Thursday, May 30, 2013

आभास - अंतिम भाग!चेनच्या अकस्मात गायब होण्याने आलोक काहीसा उदास झाला होता. पूर्ण सकाळ  त्याने चेनचा शोध घेण्यात घालविली. डायनाला त्याच्या ह्या चेनबद्दलच्या आपुलकीचे गूढ काही समजत नव्हते. दुपारी प्रथमच डायनाने भारतीय पद्धतीचे भोजन बनविले होते. छोले भटुरे आणि वेज बिर्याणी असा बेत होता. ह्या जेवणाने मात्र किमया साधली. आलोकचा मूड बराच सुधारला. जेवणानंतर दोघेही नौकाविहारासाठी बाजूच्या सरोवरात गेले. आजूबाजूच्या गर्द झाडीने वातावरणात आल्हाददायक गारवा आणला होता. बराच प्रयत्न करूनसुद्धा सूर्यकिरणे सरोवरापर्यंत पोहचू शकत नव्हती. पांढऱ्या शुभ्र बदकांची रांग निळ्याशार पाण्यात पोहत होती. ह्या परिस्थितीसाठी योग्य गाणे कोणते हे शोधण्याचा आलोकचा प्रयत्न डायनाने ओळखला. अचानक तिच्या तोंडून आलेले 'ये हसीं वादिया, ये खुला आसमान, आ गये तुम कहा ये मेरे साजना' हे गाणे ऐकून आलोक थक्क झाला. त्याने तिच्याकडे पाहून एक स्मित हास्य केले. आता मात्र डायनाच्याने राहवेना, ती आलोकच्या जवळ सरकली आणि तिने त्याचा हात हाती घेतला. सर्व बंधने गळून पडण्याची ही सुरुवात होती. पुढे दोन तीन महिने मोठ्या आनंदात त्या दोघांनी घालविले.
.
.
.
.
.
.
माधुरीच्या हाकेने आलोक खडबडून जागा झाला. त्याला क्षणभर काही कळेनासे झाले. तो आपल्या मुंबईच्या घरी होता. सकाळची धावपळ घरात सुरु होती. 'आज दांडी मारायचा विचार दिसतोय' अखिल मराठी समाजातील बायका जितक्या प्रेमाने आपल्या पतीदेवांशी बोलू शकतील तितक्या प्रेमाने माधुरी आलोकशी बोलत होती. आलोकने थोड्या बेताने घ्यायचे ठरविले. 'हो आज डोकं, सणकून दुखतंय जरा!' तो म्हणाला. भिंतीला कान लावून आलोकच्या बोलण्याकडे लक्ष देणाऱ्या सुनंदाबाई ताडकन आत शिरल्या. 'थांब, बामने तुझं डोकं चांगले चोळून देते' एकंदर परिस्थितीचा कब्जा घेत त्या म्हणाल्या. आपल्या नवऱ्याचे हे बालपण संपणार तरी केव्हा असा विचार  करीत माधुरीने आपली सकाळची आवाराआवर चालू ठेवली. 'सुट्टी घेणारच असशील तर मिहिरकडे जरा लक्ष ठेव! उनाडक्या करतोय नुसता! ह्या वाक्यातील तुझ्यासारखा हा शेवटचा शब्द माधुरीने मोठ्या प्रयासाने आवरला.
माधुरी ऑफिसला गेल्यावर आलोकने मिहिरला त्याच्या मित्रांच्या ताब्यात सोडले. एव्हाना सकाळचे ११ वाजून गेले होते. आलोकने वतर्मानपत्रावर नजर टाकली. चीनच्या सरहद्दीवरील एका ठाण्यावर रोबोंनी धुमाकूळ घातल्याची बातमी होती. त्यातील मुख्य रोबो रात्री काही काळ गायब झाला होता आणि मग परत आल्यावर त्याने उलटेसुलटे आदेश देण्यास सुरवात केली होती. एकदम हादरून आलोकने संगणक सुरु केला. जीमेलवर त्याने डायनाच्या नावाने धुंडाळले. बाईसाहेब ऑनलाईन होत्याच. आलोक तिला पिंग करणार इतक्यात समोरून तिनेच पिंग केले. 'हलो आलोक'. 'हाय डायना' आलोक उत्तरला. 'आठवते का सारे तुला?' डायनाने विचारले. 'हो, काहीच समजत नाहीये, घडले सारे ते खरे कि खोटे' आलोक उत्तरला. डायना काहीच उत्तरत नाहीय हे पाहून तो पुढे म्हणाला 'हे असे काही घडले ह्यावर आपण दोघे सोडून कोणीच विश्वास ठेवणार नाही, काहीच पुरावा नाही आपल्याजवळ'. शेवटी डायना उत्तरली 'पुरावा आहे आलोक, मी प्रेग्नंट आहे!'
तिच्या ह्या उत्तराने निरंजन आणि आलोक ह्यातील कोण जास्त थरथरले हे कोणीच सांगू शकत नव्हते!
...................................................

समाप्त!

आभास - भाग १५मे महिन्यातील लांबलेल्या संध्याकाळी घराबाहेरील बागेत खुर्च्या टाकून आलोक आणि डायना बसले होते. आणि बाजूला होता चेन! चेनचे अस्तित्व डायनाला राहून राहून खटकत होते. स्थिर होण्यासाठी ब्रायटन / होवलाच डायनाची पसंती होती. परंतु इतक्या ऐतिहासिक दीर्घ प्रवासानंतर त्या ठिकाणावरून हलण्याची आलोकची अजिबात तयारी नव्हती. स्कॉटलंडचा झोंबरा हिवाळा अजूनही चार - पाच महिने दूर होता. थोड्या चर्चेनंतर पुढील एक महिना स्कॉटलंडमध्येच घालविण्याचे त्यांनी ठरविले.
आलोकच्या गाडीतील मेणबत्त्या त्यांना आता कामी आल्या होत्या. आजच्या जेवणाचा मेनू डायनानेच ठरविला होता. आजूबाजूच्या मळ्यातील गोळा केलेल्या भाज्यांचा उकडलेला सूप, उकडलेले बटाटे असा सर्व मेनू होता. सुपरमार्केट मध्ये विजेच्या अभावाने शीतगृहातील पदार्थ खाण्याच्या पलीकडे गेले होते. असल्या मेनूवर आलोक नाराज झाला होता. त्याने आपल्या गाडीतून नुडल्सचे पाकीट काढले आणि ते गरम पाण्यात उकळविण्यास टाकले. त्याच्या ह्या कृतीवर डायना काहीशी नाराज झाली. ती काहीच बोलत नाही हे पाहून आलोकला आपली चूक ध्यानात आली. त्याने आपला मोर्चा मग उकडलेल्या सूपाकडे वळविला. 'वाह, काय सूप आहे' खरोखरीची दाद देण्याचा त्याचा प्रयत्न डायनाला जसा भावला तसेच त्याला सूप काही आवडला नाही हे मात्र तिच्या लक्षात आले.
चेनचे प्रकरण एकंदरीत दोघांच्या आवाक्यापलीकडे होते. ह्या दोघांच्या प्रत्येक संभाषणात चेनला सहभाग घ्यायचा असायचा. सहभाग ऐकण्यापुरता आणि अधूनमधून अभिप्राय देण्यासाठी! डायनाला चेनचे अस्तित्व आता अजिबात झेपेनासे झाले होते. परंतु आलोकला हे घर सद्यपरिस्थितीत राहण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या चेनच्या मदतीची जाणीव होती आणि ज्या माणसाने नव्हे रोबोने आपल्याला अशक्यप्राय असलेला प्रवास इतक्या सहजासहजी गाठून दिला त्याची गरज संपताच त्याला पळवून लावणे आलोकला  योग्य वाटत नव्हते.
पुढील ३ - ४ दिवसात चेनच्या मदतीने आलोक आणि डायना बर्यापैकी स्थिरस्थावर झाले. एका मोठ्या दुकानातून सौर उर्जेवर विद्युत निर्मिती करणारे यंत्र त्या घराला बसविण्यात आल्यावर पुढील काही महिन्याचा प्रश्न सुटला. चेनने त्यात अजून सुधारणा करून ह्या यंत्राद्वारे अधिक विद्युत उर्जा निर्माण करून ती हिवाळ्यापुरता साठविण्याचा मार्गही शोधला होता. त्यामुळे आता मोठा प्रश्न सुटला होता. डायनाला हे घर एव्हाना आवडू लागले होते. आणि दक्षिणेकडे जाण्याचा बेत आता बर्याच काळापर्यंत पुढे ढकलण्याची तिची तयारी होती.
डायनाला जसे हे घर  आवडले होते तसंच तिला आलोकसुद्धा एव्हाना आवडू लागला होता. भारतीय भोजनाचा मोठा भोक्ता असलेला आलोक तिला वैविध्यपूर्ण भारतीय खाद्यपदार्थ खावू घाली. परंतु त्याचवेळी तिच्या इंग्लिश जेवणातील विविध पदार्थही त्याने शिकून घेतले होते. सतत हिंदी गाणी ऐकण्यात मश्गुल असलेल्या आलोकने इंग्लिश पॉप संगीताचा कान विकसित केला होता. अंगणातील गवत कापण्याचे वेळापत्रक  त्याने पूर्णपणे लक्षात ठेवले होते. घराच्या साफसफाईत सुद्धा तो पुढाकार घेत असे. दिवेलागणीच्या वेळी आलोक आपल्या देवांची पूजा करून शुभंकरोती म्हणे ते तर डायनाला खूपच आवडायचे. डायनाला आलोकच्या मनाचा मात्र थांगपत्ता लागत नव्हता. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आलोक कधी गेला नव्हता. आणि हो चेनला पळवून लावायचे आलोक मनावर घेत नव्हता ही डायनाची तक्रार होती. एक दिवशी तिने थोडी जास्तच कटकट केल्यावर चेनच्या विकसित झालेल्या भावनिक बुद्धीचा आलोकने उल्लेख केला आणि त्याच्याकडे असलेल्या रोबोच्या पलटणीविषयी सुद्धा तिला सांगितले.
इथे चेनची समस्या वेगळीच होती. त्याला आता मनुष्यांचा सहवास आवडू लागला होता. परत रोबोच्या विश्वात जाण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती.
अशाच एका रम्य संध्याकाळी आलोक 'दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके' 'सबको हो रही खबर चुपके चुपके' असे गुणगुणत बसला होता. डायनाची मिश्किल बुद्धी उफाळून आली आणि तिने गुणगुण्यास प्रारंभ केला. 'दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके' 'चेनको हो रही खबर चुपके चुपके'. तिच्या ह्या विनोद्बुद्धीवर आलोक एकदम खळखळून हसला आणि दोघे हास्यकल्लोळात बुडून गेले. ह्या सर्व प्रकारात थोड्या बाजूलाच असलेल्या चेनचे अस्तित्व ते दोघे पार विसरून गेले होते. चेनला जसे हिंदी गाणे समजले होते तसेच आपला असा केलेला उल्लेख त्याला आवडला नाही.
रात्री जेवणानंतर दार बंद करण्याआधी आलोक चेनची शोधाशोध करीत होता. काही वेळाने न राहवून डायना सुद्धा त्यात सामील झाली. त्या रात्री भावनिक पातळी उंचावलेला चेन कायमचेच त्या दोघांना सोडून गेला होता हे कळायला त्यांना काही काळ लागणार होता.
निरंजन काहीसा बेचैन झाला होता. निरंजनच्या प्रयोगातील बराच टप्पा बाकी होता पण वेळ मात्र कमी होता. ह्या प्रतिकृती ग्रहावर जरी काल मूळ पृथ्वीच्या तुलनेत बऱ्याच वेगाने चालत असला तरी मूळ पृथ्वीवर ह्या दोघांना सकाळ होईपर्यंत परत पाठविण्याची वेळ आता जवळ येत चालली होती. कचने रोबोप्रकरण अचानक आवरते घेतले होते. पण तो अजून काही करणार नाही ह्याचा मात्र भरवसा निरंजनला वाटत नव्हता!

 

Wednesday, May 29, 2013

आभास - भाग १४


स्कॉटलंडला पोहोचताच आलोकने चेनला त्याच्या तळाशी संपर्क साधून तेथील विविध भागातील मनुष्यगणन संख्या घ्यावयास सांगितली. त्याच्या सुदैवाने जवळील एका तलावात त्याला एक मनुष्यगणन मिळाले. दोन मैलावरील ह्या तलावाकडे गाडी घेवुन आलोक स्वतःच वेगाने निघाला. वेगाने सुरु होणार्या गाडीत चेन कसाबसा शिरला. त्याने रागाने टाकलेल्या कटाक्षाकडे आलोकने दुर्लक्षच केले.
एका स्वप्नवत दिसणाऱ्या तलावात नौकाविहार करणाऱ्या डायनाची शांती गाडीच्या आवाजाने भंग झाली. गाडीतून उतरणाऱ्या एका मानवाकृती आणि रोबोसदृश्य आकृतीकडे पाहून ती पुरती गोंधळून गेली. आलोकचे हे रोबोपुराण तिला अजिबात माहित नव्हते आणि तो इतक्या वेगाने आणि अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकेल ह्याची तिने कल्पनासुद्धा केली नव्हती. तिच्या मनात भलताच संशय आला, अजून कोणीतरी पृथ्वीवर अस्तित्वात आहे किंवा ह्या समोर दिसणाऱ्या माणसाने रोबोच्या मदतीने हे सारे घडवून आणले आहे आणि आता तो आपला काटा काढण्यासाठी इथवर पोहोचला आहे असा विचार करून तिने नौकेला विरुद्ध दिशेला वळविण्याचा प्रयत्न केला. अर्थात तिच्या मर्यादित नौकानयन कौशल्याच्या दृष्टीने हे फार मोठे कठीण काम होते. तिचा हा प्रयत्न सुरु असतानाच 'थांब डायना, थांब! मी आलोक आहे', अशी हाक तिच्या कानी पडली. आलोकचा संगणकीय आवाज जरी वेगळा असला तरी त्याच्या ह्या हाकेवरून तो नक्की आलोकच आहे हे ओळखण्याइतपत साधर्म्य नक्कीच त्या हाकेत होते. ती लगेचच थांबली. पुढील तास दीड-तास भर नौका किनाऱ्याला लावण्याचा डायनाचा प्रयत्न सुरूच होता. आलोकच्या सूचनांनी तिला मदत होण्याऐवजी भलतेच काही होत होते. शेवटी आलोकच्या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष करीत तिने स्वतःच्या बुद्धीनुसार प्रयत्न करीत नाव किनाऱ्याला लावली.
'आलोक!', किनाऱ्यावर पहिले पाऊल टाकलेल्या डायनाने मोठ्या भावपूर्ण स्वरात आलोकला साद दिली. 'डायना!' आलोकनेसुद्धा भारावून तिला प्रतिसाद दिला. बाजूलाच उभ्या असलेल्या चेनच्या अस्तित्वाने क्षणभर गोंधळलेली डायना, नंतर मात्र पुढचा मागचा विचार न करता आलोकच्या आश्वासक मिठीत विसावली. चेनच्या भावनिक विश्वात एका नवीन अनुभवाची भर पडत होती. पुढील १ - २ तासभर ते दोघांचीही अखंड बडबड सुरूच होती. हा भावनाउद्रेक ओसरताच मग त्यांच्या चर्चेची गाडी पुढील मार्गक्रमण कसे करायचे ह्याकडे वळली.
निरंजन हा सारा प्रकार अगदी काळजीपूर्वक निरखून पाहत होता. प्रगतावास्थेतील मनुष्यजातीतील दोघांना मूळ पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या पृथ्वीच्या हुबेहूब बनविलेल्या प्रतिकृतीवर आणून तिथे त्यांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करण्याचे त्याचे हे प्रयत्न इथवर तरी बर्यापैकी सफल झाले होते. ह्या सर्व प्रकारात रोबो मध्ये कुठून घुसला हे त्याला कळत नव्हते. त्याची ही गोंधळलेली प्रतिमा पाहून कच बेहद्द खुश झाला होता.
 

Saturday, May 25, 2013

आभास - भाग १३

आलोकने चेनला त्याच्या तळाशी संपर्क साधावयास सांगितला. काहीशा प्रयत्नानंतर तो संपर्क साधण्यात यशस्वी झाला. तळाकडून मिळालेल्या माहितीनुसार डायना अजूनही स्कॉटलंडमध्येच होती. आत्मविश्वास दुणावलेल्या आलोकने चेनला पुन्हा विमानाकडे प्रस्थान करण्याचा आदेश दिला. 'नाही' चेन उत्तरला. आपल्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असे वाटून आलोकने पुन्हा तोच आदेश दिला. पुन्हा चेन 'नाही' म्हणाला.
चिनी लोकांनी रोबोंना जरी बुद्धिमत्ता आणि भावनांक दिली असली तरी त्यांनी रोबोंचा मनुष्याशी संपर्क अगदी मर्यादित ठेवला होता. त्यामुळे रोबोंच्या भावना जास्त विकसित होत नव्हत्या. परंतु आधीच बुद्धिमान असलेला चेन गेले काही दिवस आलोकच्या सहवासात चोवीस तास होता आणि आलोक ज्या ज्या भावनाकल्लोळातून जात होता ते चेन जवळून पाहत होता. आता आपल्याला ज्या क्षमतेवर काम करण्यासाठी निर्माण केले गेले आहे त्याहून बरेच अधिक काम आलोकने आपल्याकडून करून घेतले आहे ही माहिती चेनने ग्रहण केली होती. आणि नव्याने विकसित झालेल्या त्याच्या भावनिक शक्तीने त्यापलीकडे काम करण्यास नकार दिला होता.
आलोक मात्र पूर्ण गोंधळून गेला. तंत्रज्ञानाशिवाय ह्या बिंदुपासून डायनाचा शोध घेण्याची त्याची तयारी होती. चेनने केलेले उपकार तो विसरू शकत नव्हता परंतु ह्या क्षणी चेन असा का वागत आहे हे आलोकला कळेनासे झाले होते आणि जर समजा ह्याच डोक फिरलं वगैरे असेल तर, डोकं फिरलेले रोबो काय उद्रेक माजवू शकतात ह्याची आलोकला चित्रपटाद्वारे थोडीफार जाणीव होती.
आलोकने राहिलेला थोडाफार धीर एकवटून चेनला निद्रितावस्थेत ढकलण्याचा प्रयत्न केला. आलोकची भीती खरी ठरली. चेनने निद्रितावस्थेत जाण्यास नकार दिला. रात्र चढत चालली होती पण आलोकची झोप पूर्ण उडाली होती. आलोकने विमानतळावरील प्रतीक्षाकक्षात बैठक ठोकली. चेनसुद्धा समोरच्या खुर्चीवर येवून बसला. २ मनुष्यजीव, अनेक रोबो आणि एक विकसित रोबो असलेल्या पृथ्वीवरील वातावरणात एक अजब सन्नाटा पसरला होता.
थकल्याभागल्या आलोकचा पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागला. सकाळी अचानक त्याची झोप उतरली तेव्हा तो एकदम दचकला. चेन अजूनही तसाच समोर बसून होता. आलोकला काहीसं हायसे वाटले. 'चला, विमानात बसुयात' चेन स्वतःहून उद्गारला. आता आलोकची हिम्मत झाली नाही. 'मोटारीतून जावूयात' आलोक म्हणाला. चेनने हे म्हणणे ऐकले.
सुसाट वेगाने गाडी चालविणाऱ्या चेनकडे आलोक टक लावून पाहत होता. 'बघताय काय माझ्याकडे, काल मी दमलो होतो' हे ऐकताच आलोक जागच्या जागी उडायाचाच बाकी राहिला. भावनाशुन्य माणसे आणि  भावनापूर्ण रोबो ह्यापैकी अधिक खतरनाक कोण असा विचार करता गाडीने स्कॉटलंडचे अंतर कसे गाठले हे काही त्याला कळले नाही!
 

Friday, May 24, 2013

आभास - भाग १२

चेनच्या चालककौशल्याकडे आलोक निरखून पाहत होता. पुढील मार्ग चेनने आपल्या डोक्यात पूर्णपणे बसविला होता, अगदी छोट्या छोट्या वळणासाहित. खड्ड्यांचा तर प्रश्न नव्हता. गाडी १६० किमीच्या वेगाने व्यवस्थित चालली होती. आलोकने मस्त पैकी मागच्या सीटवर ताणून दिली. चेनने जेवणाच्या वेळी व्यवस्थित जेवण बनवून दिले. गाडीतील विद्युतउर्जा अजून २५०० किमी प्रवासापुरती पुरेशी होती. असाच प्रवास पुढील दोन दिवस चालू राहिला. एव्हाना ही जोडगोळी किरगिझस्तानच्या सीमेशी पोहचली होती.
आलोकने गेल्या दोन दिवसात बराच वेळ चेनशी संवाद साधला होता. चेनला मनुष्याशी इतका वेळ संभाषण करण्याची सवय नव्हती. नाही पुरत तर आलोक आपल्या सर्व भावना संभाषणातून व्यक्त करीत होता. आणि त्यामुळे नकळतपणे चेनचा भावनाबिंदू चेतवला जात होता.
गाडीतील विद्युतुउर्जा आता केवळ ५०० किमी प्रवासापुरती राहिली होती. आलोकच्या मनात कुठेतरी नवीन गाडी शोधण्याचा विचार सुरु होता. अचानक त्याचे लक्ष विमानतळाच्या मार्गाच्या खुणेकडे गेले. चेनला त्याने गाडी विमानतळाच्या दिशेने वळविण्याचा संकेत दिला. भावनेच्या पुढील पातळीवर आलेल्या चेनने त्याच्याकडे काहीश्या आश्चर्यकारक नजरेने पाहिले. गाडी व्यवस्थितपणे पार्क करून चेन आणि आलोक विमानतळाच्या मुख्य इमारतीत घुसले. (चेनला वैमानिक बनवायला सांगणाऱ्या वाचकाचे आभार!)
पुढचे दोन तास आलोकने अगदी झपाट्याने हालचाली केल्या. प्रथम त्याने चेनला निद्रितावस्थेत टाकले. वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा संगणकीय कोर्स शोधून काढला. आणि बघता बघता तो चेनमध्ये घुसवून टाकला देखील. दोन तासांनी निद्रीतावस्थेतून बाहेर आलेल्या चेनचा चेहरा अगदी ज्ञानी पुरुषासारखा दिसत होता.
गेल्या काही दिवसांच्या अनुभवाने आलोक आता एकदम सतर्कावस्थेत पोहोचला होता. धावपट्टीवर एक विमान अगदी उड्डाणाच्या तयारीत होते, म्हणजे अगदी ज्या क्षणी मनुष्यजात नाहीशी झाली त्यावेळेसारखे (आता आकाशातील विमानांचे काय झाले किंवा रस्त्यावरील धावत्या वाहनांचे काय झाले असे प्रश्न आपल्या मनात आल्यास लेखकाशी संपर्क साधा). आलोकने चेनला विमानात बसून १०० किमी अंतराचे उड्डाण करून यायची आज्ञा दिली. आलोकाच्या मनातील स्वार्थी विचार ओळखण्याची क्षमता एव्हाना आलेल्या चेनच्या चेहऱ्यावरील दुःखी भाव आलोकला जाणविले सुद्धा! अशा दोन यशस्वी उड्डाणानंतर खात्री पटलेल्या आलोकने चेनबरोबर विमानात प्रवेश केला. इंग्लंडपर्यंत पोहोचण्याइतके इंधन विमानात होते.
चार तासांनी गटविक विमानतळावर यशस्वीपणे उतरलेल्या आलोकच्या मनात स्वतःविषयी अत्यंत आदर दाटून आला होता. ह्या सर्व घटनेवर पुस्तक लिहायचे त्याने नक्की केले होते. परंतु ह्या पुस्तकाला डायनाशिवाय वाचक कोण लाभणार ह्या विचाराने तो काहीसा दुःखी झाला.
डायनाबाई स्कॉटलंडच्या लेक District मधील नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घेण्यात रमल्या होत्या. तिचा शोध घेण्याचे आव्हान आता आलोकपुढे होते!!

Wednesday, May 22, 2013

आभास - भाग ११


पुढचे दोन तीन दिवस आलोकची स्थिती खराबच होती. त्यानंतर मात्र त्याला खूपच बरे वाटू लागले. आणि त्याने आपला पुढील प्रवास सुरु केला. ताजातवाना झालेल्या आलोकने गाडी जोरात दामटवली आणि तो चीनच्या सीमारेषेवर येवून पोहोचला सुद्धा! दूरवर G318 ची खुण दिसताच आलोकला काहीसे बरे वाटले आणि तो चीनमध्ये प्रवेश करता झाला. चीनचे ठाणे आलोकने पार करताच अचानक भोंगे वाजू लागले. 'अरे बापरे, जगात जिवंत राहून राहून फक्त चिनीच जिवंत राहावेत का?' असा विचार त्याच्या मनात डोकावला. इतक्यात रोबोंची एक रांगच त्याच्या दिशेने सरकताना त्याला दिसली. 'हुं, असा मामला आहे तर' आलोक विचार करता झाला. परंतु त्याला त्वरित कृती करणे आवश्यक होते. त्याच्या नशिबाने रोबोंची हालचाल म्हणावी तितकी जलद नव्हती. आलोकला त्या आठ रोबोंच्या हालचालीत काही एक लयबद्धता असावी असे वाटले. अरेच्च्या हे तर बुद्धिबळातील सोंगट्यासारखे येतायेत, कडेचे दोन सरळ, त्यांच्या बाजूचे दोन अडीच घरवाले आणि … (वाचक प्रतिक्रिया - का हि हि) आलोकच्या चाणाक्ष बुद्धीने हे लगेच ओळखले. तत्काळ त्याने जावून राजा रोबोची एक कळ दाबली, ज्यावर 'stop' असे लिहिले होते.  ती कळ दाबताच सर्व रोबो शांत झाले. त्याच्या बायकोचे आणि आता काही प्रमाणात डायनाचे मत काहीही असो, आलोक एकदमच मठ्ठ नव्हता. सर्व रोबो शांत होताच त्याने राजा रोबोकडे चक्क दुर्लक्ष केले आणि तो वजीर रोबोचे निरीक्षण करू लागला. त्याचे लक्ष 'स्वतंत्र हालचाल' ह्या पर्यायाकडे गेले. तो निवडताच 'स्वतः' आणि 'बाह्य' असे दोन पर्याय देण्यात आले. आलोकने बाह्य पर्याय निवडला, मग पुढील आज्ञा द्या असे सांगण्यात आले. थोड्याशा मेहनतीनंतर 'तळाकडे परत चला' ही आज्ञा आलोक योग्य रुपात देवू शकला. एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा (दुर्मिळ जात! - किंबहुना  आज्ञाधारक नवर्यासारखा) रोबो तळाच्या दिशेने वाटचाल करू लागला. त्या वजीर रोबोने तळाचे प्रवेशद्वार उघडले आणि आतील संरचना पाहून आलोक थक्क झाला. बाहेरील जगातील घडामोडींचा त्या तळावर काहीच परिणाम झाला नव्हता. रोबोंची आतमध्ये वर्दळ सुरु होती. रोबोंनी हा तळ व्यवस्थित चालू ठेवला होता. वजीर रोबो बाह्य नियंत्रणाखाली असल्याने आलोक काहीसा बिनधास्त होता. वजीर रोबो आत येताच त्याने काही विशिष्ट आज्ञा बाकी सर्वांना दिल्या होत्या. आलोकने वजीर रोबोला जवळ बोलाविले. त्याचे थोडे अधिक निरीक्षण करताच आवाजाद्वारे त्याला नियंत्रित करण्याचा पर्याय आलोकला सापडला. आलोकला धन्य वाटले, परंतु त्याच्या पहिल्या एक दोन आज्ञेला रोबोने प्रतिसाद न दिल्याने तो हैराण झाला. मग भाषा बदलावी लागेल हे त्याला कळाले. भाषेच्या विविध पर्यायांमध्ये मराठी भाषा सुद्धा होती हे पाहून आलोक हैराण झाला. परंतु त्यामुळे त्याच्या जीवनातील सुसह्यता जाणून घेऊन त्याने काही वेळात  आंघोळ वगैरे आटपून घेतली. रोबोनी त्याला व्यवस्थित भोजनही आणून दिले. वजीर रोबो द्वारे सर्व रोबोंना PAUSE स्थितीत टाकून आलोकने ताणून दिली.
जागे झाल्यावर आलोकने संपूर्ण तळाचा अभ्यास केला. अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असा तळ होता तो! तिथे वीज निर्माण केली जात होती. उपग्रहांद्वारे सर्व पृथ्वीवरच्या प्रतिमा तिथे पाठविल्या जात होत्या. बहुदा तेथील कोण्या माणसाला आपण नाहीसे होत आहोत ह्याची जाणीव झाली असावी आणि म्हणून त्याने संपूर्ण नियंत्रण रोबोंकडे सोपविले होते. आलोकचे लक्ष तेथील रोबोंची तुलना करणाऱ्या तक्त्याकडे गेले. त्यातील काही रोबोमध्ये मानवी भावनांचे रोपण करण्यात चीनी लोकांना यश आल्याचे पाहून आलोक पुरता अचंबित झाला. अशा प्रकारे रोबो विश्वात गढून गेलेल्या आलोकला अचानक डायनाची आठवण आली. उपग्रहांच्या प्रतिमांचा वापर करून ती होवमध्येच आहे की नाही हे निश्चित करण्याचे त्याने ठरविले. त्याने एका उपग्रहाची प्रतिमा होववर लक्षित केली. परंतु त्या पूर्ण गावात 'मनुष्य गणन' शून्य दाखविले गेले. चिंतीत होऊन आलोकने पूर्ण इंग्लंडची गणना केली. थोड्या प्रयासानंतर बाईसाहेब लंडन जवळ पोहोचल्याचे आलोकला आढळून आले. स्त्री स्वभावाचा स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या आलोकने ह्या घटनेवर आश्चर्यचकित होण्याचे नाकारले. मग त्याच्या मनात पर्यायी गाडीचा विचार आला. सौरउर्जेवर चालणारी गाडी काहीशी थंडावली होती. थोड्याच वेळात वजीर रोबोच्या मदतीने आलोकने एक विद्युतुर्जेवर चालणारी गाडी पुढील प्रवासासाठी निवडली. आलोक आणि त्याचा मेंदू आता पूर्ण सक्रिय झाला होता. तो आता चालकाचा विचार करू लागला. त्याने संपूर्ण रोबोमध्ये चांगला सारथी कोण अशी चौकशी माहितीभांडाराकडे केली. त्यावेळी वजीर रोबोच्या मनात काहीशी दुःखी छटा आली असे त्याला उगाचच वाटून गेले. पण मग आलोकने त्याचाच विचार करण्याचे ठरविले. वजीर चालककौशल्यात पहिल्या दहात होता परंतु महत्वाची बाब म्हणजे त्याचा भावनिक बुद्ध्यांक सर्वात वरच्या क्रमांकावर होता. आलोकने त्यालाच निवडले.
नवीन गाडी, नवीन चालक घेऊन पूर्णपणे ताजातवाना झालेला आलोक पुढच्या प्रवासाकडे निघाला. निघतानिघता चिन्यांचा हा तळ उद्ध्वस्त करून टाकावा असा विचार त्याच्या मनात आला. परंतु 'chan' च्या नजरेकडे पाहून आलोकने हा विचार बदलला.

Tuesday, May 21, 2013

आभास - भाग १०


आलोकला मदत करतानाचे डायनाचे दिवस भरभर निघून गेले होते. पण आता परिस्थिती एकंदरीत कठीण होत चालली होती. आलोकशी संपर्क तुटला होता. पुढील एक दोन दिवसात इमारतीमधील वीजपुरवठाही बंद पडला. सौरउर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना इंग्लंडच्या हवामानामुळे फारशी मागणी नव्हती आणि त्यामुळे त्यांचा वापरही फारसा प्रचलित नव्हता. आलोक ज्या ज्या वेळी दुसऱ्याची गाडी घेतली, दुसऱ्याच्या घरात जाऊन झोपलो असे म्हणायचा तेव्हा डायनाला कसेसच वाटायचं. ह्या माणसाला काहीच कशा वागण्याच्या चालीरीती नाहीत असे तिला राहून राहून वाटायचं. 'संस्कार, चालीरीतीचे राजमान्य संकेत हे सभोवतालच्या परिस्थितीनुसार बदलतात आणि हे बदल घडवून आणणारा माणूस हा मोठा द्रष्टा असतो' तिच्या मनातील विचार ओळखून आलोकने दिलेला मोठा डोससुद्धा तिला आठवला. आपल्यालाही हे द्रष्टेपण स्वीकारायला हरकत नसावी अशी तिने आपल्या मनाची समजूत घातली आणि लाकडांवर चालणारी फायरप्लेस ज्या घरात आहे अशा घराचा शोध सुरु केला. तिचं नशीब तसं जोरात होत आणि दुसऱ्याच घरात तिला हवी तशी फायरप्लेस मिळाली. हो तिने waitrose मधून कच्चे मांस, पाव असे पदार्थ आणले होतेच. परंतु दीड दिवसापूर्वी बंद पडलेल्या विद्युतपुरवठ्यामुळे त्यांचा ताजेपणा उतरणीच्या मार्गावर होता. Wick Hall च्या बागेत लाकडांवर अन्न गरम करताना एकंदरीत पुढे परिस्थिती बिकट होत जाणार हे तिला कळून चुकले होते. आणि तिला आपल्या इमारतीच्या आसपासच फिरकत राहणे आवश्यक होते. कारण आलोक तर इथेच येणार होता. 'अरे पण आलोकला इथे पोहोचायला अजून किमान २० दिवसतर लागतील तोवर सारे इंग्लंड फिरून होईल' डायनाच्या मनात विचार आला. तसं पाहिलं तर स्कॉटलंड फिरण्याची तिची इच्छा फार जुनी होती. मग थोड्या फार प्रमाणात आलोककडून ऐकलेल्या माहितीच्या जोरावर दुसर्याच्या गाडीत प्रवेश करून, आवश्यक सामान गाडीत भरून बाईसाहेब लंडनच्या दिशेने दोन तासांनी निघाल्या सुद्धा! तिचा हा निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळच सांगू शकणार होता.
आलोकचा संघर्षाचा काळ सुरु होता. उंच प्रदेशातील कमी ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वेगाने गाडी चालविणे त्याला कठीण झाले होते. काठमांडू ते बनेपा ह्या २२ किमी अंतराने त्याचे चांगले २ तास घेतले. गाडीत भरलेल्या maggi ला सुर्यचुलीवर शिजवून त्याने आपली क्षुधा शांत केली होती. पुढील आरनिको  राजमार्गावरील प्रवास त्याची कसोटी पाहणारा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनात भय निर्माण करणाऱ्या दऱ्या, अंगाला गारठवून टाकणारा बोचरा वारा, अन्नाचा मर्यादित पुरवठा  ह्यामुळे आलोकला दिवेसंदिवस अशक्तपणा जाणवू लागला होता. शेवटी मग त्याने त्या उंच हिमशिखरातील एक गाव निवडून तिथे एक दिवस विश्रांती घेण्याचे ठरविले.
 

Saturday, May 18, 2013

आभास - भाग ९


आलोकने आपल्या मार्गात एक बदल केला होता. दिल्लीला जाण्याऐवजी थेट लखनौला जायचे त्याने ठरविले होते. इतक्यात फोनची घंटा खणखणली. डायनाबाई लवकर जाग्या झाल्या होत्या. इतके दिवस आपण गुगल ग्लासला कसे विसरलो ह्याबद्दल तिने आलोकचे चांगलेच बौद्धिक घेतले (धन्यवाद विकास!). आता आलोकवर नव्याने एक दुकान फोडण्याची जबाबदारी आली. आलोकने पहिली संधी मिळताच ती पार पाडली सुद्धा आणि मग ते दोन (हो प्रत्येक गोष्टीचा back-up प्लान बनवायची एव्हाना अलोकला सवयच झाली होती) गुगल ग्लास घेवून आलोक पुन्हा गाडीत बसला. त्या दोघा गुगल ग्लासांना आलोकने पूर्ण मार्गाच्या माहितीने परिपूर्ण केले सुद्धा! दुपारी साधारणतः दीडच्या सुमारास आलोक लखन्नौला  पोहोचला सुद्धा. सात तासात त्याने ९०० किमी अंतर पार केले होते. आपल्या गाडीतील संपलेल्या पाण्याच्या बाटल्या फेकून देवून आलोकने नवीन पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. दुपारच्या वेळी हलका आहार घेण्याच्या त्याच्या नियमानुसार त्याने काही बिस्किटे, फळे ह्यावरच आपली भूक भागविली. विजेच्या अभावामुळे हळूहळू मॉलची अवकळा होवू लागली होती.
आलोकने तासभर गाडीतच डुलकी घेतली. त्या झोपेने ताजातवाना होवून आलोक पुन्हा पुढच्या मार्गाला निघू लागला. अचानक त्याचे लक्ष 'अखिल भारतीय विज्ञान प्रदर्शना' च्या लावलेल्या बोर्डाकडे गेले. पुढच्या प्रवासात बघूया काही उपयोगी पडणाऱ्या वस्तू दिसतात का असा विचार करीत आलोकने आपली गाडी तिथे वळविली. अचानक त्याचे लक्ष wi - fi सिग्नल कडे गेले. तो पूर्णपणे विझला होता. त्याचा मोबाईलही नेटवर्क दाखवीत नव्हता. तशाच गंभीर मनःस्थितीत आलोक विज्ञान प्रदर्शनात शिरला. फिरता फिरता त्याचे लक्ष सौरउर्जेवर चालणाऱ्या मोटारविभागाकडे गेले. मग अर्ध्या तासातच आलोक सौरउर्जेवर चालणारी इनोवा घेवून निघाला. त्यात १५०० किमी अंतर जावू शकेल इतका चार्ज होता. आलोक मग आपला संगणक उघडला. संपूर्ण नेटवर्क डाऊन होत असल्याचा त्यात संदेश होता. म्हणजे आता पुढील सर्व मार्ग आलोकला डायनाच्या मार्गदर्शनाशिवाय काढायचा होता.
पुढचे लक्ष होते काठमांडू! अंतर होते जवळजवळ साडे चारशे किमी! परंतु आता पूर्ण सपाटीचा रस्ता संपला होता. आलोकच्या सारथ्यकौशल्याची आता खरी कसोटी होती! एकंदरीत पुढच्या सर्वच प्रवासात त्याच्या शरीराच्या प्रतिकारशक्तीची, मनोबलाची कसोटी लागणार होती. पुढे होता तो अनोळखी प्रदेश, मनुष्याच्या अनुपस्थितीने हा प्रदेश कशी रूपे बदलतो. गाडी कशी साथ देते, खायला प्यायला काय मिळते अशा अनेक घटकांवर आलोकचे भविष्य अवलंबून होते.
 

आभास - भाग ८आलोकचा प्रवास त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वेगात चालला होता. मनातील विचारांची गाडीही त्याहून जोरात चालली होती. अचानक त्याच्या मनात अंतराळात वास्तव्य करून असलेल्या अंतराळवीरांचा विचार आला. पृथ्वीवरील सर्वजण तर नाहीसे झाले पण अंतराळातील लोकांचे काय? डायनाला रात्री हा प्रश्न विचारायचे त्याने नक्की केले. अचानक संगणकाने थोडीशी कुणकुण केली. आलोकने एक नजर टाकली तर wi - fi सिग्नल नाहीसा झाला होता. 'अरे बापरे आता काय करायचे' आलोक मनातून हादरून गेला. Wi-Fi नाही म्हणजे पुढचा मार्ग आपल्याला संगणक दाखवणार कसा? दिल्लीपर्यंत ठीक आहे, रस्त्यावर दिशा, मार्ग दाखविणाऱ्या खुणा तरी असतील पण पुढे नेपाळ, हिमालयाचे काय?
 
सगळ्या शंका कुशंकानी आलोकच्या मनात गर्दी केली होती. ह्या सगळ्या विचाराच्या नादात गाडीने बरेच अंतर पार केले होते. बाविसाव्या शतकातील ह्या गाड्या, सुरेख रस्ते ह्यामुळे आलोक जवळजवळ ताशी १६० किमी वेगाने चालला होता. आपण एकंदरीत उदयपूरला पोहचू शकू अशी त्याला खात्री वाटू लागली. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास तो उदयपूरला पोहोचला देखील! एका दिवसात आपण इतकी मजल मारली म्हणून त्याने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.
हळूहळू माणसाच्या अनुपस्थितीच्या खुणा शहरात दिसू लागल्या होत्या. शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते. पूर्ण अंधार पडायच्या आधी आलोकने एका बैठ्या घराची राहण्यासाठी निवड केली. घरातील गॅस कनेक्शन सुदैवाने अजूनही चालू परिस्थितीत होते. स्वयंपाकघरात थोड्याशा खटपटीनंतर आलोक डाळ आणि तांदूळ सापडले. हे शोधताना मध्ये त्याच्या हाती एक साखरेचा डबा लागला. त्यात कुतूहलाने आलोकने मुंग्यांचा शोध घेतला, पण त्याची निराशाच झाली. हिरव्या भाज्या एव्हाना खराब होवून गेल्या होत्या त्यामुळे आलोकने डाळ भात शिजवता शिजवता लोणचे शोधून ठेवले. त्याचे नशीब जोरात होते अजूनही बाथरूम मध्ये नळाला पाणी होते. नाही म्हणायला टाकीत भरलेले पाणी वापरायला होते तरी कोण? मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने स्नान आटोपले आणि मग तो जेवावयास बसला. गरमागरम वरणभात आणि लोणचे खाल्ल्यावर त्याला संगणकाची आणि मग डायनाची आठवण झाली. भराभर जेवण आटपून तो मोठ्या आशेने संगणक चालू करता झाला आणि अहो आश्चर्य! Wi-Fi चालू होते. तो  ऑनलाईन येताच डायनाचा त्याला संदेश आला. एकंदरीत ही सर्व उपग्रहानद्वारे चाललेली संदेशयंत्रणा गेले दोन- तीन तास बंद पडली होती आणि केवळ १० मिनिटांपूर्वी चालू झाली होती. 'आता लक्षात घे, ही यंत्रणा केव्हाही बंद पडू शकते, त्याआधी पूर्ण मार्गाची सविस्तर माहिती मी डाऊनलोड करून तुला पाठवून देते. म्हणजे तुला इंटरनेटवर अवलंबून राहायला नको' डायनाच्या स्वरात चिंता दाटून आली होती. तू आता वेळ न घालविता झोप आणि सकाळी लवकर निघ कसा' पडत्या फळाची आज्ञा मानून आलोकने संगणकावरील आपली बैठक उठविली. संगणक चार्जिंगला लावला. 'रात्र एकट्याने घालविणे कठीण आणि त्यात अनोळखी ठिकाणी तर अधिकच कठीण!' आलोक विचार करीत होता. म्हणायला गेले तर wi - fi मध्येच बंद पडल्यामुळे तो जबरदस्त हादरला होता. सपाट प्रदेशात मार्ग हरविणे एकवेळ चालेल पण उंच भागातून जाताना एकदा का दिशाभूल झाली की संपलेच एकदाचे! विचार करता करता तो घराचे मुख्य दार बंद करायला आला आणि त्याला उगीचच हसू आले. येणार तरी कोण आहे घरात? चोर दरवडेखोर तर नाहीतच आणि भुते असलीच तर ती थोडी बंद दारांना भीक घालणार. दार तसे व्यवस्थित बंद होते, एक कडी लावायची बाकी होती. आलोकने ती लावली आणि अचानक त्याचे लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे गेले. आकाशातील सर्व तारे , ग्रह एकदम स्पष्ट दिसत होते. त्यांचा प्रकाश अडविणारे सर्व मानवनिर्मित अडथळे दूर झाले होते ना! अचानक एक छोटा ठिपका आकाशात पुढे पुढे सरकताना त्याला दिसला. उपग्रहच होता तो! आलोकच्या आशेला पुन्हा एकदा पालवी फुटली. तो ठिपका पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत आलोक त्याच्याकडे टक लावून पाहत होता. आलोकच्या मनात चाललेल्या विचारांच्या वादळावर थकलेल्या शरीराने विजय मिळविला. पुढील पाच दहा मिनिटात तो निद्राधीन झाला.
इथे डायना मात्र फ्रीजमधील शेवटच्या पिझ्झाच्या तुकड्यावर आपली भूक भागवता भागवता संपूर्ण मार्गाची माहिती डाऊनलोड करीत होती. पुढील पाच तासात तिची ही सर्व माहिती उतरवून झाली. तिने ती आलोकला पाठविली सुद्धा आणि तिने तशीच बिछान्यावर ताणून दिली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ही सर्व माहिती आलोकच्या संगणकात उतरविली गेली सुद्धा!
सकाळी पाचच्या सुमारास आलोकला जाग आली. झटापट त्याने निघायची तयारी केली, त्या घरात सापडलेले त्याच्या मापाचे नवीन कपडे सुद्धा त्याने घेतले. डायनाला फोन करण्याचा मोह त्याने घड्याळाकडे नजर टाकत आवरला. गाडी चालू करता करता त्याची नजर पेट्रोलच्या खुणेकडे गेली. पेट्रोल आता फक्त पाव भाग शिल्लक राहिले होते. पेट्रोल आता शहरातून बाहेर निघायच्या आत भरले पाहिजे असे स्वतःला त्याने बजावले. महामार्गाला लागण्याआधी थोडासा शहरी रस्ता होता. तिथून जाता जाता एका अलिशान बंगल्यातील एका तितक्याच अलिशान गाडीकडे त्याचे लक्ष गेले. त्याला मोह काही आवरला नाही. काही मिनिटातच आपल्या नवीन कौशल्याच्या आधारे त्या अलिशान गाडीत आलोक सवार होता. नाही म्हणायला ह्या गाडीचा पेट्रोल टॅंक फुल होता
महामार्गावर पोहोचल्यावर आलोकच्या समोर दोन दिशादर्शक खुणा होत्या. उजवीकडे मुंबई आणि डावीकडे दिल्ली! गाण्याचा अर्थ न समजता गाणी गुणगुणायची आलोकची सवय तशी जुनी होती. 'एक तरफ उसका घर, एक तरफ मैकदा' असे २ -३ मिनटे गुणगुणत तो एका जागी थांबून राहिला होता. शेवटी कोणत्या विचाराने का माहित नाही पण त्याने दिल्लीचा रस्ता पकडला!
 

Thursday, May 16, 2013

आभास - भाग ७निघताना आलोकने डोळे भरून आपल्या घराकडे पहिले होते. आई  बाबा, बायको मुलगा ह्याचे फोटो साथीला होते.  त्याने गाडी cruise कंट्रोल मध्ये टाकली होती. थोड्या वेळातच तो मुंबई पार करून मनोर मार्गे तलासरी, वापीपर्यंत पोहोचला होता. साथीला १९७० च्या सुमारातील किशोरची गाणी होतीच. आलोकने खास 'मुसाफिर हुं यारो ना घर है ना  ठिकाना, मुझे बस चलते जाना है' वगैरे गाणी लावली होती. तंत्रज्ञान थोडे अधिक प्रगत झाले होते आणि त्यामुळे एकटा प्रवासी अशी थीम दिल्यावर त्याच्या गाडीत ह्या विषयावरची सर्व गाणी वाजवली जात होती. पण ही सर्व गाणी १९८० सालापर्यंत येवून थांबत होती. त्यानंतर निर्माण झालेले हे सर्व तंत्रज्ञान आपल्याच काळातील गाणी निवडत नाही ह्याचे आलोकला अजिबात आश्चर्य वाटत नव्हते.
वापीला त्याने गाडी थांबविली. एका बंगल्यात शिरून तो ताजातवाना झाला. हल्ली एक बरे होते, सर्व जगभरच्या सपाट भूप्रदेशात  wi fi ची व्याप्ती पोहोचलेली होती. त्याला एव्हाना डायनाची आठवण झाली. त्याने तिला फोन लावला. 'कसा आहेस तू?, कुठवर पोहोचलास?' डायनाच्या स्वरात पहिल्यांदा त्याला ओलावा जाणवला. 'वापी' आलोक उत्तरला. 'तू कशी आहेस?' 'आहे मजेत! आताच बीचवर जावून मस्तपैकी पोहून आलेय!' डायना उत्तरली. 'आज कितपर्यंत मजल गाठणार?' डायनाने विचारले. 'बघुयात, आज उशिरा निघालोय, गांधीनगर तर नक्की पार करीनच, परंतु उदयपूरला पोहोचणे कठीण आहे.' आलोक उत्तरला. 'बघ रे बाबा, अगदीच अनोळखी भागात रात्र घालवू नकोस' डायना चिंतेच्या स्वरात बोलली. 'का अनोळखी भागातील भुते काय शहरातील भागापेक्षा जास्त त्रासदायक असतील?' आलोकने विचारले. 'मला भूतांची चिंता नाही, भूतीणींची आहे, त्या तुझ्या मागे लागल्या तर?' डायनाने आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले. निरुत्तर होवून अलोकने संभाषण आवरते घेतले. तिचा निरोप घेवून, बंगल्यातील आवश्यक ते जिन्नस घेवून गाडी पुढे निघाली. आता आलोकने 'अजनबी' ह्या थीमची गाणी लावली. संध्याकाळची उन्हे गाडीत शिरत होती. 'अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा है' ह्या गाण्यावर रमलेला आलोक आपल्या मनातील वादळांना शमविण्याचा प्रयत्न करीत होता.  

Monday, May 13, 2013

आभास - भाग ६
रात्रभर आलोक तळमळत जागा होता. आतापर्यंतची त्याची सर्वात लांबवर फेरी केरळपर्यंत होती आणि तीही एक पर्यटन संस्थेबरोबर! आतापर्यंतचा सर्वात लांबचा ड्राईव्ह होता तो कोकणापर्यंत. अशा पार्श्वभूमीवर गाडीने लंडन म्हणजे जरा जास्तच होते. आणि बाकी आजूबाजूच्या सर्वांचे काय झाले हा सतत डोक्याला भुंगा लावणारा प्रश्न होताच. बाकी डायनावर भरंवसा टाकतोय ते ही कितपत योग्य असा प्रश्न त्याचे अंतर्मन राहून राहून त्याला करीत होते. तिने आपल्याला बरोबर शोधून काढलाच कसा? ती म्हणते खरी की ती एकटी आहे पण त्यावरही कसा भरवसा करायचा? आणि तिथे तिची टोळी असली मग? बाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही मराठी मध्यमवर्गीय मानसिकता कायम राहिली आहे हे पाहून अखिल वाचकवर्ग खुश झाला असावा!
मग त्याच्या विचाराची गाडी स्विफ्टकडे वळली. इतक्या लांबच्या प्रवासात तिला काय झाले तर ती मध्येच रस्त्यात सोडून द्यावी लागणार ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. बाकी सामान काय भरायचे हा सर्वात गहन प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. सामानाची यादी जसजशी लांबत चालली तसा त्याचा स्विफ्टला घरीच ठेवायचा निर्णय पक्का झाला. मग त्याने समोरच्या इमारतीतील इनोवा घ्यायचा विचार पक्का केला. त्या निमित्ताने गाडी चावीशिवाय कशी व्यवस्थित सुरु करायची हा ही विचार होताच.
सकाळ होताच आलोक सामान भरावयास लागला. सामानाची यादी करताना त्याने कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या अशा सर्व गोष्टी भरण्यास सुरुवात केली. बाजूच्या दुकानात त्याच्या ह्या निमित्ताने दोन तीन फेऱ्याही झाल्या. मग त्याची ट्यूब पेटली. हे सामान आताच भरायची काय गरज आहे? वाटेत आपल्याला हे मिळेलच की! पण त्यानंतर त्याच्या मनात तिबेट, चीनच्या दुर्गम भागातील प्रवासाचा विचार मनात डोकावला. त्यामुळे हे सर्व सामान दिल्लीच्या आसपास भरायचे हे त्याने नक्की केले. अरे पण मधल्या भागात कोणी माणसे जिवंत असली तर? ती सुसंस्कृत असली म्हणजे कमावले. मग डायनाचे काय? ती बिचारी वाट बघत बसेल ना आपली, आलोक विचार करता झाला. अचानक त्याच्या मनात अजून एक विचार आला आणि त्याने सरळ संगणकाद्वारे डायनाचा नंबर फिरविला. सकाळ सकाळी चार वाजता फोनची बेल वाजल्याने डायना कमालीची संतापली. असून असणार कोण? आलोकच ना असा विचार करीत तिने महत्प्रयासाने फोन उचलला. 'अग, अजून इतर कोणत्या ip पत्त्यावरून तुला काही हालचाल दिसली का? आलोक विचारत होता. 'हो बिपाशा बासू वांद्र्याहून कनेक्ट झालेली रात्री!' असे रागाने म्हणत डायनाने फोन दाणकन आपटला. आलोकने घड्याळाकडे पाहिले आणि त्याला आपली चूक लक्षात आली. काही का असेना त्याला त्याचे उत्तर मिळाले होते. बाकी एकविसाव्या शतकातील प्रसिद्ध (?) नट्यांची नावे वापरायची पद्धत अजूनही प्रचलित होती. बाकी हिमालयात येती असला तर? ह्या विचाराने आलोक थोडा विचलित झाला.
शेवटी इतक्या सगळ्या विचाराच्या वादळातून बाहेर पडून आलोक ११ वाजताच्या सुमारास इनोवातून एका ऐतिहासिक प्रवासासाठी निघाला! !

Saturday, May 11, 2013

आभास भाग ५


(तज्ञ वाचकहो - मागील भागात डायनाने जितक्या सहजतेने फेसबुक आणि गुगल संकेतस्थळांचा डेटा मिळविला हे तर्कसंगत बुद्धीला पटण्यासारखे नाही हे मान्य! पण कथा म्हटली म्हणजे थोडी अतिशोयक्ती आलीच )
 डायनाने त्या संगणकाच्या I.P. पत्त्यावरून तो भारतातील संगणक असल्याचे जाणले होते  ज्या विशिष्ट वेळी हा संगणक कार्यरत होतो ती वेळ लक्षात ठेवून त्या  वेळी ती संगणकावर बसून उत्कठेने वाट पाहू लागली. आज आलोक थोडा जास्तच उदास होता त्यामुळे संगणकावर यायला त्याला थोडा जास्तच उशीर झाला. डायना वाट पाहून पाहून कंटाळली होती आणि अचानक तिला त्या पत्त्यावर हालचाल दिसू लागली. तिने मोठ्या आतुरतेने त्या पत्त्यावर तत्काळ निरोप पाठवला 'hi there!' आलोकच्या अंगातून आनंदाची एक तीव्र लहर उमटून गेली. 'hello' आलोकने तत्काळ प्रतिसाद दिला. 'तुझे नाव काय?' डायना विचारती झाली. 'आलोक' ह्या उत्तरावर हे पुरुषाचे नाव आहे हे ओळखण्याइतपत डायनाचे सामान्यज्ञान चांगले होते.
डायना - 'तुम्ही किती जण आहात तिथे?'
आलोक - मी एकटाच आहे. तुझे नाव काय?
डायना - डायना
बापरे १९९७ साली अपघाती मरण पावलेल्या प्रिन्सेस डायनाचे हे भूत तर नव्हे ना असा भीतीदायक विचार आलोकच्या मनात येवून गेला.  तरीही त्याने त्या विचाराला मागे सारले.
आलोक -  'तुम्ही किती जण आहात तिथे?'
डायना - मी एकटीच
त्यानंतर त्या दोघांची चर्चा खूप वेळ रंगली. हे काय झाले आहे ह्याचा त्या दोघांनाही अजिबात थांगपत्ता नव्हता. एकटे राहून आलोक खूप कंटाळला होता. परंतु भेटायचे तर कुठे आणि कसे? तुला विमान तर चालवता / उडवता येत असेलच? डायनाने थोड्या मिश्किल स्वरात विचारले. 'एक वेळ उडविता येईल, पण खाली कसे आणणार हे माहित नाही' डिस्कवरीवरील एका कार्यक्रमात पाहिलेली विमान उड्डाणाचे चित्रण आठवून आलोक उद्गारला.
त्या नंतर त्या दोघांची बराचवेळ शास्त्रीय चर्चा झाली. आलोक लगेच गुगल वर धुंडाळता झाला. त्याला २ वर्षापूर्वी पाहिलेल्या http://www.londondelhibyroad.com/ ह्या संकेतस्थळाची आठवण झाली. मग डायनाने त्याला तुझी गाडी कोणती हे विचारले. मारुती स्विफ्ट ही गाडी जवळपास ९००० मैल अंतर पार पाडू शकेल ह्याची डायनाला  शाश्वती वाटली नाही, परंतु आलोक मात्र ह्या गाडीविषयी छातीठोकपणे ग्वाही देत होता. गाडी बिघडली तर तू काय करणार? ह्या प्रश्नाला वाटेत लागणाऱ्या गावातील गाड्या आपल्याच आहेत ह्यावर त्यांचे एकमत झाले! चावी न मिळाल्यास त्या गाड्या कशा चालू करायच्या, ह्याचे जुजबी ज्ञान करून घेण्याचा सल्ला डायनाने त्याला दिला. आलोकचा संगणक ह्या लांबवरच्या प्रवासात साथ देईल आणि वाटेतील Wi-Fi जाळी त्याला सतत डायनाच्या संपर्कात ठेवतील असे गृहीतक करण्यावर दोघांचेही एकमत झाले.
दुसऱ्या दिवशीच सकाळी निघण्याचा आलोकने निर्णय घेतला. डायनाचा दूरध्वनी क्रमांक, पत्ता तिने ई-मेल वर पाठविले ते आलोकने संगणकात साठविले. तुही प्रवास चालू केलास तर आपण अर्ध्या वेळात भेटू शकू असे आलोकने तिला सुचविले सुद्धा!
मला माझे ब्रायटन / होव सोडून युक्रेन, कझाकस्थान सारख्या ठिकाणापर्यंत प्रवास करायचा नाहीये. डायनाने ठासून सांगितले. बायकांच्या निग्रही (एक चांगल्या शब्दाचा काहीसा चुकीचा वापर :) स्वभावाचे अखिल भूमातेवर सारख्याप्रमाणात वाटप करणाऱ्या त्या भगवंताचे स्मरण करून आलोक आपल्या ह्या दीर्घ प्रवासाच्या तयारीला लागला. 

Thursday, May 9, 2013

आभास - भाग ४
आलोक संगणकाच्या पुस्तक कक्षात बराच काळ रमला होता. अचानक त्याला भुकेची जाणीव झाली. पुन्हा एकदा शीतगृहात साठविलेल्या अन्नाच्या आधारे त्याने आपली क्षुधा शांत केली. असाच रमत गमत चालत असताना त्याचे लक्ष हायपरसिटी मध्ये असलेल्या ताज्या भाज्यांकडे गेले. त्याला एव्हाना वरण भाताची आठवण येऊ लागली होती. काही भाज्या उचलून तो उद्वाहकाकडे चालू लागला. अचानक मधल्या एका दुकानातील सर्व दिवे बंद असल्याचे त्याला दिसले. एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अशा परिस्थितीमध्ये उद्वाहकाचा वापर करणे किती धोक्याचे आहे हे त्याला कळून चुकले. मग जिन्याने तो खाली उतरला. गाडीत बसता बसता पेट्रोलच्या मध्यावर आलेल्या खुणेवर त्याचे लक्ष गेले. म्हणजे आता पेट्रोल सुद्धा भरायला शिकावे लागणार तर असा विचार त्याच्या मनात येवून गेला. वाटेत त्याला गणपतीचे देऊळ दिसले. नेहमी देवळात जायला का कु करणारा आलोक शांतपणे गाडी थांबवून देवळात शिरला. 'देवा, ३३ कोटी देवांपैकी एकाला तरी पृथ्वीवर पाठव रे' अशी मनोभावे प्रार्थना करून तो परत निघाला. पुन्हा एकदा आपण देवळात न जाण्याबद्दल कटकट करणाऱ्या आई आणि बायकोची त्याला आठवण आली आणि तो काहीसा गहिवरला.
गाडी पार्क करता करता त्याचे लक्ष नाक्यावरील किराणा मालाच्या दुकानाकडे गेले. कोणास ठावूक कसे पण त्याला आगपेटीची, मेणबत्तीची आठवण झाली. किराणा मालाच्या कुलुपाला फोडून त्यातून हव्या त्या गोष्टी घेवून तो परत निघाला. ब्लॉकचे कुलूप उघडता उघडता त्याचे लक्ष जोश्यांच्या ब्लॉककडे गेले. अरे ह्यांची चावी तर आपल्याकडेच आहे, त्यांच्या आलिशान सोफ्यावर मस्त पैकी ताणून द्यावे असा विचार त्याच्या मनात आला आणि मग त्याने तो लगेच अमलात आणला सुद्धा!
त्याच्या अपेक्षेनुसार वरण भात भाजीचा मेनू फिस्कटलाच. तरीही त्याला एकंदरीत करपलेली भाजी, कच्चे भात, वरण काहीसे समाधान देवून गेले. मग तो तास दोन तास संगणकावर गुगल, फेसबुक अशा संकेतस्थळावर जावून आला. फेसबुकवर शेवटचा अपडेट येवून १८ तास होवून गेले होते. 'Anybody there?' असे स्टेटस अपडेट करून कंटाळून तो झोपी गेला. सुरुवातीला त्याला झोप काही लागत नव्हती. एकट्याने रात्र घालविणे किती कठीण आहे हे त्याला प्रथमच जाणविले.
आलोकचे पुढचे दोन तीन दिवस काहीसे अशाच प्रकारे गेले. नाही म्हणायला त्याला पाण्याची टाकी कशी भरायची हे समजावून घ्यावे लागले. आता वरण, भाजीच्या दर्ज्यात बरीच सुधारणा झाली होती. आपला संगणक सुरु राहायला हवा आणि त्यासाठी त्याने जनरेटर सेटची पण सोय केली होती. हळू हळू एकटेपणा त्याच्या मनःस्थितीवर परिणाम करू लागला होता.
डायना मात्र एकदम झपाटल्यासारखे काम करीत होती. खाण्यापिण्याकडे तिचे फारसे लक्ष नव्हते. तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक तिला गुगलच्या संकेतस्थळाला किती जणांनी भेट दिली हे कसे शोधायचे हे कळाले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. थोड्या प्रयत्नानंतर तिला फेसबुकच्या बाबतीत ही यश आले. आणि मग एका विशिष्ट संगणकावरून ही दोन्ही संकेतस्थळे गेले दोन दिवस धुंडाळली जात आहेत हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
 

Sunday, May 5, 2013

आभास - भाग ३डायनाची प्रतिक्रिया आलोकच्या प्रतीक्रियेपेक्षा थोड्याफार प्रमाणात सारखी होती. सारखेपणा होता तो मनात येणाऱ्या विचारांच्या बाबतीत, परंतु तिची कृतीतील प्रतिक्रिया मात्र बरीच वेगळी होती. तिने शांतपणे कॉफी करून घेतली. कॉफीचे घुटके घेत घेत ती विचार करू लागली, मी ह्या होव गावात एकटी आहे की ससेक्स कौंटी मध्ये एकटी आहे की इंग्लंड मध्ये एकटी आहे की … डायना संगणकाच्या जाळ्यांच्या (internet network) क्षेत्रातील काहीशी तज्ञ होती. कॉफी संपल्यावर तिने संगणकाचा ताबा घेतला. एखाद्या संकेतस्थळाला किती भेटी दिल्या जातात हे कसे माहित करून घ्यायचे ह्या गोष्टीचे तिला जुजबी ज्ञान होते. परंतु इथे जुजबी ज्ञानाने भागणारे नव्हते. त्यावर अधिक मेहनतीची आवश्यकता होती.
आलोक केकचा आस्वाद घेतल्यावर बराच शांत झाला होता. आता त्याने एकंदरीत परिस्थिती किती गंभीर आहे ह्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत  गरजांपासून त्याने सुरुवात करण्याचे ठरविले. मेरवान केक कितीही स्वादिष्ट असले तरी ते आपण सतत खाऊ शकणार नाहीत ह्याची आलोकला जाणीव होती. त्यामुळे कधीतरी आपल्याला स्वतः अन्न शिजवायला सुरुवात करावी लागणार हे तो जाणून होता. आता अन्न शिजवायला गैसचा पुरवठा लागणार आणि त्यावर आपले नियंत्रण नाही हे तो जाणून होता. जितके दिवस गैस चालू राहणार तोवर ठीक आहे पण नंतर पर्यायी स्त्रोताची सोय करावी लागणार ह्याची त्याने नोंद केली. त्यानंतर त्याच्या विचाराची गाडी पाणी आणि वीज पुरवठ्याकडे वळली. ह्याही गोष्टी एकदा का बंद पडल्या की आपली हालत खराब होणार हे तो जाणून होता. वीजपुरवठ्यासाठी जनरेटर हा एक दुसरा पर्याय उपलब्ध आहे ह्याची त्याला आठवण झाली. हे सर्व विचार येता त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. गावात जीवन स्वावलंबी असते हे तो ऐकून होता. इथे जास्तच प्रश्न निर्माण झाले तर गावात जाऊन राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे ह्याचीही त्याने नोंद घेतली. हे सारे विचाराचे थैमान सुरु असताना आपल्या बायको, मुलाची त्याला अचानक आठवण आली आणि त्याने तो कासावीस झाला. असाच काही वेळ त्याला नैराश्याने ग्रासल्यावर तो पुन्हा सावरून बसला. प्रसंग कितीही बाका असला तरीही असे हातपाय गाळून चालणार नाही ह्याचीसुद्धा त्याने नोंद केली. शहरातील मुलभूत गरजा भागविणाऱ्या यंत्रणामध्ये एक प्रश्न होता. ह्या सर्व यंत्रणा सुरळीतपणे चालु  ठेवण्यासाठीसुद्धा एका सुनियोजित व्यवस्थापकीय प्रणालीची गरज होती. ह्यातील एखादा दुवा जरी निखळून पडला तरी पूर्ण यंत्रणाच कोलमडून पडणार होती. त्यामुळे गावात जाणे किंवा शहरातीलच सभोवताली अंगण वगैरे असलेल्या बंगल्याचा शोध घेणे अशा पर्यायांचा विचार करण्याची त्याने नोंद केली.
इतका सर्व विचार केल्यावर स्वतःचे काहीसे लाड करून घ्यावेत असे त्याला वाटू लागले. मग त्याची गाडी आणि स्वारी मॉलकडे वळली. मेरवानचे दार फोडताना त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने त्याला क्षणभर रोखले होते परंतु आता मात्र असा काही प्रश्न आला नाही. गाडीबाहेर पडतानाच हत्यार घ्यायला तो विसरला नव्हता. एकंदरीत अशी दार फोडताना कमीत कमी हानी कशी करावी ह्याचे तंत्र विकसित करावे अशी मनातल्या मनात त्याने नोंद केली. मॉलच्या सुरुवातीलाच J C Penny चे सुंदर दुकान होते. त्यातील महागातील महाग असे टी शर्ट आणि जीन्सची विजार त्याने उचलली. कपडे बदलण्याची खोली कुठे असावी असा विचार त्याच्या मनात आला पण तो क्षणभरच. अशा प्रकारे नव्या कपड्यात स्वतःला सजवून घेतल्यावर त्याने आरशातील आपले रूप न्याहाळले आणि स्वतःच स्तुती करीत तो मॉलमधील दुसऱ्या दुकानाकडे वळला. Barnes and Noble चे प्रशस्त दुकान त्याच्यासमोर होते. त्याचे दार अधिक सुदैवी होते! त्याची कमीत कमी हानी करून आलोक त्यात शिरला. जर पृथ्वीवर दुसरा कोणी सजीव / मनुष्य अस्तित्वात  असेल तर त्याला  शोधण्यात इंटरनेट हा आपला मुख्य आधार असल्याचे तो जाणून होता. त्यामुळे त्याने संगणक क्षेत्राच्या कक्षाकडे आपली पावले उचलली.
डायनाने थोडासा विचार केल्यावर घरात पडलेल्या एका मस्त चित्रपटाच्या DVD चा आनंद लुटला. तो चित्रपट पाहताना तिने फ्रीजमधील पिझ्झा मायक्रोवेव मध्ये गरम करून हादडलाही! दुपारनंतर गुगल, फेसबुक (हो फेसबुक अजूनही आपले अग्रगण्य स्थान टिकवून होते. ) ह्या संकेतस्थळांना कोणी भेट देत आहे का हे शोधून काढण्याचा मार्ग कोणता हे शोधून काढण्याचे तिने ठरविले. अनपेक्षितपणे मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याच्या ह्या अनुभवावर ती एकंदरीत बेहद खुश होती.
 

आभास - भाग २डायनाने सकाळी उठून लॉर्डसवर क्रिकेट सामना पाहण्याचे ठरविले होते. सकाळी पाच वाजताच उजाडत असल्याने तिची झोप काहीशी खंडित झाली होती.  अशा प्रसन्न सकाळी तिने एक फेरफटका मारायचे ठरविले. फेरफटका मारताना नेहमी दिसणारी माणसे न दिसल्याने तिला काहीसे चुकचुकल्या सारखे झाले. परंतु सकाळचे प्रसन्न वातावरण तिला त्या विचारावर जास्त लक्ष देण्यापासून परावृत्त करीत होते.
आलोक धावत धावत परत आपल्या घरात आला आणि त्याने केबल टीव्ही सुरु केला. बातम्यांच्या सर्व वाहिन्या ठप्प झाल्या होत्या. मग त्याने चित्रपटांच्या वाहिन्यांकडे मोर्चा वळविला तिथे मात्र चित्रपट चालू होते. त्यामुळे त्याला थोडा दिलासा मिळाला. परंतु त्याच्या संशयी डोक्याने पुन्हा उचल खाल्ली. अरे हे तर थेट प्रक्षेपण नाहीये. ही सर्व माणसे जिवंत असल्याचा पुरावा कुठाय? मग तो धावपळीने संगणकाच्या दिशेने पळाला. संगणकावर पुन्हा तेच, एकही मित्र कुठेच ऑनलाईन नव्हता . वर्तमानपत्राच्या इंटरनेट स्थळांवर सुद्धा शेवटचा अपडेट पाच तासापूर्वीच दाखविला जात होता. आता मात्र आलोकचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. त्याला आता एका जिवंत माणसाच्या अस्तित्वाच्या पुराव्याची आवश्यकता निकडीने भासू लागली होती. पण भुकेच्या जाणीवेने त्याचे लक्ष विचलित होत होते. बायकोच्या कटकटीकडे लक्ष देवून किमान चहा तरी बनविण्याचे शिकलो असतो तर बरे झाले असते असे त्याला वाटून गेले. परंतु आता इलाज नव्हता. मग त्याने खाली उतरण्याचे ठरविले.  बऱ्याच दिवसाने त्याने आपली कार बाहेर काढली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे चहाच्या सर्व टपऱ्या (हो २१३४ मध्ये मुंबई कितीही बदलली असली तरी चहाच्या टपऱ्या मुंबईकरांच्या चहाप्रेमामुळे शाबूत होत्या. ) बंदच होत्या. मग त्याला एक मेरवान बेकरी दिसली. ह्यातील सुंदरपणे मांडून ठेवलेल्या केक, पेस्ट्रीकडे त्याने कितीवेळा पाहिले होते परंतु वेळ नसल्याने त्याने कधी तिथे आपला मोर्चा वळविला नव्हता. आज मात्र तसे पाहिले तर त्याच्याकडे वेळचवेळ होता. तो गाडी पार्क करून उतरला. गाडी पार्क करताना मोठ्या आशेने त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क केली. एखाद्या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने आपल्या गाडीला बघून थांबावे अशी वेडी आशा त्यामागे होती. मेरवानच्या दाराशी येवून त्याच्या काचेतून त्याने एका चविष्ट दिसणाऱ्या केकची निवड केली. हाच केक आपण विकत घेवूया असा त्याने विचार केला. मग त्यातील विकत ह्या शब्दावर तो थबकला. दरवाज्यावर येवून तो थांबला. दरवाजा तर लॉक होता. आतापर्यंत आलोकचा मेंदू ह्या स्थितीला सरावला होता त्याने शांतपणे आपल्या गाडीकडे परत जावून आपली हत्याराची पिशवी आणली आणि एका फटक्याने दरवाजा तोडला. सर्व सुरक्षा भोंगे एकदम वाजू लागले. अलोक मोठ्या आशेने सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाट पाहू लागला जसे की चित्रपटात येणाऱ्या ! परंतु ते काही येणार नाहीत हे तो पक्के जाणून होता. मग शांतपणे आपल्याला हवे ते केक खात तो आपल्या मनात येणाऱ्या विचारांच्या थैमानाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होता. 

Saturday, May 4, 2013

आभास - भाग १सन २१३४
मानवाने आपल्या प्रगतीची अधिकाधिक शिखरे गाठली होती. साधारणतः १०० - १२५ वर्षांपूर्वी जी भ्रष्टाचार, अतिरेकी, महागाई, बेफाम लोकसंख्यावाढ, धर्मवेडे ह्यांची अनागोंदी माजली होती ती बुद्धिवंतांनी हुशारीने नियंत्रण आपल्या हाती घेवून आटोक्यात आणली होती. हे सर्व कसे साधले गेले ह्याचा अभ्यासू लोकांना बराच अचंबा वाटत होता. बुद्धिवंतांनी जैविक शास्त्रातील प्रगतीच्या आधारे मनुष्यातील द्रुष्ट विचार निर्माण करणाऱ्या मेंदुंतील पेशींचा नाश केला असावा अशी वदंता होती. परंतु हे सर्वच अभियान इतक्या गुप्तपणे आणि पुरावा न ठेवता राबविले गेले की त्याविरुद्ध कोणीच काही बोलू शकत नव्हते.
राष्ट्रांनी आपल्या संरक्षण खर्चात ९९.९९ टक्के कपात केली होती. चान्दोबा मासिकासारखी सुंदर गावे जगभर निर्माण केली गेली होती. साक्षरेतेचे प्रमाण ९९.९९ टक्क्यावर आले होते. जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाच्या भविष्यातील अभ्यासक्रमांची, व्यवसायाची तरतूद जन्मतःच केली जात होती. संस्कार शिबिरांना गावात, शहरात सर्वत्र स्थान होते. कृषीव्यवसायाला जगभर मानाचे स्थान प्राप्त झाले होते. संगणक, इंटरनेट ह्यांचे नवीन पिढीतील खूळ बरेच कमी झाले होते.
आलोक आपल्या ठाण्याच्या घरावरून बेस्ट बसने आपल्या दादरच्या कार्यालयाकडे निघाला होता. वाहतूककोंडी हा प्रकार ह्या पिढीला माहित नव्हता. ९ ते ६ ह्या वेळात कार्यालयातील काम आटपून तो वेळच्या वेळी घरी परतत होता. जीवनातील ही घडी अशीच राहू दे हे जुने गाणे तो आणि त्यावेळचे बरेच लोक फुरसतीच्या वेळी गुणगुणत असत.
डायना आपल्या ससेक्स, होव इथल्या घरातून ब्रायटन मधल्या कार्यालयाकडे चालत चालली होती. मे मधले इंग्लंडमधील आल्हाददायक वातावरणात तिचा मूड एकदम बनून गेला होता. आपला मित्र जॉनशी आदल्या दिवशी झालेले भांडण ती विसरून सुद्धा गेली होती.
आपला दिवस आटपून आलोक घरी परतला होता. पत्नी, मुलांसमवेत गुणात्मक वेळ घालवून तो १० वाजता निद्राधीन झाला होता. रटाळ, निरर्थक अशा मालिकांवर ५० वर्षांपूर्वी बंदी आल्याने मानवांच्या झोपेच्या कालावधीत सरासरी दीड तासांची वाढ झाली होती.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचच्या सुमारास आलोकला जाग आली. बिछान्यावर बाजूला पत्नी नव्हती हे पाहून त्याला काहीसे नवल वाटले. तो हळूच उठून मुलांच्या खोलीत आला. मुलेही तिथे नव्हती आता मात्र आलोक दचकला. त्याने पटापट पूर्ण घराची तपासणी केली. परंतु तिथे कोणीच नव्हते. त्याने पटापट आपल्या सासरचा फोन लावला. तिथे कोणीच फोन उचलला नाही. तो पटापट कपडे चढवून खाली उतरला. बिल्डींगचा रखवालदार जागी नाही हे पाहून त्याचे पित्त खवळले. अशा शिस्तबद्ध जीवनात आज हे काय चालले आहे हे त्याला न कळल्याने त्याचा मेंदू दचकुन गेला होता. बिल्डींगबाहेर आल्यावर पण अशीच परिस्थिती होती. गेल्या दहा मिनिटात आपल्याला एकही माणूसच काय पण एकही सजीव दिसला नाही ह्याची जाणीव व्हायला त्याला फारसा वेळ लागला नाही.
 

Thursday, May 2, 2013

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - अंतिम भागह्या लेखमालिकेतील दुसरया भागाचा शेवट ह्या क्षेत्रात पाच सहा वर्षे काढलेल्या एका पारंपारिक मनोवृत्तीच्या भारतीय व्यावसायिकाच्या उदाहरणाने केला होता. ह्या व्यावसायिकास विविध कारणांमुळे आज्ञावली लिहिणे नकोसे होऊ लागते. ह्या सर्व प्रकारात ज्या प्रकारची प्रोजेक्ट तुमची कंपनी घेत असते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. समजा कंपनीकडे बहुतांशी प्रोजेक्ट अशी आहेत ज्यात अनुभवी , आज्ञावलीतील खाचाखोचा माहित असलेल्या लोकांची गरज नाही, तर मग साहजिकपणे त्या कंपनीच्या दृष्टीने अनुभवी माणसांचे महत्व कमी होते. एकंदरीत चाणाक्ष व्यावसायिक ह्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मग वेगळे पर्याय निवडतो. ह्यात नवीन येणाऱ्या प्रोजेक्टसाठी प्रपोजल लिहिणे, ऑडीट / सेल्स टीम मध्ये सहभागी होणे, किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये डीलीव्हरी मनेजर होऊन बसणे ह्या प्रकारांचा समावेश होतो. आता खरी मेख अशी आहे की वरील उल्लेखलेल्या भूमिकांमध्ये चपलख बसण्याचे गुण काही माणसांत निसर्गतःच असतात. ती माणसे ह्या भूमिकांत आनंदी राहतात परंतु काहीजण असे असतात ज्यांनी लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त काही केले नसते आणि ह्या व्यवसायातसुद्धा आज्ञावली लिहिणे हे सुद्धा एक अभ्यासाचेच व्यापक रूप आहे. अशा लोकांना वरील भूमिका निभावणे कठीण होऊ लागते. केवळ मेहनतीच्या जोरावर ह्या भूमिकांतील यशाच्या व्याख्या काबीज करणे त्यांना कठीण जाते आणि मग त्यांची ह्या भूमिकांमध्ये कुतरओढ होत राहते. 
एकंदरीत हे सर्व मुद्दे मांडण्याचा हेतू असा की आतापर्यंतचे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले यश आपणास काहीसे आपसूक मिळाले आहे. ह्यात कंपन्या आणि व्यावसायिक हे दोन्ही आनंदी आहेत. परंतु आता ह्या अनुभवी मनुष्यबळाची योग्य काळजी घेणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. हा प्रश्न पाहिले तर अजून गंभीर होत जाणार. आज मोठ्या कंपनीमध्ये  जवळपास दोन लाख व्यावसायिक आहेत. दहा वर्षांनी ह्या सर्वांना व्यवस्थापक पदे मिळणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तितक्या व्यावसायिकांनी खोलवर ज्ञान मिळविणे अत्यावश्यक आहे. हे क्षेत्र तसे कठोर आहे. इथे २० : ८० नियम लागू होतो. वीस टक्के लोक ८० टक्के महत्वाचे काम करतात आणि बहुदा ह्या लोकांनाच खुश ठेवले जाते. अजून एक गोष्ट, ह्या क्षेत्रात सतत कामगिरी उंचाविण्याचे तुमच्यावर दडपण असते. त्यामुळे बढती मिळून जर तुम्ही वरच्या जागी गेलात आणि दुर्देवाने तिथले काम जमले नाही तर तुम्हांला बहुदा बाहेरचे दार दाखविले जाते. 
ह्यात अजून एक पर्याय उपलब्ध आहे. साधारणतः १५ - २० वर्षे ह्या क्षेत्रात नोकरी केल्यावर दुसर्या एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या शांत क्षेत्राची निवड करणे. तितकी प्रगल्भता आपण जोपासणे आवश्यक आहे. 
असो एकंदरीत ही लेखमालिका इथेच आटोपती घेतोय. ह्या लेखाचा मुख्य रोख मोठी स्वप्ने बाळगून ह्या क्षेत्रात शिरणाऱ्या नवीन पिढीकडे आहे. हे क्षेत्र अजूनही फायदेशीर आहे परंतु सरधोपटपणे सर्वांना यश मिळण्याचा काळ मागे पडला आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतेचे, गुणवत्तेचे व्यवस्थित मूल्यमापन करून ह्या क्षेत्रातील आपले करीअर नियीजन करणे अत्यावश्यक बनले आहे. 
समाप्त