Saturday, July 26, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ६मध्येच एकदा होवच्या मैदानात केंट आणि ससेक्स ह्यांचापंचेचाळीस षटकांचा मर्यादित सामना मी आणि श्रीकांत पाहून आलो. ससेक्स मध्ये राहत असल्याने आम्ही त्या संघाला पाठींबा देत होतो. आपला राहुल द्रविड पाहुण्या  केंट संघातून आला होता.  आम्ही तिथे पोहोचेतोवर राहुल फलंदाजीस आला होता. थंड हवेत बियरचे ग्लास मुक्तपणे प्राशन केले जात होते. आमच्या समोर बसलेल्या आणि केंटला पाठींबा देणार्या दोन प्रेक्षकांवर बियरप्राशन आणि थंड हवा ह्यांचा परिणाम झाल्याने त्यांनी ससेक्स संघाच्या नावाने खडे फोडण्यास सुरुवात केली होती. गंभीर स्वभावाच्या इंग्लिश प्रेक्षकांना हा प्रकार आवडत नसल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले होते. परंतु जवळच बसलेल्या दहा वर्षांच्या आसपास वयाच्या दोन मुलांना आपल्या  संघाचा हा असा अपमान न आवडल्याने ते अधूनमधून त्या दोघांजवळ जाऊन ओरडून येत होते. सामन्यात द्रविड व्यतिरिक्त बेवन आणि एल्हम ह्या आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. ४५ षटकामधील २१५ ही केंटची धावसंख्या फारशी खास नव्हती. मध्यंतरात लहान मुले मैदानात उतरून आपल्या चेंडू फळीने खेळत होती. काही मोटारस्वार तात्पुरत्या उभारलेल्या  लाकडी मंचावरून कसरती करत होते. जोरदार इंग्लिश गाणी वाजवली जात होती.
ससेक्सची फलंदाजी सुरु झाली. सलामीच्या फलंदाजांनी १२० च्या आसपास भागी केली. मग दोन विकेट पटकन गेल्या. नंतर शांत डोक्याचा बेवन आणि एक सलामीचा फलंदाज खेळू लागले. केंटच्या संघात पटेल नावाचा गोलंदाज होता. मध्येच  इंग्लंड मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात एका संघातून ११ ही खेळाडू पटेल असल्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. केवळ दोनच विकेट गेल्याने सामना तसा ससेक्सच्या आवाक्यात होता. परंतु शेवटची दोन षटके बाकी असताना सलामीवीर बाद झाला आणि मग बेवनला स्ट्राईकच मिळाला नाही. जेव्हा मिळाला तेव्हा दोन चेंडूत चार धावा हव्या होत्या. बेवनने चेंडू हवेत उंच टोलवला. खरंतर तो सीमारेषेबाहेर जायचा पण दुर्दैवाने सीमेवरील एका क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. आणि अशा प्रकारे ससेक्स अनपेक्षितरित्या सामना हरलं. श्रीकांतने मैदानात उडी मारली तशी एकटं राहायला नको म्हणून मी सुद्धा मारली. श्रीकांत साहेब थेट द्रविडजवळ जाऊन उभे राहिले आणि त्याने जोरात "राहुल" अशी हाक मारली. इथे आपल्याला इतक्या अधिकारवाणीने हाक मारणारा हा कोण हे पाहण्यासाठी द्रविडने आमच्याकडे पाहिले. अनोळखी चेहरे पाहून मग तो आनंद व्यक्त करणाऱ्या केंट खेळाडूमध्ये मिसळला. राहुल द्रविडला तीन चार फुटाच्या अंतरावरून ह्याची देही डोळा पाहण्याची संधी मिळाल्याने मी धन्य झालो होतो.

त्या सामन्याचा हा क्रिकइंफोवरील धावफलक!
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/421500.html

होवच्या मैदानाचं हे एक सुरेख चित्र


विक हॉल मध्ये राहण्यास गेल्यापासून जेवणाची परिस्थिती बरीच सुधारली होती. मुख्य म्हणजे भात खायला मिळू लागले होते. दोन्ही पार्टनर शाकाहारी असल्याने मी मांसाहारापासून वंचित राहत होतो. म्हटलं तर मांसाहारी स्वयंपाक करण्यास त्यांची ना नव्हती. परंतु माझे पाककौशल्य मर्यादित होते आणि तीन माणसांत किती वेगळे प्रकार करणार म्हणून मी पुढाकार घेत नव्हतो. पण मग एकदा न राहवून मी वेटरोज मधून चिकन ड्रमस्टिक घेऊन आलो. आईला वसईला फोन लावला आणि तिच्या मार्गदर्शनाखाली चिकन बनवलं. इतक्या दिवसाच्या  अंतराने चिकन मिळाल्याने ते अगदी रुचकर लागले.
पुढे एकदा अशीच दुधीची आमटी खायची हुक्की आली. माझी मोठी काकी (मोठीआई) वसईला ह्याची उत्तम आमटी करते. मग मागच्या एका भागात सांगितल्या प्रमाणे मी २.२९ पौंडांचा दुधी घेऊन आलो. एव्हाना वसईवाले झोपले असतील म्हणून अमेरिकेत राहणार्या निउला फोन लावला. तिच्या दुपारच्या तिने १५ मिनिटात दुधीच्या आमटीची रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितली. त्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकावं असा तज्ञ वर्गात मोडणारा सल्लाही दिला. ही आमटीसुद्धा सुंदर झाल्याने माझा पाककलेतील आत्मविश्वास आता बळावत चालला होता.
मध्येच विम्बल्डन होऊन गेले. सिंटेलचे काही जण जाऊन प्राथमिक फेरीचे सामने पाहून आले. प्रफुल्ल फुटबॉलचा मोठा चाहता! इंग्लिश प्रीमियर लीगचे सामने पाहायला जायचा आणि मग येताना तो प्रेक्षकवर्ग आगगाडीत कशी हुल्लडबाजी करतो हे ही सांगायचा.
एका वीकएंडला युरो २००० चा इंग्लंड आणि जर्मनी ह्यांचा सामना होता. तेव्हा मला अमेक्सच्या गायने सामन्याच्या निकालावर लक्ष ठेवत इंग्लंड हरल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे इंग्लंडचे फुटबॉल चाहते त्यांच्या हुल्लडबाजीसाठी कुप्रसिद्ध होते / आहेत.
माझी आधी ठरल्याप्रमाणे तीन महिन्याची मुदत संपायला आली होती. पण आम्ही हे दोन महत्वाचे प्रोग्रॅम विकसित केल्याने मला कंपनीने माझं वास्तव्य वाढवायला सांगितलं. पौंडाच्या वाढत्या दराकडे पाहत मी ही ते मान्य केलं. इंग्लंडच्या बँकेत आता बचत वाढत चालली होती. इथे पैसे असले तरी आमच्या मनाला काही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे मंडळी नियमितपणे भारतीय खात्यात पैसे पाठवून देत. ही रक्कम १ लाखाच्या आत असल्यास आयकर खात्याचं लक्ष जात नाही असा समज आमच्या मंडळीत रूढ होता. एकदा का बार्कलेस बँकेतून मुंबईच्या बँकेत पैसा ट्रान्सफर करायची सूचना दिली की पाचव्या दिवशी ते भारतीय खात्यात दिसत. परंतु काही कारणाने  वसईच्या खात्यात मात्र हीच ट्रान्स्फर २१ दिवस घेत असे. ही सूचना दिल्या दिल्या हे पैसे बार्कलेज मधून गायब होत असल्याने मी मात्र पुढील वीस दिवस अगदी जीव मुठीत ठेवून बसत असे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या भारतीय कंपन्या काही मनाला न पटणारे प्रकार करतात. अमेक्स चे युरो साठी बदलले जाणारे प्रोग्रॅम विविध गटात विभागले गेले होते. ह्या प्रत्येक गटांना वर्कग्रुप असे संबोधिले जाई आणि त्या गटातील तज्ञांना वर्कग्रुप चॅम्पियन असे संबोधिले जाई. अमेक्सचे वर्कग्रुप चॅम्पियन साधारणतः २० - २५ वर्षे अनुभव असणारे होते आणि त्यातील बर्याच जणांनी त्यातील आज्ञावलीचा बराच भाग कोळून  प्याला होता आणि त्यांच्यासमोर उभं केलं गेलं ते एकूण २-३ वर्षे अनुभव असणाऱ्या आणि ह्या अमेक्सच्या व्यावसायिक नियमांचा अभ्यास उपलब्ध माहिती वाचून करण्यास सुरु केलेल्या आम्हांला!! अमेक्सच्या खर्या तज्ञ लोकांची नाराजी त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसत असे!

(क्रमशः)

Saturday, July 19, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ५


 इंग्लिश उन्हाळा व्यवस्थित चालला होता. साधारणतः सकाळी चारला उगवणारा सूर्य रात्री १० नंतर केव्हातरी मावळे. मनातल्या मनात मी गणित करत होतो. ब्रायटनचा सर्वात मोठा दिवस १८ तासाच्या अवधीचा तर हिवाळ्यातील सर्वात छोटा दिवस ६ तासाच्या आसपास! म्हणजे जून ते डिसेंबर ह्या १८० दिवसाच्या अवधीत दिवसाचा अवधी १२ तासाने कमीजास्त होतो. १२ तास म्हणजे ७२० मिनिटे. म्हणजे एका दिवसात ४ मिनिटाचा फरक पडतो.अर्थात २ मिनिटे सूर्योदय आधी आणि २ मिनिटे सूर्यास्त नंतर! दिवस वाढत असताना हा फरक मस्त वाटत असे, पण पुढे सप्टेंबर महिन्यात जसजसे दिवस छोटे होत गेले तेव्हा मात्र हा फरक अगदी जीवावर येऊ लागला. एखादा अनमोल ठेवा हातातून निसटून जातोय अशी अवस्था सप्टेंबरात झाली.
बाकी भारतात चंद्रोदय दररोज आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५२ - ५३ मिनिटे उशिरा होतो. चंद्रोदयाच्या वेळेतील हा फरक अक्षांशानुसार बदलतो किंवा नाही  पडताळून पाहण्याची संधी मला ब्रायटनला मिळाली नाही  किंवा मी गांभीर्याने प्रयत्न केला नाही. मध्येच एकदा इंटरनेटवर ह्या विषयी काही शोधन केले. पण ते पूर्णत्वाला नेले नाही. अशाच एका शुक्रवारी संध्याकाळी जेवणानंतर मित्रांसोबत ब्रायटनच्या सुंदर समुद्रकिनार्यावर बसलो असता मला त्या दिवशी कृष्ण पक्षातील द्वितीया असल्याची आठवण झाली. घड्याळात पावणेनऊ वगैरे झाले असतील. काही वेळाने चंद्रोदय होईल असे मी छातीठोकपणे सांगितलं. शुक्रवारची संध्याकाळ  असल्याने मंडळी फुरसतीत होती. त्यातील बर्याच जणांना मी फेकतोय असेच वाटत होते. आकाशात चंद्र आल्याशिवाय इथून निघायचचं नाही असे त्यातील एकाने घोषित केलं. साधारणतः मंडळी शुक्रवार आणि साप्ताहिक सुट्टीच्या वेळी असे एकाला लक्ष करण्याच्या मूडमध्ये असत. ह्यावेळी मी लक्ष बनलो आहे हे आता नक्की झाले  होते. सरणार्या एकेक मिनिटाला माझा आत्मविश्वास काहीसा डळमळीत होऊ लागला होता. इतक्या वरती उत्तरेला चंद्राचे नियम वेगळे असतील तर अशी भीती मला वाटू लागली. साडेनऊ वगैरे झाले आणि मंडळीचा गलका वाढत चालला. पण मी ही हार मानण्याच्या तयारीत नव्हतो. आणि शेवटी नऊ चाळीसच्या सुमारास चांदोमामा आकाशात आले. आता मात्र मी जोरदार कल्ला केला.
सहा आठवड्याच्या वास्तव्यानंतर प्रिमियर लॉज सोडण्याची वेळ आली. आम्ही तिघांनी मिळून १३८, विक हॉल, होव इथे एक प्रशस्त सदनिका घेतली होती. एका शनिवारी सकाळी ५२३, प्रिमियर लॉज सोडण्याची वेळ आली. आणि शेवटची बॅग घ्यायच्या वेळी रूमला निरोप घेताना मला काहीसं गहिवरून आलं. वास्तूशी सुद्धा ऋणानुबंध जुळतात हे केवळ ऐकलं होतं पण ते प्रत्यक्षात अनुभवलं होतं. वसई - मुंबईच्या बाहेर फारसा कधी न गेलेल्या मला आता ब्रायटन अगदी जवळचे वाटू लागलं होतं आणि मला स्थिरावून देण्यात ह्या ५२३ रूमचा मोलाचा वाटा होता. फायर अलार्म, विंदालू वगैरे सर्व आठवणी क्षणभर डोळ्यासमोर आल्या.
ऑफिसात आमच्या दोन आज्ञावली तर पहिल्या काही दिवसातच तयार असल्याने उपभोक्ता मार्गदर्शिका (User Guide चे क्लिष्ट आणि वजनदार न वाटणारे भाषांतर) बनविण्यासाठी आम्हांला खूप वेळ मिळाला होता. मी अशा कामात खूप रस घेतल्याने १४० पानाची मार्गदर्शिका तयार झाली होती. गाय चा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून हे पहिलच काम असल्याने सर्व प्रोसेस (पद्धती ? की रीतीभाती!) अवलंबिण्यात त्याला खूप रस होता. त्यामुळे ह्या १४० पानांवर तो खूप खुश होता. तसेच ह्या दोन आज्ञावली CICS प्रोग्रॅमद्वारा यशस्वीरित्या बोलावल्या जाऊ  शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्याने माझ्याकडून दोन CICS प्रोग्रॅमसुद्धा लिहून घेतले.
मेनफ्रेम संगणकांची मोठमोठी माहिती हाताळण्याची क्षमता निर्विवाद असल्याने मोठमोठ्या वित्तीय संस्थाची माहितीभंडारे मेनफ्रेमवर असतात. विविध व्यावसायिक नियमांचा ह्या माहितीवर अवलंब करणारे बरेच प्रोग्रॅम सुद्धा मेनफ्रेमवर असतात. त्यांना ऍप्लिकेशन प्रोग्रॅम म्हटले जाते. युरो प्रोग्रॅमसाठी आम्ही विकसित केलेले ह्या  दोन प्रोग्रॅमना बाकीचे ऍप्लिकेशन प्रोग्रॅम आता बोलावणार होते. सिंटेल आणि अमेक्सची दुसरी मोठी टीम ऍप्लिकेशन प्रोग्रॅममधील आज्ञावली युरो चलनासाठी बदलत होती. आता आमचे २ हिरो प्रोग्रॅम आणि हे ऍप्लिकेशन प्रोग्रॅम एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधू शकतात की नाही हे पडताळून पाहण्याची वेळ आली होती. त्यामुळे आमचं नेपियर हाउस मधून लँचेस्टर हाउस मधील येणे जाणे वाढलं होते.
मधल्या काळात आम्ही लंडन, स्कॉटलंड अशा ठिकाणांना भेटी देऊन आलो होतो. मी ससेक्स आणि केंट ह्यांचा सामनाही होवच्या मैदानावर जाऊन पाहून आलो होतो. ह्या सर्वाचे वर्णन पुढील काही भागात!
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात येणाऱ्या बहुतेक सर्वांनाच परदेशप्रवासाची मनोमन इच्छा असते. अधिक जबाबदारीच्या कामाचा अनुभव मिळावा, परदेशी लोकांशी थेट संवाद करून संभाषणकौशल्य सुधारावं अशी व्यावसायिक कारणं असतात, त्याचबरोबर अधिक अर्थाजन, चांगल्या राहणीमानाचा अनुभव, पर्यटनस्थळ पाहण्याची सुवर्णसंधी हे ही फायदे असतात. लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसणारे नवयुवकांचा भाव वाढण्यास ह्या वारीची मदत होते. पण  अजून एक वर्ग असतो ज्यांना ह्या अधिक अर्थाजनाची आपल्या कुटुंबासाठी खूप गरज असते. असाच एक आमचा सहकारी, जो खरेतर आमच्यासोबत ब्रायटनला यायचा! पण इंग्लंडचा विसा मिळविण्यासाठी जी अगदी कडक वैद्यकीय तपासणी केली जाते त्यात त्याच्या हृदयात एक छोटे भोक असल्याचे आढळलं होतं आणि त्यामुळे त्याचा विसा लांबणीवर पडला होता. त्याला अधिक विस्तृत वैद्यकीय चाचण्या करावयास सांगण्यात आल्या होत्या. आम्हांला येऊन तीन महिने झाले तरी ह्या चाचण्या आणि वकिलातीतील त्याच्या फेर्या सुरूच होत्या. आणि त्याच्या सुदैवाने शेवटी एकदाचा विसा मंजूर झाला होता. त्याच्यासोबत माझ्या घरून थर्मल आणि अजून काही जिन्नस पाठविण्यात येणार होते. ह्या ब्रायटन भेटीआधी घरापासून सलग दूर राहण्याचा माझा उच्चांक २२ दिवसांचा होता आणि एव्हाना ९० दिवस होत आले होते. इतक्या काळात फोनवरून बोलणे आणि विक हॉलच्या सदनिकेत गेल्यानंतर पोस्टाने येणारी पत्रे ह्याहून अधिक म्हणजे घरून काही वस्तू येणार होत्या. मोठ्या उत्कंठेने मी रमेशची वाट पाहत होतो. 

Wednesday, July 16, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ४श्रीकांतचा जनसंपर्क तसा दांडगा होता. आमचं वास्तव्य अजूनही प्रिमियर लॉज मध्येच होतं. एकंदरीत आम्ही  त्या हॉटेलात ६ आठवडे राहिलो होतो. श्रीकांत मात्र बाजूच्याच दुसर्या हॉटेलात राहत असे. "मी इंग्लिश टीमला जेऊ घालणार आहे. त्यांना आपल्या भारतीय जेवणाची खरीखुरी चव कळली पाहिजे" असे भावूक आवाहन श्रीकांतने आम्हा सर्वांना केले. ह्या टीमबरोबर मी काम करीत असल्याने त्याने हे भावूक आवाहन केले नसतं तरी मला मदत करावीच लागली असती. पण एकंदरीत माझ्या बोलण्यावरून श्रीकांतने माझ्या पाककौशल्याविषयी योग्य समज करून घेतला होता आणि त्यामुळे माझ्या पाठिंब्याने त्याला फारसा आनंद झालेला दिसला नाही. बाकीचे लोक तसे बेरके होते. त्यांनी श्रीकांतचे बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. पण प्रफुल्ल आणि शिवा करुमांची ह्या श्रीकांतच्या बियर बैठकीतील निष्ठावंत साथीदारांनी त्याला पूर्ण पाठींबा दर्शविला.
त्या  शुक्रवारच्या संध्याकाळी रेंगाळणार्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने मी  घरी (नव्हे ५२३, प्रिमियर लॉज) ला परत निघायच्या तयारीत असताना श्रीकांतने मला गाठलं. आमची पावलं वेटरोजच्या दिशेने निघाली. सध्या सुरु असलेल्या भारत - इंग्लंड ह्या मालिकेतील मैदानात आणि खेळाडूंच्या शर्टाच्या बाहीवर लावलेल्या वेटरोजच्या जाहिरातीमुळे ह्या आठवणी जागृत झाल्या. वेटरोजमध्ये कोलंबी, कच्च्या चिकनचे अनेक बंद पॅंक्स, बटाटे, कांदे, टोमाटो अशी जय्यत खरेदी करून आम्ही श्रीकांतच्या हॉटेलकडे निघालो. तज्ञ प्रफुल्ल आणि शिवा तिथे आधीपासून तयार होतेच. मंडळी तयारीला लागली. ब्रायटनला बादशाह नावाचे एक अरब मालकाचे दुकान होते. तिथे सर्व भारतीय मसाले वगैरे मिळत. तिथून विविध मसाले आणण्यात आले होते. नंतरच्या दिवसात असेच एकदा मी दुध्याच्या आठवणीने भावूक झालो असता ह्या दुकानातून २.२९ पौंड ह्या किमतीला दुधी खरेदी करून त्याची भाजी बनवली होती. असो चिकन, कोलंबी ह्या सर्व मांसाहारी पदार्थांना मसाले लावून (मेरीनेट) मुरवण्यासाठी ठेवण्यात आले होते. श्रीकांतने खरेदी उदार मनाने केली होती. ११ जणांची टीम आणि डोमिनिकचं कुटुंब मिळून १३-१४ मंडळी असली तरी त्याने ५- ६ डझन पिसेस आणले होते. त्याला मसाले लावता लावता प्रफुल्ल आणि शिवा कंटाळू लागताच श्रीकांतने बियरचे कॅन्स उघडले. त्यामुळे मंडळी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली. ह्यातील उरलेल्या पिसेसना परत घेऊन यायचं आश्वासन श्रीकांतने मंडळींना दिलं. मी शनिवारी मांसाहार करणार नाही असं टुमणे चालू केल्याने श्रीकांतने बटाट्याची ओली भाजी बनविण्याचे आश्वासन दिलं.
दुसऱ्या दिवशी अकरा वाजताच्या सुमारास एक टॅक्सी करून त्यात हा सर्व कच्चा माल भरून आम्ही डोमिनिकच्या घराकडे प्रस्थान केलं. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीरच झाल्याने मंडळी तशी तणावाखालीच होती. आम्हांला पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला. डोमिनिकचे घर अगदी प्रशस्त होते आणि घराला तीन मजली होते. आणि मागे  छोटीशी बाग होती. श्रीकांतने ताबडतोब किचनचा ताबा घेऊन चिकन ओवनमध्ये भाजण्यासाठी ठेवले. एका बाजूला बटाट्याची ओली भाजी करण्यास टाकली. मंडळी बियरचा मुक्तपणे आस्वाद     घेण्यात दंग होती. त्यांचा जोर पाहून मी सुद्धा कोकचे दोन तीन कॅन रिचवून टाकलेच. खरपूस भाजल्या जाणार्या चिकनचा खमंग वास बंगल्यात आणि बंगल्यामागील बागेत दरवळत होता. क्षणाक्षणाला माझा शनिवारी मांसाहार न करण्याचा निर्धार कमकुवत बनत चालला होता. काही वेळाने श्रीकांतला भात बनवावं लागेल ह्याचं स्मरण झालं. त्याने तत्काळ मला पाचारण केलं. नशिबाने भात चांगला जमला. जेरेमीने पापडंम भाजून काढले.
एका इंग्लिश माणसाच्या घरात एका जूनच्या प्रसन्न शनिवारी कोलंबी, खरपूस भाजलेलं चिकन, बटाटा ओली भाजी, पापड, स्वतः बनविलेला भात आणि बियरने धुंद झालेल्या इंग्लिश माणसाच्या गप्पा ऐकताना कसे मस्त वाटत होते. डोमिनिकची तीन चार वर्षांची मुलगी खरपूस भाजलेल्या चिकनचा आस्वाद घेताना पाहून डोमिनिकची पत्नी बेवर्ली अगदी खुश होत होती. जेवणं - गप्पा अगदी तीन वाजेपर्यंत रंगल्या. मग डॉमिनिकच्या थोड्या धास्तावलेल्या चेहर्याकडे पाहत आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे किचनच्या साफसफाईला लागलो. एव्हाना श्रीकांतला बहुदा प्रफुल्ल आणि शिवा आठवले असावेत. त्याने उरलेले पिसेस परत नेण्याचा मानस व्यक्त करताच बेवर्लीने वेगळा विचार व्यक्त केला. मुलीला हे पिसेस खूप आवडल्याने मी हे ठेवले तर चालेल का अशी विनंतीवजा सूचना केली. प्रफुल्ल आणि शिवा ह्यांना कसे तोंड द्यावे ह्याचा भययुक्त विचार करीत श्रीकांतने काहीशा नाईलाजाने ह्या प्रस्तावाला मान्यता दिली.
दिवस अगदी मस्त चालले होते. सध्या अमेक्स टीमचा विषय सुरु असल्याने एक पुढील महिन्यातील गोष्ट सांगतो!
ली आणि टीम आम्हांला अगदी त्यांच्यातले समजून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घेत. असाच एक "टीम बिल्डींग" अर्थात संघभावना विकसित करण्याचा कार्यक्रम गुडवूड येथील अश्वशर्यतीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तिथल्या प्रवेशाचे तिकीट २१ पौंड होते. आम्हांला सुद्धा लीने बोलावलं. सकाळी दहाच्या सुमारास बस ऑफिसच्या प्रवेशद्वाराशी आली. तिथून मग त्या बसमधून स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गुडवूड कडे निघालो. बसमध्ये विविध प्रकारचे गेम खेळले जात होते. त्यात मी सुद्धा चांगली कामगिरी बजावत होतो. ब्लॅक कैप म्हणजे न्यूझीलंडचा संघ असे उत्तर दिल्याचं मला आठवत.
सकाळी मी टीव्हीवरील बातम्यात मुख्य शर्यतीचा अंदाज वाचला होता आणि त्यात एका घोड्याला 'डार्क हॉर्स' म्हणून संबोधिण्यात आले होते. मी ऑफिसात आल्यावर मोठ्या उत्साहात हा अंदाज सर्वांना सांगितला. पण सर्वांनी मला वेड्यात काढलं होतं.
गुडवूडचे वातावरण उत्साहाने भारलेलं होतं. सूर्य निळ्या आकाशात चमकत होता आणि हिरव्यागार गुडवूडच्या परिसरात आम्ही हिंडत होतो. मुख्य शामियान्यात सुंदर इंग्लिश ललना पारंपारिक हॅट्स घालून स्थानापन्न झाल्या होत्या. माझ्यासाठी हे नवीनच विश्व होते, अशा सुंदर अनुभवासाठी मी सिंटेल आणि अमेक्स ह्या दोघांचे मनातल्या मनात आभार मानत होतो. मी उल्लेखलेली शर्यत सुरु होण्याची वेळ आली. माझ्या ज्ञानाचा पुन्हा एकदा उल्लेख करून इंग्लिश मित्रांनी दुसर्या घोड्यांवर पैसे लावले. श्रीकांतने मात्र मैत्रीला जागून मी सांगितलेल्या घोड्यावर पैसे लावले. आणि अहो आश्चर्यम! तो घोडा जिंकला. श्रीकांतने लावलेल्या ५ पौंडाचे त्याला ५६ पौंड मिळाले. इंग्लिश मित्रांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. पुढे अतिउत्साहात येउन श्रीकांतने हे ५६ पौंड गमावले ही गोष्ट वेगळी! मी सुद्धा गमाविलेल्या संधीमुळे पेटून उठून पुढील तीन शर्यतीवर ५, ५ आणि १० पौंड लावले. तिन्ही वेळा हरल्यावर नशिबाने डोके ताळ्यावर आले आणि मी पुढील बेटिंग थांबविले.मन विचलित करण्यासाठी मी नजर शामियानाकडे वळविली!
ह्या शामियान्याचा इंटरनेटवरून घेतलेला एक फोटो!


संध्याकाळी आम्ही अरुंडेल नदीच्या काठावर एका स्थानिक भोजनगृहात उतरलो. तिथे बार्बक्यूचा खमंग वास येत होता. पण श्रावणी गुरुवार असल्याने मी मात्र बटाटा, कांदा, ब्रोकोली वगैरे प्रकारांवर भूक भागविली. माझी प्लेट पाहून गाय म्हणाला सुद्धा, "आपल्या सर्वांपेक्षा आदित्याची प्लेट चांगली दिसतेय!" समोर अरुंडेल किल्ला दिसत होता. सायंकाळचे आठ वाजले तरी आकाशात रेंगाळनार्या सूर्यांची सोनेरी किरणे त्याला न्हाऊ घालीत होती. सर्व काही मस्त चालले असताना घरची आठवण मात्र मनाच्या एका कोपर्यात येत होती.

(क्रमशः)

ह्या आधीचे तीन भाग मागच्या डिसेंबर महिन्यात लिहिले होते. त्याच्या लिंक्स अशा

http://nes1988.blogspot.in/2013/12/blog-post_25.htmlMonday, July 14, 2014

दडलेले प्राणी पक्षी !


शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नकात! बिबळ्या वगैरे मनुष्यवस्तीत येवून धुमाकूळ घालत असताना ह्याला दडलेले प्राणी - पक्षी  कोठे / कसे आठवले असा विचार करू नका. लहानपणी मराठी माध्यमाच्या स्कॉलरशिप परीक्षेत   विचारल्या जाणाऱ्या वाक्यात लपलेले प्राणी ओळखा ह्या गमतीदार प्रश्नांची आठवण झाली म्हणून ही पोस्ट! ह्या कोणत्या कॉपीराईटचा भंग होत नसावा ही आशा! मी कोणते पुस्तक समोर ठेवून हे लिहित नाहीये. जितके आठवतात तितके लिहितोय. उत्तरे सोपी असल्याने ती वेगळी देत नाही. काही प्रश्नात शुद्धलेखनाचा बोर्या वाजवावा लागत आहे, त्याबद्दल क्षमस्व!
१) सुधाकर कोचावर बस!
२) "पुरे झाले आता खेळणं, नीता, सुधा, अलका! वळा आता घराकडे!"  मावशी ओरडली.
३) "नाथ, हाचि मणी मनी भावला मला!"
४) वर्ल्ड कप अंतिम सामना पाहता पाहता झाली सकाळ! वीट आला आता मला!
५) आज पडलं आहे ऊन! दीर आला तरी तिचा!
६) "अरे वा! घरी वगैरे परतायचा विचार आहे की नाही तुमचा!" ऑफिसात उशिरा थांबलेल्या राकेशला बायको फोनवर म्हणाली.
७) तूच माझा सखा! रडले मी तरी तूच मला हसवायचं!
८) "बघा रविवारी मला यायला जमायचं नाही", नवी कामवाली बाई स्पष्टपणे म्हणाली!
९) "और हसी लगता ये समां! जर तु माझ्यासोबत असतीस!"
१०) नवीन पोप टर्की ह्या देशाला भेट देण्यासाठी निघाले.
११) "बघू सकाळी जमलं तर फेरी मारीन!" अजय म्हणाला.
१२) "नको नको! ल्हासा ह्या शहराला भेट द्यायची मला अजिबात इच्छा नाही!" राहुल म्हणाला.
१३) "शुद्धलेखनात अगदी आनंदी आनंद आहे तुझा हरी! "ण" ला तू सतत "न" लिहितोस!" राऊतबाई म्हणाल्या.
१४) "थांब, गळा काढून रडू नकोस" छोट्या संध्याला आई म्हणाली.
१५) "अरे शहा! मृग नक्षत्र आले तरी पावसाचा काही पत्ता नाही!" चिंतातूर हेमंत म्हणाला.

तुम्हांला काही अजून वाक्यं आठवलीत तर सुचवा!

Friday, July 11, 2014

बायकोचे बोल!


पत्नी आणि बायको हे म्हटले तर समानार्थी  शब्द असले तरी ह्या दोघांचा वापर कधी करायचा ह्याविषयी काही पायंडे पडून गेले आहेत असे आपल्याला जाणवतं. बायको ह्या शब्दाशी "त्रागा", "कटकट", "घरातील संपलेलं किराणा सामान", "घरातला रगडा", "शॉपिंगला जायची इच्छा व्यक्त करणारी" असे शब्दप्रयोग निगडीत आहेत. तर पत्नी  ह्या शब्दाशी "मर्मबंधातील ठेव", "नाजूक भावबंध", "जीवनप्रवासातील साथी", "पडत्या काळात आपली साथ देणारी" वगैरे शब्दप्रयोग वापरले जाण्याची प्रथा असावी. मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात पत्नी हा शब्द वापरला जाण्याचे भाग्य क्वचितच असते. माझ्या मर्यादित मराठी वाचनात "शिवाजी- सईबाई" , "माधवराव - रमाबाई" ह्या जोडप्यांत पत्नी ह्या शब्दाचा योग्य वापर आढळतो.
तर बायको ही व्यक्ती आपलं मनोगत सतत नवर्यापुढे व्यक्त करत असते. त्याला कटकट असे म्हणण्याची नवरेवर्गात प्रथा आहे. ह्या मनोगताला कसे सांभाळायचे ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी तंत्रे असतात. आता एक गोष्ट  स्पष्ट करू इच्छितो कि वरील सर्व विधाने ही एकंदरीत मराठी मध्यमवर्गीयांना उद्देश्यून केली गेली आहेत आणि ह्यात माझ्या किंवा माझ्या ओळखीतल्या कोणाचा अनुभव वापरला गेला नाहीये!
आता माझ्या घरची गोष्ट! पत्नी प्राजक्ता म्हणाली, "तुझा बाह्य जगतातील जनसंपर्क कमी होत चालला आहे! तुझी पांढरपेशाच्या मार्गावर वाटचाल सुरु आहे". Point Taken. मला मुद्दा पटल्याने मी सहसा जो प्रतिकार करण्याचा लुटूपुटीचा प्रयत्न करतो तो ही केला नाही. नेहमीप्रमाणे मी मग अंतर्मुख झालो.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार सुरूच असतात. आयुष्य म्हणा किंवा एखादा खेळाचा सामना असो - तुम्हांला अनुकूल क्षण येतात. काही जण हे अनुकूल क्षण ओळखतात, त्या क्षणापासून प्रगतीच्या शिखरावर जाण्याचा त्यांच्या समजुतीप्रमाणे जो मार्ग असतो त्याला धरून ठेवतात. आणि त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. प्रगतीपथाची असलेली त्यांची ही समजूत कधी अचूक असते तर कधी नाही!
ह्यात अजून एक खास गोष्ट! ही सहसा उघडपणे कोणी बोलून दाखवत नाहीत. व्यावसायिक जगात यशस्वी झालेल्यापैकी बहुतेकांच्या बाबतीत "योग्य जागी योग्य वेळी असणे" हे यशस्वी होण्याच्या मागचे मुख्य कारण असते. आपल्याइतक्याच किंबहुना त्याहून जास्त क्षमतेचे अनेक लोक बाहेरील जगात आहेत, हे सर्वांना माहित असते. त्यामुळे एकदा का ही योग्य स्थिती मिळाली की मेहनतीच्या जोरावर ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्यात मग तुमच्या जीवनातील शिस्त, वेळ योग्य प्रकारे व्यतीत करण्याची तुमची क्षमता हे सर्व महत्वाचे घटक येतात. शिस्त येते ती वागण्यातील आणि आहारातील! वेळ योग्य प्रकारे व्यतीत करण्याची क्षमता ह्यात कार्यालयाच्या जवळ घर घेणे किंवा घराच्या जवळ कार्यालय शोधणे हा प्रकार, साप्ताहिक सुट्टीत मनाला पूर्णपणे उल्हसित करण्याची तंत्रे वगैरे प्रकार येतात. जुनी लोक म्हणतात की आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. सगळ्या ह्या शब्दात प्रामुख्याने  "लग्न" "मुलेबाळे" हे अभिप्रेत असतं. करियर करायचं ते ५८ वर्षांपर्यंत! त्यात ३५ च्या  नंतर बायको, (नव्हे पत्नी!) मुले ह्यांची साथ नक्कीच महत्वाची आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळीच व्हायला हव्यात. माझी गणना जुन्या लोकात झाल्याची ही लक्षणे!!
असो मी पांढरपेशा का? तर एक साप्ताहिक सुट्टीत भाजीमार्केट मधील माझी फेरी वगळता मी बाकी कधीच घर आणि कार्यालयापलीकडील लोकांशी संपर्क साधत नाही. कार्यालयात बराच वेळ अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे विचार घोळत राहतात. घरी इंग्लिश माध्यमात शिकणाऱ्या मुलाचा अभ्यास आणि ब्राझीलातील  वर्ल्ड कप! ह्या सर्व प्रकारात माझा मेंदू ऑफिसातील कामापासून, तिथल्या वातावरणापासून फारसा लांब जाणार नाही ह्याचीच मी अप्रत्यक्षरित्या काळजी घेत असतो. म्हणजेच मी सुदैवाने मिळालेल्या आणि माझ्या समजुतीप्रमाणे चांगल्या असलेल्या परिस्थितीला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
बाकी हे ब्लॉग लिहिणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण!
बायको कधी कधी खास बोलते हे मात्र खर आहे!

Sunday, July 6, 2014

कहानी घर घर की!


यशस्वी कंपन्या आपली ध्येये अचूक ओळखतात, त्यांना शब्दात मूर्त स्वरूप देतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. कंपन्याना जशी ध्येये असतात तशी प्रत्येक घराला असतात का? असली तरी त्यावर कुटुंबातील मंडळी चर्चा करून त्यानुसार कृती करतात का?
माझ्या लहानपणी गोष्टी बऱ्यापैकी साध्यासरळ होत्या. शिक्षणाचे महत्त्व नुकताच जाणलेला मध्यमवर्ग "मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यात चांगली नोकरी मिळवावी" हे एक महत्त्वाचे ध्येय घेऊन जगला. पालकांच्या नोकरीतील प्रगतीचा आलेख बऱ्याच वेळा क्षितीजसमांतर पातळीत धावत असल्याने त्यांच्या करियरने त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्याच्या क्षमतेवर बहुदा परिणाम केला नाही. आणि हो मुलांची स्वतंत्रपणे मते मानण्याची क्षमता काही कारणाने फारशी विकसित झाली नाही किंवा ती विकसित व्हावी अशी पालकांची फारशी इच्छासुद्धा बहुदा नसावी.
वरील वर्णन पूर्वीच्या सर्व घरांना लागू होईलच असे नाही. काही घरात "माझ्या लहानपणी माझ्याकडे कोणी लक्ष नाही दिलं, मग मी सुद्धा ह्याच्याकडे का देऊ? शिकायचा असेल तितका शिकेल आणि बघून घेईल काय ते " असाही विचार काहींनी केला. म्हणजेच "काही विशिष्ट धोरण आखायचं नाही" हेच धोरण ठरविलं गेलं.
पुढे काळ बदलला. केवळ शिक्षण हे ध्येय समोर ठेवून लहानपण व्यतीत केलेली पिढी नोकरीमध्ये शिरली. नोकरीतील प्रगतीचा आलेख क्षितीजसमांतर पातळीत न राहता तो आकाशाकडे झेपावू लागला. मग एका क्षणी ह्यापुढील प्रगतीसाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही ह्याची जाणीव ह्या पिढीला झाली. व्यक्तिमत्व विकास, भोवतालच्या आर्थिक परिस्थितीचे योग्य ज्ञान ह्या घटकांची त्यात भर पडली. केवळ पुस्तकी अभ्यास ह्या एका घटकाभोवती गुंफले गेलेले कुटुंबाच्या ध्येयाचे समीकरण आता अनेक घटकांच्या समावेशाने अगदी क्लिष्ट बनून गेले. त्यात पालकांच्या सतत व्यग्र बनणाऱ्या करीयरच्या घटकाची भर पडली. आणि मग पुढ्यात ठाकला तो हे समीकरण सोडविण्याचा आटापिटा!
क्लिष्टता दोन प्रकारची! पहिली म्हणजे अनेक घटकांचा कुटुंबाच्या ध्येयात समावेश आणि दुसरं म्हणजे ह्या घटकांच्या महत्त्वाचं सतत बदलणारं प्रमाण! आज मुलांचा अभ्यास महत्त्वाचा तर उद्या पालकांचं करीयर महत्त्वाचं तर परवा नात्यातला कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने येणारी तयारी महत्त्वाची! जरा खोलवर पाहिलं आजची कुटुंब दोन प्रकारची
१) आयुष्य जसं घडेल तसं घडून देणारी कुटुंब!
२) पण काही कुटुंब मात्र वर उल्लेखल्याप्रमाणे तात्कालिक महत्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करतात. जसे की मुलांच्या परीक्षा आल्या की सर्व समारंभ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केलेलं हॉटेलिंग सार काही बंद! नेहमी साग्रसंगीत जेवण बनविलं जात असेल तर परीक्षेच्या कालावधीत थोडक्यात जेवण आटपून आई अभ्यासाला जास्त वेळ देणार! बाबांच्या ऑफिसात काही महत्त्वाची कामं असली की त्यांना घरच्या जबाबदारीतून सूट वगैरे वगैरे! ह्यातून एक कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत ही भावना विकसित होण्यास मदत होते. ह्यात काही घटक असे असतात ते पूर्णपणे नियंत्रणाच्या पलीकडचे असतात! मुलगा मोठा होईल त्यावेळी कोणते व्यावसायिक क्षेत्र जोरात असेल, त्यात आपल्या मुलांना चमक दाखविता येईल का आणि त्यांनी निवडलेली क्षेत्र आयुष्यभर जोरात राहतील का? आपल्या मुलांना योग्य असे साथीदार मिळतील का? त्याचं आयुष्य कसं जाईल? ह्या घटकांच्या बाबतीत तयारी करून सुद्धा काही फरक पडत नाही. जे काही घडायचं असेल तसंच होईल. आणि केवळ ह्या घटकामुळे कधी कधी पहिल्या प्रकारची कुटुंबाची विचारसरणी योग्य वाटते.


लेखाचा उद्देश्य एकच! आपल्या कुटुंबाच्या मुख्य ध्येयाची जाणीव असू द्यात आणि आपली विचारसरणी कोणत्या प्रकाराकडे झुकते आहे  हे ही माहित करून घ्या 

Friday, July 4, 2014

निरंजना - घार उडे गगनी पण लक्ष तिचे घरट्याशी!!


निरंजनचा लेख काहीजणांना भावला, त्यांनी तसे प्रतिक्रियेतून कळवलं सुद्धा! पण एक प्रतिक्रिया मात्र काहीशी अंतर्मुख करणारी होती. "निरंजनचे ठीक आहे, पण निरंजनाचं काय?"


खरतर निरंजनच्या लेखातील बराचसा भाग हा व्यावसायिक क्षेत्रात असणाऱ्या पुरुष आणि स्त्री ह्या दोघांना लागू असणारा होता, लेख लिहिताना निरंजनचा मी पुरुष म्हणून काही वेगळा विचार केला नव्हता. म्हणायला गेलं तर पुरुषांना थोड्याच स्वतःच्या वेगळ्या समस्या असणार! असे हे वाक्य पुरुषअधिकारवादी संघटनांना (अशा काही संघटना अस्तित्वात असल्यास!!) खटकू शकते. असो दुर्लक्षित पुरुषांच्या दुर्लक्षित अधिकारांकडे डोळेझाक करून पुढे सरकुयात!
हा विचार डोक्यात घोळत असतानाच काल फेसबुकच्या COO शेरील सैंडबर्ग आणि पेप्सीच्या CEO नुयी ह्या दोघींच्या मुलाखती वाचनात आल्या. त्यामुळे हा लेख लिहिलाच पाहिजे ह्या विचाराने उचल खाल्ली! आता CEO आणि COO ह्या दोन्ही शब्दांना मुख्य कार्यकारी अधिकारी हाच शब्द सध्या सुचत असल्याने मी अर्थ कायम ठेवण्यासाठी मूळ इंग्लिश शब्द कायम ठेवणे पसंत केले आहे हे मी नमूद करू इच्छितो. तर व्यावसायिक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवतोड मेहनत करणाऱ्या स्त्रियांच्या स्वतःच्या अशा काही समस्यांचा माझ्या परीने अभ्यास करणारा हा लेख. पूर्वी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावणे हा शब्दप्रयोग मला झेपत नसे. पुरुषांची सरासरी उंची कुठे आणि महिलांची सरासरी उंची कुठे असे विचार मनात डोकावत! पण हल्लीच्या नवीन पिढीतील मुलींची उंची पाहिल्यावर मी हा शब्दप्रयोग बिनबोभाट स्वीकारतो.


आता निरंजना हे अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या भाचीचं नाव, त्यामुळे ह्या पोस्टला हे शीर्षक द्यायला तसा मी धजावत नव्हतो. परंतु माझे ब्लॉग नित्यनेमाने वाचणारी तिची आई निऊ अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिवसानिमित्तच्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीचा आनंद घेत असल्याची शक्यता असल्याने ती आणि निरंजना हे शीर्षक फारसे मनावर घेणार नाहीत असा सोयीस्कर समज मी करून घेतोय!


तर सुरुवात नुयीपासून! "स्त्रियांना ह्या युगात सुद्धा आयुष्यात सर्व काही का मिळू शकत नाही?" अशा काहीशा विवादास्पद शीर्षकाच्या प्रबंधावर नुयींची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांनी ह्या शीर्षकाशी सहमती व्यक्त करताना म्हटलं "हे खरे आहे की आम्हां स्त्रियांना आयुष्यात सर्व काही मिळू शकत नाही! आम्ही फक्त सर्व काही मिळाल्याचं भासवून द्यायचा प्रयत्न करतो!" ३४ वर्षे संसारात असणाऱ्या आणि दोन मुलींच्या आई असणाऱ्या नुयी पुढे मुलींच्या बालपणातील काळातील दररोज सकाळी पडणाऱ्या प्रश्नाविषयी बोलतात "आज मी कोणती भूमिका निभावणार - आई/पत्नी की एक अधिकारी" शाळेतील इतर मुलींच्या आयांबरोबर असणाऱ्या साप्ताहिक कार्यक्रमाला हजर न राहता आल्याने मुलींच्या येणाऱ्या तक्रारीमुळे त्या अपराधीभावनेने ग्रासून जात. पुढे त्यावर त्यावर उपाय शोधला. हा कार्यक्रम अटेंड करू न शकणाऱ्या सर्व आयांची त्यांनी यादी शाळेकडून मागविली. पुढच्या वेळी जेव्हा मुलींनी तक्रार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी मुलींना ही यादी वाचून दाखविली आणि सांगितलं की मी एकटीच काही वाईट आई नाहीये!
त्या पुढे म्हणतात - "ही तंत्र वगैरे सर्व काही जरी खरी असली तरी एक तणावाने भरलेली कारकीर्द आणि मुलांना वाढविणे हे खरोखर अवघड आहे असे त्या म्हणतात. ज्या काळात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात स्थिरावत असतात त्यावेळी असतो त्याच वेळी  तुमच्या जैविक घड्याळानुसार मुलांना जन्म देण्याची योग्य वेळ असते आणि ज्या तुमच्या व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख अधिक जबाबदारीच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेपाशी पोहोचलेला असतो त्यावेळी वयाच्या १३ - १८ वर्षाच्या गटात पोहोचलेल्या मुलांना तुम्ही हवे असता!" ह्या सर्व प्रवासात तुम्हांला अनेक जणांची मदत लागते. ह्या मदतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांकडे धाव घेतो. आपले वेळापत्रक इतकं अचूक बनवतो की आपण एक आदर्श पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकू! पण हे केवळ आपल्या नजरेतून किंवा फारतर दुनियेच्या नजरेतून! ज्यांच्यासाठी आपण ही सारी धडपड केली त्या मुलींना आजही आपण प्रश्न केलात तर मी एक आदर्श माता होते असे त्या म्हणतील ह्याची मला शाश्वती नाही!
नुयीची एक लक्षात राहण्यासारखी आठवण! कामामुळे दररोज घरी परतायला रात्रीचे बारा वाजत! ज्या दिवशी त्यांना आपण पेप्सी कंपनीचे प्रेसिडंट बनणार हे कळले तेव्हा घरच्यांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी म्हणून त्या लवकर (म्हणजे रात्री १० वाजता) घरी परतल्या. गाडी पार्क करून घरात प्रवेश करतात तो आई जीन्याशीच उभी होती.
 "आई, माझ्याकडे एक खास बातमी आहे!"
 "बातमी थांबू देत पण घरात दुध नाहीये, पटकन जाऊन ते घेऊन ये!" आई म्हणाली.
गॅरेजमध्ये दिसणाऱ्या नवऱ्याच्या गाडीकडे निर्देश करीत नुयी उद्गारल्या, "हे किती वाजता घरी आले?"
"आठ वाजता!" आई म्हणाली.
"मग त्यांना का नाही सांगितलं?"
"प्रश्न विचारू नकोस, पटकन जाऊन दुध घेऊन ये, सकाळसाठी लागेल"
फणफणत (असे त्यांनी म्हटलं नाही, पण असे नाट्यमय शब्द वापरले म्हणजे मराठी भाषेला बरं वाटेल!) जाऊन नुयी दुध घेऊन आल्या. आणलेली पिशवी काउंटर वर आदळून त्या आईला म्हणाल्या - "कशी आई आहेस तू? आज माझी बोर्ड ऑफ डायरेक्टरवर प्रेसिडंट म्हणून नेमणूक झाली आणि तुला फक्त मी दुधाची पिशवी आणावी हीच अपेक्षा आहे!
"मला तुला काही स्पष्ट करू देत! तू भले पेप्सीची प्रेसिडंट असो वा तुझी भले बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नेमणूक झाली  म्हणून नेमणूक झाली असो, तू एकदा का ह्या घरात आलीस की तू एक सून आहेस, पत्नी आहेस आणि माता आहेस! ह्या सर्व भूमिका तुझ्याशिवाय कोणीच निभावू शकत नाही. तुझे सर्व मुकुट त्या गॅरेजमध्ये काढून ठेवत जा आणि मगच घरात प्रवेश कर! "
ह्या सर्व प्रकारानंतर सुद्धा आपल्या आईच्या हृदयात मात्र आपल्याविषयी दाट अभिमान वसत असणार ह्याची नुयी ह्यांना पुरेपूर खात्री आहे.
आता शेरीलताईंकडे वळूयात!
पहिला प्रश्न - व्यावसायिक जगात स्वतःला अतिमहत्त्वाकांक्षी म्हणविले जाण्याचा आणि त्यामुळे आपला स्त्री वर्गाची ओळख असलेला नाजूकपणा गमावून बसण्याचा धोका स्त्रियांनी कसा टाळावा?
शेरील - आपल्याला समाजाचा दृष्टीकोन बदलावा लागेल. "बॉस्सी" ही मनोवृत्ति दर्शविणारा शब्द बऱ्याच वेळा स्त्रियांच्या संदर्भात वापरला जातो हे चुकीच आहे.


पुढे त्या म्हणतात की Mentor ची (अर्थात समुपदेशकाची) गरज स्त्रियांना जास्त आहे असाच सर्वत्र जो समज पसरला आहे तो दूर केला पाहिजे. संघटनेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळायला हवी. ह्या साठी CEO
ते अगदी खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांनी स्त्रियांना अधिक संधी देण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. कंपनीतील वातावरणात स्त्री पुरुष असा फरक जाणवता कामा नये! बाकी पुढे त्या बरेच काही म्हणाल्या पण ह्या लेखाच्या अनुषंगाने जुळेल असे फार काही त्यात सापडलं नाही.


आता पुरुष नोकरी करतात ते घरसंसार चालविण्यासाठी. काही स्त्रियासुद्धा नोकरी करतात त्या घरसंसाराला हातभार लावण्यासाठी किंवा पूर्ण भार उचलण्यासाठी! आणि बाकीच्या स्त्रिया नोकरी करतात ते आपल्या बुद्धीचा आणि शिक्षणाचा योग्य वापर व्हावा ह्यासाठी. हल्ली सर्वच पत्नी पत्नी सुशिक्षित असतात. अशा वेळी जर कोण्या एकाच्या पगारात संसार चालत असेल तर तो कोणी एक म्हणजे स्त्री असणे हा प्रकार फारच कमी वेळा आढळून येतो.


मुंबईसारख्या शहरात घर ते नोकरी हा प्रवाससुद्धा स्त्रियांना वाईट अनुभव देणारा असू शकतो. कार्यालयात मर्यादाभंगाच्या सीमारेषेवर जाणारे काही शेरे, काही अनुभव येवू शकतात. हे सर्व प्रकार आपल्या मनाची एकाग्रता मूळ कामापासून दूर करू शकतात. निरंजनला ह्या चिंता नसतात!


मुलांची चिंता, त्यांचं सर्व काही ठीक चाललं असेल की नाही हा विचार जितक्या प्रमाणात स्त्रियांच्या मनात डोकावतो त्या प्रमाणात  सर्वसाधारण पुरुषांच्या मनात डोकावत नसणार. हा निसर्गसुलभ प्रकार आहे. करीयर मध्ये पुढं जाणाऱ्या स्त्रिया कार्यालयातील कालावधीत आपला भावनेचा स्विच ऑफ करून ठेवण्यात यश मिळवत असणार. कार्यालयातील भूमिका पार पडून घरी परतल्यावर नुयींनी म्हटल्याप्रमाणे सर्व मुकुट बाजूला ठेवून घरातील भूमिका बजाविण्यासाठी सज्ज व्हायचं! रात्री झोपण्याआधी निरंजन ज्याप्रमाणे फुरसतीचे गाणं ऐकतो तसे ह्यांना ऐकायला मिळेलच ह्याची शाश्वती नाही!  अजूनही एखादं कर्तव्य पार पाडायचं बाकी असू शकत!


संघर्ष क्लिष्ट आहे! माता म्हणून आपली भूमिका काही काळापर्यंत परिपूर्ण बजावण्यासाठी आपल्या करीयरचा त्याग करायचा की काळजावर दगड ठेवत मुलांच्या बालपणाच्या कालावधीत तडजोडी करीत जीवन जगायचं! मुलं मोठी झाली की नाहीतरी स्वतंत्र होतातच की! जर लहानपणी त्यांच्यावर संस्कार घडवायला आपणास वेळ मिळाला असता तर ती अजून चांगली माणसं बनली असती असा विचार मनात येणे ही सुद्धा एक शक्यता आहेच. आणि हो जरी करियरचा त्याग करून होणाऱ्या मनाच्या घालमेलीकडे दुर्लक्ष करून मुलांचे बालपण अगदी आदर्श केले आणि तरीसुद्धा मोठे झाल्यावर त्यांना त्याची कदर नसेल किंवा त्यांनी संस्काराला विसंगत असे वागणं दाखवलं तर फिर्याद करायची कोणाकडे!


शेवटी म्हणतात तेच खरं - आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करायचे आणि परिणामाची चिंता त्या सर्वशक्तीशाली ईश्वरावर सोडून द्यायची!