक परदेशस्थ असलेले मित्र वसईत सुट्टीनिमित्त येतात. त्यांच्याशीही भेटी होतात.
माणसांचे वर्गीकरण बऱ्याच निकषावर करता येत. आशावादी / निराशावादी हा एक त्यातला निकष. मी मुळचा निराशावादी वर्गात मोडणारा, हे कळायला मला तसा फार वेळ लागला. भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या निराशावादी बाजूवर विचार करण्यात मी फार वेळ घालवतो हे मला कळून चुकले. एकदा कळून चुकल्यावर मात्र मी ह्यातून बाहेर पडण्यासाठी बरीच तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे आशावादी माणसांना भेट द्यायची. ही माणसे तुमचा उत्साह खूप वाढवितात. अशाच दोन माणसांना मी ह्या आठवड्यात भेटलो. एक माझे शाळेचे शिक्षक आणि एक शालेय मित्र.
हल्ली बऱ्याच वेळा माझ्या चर्चेचा ओघ हा हाताबाहेर चाललेल्या सामाजिक परिस्थितीकडे जातो. पुढील २०- २५ वर्षात आपल्या देशातील परिस्थिती कशी सर्वसामान्य लोकांच्या पलीकडे जाणार आहे ह्याविषयी ही चर्चा असते. आता पुढील २०-२५ वर्षात ही परिस्थिती उद्भवणार आहे ह्याविषयी बऱ्याच मध्यमवर्गीयांचे एकमत आहे. त्यामुळे आपापल्या परीने प्रत्येकजण त्यावर उपाय शोधीत असतो. परदेशी स्थायिक होणे हा त्यातील सर्वात लोकप्रिय असणारा उपाय. परंतु तो सर्वांनाच शक्य असतो असे नाही आणि इथल्या परिस्थितीला टाळण्यासाठी तो उपाय स्वीकारणे कितपत योग्य आहे यावर बरीच चर्चा आपण करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे आपल्या परीने जमेल तेवढी बचत, गुंतवणूक करून आपल्या पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणे. ह्यावर ह्या मित्राने मार्मिक टिपण्णी केली. २० वर्षानंतर होणाऱ्या महागाईला तोंड देण्यासाठी आतापासून बचत करणे म्हणजे आपल्या सध्याच्या आवडीनिवडीला मुरड घालणे होय आणि पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करताना आपण त्यांना अकर्तबगार तर बनवीत नाही ना हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे असे तो म्हणाला. योग्य वाटले ते मला. ह्यात अजून एक भर पडते ती काही जाहिरातींची. निवृत्त होताना तुमच्याकडे किमान ३-४ कोटी राशी जमा असणे हे आपल्याला पटवून देण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असतात. त्यातल्या गृहीतकांमध्ये मुख्य असतात ती तुमचे निवृतीनंतरचे राहणीमान पूर्वीसारखेच राहणार आहे आणि तुम्ही दरवर्षी एक परदेश सहल करणार आहात. मध्यमवर्गीयांचा बुद्धिभ्रम करण्याचा हा प्रयत्न आहे हे मला मनापासून वाटते. भारतातील बहुतांशी जनता अजूनही महिन्याला ५ - १० हजारांत आपला संसार चालविते. अगदी त्या पातळीवर जाऊन नाही पण नक्कीच आपल्या सध्याच्या राहणीमानात बदल करण्याच्या खूप संध्या आपणास उपलब्ध आहेत. ह्यात अजून एक मुद्दा. निवृत्तीनंतर महानगरात राहणे हाच एक पर्याय मानला जातो. हल्ली साठीनंतरही लोक बरेच सक्रिय असतात. अशा लोकांनी छोट्या छोट्या गावात जाऊन वसाहती निर्माण करणे किती आवश्यक आहे ह्यावर आपण विचार करीत नाही. आणि गावात जाऊन शहरी पद्धतीची घरे बांधणे ही अजून एक चूक आपण करीत आहोत. ज्या गावी जावे तिथल्या पद्धतीने राहावे ह्या उक्तीचा विचार गंभीरपणे करणे आवश्यक आहे. निवृत्त लोकांनी अशा छोट्या वसाहती भारतातल्या गावोगावी निर्माण केल्यास बरेच फायदे होतील. त्यांचा राहणीमानाचा खर्च कमी होईल, गावांचा विकास होईल आणि निवृत्तीनंतर  आरोग्यावर होणारा खर्चही कमी होईल. परंतु असा विचार करण्याची आपली क्षमता आपण गमावून बसलो आहोत.
असो ह्या दोन्हि आशावादी लोकांशी बोलल्यावर असे जाणवले की तेही पुढील परिस्थितीविषयी फारसे आशावादी नाहीयेत. तुमचे काय म्हणणे आहे?

Saturday, December 22, 2012

प्रसारमाध्यमांची जबाबदारीआजचा ब्लॉग फार छोटा असेल असे ठरवूनच लिहितोय. गेल्या एक दोन आठवड्यात फार दुर्दैवी घटना घडल्या. स्त्रियांविरुद्ध अत्याचाराच्या असो की अमेरिकेतील निष्पाप मुलांच्या हत्येच्या असोत, ह्या घटना सर्वसाधारण माणसास फार अस्वस्थ करून गेल्या. त्याविषयी बऱ्याच जणांनी लिहिले. त्यात मी फारसे काही अधिक मुल्य वाढवू शकत नाही म्हणून मी लिहित नाही.
आज मला म्हणायचे आहे ते ह्या बातम्या वाचून सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या तणावाविषयी! आपल्या वृत्तपत्राचा / वाहिनीचा खप / प्रेक्षकवर्ग वाढावा म्हणून सतत ह्याच बातम्यांना प्रसिद्धी देण्याचे धोरण जर स्वीकारले जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कल्पना करा की समजा आपले काम नियमित करणाऱ्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या, हुशार विद्यार्थ्याच्या अथक परिश्रमांच्या, सर्वसामान्य गृहिणीने घरखर्च चालविण्यासाठी केलेल्या खटाटोपीच्या बातम्या जर सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राने / वाहिनीने सर्वात जास्त प्रसिद्ध केल्या तर मध्यमवर्गीयांना किती मानसिक दिलासा मिळेल आणि अत्याचाराच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने ती वृत्ती ज्यांच्या मनात फोफावते ते किती प्रमाणात कमी होईल! पण हे नक्कीच होणार नाही. आर्थिक नफ्याची गणिते हे कधीच शक्य होवू देणार नाही.
जितका जास्त विचार करतो तितके कलियुगाची संकल्पना किती बरोबर आहे हे जाणवते. बहुदा आपण मनुष्यजातीने गमाविलेला निरागसपणा मनुष्यजातीच्या ह्या अवताराततरी पुन्हा मिळविणे शक्य दिसत नाही. असो मागच्याच आठवड्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. आपली पृथ्वी, आपली मनुष्यजात आणि हे सर्व विश्व हा एका प्रचंड महासंगणकाने बनविलेल्या महाप्रचंड आज्ञावलीचा खेळ आहे अशी ती बातमी होती. म्हणजे ह्या २१ शतकात वसईत बसून लेख लिहिणाऱ्या माझ्या मेंदूतील विचारासाठी सुद्धा तिथे काही आज्ञा लिहलेल्या असणार. आणि ते मला कळले आहे हे ही त्या सर्वज्ञानीला कळले असणार!

Thursday, December 20, 2012

पट मांडला - भाग तिसरा


केंद्रीय मंडळाचे संध्याकाळी मुंबईत आगमन झाले. शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वरूपसिंग करीत होते. स्वरूपसिंगांच्या स्वागताला अण्णासाहेब आणि सुजितकुमार दोघेही विमानतळावर उपस्थित होते. ठेवणीतल्या शाब्दिक कोट्या, पत्रकारांसाठी / छायाचित्रकरांसाठी खास राखून ठेवलेल्या हास्यमुद्रा ह्यांना उधाण आले होते. पक्षात सर्व काही आलबेल आहे असा कोणाही पाहणाऱ्याचा समाज झाला असता. मंडळींचे रात्रीचे जेवण पंचतारांकित हॉटेलात आटोपल्यावर सुजीतकुमार म्हणाले, "मी सोडतो स्वरुपसिंगांना, त्यांच्या हॉटेलावर!" अण्णासाहेबांना काही पर्याय आहे कि नाही हे तात्काळ लक्षात न आल्याने त्यांनी मान डोलावली. स्वरुपसिंगाच्या हॉटेलावर सुजीतकुमारांची गाडी पोहचली. "आता इथपर्यंत आलात तर दोन मिनटे रूमवर या की!" स्वरूपसिंग उद्गारले! सुजीतकुमारांनी पडत्या फळाची आज्ञा मानून चालकाला गाडी पार्क करण्यास सांगितले. खोलीवर थोड्या वेळातच मदिरेने प्रवेश केला आणि वातावरणात जान आली. 'दिल्ली काय म्हणतेय?' सुजीतकुमार उद्गारले. स्वरुपसिंगांनी एक मोठा श्वास घेतला आणि मग दिल्लीची कहाणी सांगण्यास आरंभ केला. पक्षाचे युवा नेते मुकुल हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने प्रबळ बनत चालले होते. पंतप्रधान जीवनरामांची त्यांनी खास मर्जी संपादन केली होती. ह्याचाच पुरावा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे मुकुल हे हलवीत होते. पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये ह्यामुळे नक्कीच नाराजीचे वातावरण पसरले होते. तरुणांना राजकारणातील काय कळते असा त्यांचा पक्का समज होता. परंतु एकदा आपटी खाल्ल्याशिवाय ह्यांना काही समजणार नाही असे ठरवून ही जेष्ठ मंडळी शांत बसून सारा खेळ पाहत होती. मध्येच एक भाऊरावांचा फोन आला परंतु तो सुजीतकुमारांनी न घेता भ्रमणध्वनीला शांत (silent) अवस्थेत करून ठेवले. 'पण पैश्याशिवाय गाडी चालायची कशी? नवीन रक्त थोडेच पैसा पुरविणार आहे?' सुजीतकुमार विचारते झाले. 'आता नियमाला अपवाद असतातच की, तुमची अशी काही खास माणसे असतील आपण बघूयात' स्वरुपसिंगांच्या ह्या आश्वासनाने सुजीतकुमार थोडे शांत झाले.
संपतराव सकाळीच परत आले होते. स्वारी एकंदरीत खुशीत असल्याचे सगुणाबाईंच्या केव्हाचेच ध्यानात आले. मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी संपतरावांनी स्वतः हून स्वीकारली. आकाशवाणीवर मराठी गाणी ऐकणारे संपतराव आज किशोरकुमारची गाणी ऐकत बसले होते. अशा प्रसन्न वातावरणातच दुपार गेली. चार वाजता मुले शाळेतून परत आली आणि त्यांनी बाबांमागे बाहेर जाण्याचा आग्रह धरला. 'कुठे जायचे फिरायला' असे संपतराव म्हणत असतानाच फोनची बेल खणखणली. आईचा आवाज ऐकताच सगुणाबाईंचा चेहरा खुलला. 'आज संध्याकाळी तुम्ही सर्वांनी जेवायलाच यायचे असे इंदुमतीबाई म्हणत होत्या. 'थांब ह्यांना विचारून बघते' असे सगुणाने म्हणताच. 'कशाला विचारायला पाहिजे? आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असे म्हणून इंदुमतीबाईंनी फोन ठेवला. आश्चर्याची बाब म्हणजे संपतरावांनी सुद्धा फारसे आढेवेढे घेतले नाहीत. सुगरण इंदुमतीबाईंनी खास स्वयंपाकाची तयारी चालवली होती. 'या संपतराव या' असे म्हणत विश्वासरावांनी त्यांचे स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर नातवंडांनी विश्वासरावांचा ताबा घेतला. आजोबांच्या तोंडून ऐतिहासिक गोष्टी ऐकणे त्यांचा आवडता छंद होता. सगुणाबाई आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या. संपतरावांनी दूरदर्शनसंच सुरु केला. प्रादेशिक बातम्या सुरु होत्या. 'सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन' दूरदर्शनवरील निवेदिका सांगत होती. संपतराव स्वतःशीच हसले. तसे म्हणायला गेले तर ही बातमी ही गेले कित्येक वर्षे काही महिन्याच्या कालावधीनंतर सतत येणारी! निमित्त वेगवेगळी असोत पण केंद्रीय शिष्टमंडळाशिवाय आपले पानही हलायचे नाही हे जाणवून संपतरावांना हसू आले. पण ह्या वेळचे शिष्टमंडळ आपल्या भवितव्याची किल्ली घेवून आले आहे ह्या जाणीवेने ते थोडे अस्वस्थ झाले. सगुणाबाई मात्र एकदम प्रसन्न मुद्रेत होत्या . जीवनात ही घडी अशीच राहू दे हे आपल्या आवडीचे गाणे गुणगुणत होत्या. इंदुमतीबाई मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. ज्यावेळी विश्वासरावांनी जावयाला सहकुटुंब जेवायला बोलाविले तेव्हा ते सकाळच्या भाऊरावांच्या फोनविषयी चर्चा करायला असे त्यांना वाटले होते. पण इथे तर अशी काही चिन्हे दिसत नव्हती. आणि आपण हा विषय काढला तर विश्वासरावांना आवडेल की नाही ह्याची खात्री नसल्याने त्या गप्प राहिल्या. जेवणे एकदम प्रसन्न वातावरणात पार पडली. 'संपतराव, बाकी तुमचे वजन हल्ली वाढत चालले आहे' ह्या विश्वासरावांच्या वाक्यावर संपतराव मनापासून खुश झाले. आपल्या राजकीय प्रभावाची सासऱ्याने केलेली ही स्तुती आहे असे वाटून त्यांनी दोन घास अधिक घेतले.
रात्री घरी परतताना अकरा वाजून गेले. सगुणाबाई मुलांना झोपवीत असताना सवयीनुसार संपतरावांनी दूरदर्शन संच लावला. आणि त्यावरील ब्रेकिंग न्यूज पाहून ते हादरून गेले. 'सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव ह्यांच्या जीपला मुंबईला जाताना अपघात, विजयरावांचे अपघाती निधन!'

Sunday, December 16, 2012

पट मांडला! भाग दुसरा


एकदा सरपंच झाल्यावर संपतरावांनी मागे वळून पाहिलेच नाही. गावातील माध्यमिक शाळेला जोडून उभे केले गेलेले महाविद्यालय, मातीच्या रस्त्यांची जागा घेतलेले डांबरी रस्ते असो अथवा जवळच बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित धरणाची जागा असो सर्वांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला. आतापर्यंत सर्व कसे सुरुळीत चालले होते, संसारवेलीवर दोन सुंदर फुलेही फुलली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मध्येच येऊन गेलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊरावांना निवडून आणून देण्यात विश्वासरावांबरोबर संपतरावांनी खांद्याला खांदा लावून काम केले. निवडणुकीत विरोधी पक्षाचा धुव्वा उडविल्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचे नियोजनही अर्थात संपतरावांनी केले. म्हणायला तसे एक गालबोट लागले ते मिरवणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयसभेच्या वेळी. व्यासपीठावर आपली जागा संपतरावांनी गृहीतच धरली होती. परंतु ऐनवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आले आणि संपतरावांचे व्यासपीठावरील स्थान हुकले. त्यांच्या मनाला हे कुठेतरी लागून राहिले.
विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षातच विश्वासरावांचा संचालकपदाचा कालावधी संपला. भाऊराव आणि विश्वासरावांच्या बैठकी आता परत जोरात रंगू लागल्या. संपतराव सुद्धा त्यात असायचेच परंतु चर्चा होतेय ती फक्त बुजुर्गात आणि आपण केवळ नावापुरते तिथे असतो हे लक्षात आल्यावर संपतरावांनी तिथे आपले जाणे कमी केले. आता हळूहळू संपतरावांनी आजूबाजूच्या गावाकडे मोर्चा वळविला. निर्मळ गावाच्या प्रचारात त्यांना भाग घेण्याचे आलेले आमंत्रण त्यांनी खुशीने स्वीकारले. त्या गावातील पक्षाच्या विजयाचा आनंद त्यांनी स्वतःच्या विजयापेक्षा जास्त खुशीने साजरा केला. झाई गावाच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना होता आणि त्यावेळी त्यांना प्रचारासाठी खास बोलावणे आले. इथेही आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर आणि केलेल्या कामगिरीची उदाहरणे देत त्यांनी गावकऱ्यांना जिंकून घेतले. ही ग्रामपंचायत जिंकताच संपतराव हे नाव परिसरात मोठ्या आदराने घेवू जावू लागले.
इथे भाऊराव मात्र राज्यपातळीवरील राजकारणात गुंग झाले होते. मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या विरोधात सुजीतकुमार सक्रियपणे पक्षांतर्गत आघाडी चालवत होते. अण्णासाहेबांच्या खुर्चीवर त्यांचा डोळा होता. अण्णासाहेबांच्या वा त्यांच्या सहकार्यांच्या कारभारात कुठे काही खुसपट काढता येईल का याची ते कधीपासून वाट पाहत होते. त्यांनी ह्या कामासाठी स्थापन केलेल्या खास गटात भाऊरावांना आघाडीचे स्थान होते. परंतु ह्या कामानिमित्त आपल्याला मुंबईतच सतत राहावे लागते ह्याची खंत भाऊरावांना लागून राहिली होती. त्यांची अस्वस्थतता वाढली जाण्याचे अजून एक कारण होते ते जिल्ह्यातून येणाऱ्या संपतरावांच्या कामगिरीच्या बातम्या.
दुसरा दिवस उजाडला. संपतराव सकाळची आन्हिक आटपून पेपर चाळत चहाचा घोट घेत बसले होते. इतक्यात महादेव जोरात आपली बाईक घेवून घराच्या दिशेने येताना त्यांना दिसला. महादेव त्यांचा सच्चा कार्यकर्ता. नवीन युगाशी, त्यातील सगळ्या नवनवीन गोष्टींशी नाते जोडून असणारा. महादेवने बाईक घाईघाईतच अंगणात लावली आणि तो संपतरावांकडे आला. 'परवा केंद्रीय शिष्टमंडळ मुंबईला येतेय', संपतरावांनी दिलेल्या खुर्चीवर बसता बसता महादेव म्हणाला. 'अरेच्चा पण हे सगळे पेपर तर मी चाळून काढले पण ही बातमी कोठे दिसली नाही! आश्चर्य चकित होवून संपतराव म्हणाले. 'इंटरनेटवर बातमी आलेय' असे महादेव म्हणताच संपतरावांचे आश्चर्य ओसरले. जी काही धडपड करायची ती येत्या दोन दिवसातच ह्याची जाणीव त्यांना झाली.
केंद्रीय शिष्टमंडळाला भेटायला जाणाऱ्या जिल्ह्यातील पक्षाच्या गटाचे नेतृत्व विजयराव करणार हे माहित करून घ्यायला संपतरावांना फारसा वेळ लागला नाही. दुपारचे जेवण घाईघाईतच आटपून ते आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघाले. 'जाताना आबांना भेटून जा' हा सगुणा बाईंनी त्यांना दिलेला सल्ला त्याच्या कपाळावर आठ्या उमटवून गेला हे सगुणा बाईंच्या लगेच लक्षात आले. नाईलाजास्तव त्यांनी आपली गाडी विश्वासरावांच्या बंगल्याकडे वळविली. 'साहेब आताच बाहेर कामानिमित्त गेले आहेत' हे सासू बाईंच्या तोंडचे उद्गार ऐकताच खुश होवून त्यांनी सासू बाईंचे आशीर्वाद घेतले आणि ते तडक निघाले.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तुफान गर्दी होती. विजयरावांनी विविध मतदारसंघांचे क्रम आखून दिले होते. दिवेपुरचा क्रमांक बराच मागे होता. इतर मतदारसंघांची चर्चा अपेक्षेपेक्षा जास्तच लांबली. एकेका मतदार संघात ५ - ५ इच्छुक मंडळी होती. सर्वांचे म्हणणे ऐकून घेताघेता विजयरावांच्या नाकी नऊ आले. दिवेपुरचा क्रमांक आला त्यावेळी रात्रीचे ११ वाजून गेले होते. संपतरावांना पाहताच विजयरावांची कळी खुलली. ह्या तरुण कार्यकर्त्याविषयी ते बरेच ऐकून होते. महादेवने बनवून दिलेले संपतरावांच्या कामगिरीचे पॉवर पॉईटचे प्रेसेंटटेशन पाहून विजयराव अत्यंत खुश झाले. त्यांची ही खुशी पाहून संपतरावांना खूप बरे वाटले. त्या खुशीतच ते आपल्या सहकार्याच्या निवासस्थानी झोपावयास गेले. बिछान्यावर पहुडता पहुडता आपल्या मतदारसंघातून दुसरे कोणीच इच्छुक कसे आले नाहीत याचा त्यांना अचंबा लागून राहिला. 
 
सकाळ सकाळी विजय रावांच्या दूरध्वनीची बेल खणखणली तेव्हा त्यांनी अगदी वैतागून फोन उचलला. रात्री झोपताना त्यांना दोन वाजले होते आणि मुंबईला घेवून जाणारी जीप सकाळी १० वाजता निघणार होती. तोपर्यंत चांगली झोप काढावी असा त्यांचा मनसुबा होता. पण समोर भाऊराव आहेत हे समजताच त्यांचा नाईलाज झाला. बाकीच्या मतदारसंघांचा आढावा घेत चर्चेचा ओघ दिवेपुरकडे वळला. आता मात्र विजय रावांच्या बोलण्यात नवीन चैतन्य आले. संपत रावांची स्तुती करतांना त्यांना जणू काही शब्द कमी पडत आहेत असा भाऊरावांना भास झाला. आपला राग मोठ्या मुश्किलीने आवरून त्यांनी फोनवरील बोलणे आटोपते घेतले. हा फोन संपताच त्यांनी सुजितकुमारांना फोन लावला. सुजित कुमारांनी फोन उचलल्यावर त्यांच्या स्वरात नेहमीचे चैतन्य नाही अशी संशयाची पाल भाऊरावांच्या मनात चुकचुकली. 'भाऊराव, श्रेष्ठींनी यंदा नवीन रक्ताला वाव द्यायचे  ठरविले आहे' हे सुजितकुमारांचे शब्द तप्त आगीच्या गोळ्याप्रमाणे त्यांच्या कानी पडले. पुढचे सुजीतकुमारांचे बोलणे ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. हा फोन संपताच ते रागारागाने अंगणात फेऱ्या मारू लागले. इतक्यात त्यांच्या मनात असे काही विचार आले की त्यांची मुद्रा खुशीने उजळून निघाली. त्यांनी तडक विश्वासरावांना फोन लावला. आजूबाजूचे बोलणे झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला. 'विश्वासराव, तुम्ही बघा इतकी वर्ष साथ दिलीत आम्हाला! आता यंदा तुम्हीच निवडणुकीला उभे राहावे असे म्हणतो मी!' त्यांचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून विश्वासराव प्रथम थोडे आश्चर्यचकित झाले पण आपल्या मनातली भावना कोणीतरी ओळखली ह्याचा त्यांना जबर आनंद झाला. 'आता बघा तशी काही माझी इच्छा नाही पण जर तुम्ही म्हणत असालच तर मी तयार आहे' विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून मागे उभ्या असलेल्या इंदुमती बाई एकदम चकित झाल्या!

क्रमशः

पट मांडला ! भाग पहिला


घरची सभा संपल्यावर कार्यकर्त्यांना घेवून जाणारी जीप जशी नजरेआड झाली तशी संपतरावने सुटकेचा निश्वास टाकला. विधानसभेची निवडणूक घोषित होणार होणार म्हणून जी काही इतके दिवसाची अनिश्चितता होती ती एकदाची काल संपुष्टात आली. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. संपतराव इतके दिवस लपूनछपून मोर्चेबांधणी करीत होता. आपल्याला स्थानिक पातळीवर किती पाठिंबा आहे याची चाचपणी करीत होता. ही सर्व चाचपणी करताना भाऊरावांना त्याचा सुगावा लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता. दिवेपूर मतदारसंघ तसा मोक्याचा होता. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार भाऊराव मागच्या दोन खेपेला निवडून आले होते. आणि गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षात त्यांनी तसे मोक्याचे स्थान बनविले होते. मंत्रिमंडळाच्या मागच्या खेपेच्या विस्तारात भाऊरावांची वर्णी लागणार अशी जोरदार बातमी होती. संपतराव बिचारा पाण्यात देव बुडवून बसला होता. एकदा का भाऊराव मंत्री बनले की आपल्या आमदारकीच्या स्वप्नांना कायमचा सुरुंग लागणार हे तो ओळखून होता. तसे त्याला एकदोन वेळा विरोधी पक्षाकडून निरोपही आले होते. परंतु एवढी मोठी जोखीम घ्यायची त्याची तयारी नव्हती. आणि मग ज्यावेळी मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि त्यात भाऊ रावांचा समावेश झाला नाही त्यावेळी संपतने सुटकेचा निश्वास टाकला.
'कसला विचार करत बसलात, जेवण वगैरे घ्यायचे कि नाही? आता तर निवडणुका नुसत्या जाहीर झाल्या आहेत! ' सगुणाबाईच्या ह्या शब्दांनी संपतराव भानावर आले. पुढचे विचार मनातच ठेवत त्यांनी हातावर पाणी टाकले आणि ते पानावर बसले. सगुणाबाई जिल्ह्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या कन्या. त्या संपतरावांच्या आयुष्यात आल्या आणि संपतरावांचे आयुष्य पुरते पालटून गेले. कारखान्याच्या कार्यालयात सर्व हिशोब कसोशीने सांभाळणारा हा चुणचुणीत पदवीधर विश्वासरावांना आधीपासूनच आवडायचा. एकदा आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ लावताना मोठा बाका प्रसंग उद्भवला. कार्यालय नियोजित वेळेच्या पुढे चालू ठेवले तर काहीतरी गडबड आहे हे साऱ्यांच्याच लक्षात यायचे. तसे व्हायला नको म्हणून विश्वासरावांनी सर्व कारभार घरी हलवायचा हुकुम दिला. संपतराव आणि कर्मचारीवर्ग विश्वासरावांच्या बंगल्यावर दाखील झाला. रात्रभर सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आणि त्यांच्या कामाची तपासणी करीत, सकाळपर्यंत संपंतरावने परिस्थिती आटोक्यात आणली. ह्या सर्व प्रकारात संपतने विश्वासरावांचा विश्वास तर संपादन केलाच आणि त्याच बरोबर सगुणाच्या नजरेतही ते भरले. आपल्या वडिलांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढणारा हा सावळासा तरुण सगुणाला आवडून गेला. पुढे संपतचे बंगल्यावर कामानिमित्त येणेजाणे वाढत गेले. आणि एकंदरीत परिस्थिती ध्यानात येण्यास चाणाक्ष विश्वासरावांना वेळ लागला नाही. सुरुवातीला ह्या नात्याला फारसे अनुकूल नसणाऱ्या विश्वासरावांनी आधुनिक काळातील परिस्थिती ध्यानात घेत ह्या जोडीस आपली अनुकुलता दर्शविली.
लग्नसमारंभ मोठ्या थाटात झाला. आपल्या लग्नात एवढी मोठी नेते मंडळी येतील असे संपतने स्वप्नातही पाहिले नव्हते. आमदार शंकरराव, जिल्ह्याचे राज्यमंत्री ह्या सर्वांनी त्यांच्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. विश्वासरावांनी गावजेवण घातले. लग्नानंतर काही दिवसांनी फुरसत मिळाल्यानंतर संपतने आपल्या परीने लग्नखर्चाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आपली ही नोकरी आपण आयुष्यभर जरी केली तरी असे  लग्न आपण आयोजित करू शकणार नाही याची त्याला खात्री त्याला पटली. मग अचानक बातमी आली ती शंकररावांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूची! त्यांचे गाव दिवेपुरच्या बाजूचेच! त्यांच्या मृत्यूचा शोक सरतो न सरतो इतक्यात आमदारकीच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली. त्या भागातील मोठे उस शेतकरी असलेल्या भाऊरावांनी आपली प्यादी व्यवस्थित मांडून ठेवली होती. त्यांचे वजीर होते ते विश्वासराव! एकदंरीत सर्व काही मनाजोगते होवून गेले आणि भाऊरावांची आमदारपदी वर्णी लागली. ह्या सर्व घडामोडीत नवा जावई संपत बैठकीत आजूबाजूलाच असायचा. एकंदरीत संपतला हे क्षेत्र आवडते हे जसे विश्वासरावांनी जाणले तसे सगुणानेही. थोड्याच दिवसात संपतने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मग आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपत बिनविरोध निवडून आला आणि संपतराव सरपंच म्हणून विराजमान झाले.
क्रमशः

 

Friday, December 14, 2012

सावळा गोंधळ


मागे मी FM रेडीओ वाहिन्यांवर सुरु असलेल्या RJ लोकांच्या बाष्कळ गडबडीचा ओझरता उल्लेख केला होता. त्यांची गडबड बहुतांशी लोकांना सहन होत नाही, तीच गोष्ट केबल वाहिनीवरील मालिकांची, जवळजवळ सर्वजणच ह्या मालिकांना वैतागले आहेत. ह्यात काही सन्माननीय अपवाद (मालिकांचे) आहेतच.
तसेच उदाहरण हल्ली पेव फुटलेल्या लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त अथवा कंपनीच्या वार्षिक पार्टीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या खेळांविषयी! जर आपण जनमत आजमावले तर असे आढळून येईल की हे जे खेळ असतात ते बहुतांशी लोकांना आवडत नाहीत. परंतु पर्याय नाही म्हणून हे स्वीकारले जातात.
ह्या दोन्ही उदाहरणात असे आढळून येते की एखादी अपात्र गोष्ट सतत तुमच्या समोर सादर केली तर तुम्ही तिला एक योग्य गोष्ट म्हणून स्वीकारता.
गेल्या आठवड्यात लाईफ ऑफ पाय हा चित्रपट बघितला. चित्रपटाच्या आरंभीच येणारे नितांत सुंदर गाण, पोंडेचरीतील वसाहतकालीन शांत जीवन, सुंदर तब्बू सारे काही मस्त. त्यानंतरचे छायाचित्रणातील अद्भुत करामती. माणसाची कल्पनाशक्ती आणि संगणकाची तंत्रे वापरून विविध सुंदर देखावे निर्माण केले गेले आहेत. मानवाच्या मर्त्य जीवनापलीकडे काही असल्यास ते कसे असेल ह्याची विविध लोक वेगवेगळी चित्रे रंगवतात. ह्या चित्रपटातील छायाचित्रणातील अद्भुत करामती पाहून आपणही ह्या वेगळ्या विश्वाची आपल्या परीने चित्र रेखाटू शकतो. चित्रपटाच्या शेवटी नायक कथेला थोडी रूपकात्मक जोड देण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा चित्रपट कथानकाच्या पातळीवर भयंकर मार खातो. तंत्रज्ञानाची खूप उंची गाठलेल्या ह्या चित्रपटाने कथेच्या बाबतीत इतका मार खाल्ल्याचे पाहून वाईट वाटते.
मग आठवला तो जब तक हैं जान हा चित्रपट. तो ही तसाच. कथानकाच्या पातळीवर सगळी बोंब. मग आठवले ते ह्या वर्षी सुद्धा विकत घेतलेला दिवाळी अंकांचा संग्रह. पूर्वी वाचलेल्या दिवाळी अंकातील दीर्घ कथेच्या आठवणीने मी दर वर्षी दिवाळी अंकाचा संच विकत घेतो आणि दर वर्षी निराशाच पदरी पडते.
केबल टीवी वर वर्ल्ड मूवी नावाची एक वाहिनी येते. त्यातील तंत्रज्ञानाच्या प्राथमिक पातळीवर असणारे पण कथानकाच्या आणि कथेतील व्यक्तिमत्वाच्या रंगछटा रंगविण्याच्या बाबतीत विलक्षण पातळी गाठलेले चित्रपट आठवतात.
एकंदरीत काय तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता विरुद्ध दिशेने जात असाव्यात असा मी घाईघाईने निष्कर्ष काढतो. आता ह्यामागे मूळ कारण काय तर उत्तम पर्यायांचा अभाव. सर्जनशीलता असणारे लोक अजूनही अस्तित्वात आहे परंतु एक तर त्यांना संधी मिळत नाही किंवा त्यांना ह्या गोंधळाच्या जगात आपली कला सादर करायला आवडत नाही. जातिवंत कलाकार जनसामान्यांपासून अधिकाधिक दूर जात आहेत आणि सार्वजनिक माध्यमातून चालला आहे तो मुर्खांचा गोंधळ!
अजून एक मुद्दा तो मुंबईतील सर्वाधिक खप असलेल्या वर्तमानपत्राविषयी. दुनियेत फक्त भ्रष्टाचार, लफडी, अत्याचार, चोऱ्यामाऱ्या चालू आहेत असा समज हे वर्तमानपत्र वाचल्यावर होतो. त्यात चांगली सदरेही असतात पण ती ह्या सर्व गोंधळात शोधावी लागतात. गंभीरता राखून असलेल्या वर्तमानपत्रांचा खप दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

Monday, December 10, 2012

भारतराष्ट्राचे ध्येय


व्यावसायिक जीवनात प्रत्येक वर्षी व्यक्तिगत, सामुहिक आणि संघटनेच्या पातळीवर ध्येये ठरविली जातात. ही ध्येये प्राप्त करण्यासाठी मार्ग आखला जातो आणि वर्षाच्या शेवटी ह्या ध्येयांच्या तुलनेत आपण प्रत्यक्ष किती प्रगती केली ह्याची तपासणी केली जाते. ह्या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे पूर्णपणे साध्य होत नाही परंतु यशस्वी कंपन्या बर्याच प्रमाणात ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविताना दिसतात. भारताचे पुढील वर्षाचे, दशकाचे किंवा अधिक कालावधीचे ध्येय जाणून घ्यायचे असेल तर योग्य ठिकाण कोणते हा मला पडलेला प्रश्न.
पहिलीच एक कबुली की आपल्या प्रशासकीय प्रणालीबद्दल मला जवळजवळ शून्य ज्ञान आहे. त्यामुळे भारताचे ध्येय दाखविणारे एखादे कागदपत्र असेलही आणि असे असल्यास मला आनंद होईल. पण माझा अंदाज असा आहे की देश म्हणून आपली धोरणे असतात. संरक्षण धोरण, कृषी धोरण, औद्योगिक धोरण, क्रीडा धोरण इत्यादी इत्यादी. परंतु ह्यात उल्लेखलेली ध्येये बहुदा देशाच्या पातळीवर असतात. देशाचे आर्थिक / कृषी उत्पादन पुढील १० वर्षात इतक्या टक्क्यांनी वाढले पाहिजे इत्यादी इत्यादी. परंतु ह्यात वैयक्तिक पातळीवर आपण भारतीय नागरिकास काही कालावधीनंतर कोठे पाहत आहोत ह्याचा उल्लेख असावा की नाही ह्याबाबत मी साशंक आहे. समजा भारतीय समाजाचे आपण विविध वर्गात वर्गीकरण केलं, शेतकरी (ह्यात अल्प भूधारक आणि मोठे जमीनदार असे प्रकार येवू शकतात), नोकरवर्ग, लघु आणि मोठे उद्योजक आणि बाकीचे रोजंदारीवर जगणारे लोक. त्यानंतर ह्या प्रत्येक वर्गातील लोकांचे आर्थिक उत्पन्नानुसार वर्गीकरण करता येईल. आपली कृषी आणि औद्योगिक धोरणे ह्यातील किती वर्गांचे भवितव्य आखीत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल. आपण जनगणनेद्वारे ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या माहितीच्या अचूकतेविषयी खात्री देता येईल असा विश्वास बाळगणे थोडे कठीण जाते.
सध्या मला मनात एक भीती वाटत आहे. आपण जी सध्या मध्यमवर्गाची प्रगती पाहत आहोत, ती दोन गोष्टीवर आधारित आहे. एक म्हणजे आपल्या पिढीची कष्ट करण्याची तयारी आणि दुसरे म्हणजे तुलनेने कमी असणारा पगार. १९९० - २००० च्या कालावधीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरलेले बहुतांशी लोक मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आले होते. हे सर्व आता उच्च मध्यमवर्गीय वर्गात मोडू लागले आहेत. ह्या वर्गातून पुढे येणारी पिढी इतकीच कष्ट करणारी असेल असा विश्वास देता येत नाही. केल्या जाणार्या कष्टाचे आणि मिळणाऱ्या पगाराचे समीकरण ह्या नवीन पिढीच्या बाबतीत धोकादायकरित्या बदलू लागले आहे.
कालच जो ब्लॉग लिहिला त्यात पुस्तक वाचून मला जाणवलेले कृषी क्षेत्राचे विदारक चित्र मी रेखाटले आहे. थोडक्यात सांगावयाचे झाले तर सध्याच्या आपल्या प्रगतीचे दोन्ही (कृषी आणि शैक्षणिक) खांब ठिसूळ पायावर उभे आहेत अशी मला भीती वाटते. त्यामुळेच जाणकार व्यक्तींनी भारतीय समाजाचा संख्यात्मक अभ्यास करून पुढील काही वर्षात लोकांना रोजगाराची खात्रीची क्षेत्रे उपलब्ध करणे आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे. पुन्हा इथे ही जबाबदारी बुद्धीजीवी वर्ग का स्वीकारत नाही हा प्रश्न उद्भवतोच!
 

Sunday, December 9, 2012

STOLEN HARVEST - समृद्धीची लुट - एक अस्वस्थकारी अनुभव


मध्यंतरी वीणा गवाणकरांनी चतुरंग मध्ये वाचनसंस्कृती विषयी एक छान लेख लिहिला होता. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून वाचन करणे कसे महत्वाचे आहे असा एकंदरीत त्या लेखाचा आशय होता. वाचनाच्या सवयीने मुलांची बौद्धिक वाढ कशी झपाट्याने होते हे सर्वांनाच ऐकून माहित असते परंतु ते प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी पालकांना स्वतः आदर्श निर्माण करावा लागतो आणि हीच फार कठीण गोष्ट आहे. माझा एक खास मित्र अधून मधून मराठीतील वाचनीय पुस्तकांची मला शिफारस करत असतो. हल्लीच त्याने कमल देसाई ह्यांनी अनुवादित केलेले समृद्धीची लुट हे पुस्तक सुचविले. मूळ पुस्तक वंदना शिवा ह्यांनी STOLEN HARVEST ह्या नावाने लिहिले आहे.
नैसर्गिक साधनसामृगीच्या ऱ्हासाविषयी आपण सर्वच भावनिक होवून बोलत असतो. परंतु हे पुस्तक आकडेवारीसहित काही विदारक सत्य समोर आणते. नैसर्गिक अन्नसाखळीला परंपरागत शेती कशी जोपासत होती आणि आता छोट्या शेतकऱ्याच्या अधोगातीमुळे ही नैसर्गिक अन्नसाखळीच कशी धोक्यात आली आहे, तथाकथित शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे चित्र कसे दिखावू आणि क्षणभंगुर आहे ह्याचे भयाण चित्र हे पुस्तक आपल्यासमोर रेखाटते. त्यानंतर लेखिका जगाच्या विविध भागातील स्थानिक अन्न संस्कृतीचा कसा वेगाने ऱ्हास चालू आहे ह्या विषयाला हात घालते. तिथून लेखिका समुद्रातील मस्त्यसंपत्तीचा मनुष्याने कसा विनाश चालविला आहे ह्याकडे वळते.
हा ब्लॉग लिहताना सुरुवातीला मी ह्या पुस्तकाचा सारांश मांडावा असा विचार केला होता. परंतु ज्या पातळीवर हे मूळ पुस्तक आणि त्याचा अनुवाद लिहला गेला आहे ते लक्षात घेता हा सारांश लिहिणे म्हणजे लेखिका आणि अनुवादिका ह्या दोघींवर अन्याय करण्यासारखे होईल हे मला जाणवले. इथे एकच म्हणणे, जर तुम्हाला पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी चिंता वाटत असेल तर हे पुस्तक मिळावा आणि वाचा.
दुनियेत पूर्वीपासून सम्राट होते. पूर्वी उघड रूपाने संपत्ती गोळा करणाऱ्यांनी आपली रूपे, पद्धती बदलल्या आहेत एवढाच काय तो फरक.
 

Friday, December 7, 2012

जडणघडण कळत नकळत


मनुष्याच्या लहानपणापासून त्याचा जडणघडण ह्या संकल्पनेशी संबंध येतो. लहानपणी बालकाचे पालक त्याच्यावर आपल्या निवडीनुसार, जमेल तितके संस्कार करायचा प्रयत्न करतात. असे म्हणतात की बालक ही ओल्या मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना जसे घडवावे तशी ती घडतात. बालक एका विशिष्ट काळापर्यंत हे संस्कार बिनबोभाट स्वीकारत. हा काळ (ज्यात बालक पालकांनी केलेल्या संस्काराला विरोध करीत नाही) प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. त्यानंतर बालकास स्वत्वाची जाणीव होते. मग बालक त्याच्यावर होणार्या जडणघडणीच्या प्रयत्नांविषयी आपली मते दर्शविण्यास सुरुवात करते. ह्या क्षणानंतर चालू होतो तो मनुष्याच्या आयुष्यातील एक प्रवास ज्यात मनुष्य एक तर कोणाकडून तरी घडविला जातो किंवा मनुष्य कोणाला तरी घडवितो. आता ह्यातला कोण म्हणजे आजूबाजूचे लोक किंवा परिस्थिती.
बालकाच्या जडणघडणीचे ढोबळमानाने दोन प्रकार करता येतात. पालक एक तर बालकास आपण जसे घडलो तसे बनविण्याचा प्रयत्न करतात किंवा बालकाला बाहेरच्या जगात सक्षम नागरिक बनविण्याच्या हेतूने त्याची जडणघडण करतात. हल्ली आढळून येणारा नवीन प्रकार म्हणजे बालकाच्या जडणघडणीस त्याच्या दैवावर सोडून देणे. काही कालावधीनंतर मुलं परिसरातील मुलांशी खेळतात, शाळेत जाऊ लागतात. बालकाचा ओलावा अजूनही कायम असतो. इथे मित्र आणि शिक्षक हे जडणघडणीतील दोन महत्वाचे घटक समोर येतात. इथे एक नवीन गोष्ट घडते आणि ती म्हणजे बालक हळूहळू दुसर्याशी संवाद साधताना आपली मते दर्शविते आणि जेणेकरून दुसर्या व्यक्तीच्या जडणघडणीत थोडाफार भाग घेते.
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना हळूहळू बालकाचा ओलावा कमी होत जातो. त्याची व्यक्ती म्हणून जडणघडण बर्याच प्रमाणात पूर्णत्वास आलेली असते. ह्या इथवरच्या प्रवासात त्या बालकाची पैसा ह्या घटकाशी वेगवेगळ्या प्रमाणात ओळख झालेली असते. ज्यांना अर्थाजनाची जबाबदारी ह्या वयातच घ्यावी लागते त्यांच्या बाबतीत पैसा हा घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ह्या वयातच एक वेगळी झालर देवू शकतो. बाकी सर्वांच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनानंतर नोकरी/ व्यवसाय हा प्रकार समोर येतो. माणसाच्या व्यावसायिक व्यक्तिमत्वावर हे दोन घटक (नोकरी / व्यवसाय आणि त्या अनुषगाने सामोरे जाव्या लागणाऱ्या व्यक्ती) परिणाम करतात. काहींच्या बाबतीत व्यावसायिक व्यक्तिमत्वातील हा बदल इतका प्रभावी ठरतो की त्यांचे वैयक्तिक व्यक्तिमत्व बदलून जाते.
ह्या क्षणी नैसर्गिक पणे होऊ शकणारी माणसाची जडणघडण पूर्णत्वास आलेली असते. आणि एक नवीन घटनेस तो समोर जातो आणि ती म्हणजे विवाह. ह्या घटनेमुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा जिच्यावर सर्वात जास्त परिणाम होतो अशी व्यक्ती त्याच्या जीवनात येते आणि येताना ती व्यक्ती आपले पूर्णत्वास आलेले व्यक्तिमत्व घेवून येते. आपले पूर्वज बालविवाहाच्या प्रथेचा पुरस्कार करायचे. त्यात आपल्या घरातील येणाऱ्या सुनेची जडणघडण सुद्धा आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार व्हावी असा प्रयत्न असायचा. असो परत हल्लीच्या काळाकडे. विवाहानंतर दोन पूर्णत्वाला आलेली व्यक्तिमत्व एकत्र नांदू लागतात. आणि मग सुरु होतो तो एकमेकांच्या जडणघडणीचा एक अदृश्य, कळत नकळत प्रयत्न. मगाशी एक मी वाक्य टाकले. ' ह्या क्षणी नैसर्गिक पणे होऊ शकणारी माणसाची जडणघडण पूर्णत्वास आलेली असते.' इथे मग पती पत्नी ह्यांनी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक असते. व आपल्या व्यक्तीमत्वात आवश्यक अशी जडण घडण करणे अनिवार्य बनते. काही जोडप्यांच्या बाबतीत हा प्रकार सुरुळीतपणे पार पडतो आणि काही जोडपी ह्या बाबतीत थोडा संघर्ष करतात. कधी हा प्रवास संवादासहीत होतो तर कधी छुप्या रीतीने होते. कधी ही एकमेकाला अनुरूप बनविण्याची जडणघडण यशस्वी होते तर कधी नाही.
इथे एक अजून घटना घडत असते. मनुष्य आपल्या मुलांवर जडणघडणीचा प्रयत्न करीत असतो. एक आलेख असतो तो मनुष्याच्या स्वतःच्या जडणघडणीचा जो आपला उच्च बिंदू गाठून आपल्या साथीदाराच्या व्यक्तिमत्वाच्या आलेखावर नजर ठेवीत काहीसा समांतर दिशेने प्रवास करीत असतो आणि त्याच वेळी उभारणाऱ्या आपल्या मुलांच्या आलेखावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतो. कधी ही समीकरणे फार क्लिष्ट बनून जातात आणि मग माणसाला एक प्रकारचे वैराग्य येते. माणूस आपल्या खर्या व्यक्तिमत्वाला आवरण घालतो आणि सभोवतालच्या परिस्थितीला अनुकूल असे खोटे व्यक्तिमत्व बनवून जीवन जगत राहतो.
काही माणसे समाजाच्या जडणघडणीचा प्रयत्न करतात. पूर्वी समाज थोड्याफार प्रमाणात आपला ओलावा राखून होता आणि त्यामुळे संत मंडळी, लेखक, नेते ह्यांनी हा प्रयत्न यशस्वीरित्या केला. आता हा प्रयत्नही सोपा राहिला नाही!

Thursday, December 6, 2012

ब्लॉग हिट संख्या - कबुलीजबाब


दोन वर्षापूर्वी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा ह्या संकेतस्थळाला किती जणांनी भेट दिली हे आपण माहित करून घेवू शकतो हे मला ठाऊक नव्हते. मध्येच बहुदा ब्लॉग स्पॉटवाल्यांनी काही प्रशासकीय सुधारणा केल्या किंवा मी त्या प्रथमच पाहिल्या आणि मग मी बिघडलो. आधी स्वानंदासाठी लिहिणे हाच एक उद्देश होता. आता आपल्या ब्लॉगला किती हिट मिळतील हा विचार डोक्यात शिरू लागला. शालेय आणि खास मित्रांना पूर्वी पूर्ण ब्लॉग मेल मधून पाठवणारा मी आता फक्त लिंक पाठवू लागलो. त्यानंतर काही दिवसांनी हा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व (http://marathiblogs.net/) ह्या संकेतस्थळाला जोडला गेल्यावर ब्लॉग भेटींच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली. तरी माझा ब्लॉग २०१० मध्ये (दीपक कदम ह्यांनी) बनविला असल्याने आणि त्याला एकदम आधुनिक स्वरुपात कसे आणायचे हे माहित नसल्याने त्याला एकूण किती लोकांनी भेटी दिल्या हे एकत्रितरित्या नोंदले जात नाही. ते कसे करून घ्यायचे हे मी कधीतरी शिकून घेईन असा मला विश्वास आहे.
असो ब्लॉगला मिळालेल्या भेटींच्या संख्येवरून मी त्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केली.
न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणी २३२ भेटी
PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्र १५८ भेटी
रिकामी न्हावी... १४५ भेटी
चांगुलपणा, तक्रार, गिरीश कुबेर....१४० भेटी
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग!! १२७ भेटी

असे काहीसे वर्गीकरण झाल्याचे आढळले. ज्या ब्लॉगची संख्या जास्त आहे त्यामागे अनेक कारणे आढळली.
१> विषय - शालेय जीवनातील आठवणी हा विषय असल्यावर आणि तो १००० सदस्य असलेल्या फेसबुक गटावर जबरदस्तीने लादल्यावर ही भेटसंख्या अपेक्षित होती. तसे बघितले तर हा लेख चांगला उतरला आहे. असा माझा समाज आहे :)
२> माझे भावजी निशांक सावे ह्यांनी काही ब्लॉग त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध केले. त्यांचा मराठी रसिक मित्रपरिवार दांडगा असावा. कारण त्या ब्लॉगना चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या पत्नीने सुद्धा काही ब्लॉग तिच्या फेसबुकवर प्रसिद्ध करून हातभार लावला.
३> ब्लॉगचे शीर्षक - हे जितके आकर्षक तितके जास्त लोक वाचणार. ह्यात प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाचा समावेश केल्यास भेट संख्या नक्की वाढणारच.
४> जितका वेळ तुमचा ब्लॉग मराठी विश्वाच्या प्रथम पृष्ठावर राहणार तितका अधिक भेटी मिळायची संधी जास्त. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री प्रसिद्ध केल्यास संख्या थोडी जास्त पटकन वाढते. बहुदा अमेरिकेतील मातृभूमीला आसुसलेले जीव मराठी ब्लॉगला जास्त भेट देत असावेत त्यांच्या शनिवारी सकाळी.
५> मध्ये मी गुलजार ह्यांच्यावर लिहायला घेतले पण माझ्या वडील भावाने, संजीवने  सुचवले की तूझे वैचारिक लेखन थांबवू नकोस. त्याचा सल्ला मी मानला.
ह्यात एकंदरीत मी बिघडलो! गंभीर विषयावरील लिखाण मी कमी केले. मला वैयक्तिक पातळीवर आवडलेले वैचारिक ब्लॉग ह्या यादीत खालच्या क्रमांकावर असल्याचे पाहून मला थोडे दुःख झाले. परंतु हा भ्रष्टाचार मी पुढे थोडा कमी करीन किंवा कमी करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन मी तुम्हाला देतो! बाकी आजचा ब्लॉग ही अधिकाधिक भेटी मिळाव्यात असा दृष्ट हेतू मनात ठेवूनच लिहिला आहे.

Sunday, December 2, 2012

मोकळा वेळ आणि अभियांत्रिकी


दिनांक डिसेंबर २०१२

अभियांत्रिकीच्या एका सत्राच्या परीक्षेत मला एक विचित्र अनुभव आला होता. पहिल्या पेपरच्या रात्री दहा वाजता मी पुस्तक बंद करून झोपायला गेलो. अभियांत्रिकीच्या लोकांना हा जरा विचित्र अनुभव वाटेल कारण अभियांत्रिकीच्या पेपरच्या आदल्या रात्री १० वाजता झोपणे हे काहीसे सामान्य वर्गात मोडणारे नाही. आता माझा अभ्यास पूर्ण झाला होता अशातली गोष्ट नव्हती. तसं म्हटलं तर अभियांत्रिकीचा कोणाचा अभ्यास कधी पूर्ण होत असेल हे शक्यच नाही. परंतु आदल्या दिवशी रात्री नवीन काही वाचायची मला त्यावेळी सवय नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर (सुमारे ४ वाजता) उठून आधी केलेला अभ्यास पुन्हा एकदा पाहायचा असा माझा मूळ हेतू असायचा. ११ वाजले झोप नाही, १२ वाजले तरी नाही, असे करता करता मी पूर्ण रात्र जागून काढली. पहिल्या पेपरच्या वेळी हा मला नाउमेद करणारा अनुभव वाटला. त्याचा परीक्षेतील माझ्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. मला नाउमेद होण्याचे मुख्य कारण उपलब्ध वेळ वाया चालल्याची अपराधी भावना. पुढे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पेपरलाही (म्हणजे पेपरच्या आदल्या रात्री) असेच घडले. कळत नकळत मी ह्या परिस्थितीवर उपाय शोधून काढला. १० नंतर अभ्यास करणारच नाही ह्या माझ्या अट्टाहासाचा पुनर्विचार केला. मेंदू पूर्ण तरतरीत नसताना कोणते धडे वाचता येतील हे ठरविले आणि मुख्य म्हणजे वेळ वाया गेला म्हणून अपराधी वाटून घेण्याचे थांबविले.
असाच अनुभव परदेशवारीवर (लग्नाआधी) गेल्यावर आला. साप्ताहिक सुट्टीच्या वेळी वेळ मुबलक असायचा. इंटरनेटवर निरर्थक वेळ घालविला की एकदम निष्क्रिय बनल्यासारखे वाटायचे. गप्पा मारायला पण ज्यांच्याशी आपला ताळमेळ जुळतो असे मित्र उपलब्ध असायचेच असे नाही. हळूहळू मला समजून चुकले की उदास न होता मोकळा वेळ कसा घालवायचा हा माझा एक मुख्य प्रश्न आहे. यावर माझ्या परीने मी काही उपाय शोधून काढले. माझा ८ वर्षाचा मुलगा ह्या बाबतीत माझे आशास्थान आहे. सुट्टीच्या वेळी जुनी खेळणी काढून तो एकटाच काही खेळत बसतो. मीही मग ब्लॉग लिहिणे चालू केले, केबल वाहिन्यांवर चित्रपट बघण्याची आवड जोपासली. क्रिकेटपासून (ज्या सामन्यात भारत सहभागी आहे) दूर राहण्याचे ठरविले. ज्या क्षणी माझा मोकळा वेळ सुरु होतो त्यावेळी असलेला माझ्या मनाचा उत्साह जी कोणती क्रिया / उद्योग मोकळा वेळ संपेपर्यंत वाढवील किंवा किमान कायम ठेवील अशा उद्योगाची यादी मी बनविली. चालणे अथवा व्यायाम हा देखील एक उत्तम उपाय आहे. पुढे अजून थोडा विचार केला मग मला जाणवले की काही मानसिक दृष्ट्या प्रगत माणसांना हा प्रश्न भेडसावत नाही. कामाची वेळ येताच मनाचा मूड वगैरे क्षुल्लक गोष्टींना ते थारा देत नाहीत. परंतु असे काही करण्याचा मी प्रयत्न केला नाही. आमच्या समाजातील वयस्क लोकांना पाहिले, ते निमित्त काढून इतरांकडे जातात यात त्या व्यक्तीला बरे वाटतेच पण त्यांचा स्वतःचा मूडही सुधारतो.
प्रत्येकाकडे एक TO DO LIST असते. त्यातली काही कामे करण्यासाठी मनाची एक किमान विशिष्ट उत्साहवर्धक स्थिती आवश्यक असते. ती असेल तरच अशी कामे हाती घ्यावीत. आताच जाणवले की ह्या ब्लॉग मध्ये आधीच्या काही ब्लॉगची पुनरोक्ती आहे.
पुन्हा एकदा अभियांत्रिकी परीक्षेकडे! समजा आपण एका विषयाची तयारी करून गेलो आणि दुसराच पेपर सोडविण्याची वेळ आपल्यावर आली तर आपण कितपत टिकाव धरू शकू? अभियांत्रिकीची बहुतांशी मुले / मुली म्हणतील की हालत खराब होईल. शेवटच्या दिवशी केलेला अभ्यास ही उत्तीर्ण होण्याची जीवनरेखा आहे. परंतु मला हे काहीसे पटत नाही. अभियांत्रिकी परीक्षेत आपण पेपर हातात येण्याआधी आणि सुरुवातीची ५ -१० मिनटे बेचैन असतो. पण एकदा का आपण पेपरची तपासणी केली की आपला मेंदू साधारणतः विश्लेषण तयार ठेवतो, कोणता प्रश्न आपल्याला सहजासहजी सोडविता येईल आणि कोणत्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला मेंदूत खोलवर शिरावे लागेल. जर आपणास दुसराच पेपर सोडविण्याची वेळ आली तर सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आपल्याला मेंदूत खोलवर शिरावे लागेल. असो मेंदूतील माहिती योग्य वेळी बोलण्या - लिखाणाद्वारे प्रकट करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी!