Friday, January 27, 2012

वसईची पिशवीलहानपणची गोष्ट, मुंबईला राहणाऱ्या आत्या वसईच्या मुक्कामाहून परत मुंबईला जायला निघाल्या की आजी त्यांच्या हातात भाजीची पिशवी देई. वाडीतील भाजी, केळ्याचा फणा, सुरण तत्सम पदार्थांचा त्यात समावेश असे. वसईच्या भाज्या ताज्या, मुंबईला परत गेल्यावर लगेच बाजारात जायला लागू नये म्हणून आजी ह्या भाज्या देत असेल अशी माझी समजूत. काही वर्षाने बहिणींची लग्न झाल्यावर हेच चित्र पुन्हा अवतरले. ह्या ही वेळेला माझ्या समजुतीत फारसा काही फरक झाला नाही.

काही वर्षे गेली, शिक्षण संपले, नोकरी चालू झाली. प्रथमच परदेशगमनाचा योग आल्यावर सामान भरताना मध्येच आईने त्यात लाडूचा एक डबा भरला. हा डबा कशाला, असा थोडासा तिच्याशी वाद घातल्यावर मी तो डबा नेण्याचे कबूल केले. शनिवारी रात्री ब्रायटन (इंग्लंड) येथील हॉटेलात आगमन झाले. व्यवस्थित पोटपूजा होण्याची काही शक्यता नव्हती. रविवारी सकाळी, इंग्लंडच्या थंड हवेत उठून बाहेर एक फेरफटका मारून आल्यावर अचानक ह्या लाडूच्या डब्याची आठवण झाली. तो एक लाडू तोंडात घालताच हजारो मैलांचे अंतर पार करून मी थेट घरापर्यंत पोहोचलो. पुढे हा डबा मी बरेच दिवस पुरविला. त्यानंतरच्या प्रत्येक परदेशवारीला घरून दिलेली ही पिशवी मी नेत गेलो.
बोरिवलीला राहायला गेल्यानंतर वसईच्या फेर्या शनिवार- रविवारकडे होत राहिल्या. मुंबईत वाढलेली बायको, वसईच्या भाज्यांची, माश्यांची रसिक बनली. वसईहून आम्ही आता पिशव्या घेवून येवू लागलो. मेरू, स्विफ्ट मध्ये एकावेळी सर्वाधिक पिशव्या घेवून येण्याचा विक्रमही बहुधा आम्ही प्रस्थापित केला.

ह्या सर्व प्रवासात वसईची पिशवीतील भाजीच्या ताजेपणापेक्षा त्यातील भावनिक गुंतवणुकीचा, मायेचा उलगडा केव्हा आणि कधी झाला हे माझे मलाच कळले नाही. एका पिढीतील माया दुसर्या पिढीपर्यंत भौगोलिक अंतराचे बंध ओलांडून पोहचविण्याचे काम ही वसईची पिशवी अनेक वर्ष करीत राहील याविषयी मात्र माझ्या मनात अजिबात शंका नाही!

Sunday, January 8, 2012

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्षी माणूस साधारणतः थोडासा भावूक बनतो. आयुष्यातील एक वर्ष निघून गेल्याची जाणीव मनात काहीशी खंत निर्माण करते. स्वतःच्या अक्षय अस्तित्वाच्या कल्पनेला कालरूपी वास्तवाने अजून एक छेद दिला हे नाही म्हटले तरी कोणाला आवडणार?
चाळीशीच्या उंबरठ्यावर एक मोठा प्रश्न मनात डोकावू लागतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे निघून गेली आहेत का? प्रगतीची शिखरे गाठण्याची संधी मी गमावली तर नाही ना?. ह्या प्रश्नाकडे बर्याच प्रकारे पाहता येईल. जो पर्यंत तब्येत धडदाकट आहे, मन चिरतरुण आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनू शकतो. मी तर असे म्हणेन की केवळ अनुभवाने येणारी प्रगल्भता या वेळी आपणाकडे असते. स्वतःला विविध पातळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण सिद्ध केल्याचा आत्मविश्वास तुम्हाकडे असतो. पिकल्या केसांनी (हे ह्या पिढीचे वास्तव) तुम्हाला संयमी बनविले असते. मान्य आहे की कौटुंबिक जबाबदार्या काही प्रमाणात वाढलेल्या असतात पण जर आपल्या जीवनसाथीदाराशी योग्य सामंजस्य निर्माण करण्यात तुम्हाला यश आले असेल तर ह्या जबाबदार्या सुद्धा तुम्ही सहजपणे पेलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता.
आता प्रगतीची शिखरे ह्या शब्दप्रयोगाकडे मी परत वळतो. प्रगतीची शिखरे म्हणजे केवळ व्यावसायिक जगातील यश असा अर्थ मला अभिप्रेत नाही आहे. प्रगतीची शिखरे मोजण्याचा मापदंड हा केवळ लौकिकार्थाने मिळालेले यश असा होत नाही. एखाद्या गृहिणीने संसारावर, मुलांच्या अभ्यासावर मिळविलेले नियंत्रण, एखाद्या कलाकाराने अथक प्रयत्नानंतर कलेवर मिळविलेले प्रभुत्व, एखाद्या छायाचित्रकाराने टिपलेले एक दुर्मिळ चित्र हे ही प्रगतीचे शिखर असू शकते. दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील एक वाक्य कायमचे माझ्या लक्षात राहिले आहे. स्वानंद हे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
मीच माझ्या मनाचा स्वामी. त्यामुळे जर मी मनाला प्रसन्न ठेवू शकलो तर मी प्रगती करणारच. जगाने बनविलेले प्रगतीचे मापदंड माझ्या निकर्षाशी मिळतेजुळते असतील असेही नाही.
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण!
अजूनही अर्धे आयुष्य बाकी आहे! मी वास्तववादी असे जीवनध्येय ठरविणार आणि जीवनाचा आनंद घेत ते साध्यही करणार! आणि दुनियेतील मला निराश करणाऱ्या घटकांपासून मला सांभाळण्यासाठी मनोबल वाढविणार!
Happy 2012!