Saturday, October 20, 2012

PICTURE PERFECT - भाग २


परिपूर्ण चित्राच्या पहिल्या भागाला जाणकार लोकांनी दाद दिल्याने मी सध्या खुश आहे.

आज सुरुवात करूया व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमाने! अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाची हल्ली असंख्य महाविद्यालये उघडली आहेत. आणि आपली अपुरी स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा मनी बाळगून हल्लीचा पालकवर्ग आपल्या पाल्यांना ह्या महाविद्यालयात दाखल करतो. आता आपल्या पाल्याचा कल त्या अभ्यासक्रमाकडे आहे की नाही किंवा त्यात तो प्राविण्य मिळवू शकतो कि नाही ह्याचा आपण सारासार विचार करीत नाही. मागच्या एका ब्लॉग मधील माझ्या म्हणण्याची थोडी पुनरावृत्ती; भविष्यकाळात भारताला कोणत्या क्षेत्रातील किती व्यावसायिकांची गरज आहे याचा प्राथमिक स्वरूपातील सुद्धा अभ्यास कोणी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. माझे म्हणणे चुकीचे असल्यास मी आनंदी होईन.

आता पालकवर्ग दुसरे मार्ग का पत्करू पाहत नाही? तर दुसऱ्या मार्गाने आपला पाल्य गेल्यास कशा प्रकारे तो यशस्वी होवू शकतो ह्याचे परिपूर्ण तर सोडा, पण प्राथमिक स्वरूपातील चित्र देखील आपण समाजापुढे ठेवले नाही. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाने रंगवायला घेतलेले ७०- ८० च्या सुमारातील चित्र आज माहिती आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन ह्या रंगांच्या छटांनी गडद झाले आहे. ह्यात अजून एक अदृश्य घटक आहे जो एकंदरीत लेखाच्या गंभीर वातावरणाशी थोडा विसंगत आहे. आज मुले, मुली दोन्ही बहुतांशी उच्चशिक्षित बनले आहेत. ह्यातील किती मुली शेती क्षेत्रात किंवा स्वःताच्या व्यवसायात यशस्वी असलेल्या मुलांशी छोट्या शहरात किंवा गावात संसार करण्यास तयार होतील? प्रमाण नक्कीच कमी आहे.

आता ह्याच मुद्द्याची दुसरी बाजू. वसईतील वाड्यांची आजची स्थिती! आज बऱ्याच प्रमाणात वाड्यातील उत्पादन कमी होत चालले आहे. महत्वाचे कारणे म्हणजे शेतकऱ्यांची पुढची पिढी शैक्षणिक क्षेत्रात उतरली आणि परंपरागत कामगारांची पुढील पिढी कारखान्याच्या कामात रंगून गेली. ह्यात तसे बघितले एक संधी उपलब्ध आहे. वसईतील वाड्यांसाठी कामगार पुरवठा करण्याची एक संस्था स्थापण्याची. समजा एखाद्या होतकरू तरुणाने अशी संस्था स्थापिली तर त्याचे आयुष्य कसे असेल? सकाळी तो आपल्या संगणकाद्वारे त्या दिवसासाठी आपले कामगार कोणकोणत्या वाड्यांमध्ये कामाला जाणार आहेत ह्याचा आढावा घेईल. घराच्या मागे असलेल्या आपल्या गोठ्यातील गाईंचे स्वतः किंवा आपल्या कामगारांद्वारे दुध काढून घेईल. कोंबड्यांची गावठी अंड्यांची मागणी लक्षात घेवून त्यानुसार त्यांचा भाव ठरवील. पानवेलीसाठी लागणारे कुशल कामगार (गो) उपलब्ध नसल्यास तो संगणकावरील संकेतस्थळावर त्याची जाहिरात देईल. त्याच्या ह्या जीवनशैलीचे फायदे? तो वाहतूक कोंडीत सापडणार नाही, प्रदूषणापासून तो दूर असेल, त्याच्या व्यवसायातच त्याचा व्यायाम होऊन जाईल, त्याला सदैव स्वतःला अपडेटेड ठेवण्याची गरज भासणार नाही.. दुसर्या एक चित्राच्या प्राथमिक रेखा रेखाटण्याचा माझा प्रयत्न...सद्यस्थितीत हे फारसे वास्तव वादी नाही याची मलाही जाणीव आहे..ह्याचे परिपूर्ण  चित्र होणार की नाही ते आपल्या मनोबलावर अवलंबून आहे.  

Saturday, October 13, 2012

सरलता



मध्येच एका कार्यालयीन कामकाजात एका संज्ञेने माझे लक्ष वेधून घेतले. 'KISS - KEEP IT SIMPLE SILLY'. गोष्टी जितक्या सोप्या ठेवता येतील तितक्या त्या सोप्या ठेवाव्यात असं एकंदरीत म्हणण होत. त्यात एक मेख अशी आहे गोष्ट सोपी बनविण्याच्या नादात त्या गोष्टीच्या मूळ अर्थाला, हेतूला धक्का लागता कामा नये.

नेहमीप्रमाणे मी व्यवहारात त्याची उदाहरणे शोधू लागलो. लगेचच अमेरिकेत असतानाचा माझा मित्र कल्याण मला आठवला. एकदम साधा आणि शिस्तबद्ध माणूस. वेळापत्रक आखून त्याप्रमाणे वागणारा. शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी सार्वजनिक धुलाईयंत्रात जाणार. त्यानंतर आठवडाभराचे किराणामालाचे सामान भरणार, दर क्ष दिवसांनी गाडीत पेट्रोल भरणार, सकाळी सव्वाआठ नंतर वाहतूक वाढते म्हणून पावणेआठलाच निघून कार्यालय गाठणार. मी त्याचे बारकाईने निरीक्षण करायचो. एकदा मी त्याला ह्यावरून छेडले. तो म्हणाला, आदित्य आयुष्यात अशा बऱ्याच क्लिष्ट गोष्टी आहेत त्याबाबतीत मी काही करू शकत नाही. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत त्या सोप्या ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. कल्याण आणि त्याचे हे म्हणणे माझ्या कायम लक्षात राहिले.

ह्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे त्या परिस्थितीचे आपणास पूर्ण किंवा बऱ्यापैकी आकलन असले पाहिजे. आपण आपली उर्जा / शक्ती परिस्थितीच्या पृथ्थकरणात खर्च केली पाहिजे. एकदा का आपल्याला त्यात यश आले की उपलब्ध असलेल्या मार्गांमधील आपल्याला उद्दिष्टांच्या जवळपास घेवून जाणारा सरलसोपा मार्ग निवडावा. सर्वात पहिले उदाहरण डोळ्यासमोर येते ते आपण ज्यांच्याबरोबर सदैव वावरतो अशी कार्यालयातील, घरातील माणसे आणि त्यांचे स्वभाव. आपल्या आणि त्यांच्या स्वभावातील काही गोष्टी कोणीच बदलू शकत नाही, ह्या गोष्टी ओळखल्या की मग कोणत्या गोष्टीत त्यांच्याशी डोकेफोड करायची आणि कुठे कानाडोळा करायचा हे ठरावयास मदत होते.

हल्ली प्रत्येकासमोर कामाचा व्याप भारी असतो. आपण सर्वच एका गोष्टीवर कधी ना कधी अडखळतो आणि ती म्हणजे महत्वाच्या गोष्टींवर प्रथम लक्ष देणे! ह्यातला kiss घटक म्हणजे प्रथम कामाची यादी बनवून त्या सर्वांना प्राधान्य नेमून देणे! उदाहरणे अनेक असतात, सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घ्यायचा असे ठरविल्यावर उपहारगृहाची निवड करण्यात बराच वेळ जातो, आणि एखादे उत्तम पण दूरचे उपहारगृह निवडले जाते. मग होते काय की तिथे पोहचता पोहचता बराच वेळ लागतो आणि मग प्रतीक्षायादी ह्यात आपला मूळ मुद्दा बाजूला राहतो!

एकंदरीत काय kiss अमलात आणताना डोक्याचा कीस पडला की!

PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्र


लहानपणी चांदोबा हे माझे आवडते मासिक होते. त्यातली चित्रे मला अतिशय आवडायची. सुंदर घरे, आजूबाजूला हिरवीगार झाडी, व्यवस्थित कपडे परिधान केलेली त्यातली पात्रे. सर्व काही नीटनेटके. प्रत्यक्षात असं काही असू शकत का असा मला प्रश्न पडायचा. पुढे अमेरिकेत असताना उड्डाण / आगमनाच्या वेळी दिसणारं दृश्य मनाला भावून गेलं. भूमातेचा प्रत्येक भाग एकतर हिरवळीने व्यापलेला किंवा मनुष्यनिर्मित सुबक संरचनेने! अमेरिका मला जशी भावली तशी बऱ्याच भारतीयांना सुद्धा! त्या देशाने मानवी भावबंध वगळता सर्व काही कसे आखून रेखून ठेवले आहे.

अमेरिकेच्या ह्या परिपूर्ण चित्राच्या अनुभवाने प्रभावित झालेली मंडळी जेव्हा भारतात परत आली तेव्हा त्यांनी हे picture perfect आपल्या परीने अमलात आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर तो सार्वजनिक जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील मुरलेल्या system पुढे बहुतांशी सर्वांनी हार मानली. मग ह्या सर्वांनी आपला मोर्चा वैयक्तिक जीवनाकडे वळविला. आता वैयक्तिक जीवनातील picture perfect साठी लागणारे घटक कोणते? एक सुंदर घर, त्यात दिवाणखान्यातील भिंतीवर टांगणारे एक सुंदर चित्र, सुशिक्षित / सुस्वरूप बायको, CBSE / ICSE बोर्डात शिकणारी मुले, एखादी गाडी, व्यायामशाळेचे सदस्यत्व, SECOND HOME मधील गुंतवणूक, साप्ताहिक सुट्टीत मॉलला भेट, वर्षातून एकदा कौटुंबिक सहल, त्याचे फेसबुकवरील मित्रांनी LIKE केलेले फोटो यादी अशी वाढतच जाते. मुक्त अर्थव्यवस्थेने ह्या picture perfect ला पूर्ण पाठींबा दिला. किंबहुना मुक्त अर्थव्यवस्थेचा हे picture perfect म्हणजे कणाच होता.

हे picture perfect असं कायम राहत का हा मला पडलेला प्रश्न? picture perfect चा एक कमकुवत दुवा म्हणजे ह्यातील काही घटक पृष्ठभागावरील आणि क्षणिक असतात. हा डोलारा ज्यावर उभा आहे ती नोकरी/ व्यवसाय हा एकूण चित्रातील एक महत्त्वाचा घटक बनतो, वाढणारी मुले आपल्या आवडीनुसार आपले स्वतःचे एक picture perfect बनवितात आणि ते आपल्या परिपूर्ण चित्राशी मिळतेजुळते असेलच असे नाही. एकंदरीत काय, picture perfect वर जास्त मेहनत घेऊ नका. मित्र मंडळी, नातेवाईक, कला याच्यावर लक्ष द्या.....

Tuesday, October 9, 2012

सिग्नल तोड, समस्या - मुलभूत कारण, बळी



मुंबईत शांतपणे वाहन चालवणे हे एक अवघड काम आहे. रस्ता पार करणारे पादचारी, तुमच्या वाहनाला कोपऱ्यात ढकलू पाहणारे बेस्ट बसचालक, उजवी वाहनमार्गिका (लेन) जी सर्वात जलद वाहनांसाठी आहे ती अडवून ठेवणारे, खडखड आवाज करणाऱ्या रिक्षाचे चालक आणि ह्या सर्वांना तोंड देत तुमच्या हातून कशी चूक होते ह्याची लपून वाट पाहणारे वाहतूक पोलीस. कालच पेपरात बातमी वाचली की सिग्नल (याला एक लांबलचक मराठी शब्द आहे तो आता आठवत नाही) तोडण्याचे प्रमाण मुंबईत फार वाढले आहे. आणि त्यासाठी माहिती मायाजालावर प्रयत्न करणाऱ्या गटाने प्रत्यक्ष एक सभा बोलावली होती. ही बातमी वाचून माझे मन पश्चातापदग्ध झाले. चिंचोली बंदर ते चिकूवाडी ह्या रस्त्यावर रात्री येताना तोडलेले असंख्य सिग्नल आठवले. ह्या पुढे सिग्नल थोड्या कमी प्रमाणात तोडायचे असा मनोमनी निर्धार केला. बघूया किती दिवस हा निर्धार टिकतो ते.

कार्यालयात कधी कधी एखादा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण होतो. काही वेळा तो आपसूक मिटतो तर काही वेळा विविध गटातील तज्ञ लोकांना दूरध्वनीवर बोलावून हा प्रश्न सोडवावा लागतो. प्रश्न सुटल्यावर ह्याचे मूळ कारण कोणते ह्यावर बरेच विचारमंथन केले जाते. दोन तीन गोष्टींना निवडले जाते आणि त्यातली एखादी मूळ कारण आहे ह्यावर सर्व एकमत होतात. ह्यात एक मेख असते. मूळ कारण सोडून बाकीच्या गोष्टी ह्या त्या समस्येच्या बळी असतात. म्हणजे कारण की बळी ह्यावर काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व आठवायचे कारण म्हणजे सिग्नल तोडून बेशिस्त वाहतुकीला आमंत्रण देणारे वाहनचालक हे समस्येचे कारण आहेत की ह्या शहरात वाढणाऱ्या बेसुमार लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या ताणाचे बळी आहेत ह्याचा विचार करायला हवा. थोडा खोलवर विचार केल्यास हे तत्व बर्याच ठिकाणी लागू होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक समस्यांचे खापर आपण वरवर दिसणाऱ्या कारणांवर फोडून मोकळे होते. पण जमल्यास थोडा विचार करून ह्या वरपांगी कारणामागे अजून काही घटक आहेत का याचा विचार करा!
 

Monday, October 1, 2012

भावनिक सुसंवाद


रविवारच्या वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचताना कधी कधी त्यातील एखाद वाक्य विचार करायला भाग पाडत. असंच त्यादिवशी वाचलेला एक लेख. विषय होता मनुष्याची वाढलेली आयुष्यमर्यादा आणि एकंदरीत बदलत्या वातावरणाचा जोडप्यांवर होणारा परिणाम! सारांश असा, पूर्वी मनुष्याची आयुर्मर्यादा कमी होती, शिक्षणाचा प्रसार सर्वत्र नव्हता, पुरुष असो वा स्त्री, त्यांचा जनसंपर्क मर्यादित होता. अपत्यांची संख्या तुलनेने जास्त होती आणि घरकामातच दोघांचा बहुतांशी वेळ जात असे. त्यामुळे संसारातील भावनिक जीवन फारस फुलत नसाव. ह्याला काही प्रमाणात अपवाद नक्की असणार, पण ही एकंदरीत सर्वसामान्य परिस्थिती होती.

बदलत्या काळानुसार अपत्यसंख्या १-२ वर आली, सर्वजण खूप शिकले, सर्वांचाच जनसंपर्क वाढला, स्त्री पुरुष विविध क्षेत्रातील निपुण लोकांच्या संपर्कात येवू लागली. अप्रत्यक्षरीत्या बाहेर भेटलेल्या लोकांच्या वागण्याची आपल्या साथीदाराशी तुलना होवू लागली. ह्या सर्वांमुळे नवीन पिढीतील पुरुष आणि स्त्री ह्या दोघांवर संसारातील जबाबदाऱ्या वाढल्या, ह्या जबाबदाऱ्या घरकामातील नव्हेत तर आपल्या साथीदाराच्या भावनिक जगाशी संबंधित होत्या. समस्या अशी होती की मुळातच आपल्या साथीदाराला भावनिक गरजा असतात ह्याचे सर्वानाच भान नसते, आणि असल्याससुध्दा त्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे हे सर्वच मान्य करणार नाहीत. पुन्हा भावनिक गरजा स्थिर नसतात, त्या वयानुसार बदलत जातात. एकंदरीत प्रकार कठीण आहे! ही आजच्या पिढीची स्थिती, पुढच्या पिढीला भावना कितपत शिल्लक राहतील ह्यावर त्या पिढीतील जोडप्यांचा भावनिक सुसंवाद अवलंबून राहील.