Sunday, July 17, 2022

२०२२ - अमेरिका दौरा


गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे प्रवासावर आलेल्या निर्बंधांमुळं अमेरिकेतील ऑफिसात जाणं झालं नाही. जसजसे मागील वर्षी प्रवासावरील निर्बंध उठू लागले तेव्हा हळूहळू हैदराबाद कार्यालयात फेऱ्या सुरू झाल्या. जून महिन्यात अमेरिकेतील ऑफिसमध्ये अमेरिकेतील विविध कार्यालयांत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एका विशिष्ट प्रशिक्षणासाठी नेवार्क डेलावेअर येथील ऑफिसात बोलावण्यात आले होते. मी सध्या जी भूमिका बजावत आहे त्या अनुषंगानं या प्रशिक्षणाच्या निमित्ताने मीही तिथे गेलो. या दौऱ्यातील काही महत्त्वाची महत्त्वाच्या नोंदी आणि त्या अनुषंगानं आलेली काही छायाचित्रं असं ह्या पोस्टचे स्वरूप असणार आहे.

परदेश दौरा म्हटला की तुमच्या बॅग्सचे पॅकिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जर आपण नियमित परदेश प्रवासाला जात असाल तर आपण याबाबतीत काहीसे सुसज्ज असता. परदेश प्रवासासाठी आवश्यक असणारी यादी आपल्याकडे सदैव तयार असते. अनुभवी माणसं केवळ पाच-सहा तासात परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या बॅग्स भरतात असं ऐकिवात आहे. मी याबाबतीत पूर्णपणे माझ्या पत्नीवर अवलंबून आहे!

संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी

Tuesday, June 30, 2020

अनुपमा १९६६


शनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न ! 

पत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस ! बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात. 

चित्रपटातील संगीत श्रवणीय ! 

धीरे धीरे मचल ये दिले बेकरार 
कुछ दिल ने कहा 
या दिल की सुनो दुनियावालो 

ही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी !  सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला! शर्मिलेचे सौंदर्य मोहक ! भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय ! धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला ? तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल! देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात ! डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला ! शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे! चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते! त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता ! 

चित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल!  प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा ! आपल्या मालकाकडं आयुष्यभर  नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम ! आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन! जाता जाता ती सांगते! 

धर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे  ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं !

जाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला ! चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला.  हे सारं आपण का गमावलं ?  ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ! May be Sharmila effect! 

एक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा! जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ! 

Saturday, May 2, 2020

सांजशकुन - भाग १


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही !

Monday, March 30, 2020

Discovery Time






जगावर येणाऱ्या भयावह संकटाच्या संकल्पनेवर बेतलेले अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाचा शेवट जवळ आला आहे, केवळ नायक, मोजकी मंडळी त्या संकटाचा मुकाबला करत आहेत असं काहीसं चित्र ह्यात रेखाटलं गेलेलं असतं. आज आपण ज्या परिस्थितीत सापडलो आहोत ती परिस्थिती काहीशी ह्या चित्रपटांची आठवण करुन देणारी आहे. 



करोना पुर्वीचे जग !

करोनापुर्वीचे जग काहीसं वेगळं होतं. तुमचा पैसा, तुमची पत ह्याचा तुम्हांला गर्व करता येत असे. पैसे खर्च करुन तुम्ही काहीही विकत घेता येण्याची घमेंड बाळगु शकत होता. निसर्गानं सर्व माणसांना एका पातळीवर निर्माण केलं असलं तरी माणसानं कृत्रिम पातळ्या निर्माण केल्या होत्या. आभासी दुनिया निर्माण करुन त्यात आभासी चलनाद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या मागे बहुतांशी मनुष्यजात लागली होती. 

सद्यस्थिती 

आजच्या परिस्थितीत हे सर्व काही नाहीसे झालं आहे. आपला जीव वाचवण्याची काळजी घेणे हा सर्व मानवजातीचा प्राधान्यक्रम झाला आहे. ह्यात राव-रंक सर्वजण एका पातळीवर आले आहेत. 

मनःपुर्वक आभार !

इथं आपल्या सर्वांचा दिनक्रम सुरु ठेवण्यास जी मंडळी हातभार लावत आहेत, त्यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात. किराणामाल दुकानदार, दूधवाला, सफाई कामगार, पोलीस,टोलनाक्यावरील  कर्मचारी हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगा, पिता आहेतच.  आपण साधं थोडा वेळ बाहेर पडलो तर घरात आल्यावर तातडीनं हात स्वच्छ धुण्याच्या मागे लागतो, अंघोळ करतो. ही मंडळी मात्र दीर्घकाळ बाहेर राहत आहेत ते केवळ आपला दिनक्रम सुरळीत चालु राहावा ह्यासाठी! 

इस्पितळात काम करणारे नर्स, डॉक्टर आणि बाकीचा कर्मचारीवर्ग हे तर अधिक धोकादायक परिस्थितीत कार्य करत आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात ही मंडळी येत आहेत ते केवळ मास्क, बाकीच्या प्रतिबंधात्मक आवरणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवून ! त्यांच्या स्वाथ्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना! 

दृढ मनोबलाची आवश्यकता 

ह्या करोनाने काही वेगळ्या परिस्थिती निर्माण केल्या आहेत. दहावीच्या एस. एस. सी. बोर्डाचा शेवटचा पेपर बाकी आहे. वर्षभर अभ्यास करुन सतत तणावाखाली राहणाऱ्या मुलांना कधी एकदा आपण ह्या तणावातुन मुक्त होऊ असं झालं असेल. परंतु आता त्यांना परिस्थिती निवळण्याची वाट पाहावी लागणार! ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्यावेळी पेपर पुन्हा घेतले जातील त्यावेळी अशा परीक्षांसाठी लागणारी मनःस्थिती पुन्हा आणणे कठीण असणार आहे. एस. एस. सी. परीक्षा हे केवळ एक उदाहरण झाले अशा अनेक परीक्षांत मुलं अडकून बसली आहेत. त्यांनी ह्या काळात आपलं मनोधैर्य शाबुत ठेवावं ! ज्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत त्यांनासुद्धा घरातच बसावं लागणार आहे! वर्षभराच्या अभ्यासाच्या तणावमुक्तीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सर्वांवर पाणी पडलं आहे ! 

परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेल्या तरुण मुला-मुलींसाठी हा कसोटीचा काळ आहे. आपल्या कुटुंबियांपासुन दुर तर राहावे लागणार आहे त्याचवेळी प्रदीर्घ काळ मोजक्या जागेत आपल्या रूममेट्स सोबत एकत्र राहावे लागणार आहे. 

मोजक्या जागेत एकत्र राहण्याचा प्रसंग एखाद्या कुटुंबासाठीसुद्धा कठीण ठरु शकतो. संवाद,चर्चा काही काळ ठीक असते परंतु प्रदीर्घ चालत राहिल्यास त्याचं परिवर्तन विसंवादात होऊ शकतं. त्यामुळं ह्या काळात कुटुंबाने संवाद कसा साधायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आखुन घ्यावीत.  आलटुन पालटुन कुटुंबसदस्यांनी संवाद - पर्यवेक्षकाची भुमिका बजावावी. संवाद जराही कटुतेकडे जात असल्याची शक्यता निर्माण झाल्यास टाईमआउट घोषित करावा.

काही कुटुंबांना एकत्र बसुन संवाद करण्याची कदाचित सवयही नसेल. ह्या निमित्तानं जी संवादसंधी निर्माण झाली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवावा. एका घरात वेगवेगळी आयुष्य जगणारी अनोळखी माणसे ह्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात. माझ्या नोकरीधंद्यात  काय घडत आहे, मला ह्या क्षणी कोणत्या गोष्टींविषयी आशावादी वाटत आहे, कोणत्या गोष्टींविषयी असुरक्षितता वाटत आहे इथुन प्रारंभ करावा ! 

नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर आपलं बोलणं कमी झालं आहे. प्रथम फोन कोणी करावा हा इगोचा भाग सर्वप्रथम आडवा येतो. त्याला सरळ बाजुला सारावे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या मंडळींशी आपण संपर्क गमावलेला असतो तो केवळ वेळ नाही ह्या कारणास्तव ! त्यांचा फोन नंबर चिकाटीनं शोधुन काढुन मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं !  

कार्यालयात एकत्र येऊन काम केल्यामुळं संघभावनेस चालना मिळत असे. आता सर्वजण घरुन काम करत असल्यानं केवळ कामासाठी फोन कॉल्स होतात. ह्या रिमोट काम करण्याच्या कार्यपद्धतीत संघभावनेस चालना देण्यासाठी काही नवीन सर्जनशील पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. लंच अवर ऑन व्हिडिओ कॉल  असं काही थोड्याच दिवसात ऐकायला मिळालं तर आश्चर्यचकित होऊ नकात ! 

एकंदरीतच हा काळ सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे ! ज्यांचं मनोबल चांगलं आहे अशी मंडळी ह्यातुन सहजपणे तावूनसुलाखून बाहेर निघतील. भविष्यात असले प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यामुळं पुढील पिढीला मानसिकदृष्ट्या कणखर बनविणं किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव करोनाने आपल्या सर्वांना करुन दिली आहे. 

करोनानंतरचे जग !

जग करोनामुक्त कधी होईल हे आजच्या घडीला छातीठोकपणे कोणीच सांगु शकत नाही. किंबहुना करोनाचा प्रभाव कमी झाला तरी त्याची भिती सदैव मनुष्यजातीच्या आसपास राहणारच आहे. सध्याच्या काळात आपल्या वागण्यात करोनाने काहीसा बदल घडवुन आणला आहे. जीवनाच्या अशाश्वततेच्या जाणिवेनं आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं आहे. 

पण ज्या क्षणी ह्या भयाची तीव्रता काहीशी कमी होईल किंवा पैशाच्या जोरावर करोनापासुन जीव वाचविण्याची हमी माणसाला प्राप्त होईल त्यावेळी माणसांचे वागणं कसे असेल? करोनापुर्वीची मग्रुरी परत त्याच प्रमाणात मनुष्यजातीतील काही लोकांना ग्रासुन टाकेल का?  हल्लीच्या जगाविषयी, त्यातील मनुष्यांविषयी भाबडेपणा बाळगणं फार कठीण आहे. त्यामुळं बहुतांशी मंडळी पुन्हा संपत्तीनिर्मितीच्या मागे लागतील. 

करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर बरेचसे प्रतिकुल परिणाम होऊ शकतील. ही शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते ह्याची जाणीव असु द्यात आणि ती प्रत्यक्षात उतरली तर आपल्या बाबतीत जो काही worst case scenario होऊ शकतो ह्याची आधीच अटकळ बांधुन ठेवा, त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तयारी करा ! केवळ चांगला विचार केल्यानं एखादी वाईट गोष्ट घडायची टळत नाही, पण जर वाईट शक्यतेचा आधीपासुन विचार केला तर त्याचा धक्का कमी बसतो. जगात वाईट गोष्टी अहोरात्र घडत असतात त्यातील काही गोष्टी क्वचितच आपल्या वाट्यालाही येणारच. पण वाईट गोष्टी घडल्यानंतर गगनभरारी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते हे ही ध्यानात ठेवा ! 

Saturday, February 8, 2020

Enough is not ....


गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक चांगलं वाक्य वाचायला मिळालं. Enough is not quantity; but it is a decision. पुरेसं हे एक प्रमाण नसुन तो एक निर्णय असतो. नेहमीप्रमाणं हे वाक्य मी माझ्या अनेक मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांच्यात चर्चेसाठी घेऊन गेलो. 

वाक्याचा अर्थ सर्वांनाच खुप भावला. मला इतका पगार मिळाला की मी समाधानी होईल, मला दादरला मोठी सदनिका मिळाली की मी सुखी होईन अशा आणि तत्सम सुखसमाधानाच्या आपण रेखा आखुन घेतो. पण भोवतालची परिस्थिती सदैव बदलत राहते. एक विशिष्ट पगारच, विशिष्ट उपनगरातील सदनिकाच आपणाला का हवीहवीशी वाटते? कारण ह्या घटकांशी आपण आपली विशिष्ट जीवनशैली, समाजातील आपली पत ह्या गोष्टींचा संबंध मनात जुळवून ठेवतो. कदाचित आपण मनातल्या मनात सुखाचं एक मोठंसं क्लिष्ट समीकरण बनवून ठेवतो. 
सुख = सदनिकेचे आकारमान ^ २ + ३.१४ * पगार + ... अजुन बरंच काही!

होतं काय की आपण सुखाची ही व्याख्या घेऊन काहीशा अजुन उच्चभ्रु गटात सहभागी व्हायला गेलो की आपल्याला कळुन चुकतं की तिथं सुखाच्या व्याख्येत केवळ सदनिकेच्या आकारमानाचा वर्ग पुरेसा नाही तर तिथं त्याचा घन घेतला जातो. तुमच्याकडील High End गाड्यांची संख्या समीकरणात समाविष्ट केली जाते. 

मग मात्र आपल्याला समजुन चुकतं की सुख, समाधान, चवीचं खाणं, चांगले कपडे, दागिन्यांची / वाहनांची हौस ह्याला कुठंच मर्यादा नाहीत! मर्यादा असल्या त्या आपल्या मनात आहेत. भाकरीचा, ब्रेडचा तुकडा खाऊन रस्त्यावर वाहनांच्या कोलाहलात झोपणारा गरीब माणुस आणि चमचमीत जेवण रिचवुन आलिशान शयनगृहात झोपणारा श्रीमंत ह्यांच्या समाधानाची पातळी कदाचित एकच असु शकते ! 

नेकीनं केलेल्या माझ्या प्रयत्नांची पातळी माझं समाधान ठरवेल हा निर्णय घेऊन पहा. कदाचित आयुष्य सोपं होईल ! 

पोस्ट आटोपती घेतोय. कारण इथंही पोस्टचा आकार नव्हे तर त्यातील सार महत्वाचं आहे. वाचकमंडळी सुज्ञ असल्यानं त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला ह्याविषयी तिळमात्र शंका नाही ! 

हरि मुखे म्हणा  Enough is not ...!!

Saturday, February 1, 2020

नात्यांचा जीवनक्रम !



नात्यांचे अनुबंध प्रत्येकाभोवती कळत नकळत गुंतले जातात. काही नाती रुढार्थानं नावं बाळगुन असतात तर काहींना तितकेही भाग्य नसतं. नाती कधी, कुठं जुळावी ह्याविषयी लिखित नियम असणं शक्य नाही. ह्या  पोस्टमध्ये नाती म्हणजे रक्ताची नाती, मैत्रीची नाती असे सर्व काही अर्थ अभिप्रेत आहेत. 

आयुष्याच्या पुर्वार्धात माणसाला बरीच नाती आपसुकच मिळतात. लहानपणीची नाती ही वारसाहक्कानं मिळालेली असतात. बालपणी अनुभवलेल्या नात्यांत खुपदा निरागसतेचा अनुभव आल्यामुळं आपण एकंदरीत नात्यांविषयी  खुप आशादायक दृष्टिकोन घेऊन पुढील आयुष्यात पाऊल ठेवतो.  शिक्षण संपल्यानंतर  माणसाचं आयुष्य खुपच गतिमान बनतं . त्यामुळं काही मोजकी नाती सोडली तर बाकीच्या नात्यांकडं लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही. 

एखाद्या नात्याचा जीवनक्रम कसा असतो? जीवनक्रम म्हणजे नक्की काय? नातं जुळणं, दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना ओळखुन घेऊन नातं स्थिरतेकडं नेणं आणि मग त्यानंतर नात्यांतील स्थिरतेचा काळ ! आदर्श स्थितीमध्ये नात्यांचा जीवनक्रम काहीसा वर उल्लेखल्याप्रमाणं असायला हवा ! परंतु जीवनात आदर्श असं काही नसतं ! त्यामुळं ह्या नात्यांच्या जीवनक्रमात बरेच चढावउतार येतात. सहजासहजी जुळू शकणारी नाती काही कारणानं  जुळत नाहीत, कमी माहितीवर आधारित नाती जोडली जातात आणि मग अपेक्षाभंगाचं शल्य उरी बाळगत निभावली जातात किंवा मोडली जातात, काही नाती सुरुवातीच्या काळात अत्यंत वादळी प्रवास करुन त्यातील प्रवाशांना शहाणं करुन सोडतात, आपल्या भुमिकांच्या आणि नात्यांच्या पुर्नव्याख्येनंतर मग एक शांत संयत वाटचाल करतात. काही शहाणी नाती आयुष्यभर समजुतदार प्रवास करतात. काही उत्साही नाती आयुष्य अगदी रसरसुन जगतात. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर माणुस स्वतःकडं अलिप्ततावादी दृष्टीनं पहायला शिकतो. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी येत असला तरी तो कधीतरी नक्कीच यायला हवा. ह्या घटनेनंतर मनुष्याच्या आयुष्यातील नात्यांमध्ये काहीसा फरक पडत असावा. नात्यांतील उत्कटता काहीशी संपुष्टात येत असावी! अहम भावनेचा त्याग करुन माणसं स्वत्वाच्या शोधात निघतात ! आपल्या संपुर्ण आयुष्याकडं तटस्थेनं पाहण्याची क्षमता त्यांच्यात येते ! पैलतीराचा शोध वगैरे म्हणतात ते हेच असावं कदाचित !  

वायनाड भेटीच्या वेळी काढलेल्या दोन छायाचित्रांची ह्यावेळी आठवण झाली. दूरवर पाहिस्तोवर दिसणारी हिरवाई , जाणवणारी शांतता! आयुष्यात सुद्धा अशी मनःस्थिती लाभणं किती भाग्याचं नाही का?



Thursday, January 2, 2020

मावळत्या दिनकरा !


काहीशा अनामिक हुरहुरीनं सरत्या वर्षाचा आपण निरोप घेतो. जाणते झाल्यापासुन प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर आयुष्यातील अंतिम सत्याच्या  आपण अधिक जवळ पोहोचलो आहोत ही भावना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी डोकावते. सार्वजनिकरित्या ती थेट बोलुन दाखविण्याची प्रथा नसल्यानं हुरहूर वगैरे शब्दांचा आधार आपण घेत राहतो. 

हे २०२०! एका नव्या उमेदीनं मी तुझं स्वागत करत आहे ! त्यानिमित्त माझ्या मनातील हे काही विचार !

१) आयुष्यातील तुझ्या आधीच्या साथीदारांनी मला जे काही अनुभवांचे क्षण दिले त्यांना मी संकलित स्वरुपात स्मरणात ठेऊ इच्छितो. 

२) माझ्या आयुष्यातील संकटे, कठीण गोष्टी जितक्या सुस्पष्टपणे मला जाणवतात तितक्याच सुस्पष्टपणे माझ्या आयुष्यातील अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींची, लोकांनी माझ्याशी केलेल्या चांगल्या वर्तवणुकीची मला जाणीव येऊ देत. 

३) माझ्या व्यावसायिक जीवनात मला एका विशिष्ट प्रकारची वर्तवणुक स्वीकारावी लागते. माझ्या मुळ स्वभावापासुन ही काहीशी वेगळी असु शकते. परंतु माझी व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तवणुक, विचारधारा वेगळी ठेवण्याची बुद्धी आणि शक्ती मला लाभो !

४) भोवतालचे लोक विविध ताणतणावाच्या प्रसंगातुन जात असतात. ह्याचा परिणाम त्यांच्या वर्तवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळं प्रसंगी त्यांची माझ्याशी असलेली वागणुक माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी असु शकते, मला क्लेशदायक असु शकते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्या अशा वागणुकीकडे तटस्थ मनोवृत्तीनं पाहण्याची शक्ती दे !

५) मी, माझं वागणं काही लोकांना आवडत / आवडणार नाही ही स्पष्ट शक्यता आहे हे सत्य मी मोकळेपणानं स्वीकारु शकु देत ! 

६) माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडुन शिकण्यासारखं बरंच काही असु शकतं. इतर गोष्टीपेक्षा ह्या शिकण्यासारख्या गोष्टीकडं माझं लक्ष सर्वप्रथम वेधलं जावो !

७) माझ्याकडुन चांगलं वाचन होवो. ह्या वाचनातील सुविचारांचे मला आकलन होवो आणि माझ्या जीवनाशी निगडित सुविचारांचे माझ्याद्वारे अंगिकरण  होवो !

८) स्थानिक, जागतिक पातळीवरील कोणत्याही ताणतणावाला तोंड देण्याची शक्ती माझे नातेवाईक, मित्र मला देतात. त्यांच्याशी मी सदैव संपर्कात राहू शको !

९) माझा निसर्गाशी असलेला संपर्क कायम राहो ! निसर्ग मला माझं जगणं समृद्धपणे जगण्याची प्रेरणा देत राहो !

आणि .... 

सातत्यानं ब्लॉगपोस्ट लिहुन त्यांच्या लिंक्स फेसबुक भिंतीवर, शेकडो व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवुन नातेवाईक, मित्रगणांना त्रस्त करण्याची माझी इच्छाशक्ती कायम राहो !

Wednesday, December 25, 2019

ययाति - वि. स. खांडेकर



 गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट कादंबऱ्यांद्वारे ह्या सुवर्णकाळाचा अनुभव आजही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. वि. स. खांडेकर ह्यांच्या अश्रू ह्या कादंबरीचे मला झालेलं आकलन ह्या आधी एका पोस्टद्वारे केलं होतं. ह्या सिद्धहस्त लेखकाच्या ययाती ह्या अविस्मरणीय कादंबरीविषयीच माझं मनोगत मी इथं मांडत आहे. ह्या कादंबरीस १९७६ सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 

वि. स. खांडेकर हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतुन आणि पार्श्वभुमी ह्या विभागातुन कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ह्या कादंबरीतुन सद्य समाजानं शिकण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. 

ययाती 

स्त्रीसुखासाठी आंधळा होऊन स्वतःच्या पुत्राकडं तारुण्याची मागणी करणारा एक निर्दयी पिता अशी ययातीची ओझरती ओळख घेऊन ह्या कादंबरी वाचनास मी आरंभ केला होता. कादंबरीच्या पुर्वार्धात ययातीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु खांडेकरांनी उलगडुन दाखविले आहेत. प्रत्यक्ष इंद्राला पराभुत करणाऱ्या पराक्रमी नहुष  राजाचा हा पुत्र. परंतु आपल्या पित्याकडुन विजयाच्या एक उन्मत्त क्षणी घडलेल्या चुकीमुळं मिळालेल्या शापाचे ओझे सदैव घेऊन वावरणारा! "नहुष राजाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" हा तो शाप ! स्वतः खुप पराक्रमी. अश्वमेधाच्या घोड्यासोबत स्वतः स्वारी करत मोठमोठ्या राजे - महाराजांना स्वतःसमोर लोटांगणे घालावयास भाग पाडणारा ! आपल्या जन्माआधी राजमहालातील वैभवाचा त्याग करुन गेलेल्या आपल्या थोरल्या भावाशी म्हणजेच यतीशी त्याची ह्या प्रवासात अचानक भेट होते. यतीचं आपलं आयुष्य पुर्णपणे तपश्चर्येला वाहुन देणं ययातीला विचारात पाडतं. हे वादळ संपतं तितक्यात अंगिरस ऋषींच्या शांतीयज्ञात  राक्षसांकडुन होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासुन संरक्षणासाठी ययाती काही काळ त्या ऋषींच्या आश्रमात घालवितो. तिथं त्याची भेट कचाशी होते! ययातीच्या पत्नीचं म्हणजेच देवयानीचे पहिलं प्रेम हा कच ! परंतु एकंदरीत देवयानी प्रेमापेक्षा सामर्थ्याला महत्व देणारी ! त्यामुळं योगायोगानं भेटलेल्या ययातीला तो केवळ एका बलवान साम्राज्याचा चक्रवर्ती आहे म्हणुन पती म्हणुन स्वीकारण्यात तिला कोणताही संदेह नव्हता. परंतु ह्याच कारणामुळं ती ययातीची प्रेयसी केव्हाच बनु शकली नाही! म्हणुनच की काय ययाती मग शर्मिष्ठेकडं आकर्षिला गेला! ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणं प्रेमाच्या भुकेखातर असं जरी क्षणभर मानलं तरी त्याआधी आणि त्यानंतर त्यानं केलेल्या अनेक स्त्रियांच्या सहवासाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही! 

इथं खांडेकर ययातीची तुलना आधुनिक काळातील मानवाशी करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीनं निर्माण केलेलं आधुनिक सुंदर व संपन्न जगआजच्या ययातीपुढं पसरलं आहे. सुखोपभोगांची विविध साधने घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे!" १८५७ ते १९४७ च्या काळात पेटलेल्या पवित्र यज्ञकुंडांच्या ज्वाला विझुन गेल्या आहेत आणि मोठमोठे ऋत्विज यज्ञभूमी सोडुन गेले आहेत! - 

पहा किती सौंदर्यपुर्ण अशी ही उपमा! 

देवयानी 

देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या ! पित्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिच्यात उतरलेला! आपल्या बालपणात शर्मिष्ठेचं वैभव तिनं अगदी जवळुन पाहिलेलं. आपल्या पित्याला, त्याच्या विद्वतेला कितीही मान असला तरी प्रत्यक्ष राजाकडे असणाऱ्या सत्तेविषयी तिच्या मनात सुप्त आकर्षण कायम वसलेलं असतं. त्यामुळं कचाविषयी तिच्या मनात आकर्षण असलं तरी त्याच्याशी विवाह करण्याचा विचार ती कधीच करत नसते. ययातीसोबत योगायोगानं झालेल्या एका भेटीमुळं तिला आपल्या महत्वाकांक्षांना मुर्त रुप देण्याची संधी आपसुक गवसते. जिच्या वैभवाच्या सावलीत आपलं बालपण घालवलं त्या शर्मिष्ठेविषयी असणाऱ्या असुयेमुळं ती तिला आपली दासी बनवुन आपल्यासोबत हस्तिनापुरात घेऊन येते. इथं तिला हवं असलेलं सत्तासामर्थ्य लाभतं. एक सम्राज्ञी म्हणुन देवयानी यशोगाथा बनली असली तरी एक पत्नी म्हणुन एक जिवंत शोकांतिका बनुन वावरत राहते! खांडेकरांनी ही कादंबरी लिहिताना ज्या स्रोतांचा संदर्भ घेतला आहे तिथं एका ठिकाणी ती ययातीने शर्मिष्ठेला तीन पुत्र दिले आणि आपल्याला दोनच पुत्र दिले अशी तक्रार करत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तिला ययातीने आपल्याशी केलेल्या प्रतारणेविषयी खंत नाही. पण तत्कालीन संदर्भानुसार स्त्रीला समाजात ज्या बाबींमुळं मान मिळायचा त्या पुत्रांच्या बाबतीत ययातीने दुजाभाव केल्याची खंत ती बाळगुन आहे.  

सद्यकालीन समाजाशी तुलना करता येनकेनप्रकारे प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजातील मनोवृत्तींसोबत देवयानीची तुलना होऊ शकते. इथं ह्या प्रतिष्ठेच्या मागं धावताना जीवनातल्या गमावलेल्या अनेक अमुल्य गोष्टींचं भान अशा मनोवृत्तींना राहत नाही !

शर्मिष्ठा 

केवळ एका दुर्दैवी घटनेमुळं आपलं राजकन्यापद सोडुन देऊन शर्मिष्ठेला देवयानीचं दासीत्व पत्करावं लागतं. शुक्राचार्यांच्या रागीट स्वभावाची पुर्ण कल्पना असल्यानं त्यांच्या मुलीचा हा दुराग्रह पुर्ण न करण्यामुळं होऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांचा तिला पुर्ण अंदाज आहे. आपल्या ज्ञातीसाठी स्वतःच्या जीवनातील सर्व सुखांचा ती त्याग करण्यास तयार होते. तिनं केलेल्या ह्या त्यागासाठी सद्यकालीन समाजात समांतर उदाहरण मिळणं तसं कठीणच! परंतु शर्मिष्ठा हस्तिनापुरात आल्यावर पुर्णपणे आपल्या नशिबाला दोष देत बसलेली दिसत नाही! ययातीने शर्मिष्ठेला वश केलं की त्यासाठी शर्मिष्ठेनं स्वतःहुन काही पावलं उचलली असावीत ह्याची खोलवर मीमांसा करण्याइतका  माझा अभ्यास नाही ! परंतु शेवटी ययातीच्या हृदयातील स्थानाच्या बाबतीत देवयानीवर कुरघोडी करण्यात ती यशस्वी होते! इतकंच नव्हे तर तिचा पुत्र पुरु अत्यंत सुस्वभावी आणि कर्तृत्ववान निघतो. पित्यासाठी आपलं तारुण्याच नव्हे तर देवयानीच्या मुलासाठी राज्यावरील आपला अधिकार सोडुन देण्यास तो तयार होतो. त्याच्या ह्या वागण्यानं देवयानीसारख्या स्त्रीचं हृदयपरिवर्तन करण्यात त्याला यशही मिळतं ! 

सद्यकालीन समाजातील आपल्या मेहनतीनं अधिकारपदाकडं वाटचाल करणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व शर्मिष्ठा करते असं ढोबळमानाने विधान आपण करु शकतो ! कठोर तपस्या करणारा कच बहुदा समाजातील ज्ञानपूजक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो.

मुकुलिका, अलका या दासींची वर्णनं ह्या कादंबरीत विस्तारानं येतात. ह्या दासी कुशाग्र बुद्धीच्या असाव्यात. स्वपराक्रमावर मोठाली युद्धं जिंकुन आणणाऱ्या ययातीसारख्या यशस्वी सम्राटाला सर्वपरीनं त्या समाधानी ठेवतात! इथं एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. देवयानी असो की ययातीची आई असो; सम्राज्ञीपणाच्या भूमिकेच्या ओझ्याखाली कुठंतरी ह्या स्त्रिया एक पत्नी म्हणुन कमी पडत असाव्यात !  आणि म्हणुनच ह्या बुद्धिमान दासींची ह्या कथांमध्ये आणि सम्राटांच्या आयुष्यात महत्वाची भुमिका ठरते !

खांडेकरांच्या प्रतिभेचा  मेरु ह्या कादंबरीत चौखेर उधळला आहे! आपल्या ह्या काळातील जीवनाचं हुबेहूब वर्णन ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. मी पुर्णपणे ह्या कादंबरीशी आणि तात्कालीन व्यक्तिरेखांसोबत समरस होऊन गेलो ! एक अजरामर पौराणिक कथा आणि त्या कथेला यथायोग्य न्याय देणारा तितक्याच ताकदीचा प्रतिभाशाली साहित्यिक असा दुग्धशर्करायोग ह्या कादंबरीच्या निमित्तानं जुळून आला आहे. ह्या कादंबरीतील प्रत्येक वाक्य साहित्यिक श्रीमतीनं ओथंबुन भरलं आहे! ह्या रसाचा अत्यंत शांत मनःस्थितीत आस्वाद घेण्यासाठी ह्या कादंबरीचं पुन्हा सखोल वाचन करणं अनिवार्य आहे असा माझा समज आहे ! खांडेकरांना आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला माझा सादर प्रणाम! सद्यकाल AI, ML, Cloud ह्या दिशेनं कितीही वेगानं जात असला तरी साहित्यातील अशा अमुल्य ठेव्यांचा आपण स्वतः आनंद घ्यावा आणि जमल्यास पुढील पिढीपर्यंत सुद्धा ह्या ठेव्यांचं हस्तांतरण करावं ही माझी कळकळीची विनंती!

Thursday, December 19, 2019

तु असा / अशी ऐकत रहा !




आधुनिक काळात अनेक सुखं आहेत, तशा समस्याही आहेत! सोशल मीडिया वगळता आपण सहसा आपल्या आनंदी क्षणांची वाच्यता करण्याचं टाळतो. आपल्या समस्या एकंदरीत आपल्या विचारप्रक्रियेचा मोठा हिस्सा व्यापुन टाकतात. ह्यातील बऱ्याच समस्या त्वरित सुटणे शक्य नसते; त्यांच्यावर विचार करुन त्यांच्या उत्तरांच्या दिशेनं वाटचाल होईल हा ही ग्राह्य पर्याय नसतो. सतत आपल्या समस्यांचा विचार करत राहिल्यानं आपल्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत राहतो. 

समस्यांनी त्रस्त झाल्यानं आपण सारासार विचार करत नाही आहोत हे ही आपल्यातील बऱ्याच जणांना उमगतं. त्यामुळं लवकरात लवकर ह्या मनःस्थितीतुन बाहेर कसं पडता येईल ह्याकडे सर्वांचा कल असतो. ह्यावर जालीम उपाय असा नाही. काळ हा सर्व समस्यांवर उपाय आहे हे आपण म्हणत असलो तरी काळाने एक समस्या आपल्या नजरेसमोरुन दूर करेपर्यंत बऱ्याच वेळा दुसऱ्या समस्येनं आपलं मनःपटल व्यापुन टाकलेलं असतं. 

ह्या सर्व प्रकारात हल्ली एक आशेचा किरण दिसु लागला आहे, तो म्हणजे आपल्या समस्या ऐकुन घेणारी, त्यावर योग्य सल्ला देणारी अशी मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती बऱ्याच वेळा अशी मंडळी असतात. पण ती आपल्याला गवसली पाहिजेत! ह्या मंडळींची वैशिष्टयं कोणती हे पाहुयात. 

१) ही मंडळी प्रथम तुम्हांला पुर्णपणे व्यक्त होऊ देतात. आपल्याला व्यक्त होताना विचार आणि शब्द ह्यांची योग्य सांगड घालावी लागते. ही सांगड घालण्यासाठी ही मंडळी तुम्हांला मदत करतात. तुम्ही बोलायला आरंभ केल्यापासुन तुमच्या अंतिम मुद्दयापर्यंत प्रवास करताना तुम्ही भरकटत जाण्याची शक्यता निर्माण होते. ही मंडळी शांतपणे तुम्हांला मुळ रस्त्यावर आणुन सोडतात. 

२) तुमचे मुद्दे मांडत असताना तुमच्या भावनांचे चढउतार होत असतात; ही मंडळी तुम्हांला समजुन घेतात. तुमच्या बाह्यदर्शनी कठोर व्यक्तिमत्त्वाचे कोमल , हळवे कंगोरे ह्या मंडळींसमोर उघड करताना तुम्हांला कसलाही संकोच वाटत नाही, कारण ह्यांच्यावर तुमचा पुर्ण विश्वास असतो! 

३) अशा प्रकारे तुम्ही पुर्णपणे व्यक्त झालात की ह्या व्यक्ती तुम्हांसोबत  त्यांची मते शेयर करतात. ह्यात कोणत्याही प्रकारचं मतं लादणं हा प्रकार नसतो, असतो तो फक्त उपलब्ध माहितीचं विश्लेषण करुन शक्य असलेल्या विविध पर्यायांचा निरपेक्ष उहापोह! त्यात शक्य असल्यास ही मंडळी तुम्हांला अशाच मिळत्याजुळत्या अनुभवांची उदाहरणं देऊन तुमच्या चिंतेची तीव्रता कमी करतात. 


अर्थात सर्वांनाच अशा मंडळींची गरज असते असंही नाही ! काही कणखर व्यक्तिमत्वांमध्ये जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगांना एकटेपणाने सामोरे जाण्याची क्षमता असते! अशा लोकांच्या मेंदुचे विश्लेषण कोणी मला पाठवाल का हो? 


बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी भुमिका बजावत आहेत ह्याविषयी आपण पुर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळं कधी त्यांना औपचारिकपणानं Thank You म्हणण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही! त्यांनाही ह्याची म्हणा अपेक्षा नसतेच! 

कधीकाळी ह्या मंडळींना सुद्धा कोणत्यातरी समस्येने ग्रासु शकते. पण होतं काय की आपण आपल्याच विश्वात रममाण असतो; त्यांनाही त्यांच्या समस्या आपणासोबत शेयर करण्याची कदाचित सवय नसते! कदाचित त्यांची नजर, सुप्त संदेश  आपल्याला हे सांगुन जात असावी! पण आपण हे सारं ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नसतो. 

विश्वाचा प्रवास आपल्या नजरेतुन असाच पुढे चालु राहतो !!

Tuesday, December 17, 2019

संस्कृतीतरंग !




कालच्या पोस्टमध्ये वर्णन केलेल्या बैठकीनंतर मला एक दिवसीय प्रशिक्षणाला धाडण्यात आलं. धाडण्यात आलं हा सयुक्तिक शब्दप्रयोग अशासाठी की अशा प्रशिक्षणांना हजेरी लावण्याबाबत मी फारसा उत्सुक नसतो. जगभरातील विविध संस्कृतीच्या लोकांसोबत काम करताना कोणत्या मनोवृत्तीची (Mindset) आवश्यकता आहे ह्याविषयी हे प्रशिक्षण होते. ह्या प्रशिक्षणांची एक गंमत असते. आम्ही संवादाद्वारे प्रशिक्षण करतो असं म्हणत ही मंडळी आपल्याकडूनच बरंचसं वदवून घेतात. अधुनमधुन चर्चेला मार्गावर आणण्याचं काम ही मंडळी चोख बजावतात. 

ह्या प्रशिक्षणात एक मजेशीर मुद्दा प्रशिक्षकांनी मांडला. आपण भारतीय लोक कसे भावनिकरित्या सगळीकडे गुंतत राहतो हा तो मुद्दा !पाश्चात्य देशातील सहकारी आला की कंपनीच्या प्रवेशद्वाराशी रांगोळ्या काढतो. त्यांना कुर्ता, साड्या नेसवुन रंगीबेरंगी कपड्यात छायाचित्रे काढतो. हल्ली तर त्यांना बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्यसुद्धा करावयास लावतो! पण हेच आपण तिथं अमेरिकेत एका आठवड्यासाठी गेलो तर बऱ्याच वेळा आपले आपण असतो. एखादया सायंकाळी सर्वांसोबत डिनरला जाऊन आलो की सामाजिक बांधिलकीचं ओझं बहुदा संपते. अर्थात ह्याला हल्ली बरेच सन्माननीय अपवाद निर्माण झाले असावेत. 

अजून एक मुद्दा समजा आपले आणि ह्या परदेशी सहकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले की बऱ्याच वेळा त्यांच्या बाजुनं वैयक्तिक ऋणानुबंध कमी होतात. पुन्हा एकदा कदाचित ही निरीक्षणे काही वर्षापुर्वी खरी असावीत. हल्ली ह्यात खुप बदल घडुन आला आहे. मुख्य मुद्दा आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतींमध्ये कसा फरक होता हे समजुन घेऊन त्यानुसार आपल्या व्यावसायिक अपेक्षांमध्ये, वागणुकीत योग्य बदल घडवून आणण्याविषयी होता. काही प्रशिक्षणार्थी पूर्वेच्या आणि युरोपातील सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव मांडले. 

ह्यातील आपल्या संस्कृतीतील भावनिक गुंतवणुकीच्या मुद्द्याचा धागा पकडुन पुढे सरकूयात. ह्या सोशल मीडियाचा उद्रेक ज्या वेळी सर्वप्रथम झाला त्यावेळी काही काळातच आपण सर्वांनी ह्याच्या माध्यमातुन जुन्या काळाकडे धाव घेतली. जुन्या संस्कृतीला, गाण्यांना, मित्रमंडळींना एकत्र आणलं! आपण सर्व अगदी भावनाविवश होत ह्या जुन्या काळाच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो. चाळिशीनंतर करिअर वगैरे गौण बाब आहे, ज्याच्या भोवताली मित्रमंडळी तोच खरा  श्रीमंत वगैरे वाक्य ऐकावयास आली! 

पण काही मंडळींनी मात्र ह्याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्या करियरला नवचैतन्य दिलं. नव्यानं झेप घेतली. सत्तरीच्या पलीकडं सुद्धा व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचा चंग बांधला. 

वरील दोन परिच्छेदात मांडलेल्या दोन भिन्न मतप्रवाहांपैकी कोणता एक बरोबर आणि दुसरा  चुकीचा असं मी म्हणत नाही. दोन्हींच्या आपल्या परीनं चांगल्या वाईट बाजु आहेत. गेल्या महिन्यातील माझ्या अनुभवावरुन मी दुसऱ्या पर्यायाकडे काहीसा झुकला गेलो असलो तरी ही तात्कालिक स्थिती असु शकते. 

सारांश इतकाच की सांस्कृतिकदृष्या पाहायला गेलं तर आपण भावनिक मंडळी! त्यामुळं आपले बरेचसे निर्णय भावनेच्या भरात घेतले जाण्याची शक्यता अधिक असते. ह्या गोष्टीचे भान राखत योग्य ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे सारासार विचार करुन बौद्धिक निर्णय घ्यावा ही विनंती!

रस्सीखेच



जवळपास दोन महिन्यानंतर आजची ही पोस्ट ! डिसेंबराच्या पहिल्या सोमवार - मंगळवारी एक वरिष्ठ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. अमेरिकेहुन उच्च अधिकारी आले होते. आपला देश का व्यवस्थित चालतो हे जाणुन घ्यायला अशा बैठकी उपयोगी पडतात. दोन दिवसाच्या ह्या बैठकींमध्ये एकेका मिनिटाचा हिशोब ठेवून सादरीकरण केलं गेलं. पुढील वर्षाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्यानं उपस्थित मंडळी अगदी तन्मयतेनं सर्व सादरीकरणात सहभागी होत होती. व्यावसायिक पातळीवरील जोशात येऊन प्रश्नोत्तरे होत होती. 

ह्यातील एका गटाच्या सादरीकरणात माझाही सहभाग होता. तयारी अगदी बऱ्याच दिवसांपासुन सुरु होती. कोणती स्लाईड कोणी सादर करायची, तिथं नेमकं काय बोलावं ह्याची सखोल तयारी करण्यात आली होती. प्रेसेंटेशन्सना व्यावसायिक रुप देण्यासाठी एका वेगळ्या गटाची मदत घेण्यात आली. सादरीकरण बऱ्यापैकी चांगलं पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या प्रकारातील व्यावसायिक बैठका होत असतात. इथं प्रत्येक  शब्दाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायचा असतो. त्यामुळं प्रत्येक स्लाईड, स्लाईडवरील प्रत्येक वाक्य / शब्द खरोखर आवश्यक आहे का? त्यांची क्रमवारी योग्य आहे का ह्याचा सर्वागीण विचार केला जातो. हा झाला आपला प्रगतशील भारत! इथं तुमच्या कर्तृत्वावर आपलं भाग्य घडविण्याची तुम्हांला पुरेपूर संधी दिली जाते. 

ह्या भारताकडुन भोवतीच्या दुसऱ्या भारताकडं वळल्यानंतर मात्र बरीच निराशा होते. ह्या भारतात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेलच ह्याची खात्री नसते कारण इथं प्रस्थापितांचे राज्य असतं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सारासार विचार करण्याच्या वृत्तीपासून आपण अधिकाधिक दुर जात चाललो आहोत असं दिसतं. 

ब्लॉग लिहुन कोणताही प्रश्न सुटेल ह्याच्यावरील माझा विश्वास बऱ्याच आधी उडाला आहे. त्यामुळं हल्ली पूर्वीइतक्या जोमानं ब्लॉग लिहणं मी खुपच कमी केलं आहे. हल्ली सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा वडीलधारी / जाणकार माणसांचे ऐकुन घेण्याची तयारी राहिली नाही. 

व्यावसायिक जगात प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकाराची जागा दिली गेली असते. कोणी अधिकाराच्या पोस्टवर किती काळ राहावं ह्याचा निर्णय योग्य मंडळी घेत असतात. एकदा का एक व्यक्ती अधिकाराच्या जागी नियुक्त झाली की तिचे निर्णय ऐकून घेणं हे त्या व्यक्तीच्या संघातील सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळं त्या संघातील निर्णयांत, कृतीत एकवाक्यता येते. संघाच्या यशस्वी होण्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढीस लागते. 

आपल्या सार्वजनिक जीवनात सुद्धा कुठंतरी व्यावसायिक जीवनातील ह्या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. नाहीतर एकीकडं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशाला पुढे नेत राहणार परंतु बाकी क्षेत्रात योग्य व्यक्ती अधिकाराच्या जागी नसल्यानं आपल्या देशाच्या प्रगतीवर प्रचंड मर्यादा निर्माण होत राहणार ! ही रस्सीखेच थांबायला हवी ! 

Saturday, October 19, 2019

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.

ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


Sunday, October 6, 2019

बारावीच्या पाल्यांची तणावाची स्थिती !



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत बहुतांशी पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी आणि माझा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र राहुल ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीच्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेचे माहात्म्य कमी होत असलं तरी ह्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हांला किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  

या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! 

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आयआयटी मेन्स या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आयआयटी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आयआयटी मेन्स या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी मिळते.  जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यात ही परीक्षा घेण्यात येऊन ह्या दोघातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. या परीक्षेत गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPIT मध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? सध्या बऱ्याच ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्क्यांची अट घालण्यात आल्यानं तुलनेनं सोप्या असलेल्या HSC बोर्डात प्रवेश घेण्याकडं विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.  

आता महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास आहे ज्यात आपण प्रवेश घ्यायला हवा !


सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला ह्या क्षणी मात्र या क्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी ऍडव्हान्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

आपल्या मुलाची क्षमता किती आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आपल्याला आधीपासुन कळायला हवं असंच सर्व पालकांना वाटत असतं. परंतु हे माहिती करुन घेण्यासाठी खात्रीलायक असा मार्ग नाही. त्यामुळं सर्वजण सर्वात महत्वाकांक्षी पर्यायाची म्हणजेच IIT Advanced ची तयारी करुन घेणाऱ्या शिकवणी वर्गांची निवड करतात. हे क्लास घेणारे सुद्धा स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेऊन तुमच्या मुलाच्या खऱ्या क्षमतेचं चित्र केव्हाही तुम्हांला सांगत नाही. साधारणतः एका वर्षांनी वगैरे आपल्याला IIT Advanced झेपणार नाही हे उमजुन चुकलेली अनेक उदाहरणं मी ऐकली आहेत. परंतु ह्यावेळी तुमचे परतीचे सर्व मार्ग कापले गेलेले असतात. त्यामुळं भावनाविवश न होता आपल्या मुलांच्या क्षमतेचं वस्तुनिष्ठ परीक्षण करुन मगच योग्य पर्याय निवडावा !

बाकी ह्या सर्व बारावीला असणाऱ्या मुलांना इतक्या तणावातून आपण का जायला भाग पाडत आहोत? स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाची परीक्षा आणि IIT प्रवेशासाठी IIT च्या परीक्षा असा सोपा मार्ग का अवलंबु नये? अगदीच झालं तर स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाच्या परीक्षेसोबत तुम्हांला IIT मेन्स विचारात घेता येईल. जेणेकरून मुलांची एका अधिकच्या प्रवेशपरिक्षेतुन (CET) सुटका होईल. 

इथं दोन बाबी जाणवतात. पहिली म्हणजे आपण शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडला आहे. पालकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचे ह्या प्रवेशपरीक्षा हे एक साधन बनले आहे. दुसरी बाब म्हणजे आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट बनविण्यात आपला कोणी हात धरु शकणार नाही !