Sunday, April 27, 2014

न्यू इंग्लिश स्कूल प्रिमियर लीग - २०१४


लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केला. त्याचप्रमाणे २०१२ साली आमच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठीचा एक विरंगुळ्याचा उपक्रम म्हणून न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीगची (NPL) स्थापना केली. परवाच २६ एप्रिल रोजी ह्या NPL ची तिसरी आवृत्ती मोठ्या शानदारपणे पार पडली. 
स्पर्धेत एकूण १२ संघांनी भाग घेतला होता. मागच्या शनिवारी चिठ्या टाकून ह्या १२ संघांची एकूण ४ गटात विभागणी करण्यात आली. भाग घेतलेले संघ खालीलप्रमाणे आपल्या असे लक्षात येईल की सर्वात ज्येष्ठ संघ हा १९८१ साली दहावी उत्तीर्ण झालेला असून सर्वात तरुण संघ २००२ साली दहावी उत्तीर्ण झालेला होता. अशा प्रकारे ह्या दोन्ही संघाच्या वयात  २१ वर्षांचा फरक असला तरी क्रिकेट ह्या खेळाने ह्या सर्वांना एकत्र आणले होते.

गट अ - १९९९, २००२ - निर्मळ शाखा, १९८६
गट ब -  १९८२, १९८८, २००२
गट क - १९८३, १९८५, १९९६
गट ड -  १९८१, १९८७, १९८९


प्रत्येक संघास विशिष्ट रंगाचा टी शर्ट देण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांपैकी बहुतेकजण व्यावसायिक जगात यशस्वी झाले आहेत. त्यातील उज्ज्वल म्हात्रे आणि अमोल पाटील ह्यांनी हे टी शर्ट खास मुंबईहून मागवले. . त्यामुळे ह्या स्पर्धेला नक्कीच एक प्रकारची झळाळी प्राप्त झाली.
ह्या टी शर्टच्या रंग निवडीसाठी चिठ्या काढण्यात आल्या त्यावेळची ही चित्रे!आपल्या आवडीच्या रंगाचा टी शर्ट मिळाल्याने खुश झालेले १९८१ बॅचचे प्रशांत वर्तक!

मागच्या दोन वर्षीच्या स्पर्धा रविवारी सकाळी सुरु करून दुपारपर्यंत चालल्या. मे महिन्यात सकाळी ९ वाजल्यानंतर उन्हात खेळणे फार कठीण होते (विशेषतः ८० च्या दशकात १० पास झालेल्यांसाठी!!) हे लक्षात घेऊन अमोल पाटील ह्यांनी पुढाकार घेवून विद्युतझोतात सामने भरविण्यासाठी खास पुढाकार घेतला. 

शाळेत २४ तारखेला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पटांगणात पिच बनविण्यात आले. आणि स्पर्धेच्या दिवशी म्हणजे २६ एप्रिलला सकाळी मैदानाच्या सीमारेषा, क्रीज, विद्युतझोतासाठीचे खांब अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या. 

प्रत्येक गटात ३ संघ होते आणि प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार होता. त्यामुळे एकंदरीत ३ * ४ = १२ साखळी सामने आणि ३ बाद फेरीचे सामने असे एकंदरीत १५ सामने होते. ४ ते १० ह्या वेळात हे सामने आणि एक प्रदर्शनीय सामना खेळवायचे असल्याने वेळेचे बंधन पाळणे फार आवश्यक होते. आनंदाची गोष्ट अशी की स्पर्धा सव्वादहाच्या सुमारास आटपली. भिडे सरांनी शिक्षकांचा संघ जमा करण्यात यश मिळविले आणि सुगंधा जोशी ह्यांनी महिला संघ तयार केला. 

२६ एप्रिल दुपार

दुपारी साडेतीन वाजताच माजी विद्यार्थी संघ मैदानावर हजर होऊ लागले होते. १९८२  बॅचचे रंजन सावंत हे खंदे खेळाडू! आपल्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेला विसरून ते सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी चारच्या आधीच हजार होते. 

चार वाजता वसईतील प्रसिद्ध खेळाडू आणि क्रिकेट प्रशिक्षक वसंत मोरे ह्यांचा शुभहस्ते मैदानावर श्रीफळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ झाला. 
ह्या प्रसंगी स्पर्धेचे चेअरमन आणि ह्या ब्लॉगचे लेखक ह्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी ह्या स्पर्धेला व्यावसायिक रूप दिल्याबद्दल आयोजक समितीचे आभार मानले आणि स्पर्धकांनी मैदानाचे खडबडीत रूप पाहता जखमी न होण्याची दक्षता घेण्याची काळजी घ्यावी अशी विनंती केली. 
अ गटातील १९९९ विरुद्ध आणि २००२ निर्मळ ह्या संघातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. ह्या दोन्ही संघातील नाणेफेकीचा हा क्षण! हा सुरुवातीचा सामना अतिशय रंगतदार होऊन शेवटी बरोबरीत सुटला. १९९९ संघाने कमी विकेट गमावल्या होत्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत १९८६ हा एकमेव संघ येऊ शकला नाही. त्यामुळे ह्या एका सामन्याच्या निकालावर १९९९ संघ कमी विकेट गमावल्याच्या निकषावर उपांत्य फेरीत दाखल झाला. २००२ निर्मळ संघ - तुम्ही सुंदर खेळलात! पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच अजून पुढे जाल!

त्यानंतर ब गटातील १९८२ विरुद्ध २००२ वसई हा सामना झाला. माझे ज्येष्ठ बंधू संजीव पाटील हे सुरुवातीलाच बाद झाल्याने १९८२ संघाला धक्का बसला. त्यानंतर चंद्रशेखर गायकवाड आणि विवेक काणे ह्यांनी जबाबदार फलंदाजी करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सचिन घरत, आनंद चौधरी आणि संदीप ठाकूर ह्यांनी मोलाची साथ दिली. परंतु २००२ च्या तरुण रक्ताच्या खेळाडूंनी चपळ क्षेत्ररक्षण करीत धावसंख्येला आळा घातला. आपल्या फलंदाजीच्या जोरावर २००२ संघाने हा सामना आरामात जिंकला. त्यानंतर गतवर्षीचे विजेते १९९६ संघ आणि उपविजेते १९८३ ह्यांच्यात एक चुरशीचा सामना झाला. १९९६ संघांचे चिन्मय गवाणकर ह्यांचा प्रसन्न मुद्रेतील हा एक फोटो!१९९६ चे आणि माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार महेश अभ्यंकर ह्यांनी सर्व काही आलबेल असल्यांची ग्वाही दिली! बाजूलाच निळ्या शर्टातील त्यांचे प्रतिस्पर्धी उज्ज्वल म्हात्रे. उज्वल म्हात्रे ह्यांनी २०१३ स्पर्धेत सर्वोकृष्ट फलंदाजीचा पुरस्कार मिळविला होता. 
सर्व काही आलबेल असलं तरी नियमांचे पालन हे केलेच पाहिजे हे सांगायला महेश विसरले नाहीत. १९८३ साली उत्तीर्ण झालो असलो तरी आमच्या क्रीडाकौशल्याला कमी लेखू नका हे आपल्या खणखणीत फटक्याद्वारे सर्वांना बजावून सांगताना अमोल पाटील. त्यांच्या मागे उभे असलेले संदेश वर्तक! ह्या चित्रात जो क्षेत्ररक्षकाचा पाय दिसतोय तो चिन्मयचा आहे असे मानण्यास भरपूर वाव आहे. 

बॅकफूटवर जात महेश अभ्यंकर ह्यांनी मारलेला हा सुरेख फटका!
मग सामने जोरात चालू राहिले. १९८१ संघाचा प्रथम १९८७ संघाशी मुकाबला झाला. बऱ्याच वर्षांनी खेळत असल्याने १९८१ संघाला हा सामना जर कठीण गेला. परंतु पुढच्या सामन्यात त्यांनी जोरदार खेळ करीत १९८७ संघाला नमविले. वसईतील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर विजय फडके ह्यांनी ह्या विजयात मोलाची कामगिरी बजाविली. डॉक्टर विजय फडके हे १९८१ सालीच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण बोर्डात दहावे आले होते. त्याच्या आधीच्या वर्षी त्यांची भगिनी साधना फडके ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली होती. त्याकाळातील न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्वांना ह्या आठवणी अजूनही लक्षात आहेत. 

ह्या सामन्यांमध्ये मग भावाभावांच्या बऱ्याच जोड्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसल्या. रमेदीचे पाटील बंधू, पारनाक्याचे अभ्यंकर बंधू, वासळईचे म्हात्रे बंधू, मुळगावचे वर्तक बंधू ह्यांचे संघ एकमेकांविरुद्ध ठाकले. ह्या सर्व बंधूंनी आपले बंधूप्रेम संघनिष्ठेच्या आड येऊ दिले नाही. 

मग योग्य वेळ साधून वसईतील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे ह्यांचे परदेशी मित्र ह्यांच्या हस्ते  वसंत मोरे ह्यांचा सत्कार करण्यात आला. जवळजवळ गेले ३० -३५ वर्षे वसंत मोरे हे वसई मैदानावर मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. 

आणि सर्व संघाचा आपल्या गणवेशातील एक सांघिक फोटो!

इतका वेळ प्रेक्षकगृहात बसून सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या महिलावर्गाने मग सामन्यासाठी मैदानावर प्रवेश केला. कार्यव्याप्तीमुळे शिक्षकवर्गाचा संघ हजर राहू शकला नाही. मग आयोजकांचा संघ त्यांच्याविरुद्ध मैदानात उतरला. १९८० बॅचच्या मिलिंद म्हात्रे ह्यांच्या दिलदार खेळामुळे महिलावर्गाने हा सामना जिंकला देखील!गोलंदाजी करणाऱ्या चिन्मयचे लक्ष विचलित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारी सुगंधा जोशी! मराठीतून सामन्याचे समालोचन करणारे वसईतील भौतिकशास्त्राचे ख्यातनाम १२ चे शिक्षक  आणि १९८५ चे हेमंत डोंगरे! मध्येच आपण क्लास मध्ये आहोत असा त्यांना भास होत असे आणि ते इंग्रजीत समालोचन सुरु करीत. त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे मित्र मुकेश ह्यांनी मध्येच समालोचनाची जबाबदारी स्वीकारली. परंतु पार्किंग लॉटमधील करिज्मा  गाडीच्या मालकाला ती बाजूला घेण्याची विनंती करीत असताना त्यांनी तिचा उल्लेख काळी करिश्मा असा केल्याने समस्त कपूर खानदान नाराज झाले आणि मग मुकेश ह्यांना समालोचनाच्या जबाबदरीतून मुक्त करण्यात आले!   मधल्या काळात पंचांच्या निर्णयावरून काही वेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले. परंतु लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. 

बाद फेरीचे सामने सुरु झाल्यावर चषक प्रदर्शनीय भागात आणण्यात आले!
सामन्यांचा आनंद घेत असलेला प्रेक्षकवर्ग!

उपांत्य फेरीचे सामने १९९९ विरुद्ध १९८७ आणि १९९६ विरुद्ध २००२ वसई असे रंगले. १९८७ संघाने एका चुरशीच्या लढतीत १९९९ चा शेवटच्या षटकात पराभव केला. संज्योत वर्तक ह्यांनी एक अप्रतिम खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला! २००२ वसई संघाने एका सांघिक कामगिरीच्या जोरावर १९९६ च्या संघास हरविले. ह्या सामन्यात दुर्दैवाने महेश अभ्यंकर ह्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. त्यांना ३५ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. 

अंतिम सामना १९८७ विरुद्ध २००२ वसई ह्यांच्यात झाला. २००२ संघाने ५ षटकात ८९ धावांचे कठीण आव्हान १९८७ च्या समोर ठेवले. संज्योत आणि पेडणेकर ह्या दोघांनी प्रयत्नांची शर्थ केली.परंतु शेवटी २००२ संघाने ही धावसंख्या यशस्वीपणे राखत न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीग -  २०१४ चे विजेतेपद पटकाविले. शाळेचे चित्रकला विषयाचे माजी शिक्षक मोद्गेकर सर ह्यांच्या शुभहस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले!

उपविजेता १९८७ संघ - जोशी, निकेश वर्तक, अभिजित पाटील, संज्योत वर्तक, पराग पाटील, राउत!


१९८७ च्या संघाचा अजून एक फोटो

आणि न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीग -  २०१४ चा विजेता २००२ संघ!ह्या निमित्ताने २०१२ च्या स्पर्धेचा हा एक सांघिक फोटो!

आमच्या संघाचा अतुल ह्याचा २०१२ सालचा एक फोटो!


ही सर्व छायाचित्रे काढणाऱ्या राहुल ठोसरचे, पंचांची भूमिका निभावणाऱ्या सुजित, चिन्मय, हेमंत बुवा आणि उज्ज्वल ह्यांचे मनःपूर्वक आभार! ह्या स्पर्धेच्या आयोजनात मोलाची कामगिरीबजावणाऱ्या सर्वांचे आभार!

आमचा संघ हरल्यावर अतुल आणि सचिन एका कोपऱ्यात मला म्हणाले, "अरे आपला जमाना गेला रे! नवीन पोरं काय खेळतात, कसली फिल्डिंग करतात!"
जमाना गेला नाही! पुढच्या वर्षी आम्ही नव्या जोमाने परत येऊ!