Saturday, May 17, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ३


सिमल्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहताना दुसरा दिवस काहीसा दमवणूक करणारा ठरला होता. आणि तिसऱ्या दिवशी मनालीचा २७५ किमीचा पल्ला गाठायचा होता. दोन दिवसात हॉटेल डॉन मध्ये काही प्रमाणात संसार मांडला होता. हा संसार रात्रीच सावरून बॅगात भरायचा की सकाळी उठून भरायचा ह्यावर चर्चा करतानाच झोप लागल्याने आपसूकपणे दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता.
६ मे! लग्नाचा १३ वाढदिवस! पाच सव्वापाचला उठून बॅगा भरतानाच घरच्यांनी अभिष्टचिंतनाचे फोन करण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे लग्नाला इतकी वर्षे झाली ह्यावर विश्वास बसत नव्हता. बॅगा पावणेसात वाजता खोलीबाहेर काढून ठेवायच्या होत्या. निद्रामोड कॉलमध्ये ह्याचीसुद्धा आठवण करूनदेण्यात आली होती. बॅगा भरण्याची जबाबदारी प्राजक्ताकडे असल्याने त्यात लुडबुड न करणे आणि तिने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करणे हे आम्ही दोघे व्यवस्थित पार पाडत होतो. शेवटी तिघांच्या आंघोळी आटपून बॅगा सहा पन्नासला खोलीबाहेर निघाल्या तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आदल्या दिवशी सकाळी वळणावळणाच्या रस्त्यांचा ज्यांना त्रास झाला होता त्या बालकांच्या मातांनी आपापसात सुसंवाद साधला होता आणि विविध सिद्धांत मांडले होते. सोहमने जास्त जड ब्रेकफास्ट करू नये, हलकेच खावे असा काहीसा निष्कर्ष निघाला होता. सोहमने सुद्धा ह्या प्रकाराचा इतका धसका घेतला होता की त्याने केवळ सुक्क्या कॉर्नफ्लेक्सवर आपला नास्ता आटोपला. त्याच्यासमोर पराठे, दही वगैरे वगैरे खाताना माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. परंतु कर्तव्य पार पाडायचं म्हणून आम्ही हा नास्ता मनसोक्त भक्षण केला!! एक सांगायचं राहून गेलं, वीणा वर्ल्ड तर्फे सर्वांना फराळाची एक मोठी पिशवी आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यात बाकरवडी, डाळ, बिस्किटे, डिंक लाडू अशा मनाचा संयम ढळवू पाहणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश होता. हे सर्व खायचं तरी कधी हा आम्हांला पडलेला प्रश्न! आणि हो डिंकाचा लाडू स्नो पॉइंटला गेल्यावरच मग खा असा अनुभवी सल्ला द्यायला आदित्य विसरला नाही.
सिमला सोडण्याची वेळ आली होती. गणपतीबाप्पा, उंदीरमामांचे स्मरण करून प्रवासास सुरुवात झाली. बिसलेरीच्या बाटल्यांसोबत गोळ्या, प्लास्टिक बॅगाचाही पुरवठा करण्यात आला होता.
सिमला शहर तसे सुरेख! थंड हवामान आणि उंच डोंगरात जमेल तशा एकमेकाला खेटून उभारलेल्या इमारती. पण ह्यात माणसानं निसर्गाला ओरबाडून खरं सौंदर्य नष्ट केल्याची भावना माझ्याच नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण होत होती. सिमल्यात आदल्या दिवशी पाहिलेल्या ठिकाणात निसर्गाशी थेट नाते जोडणारे ठिकाण म्हणजे फक्त हिमालयीन झू हेच होतं. बाकी सर्व व्यापारीकरणाचे प्रकार! असे असलं तरी सिमला सोडताना काहीशी चुकचुकल्यासारखी भावना होत होती. ऋणानुबंध केवळ माणसांशीच जुळत नाहीत तर ते वास्तू, स्थळे ह्यांच्याशी सुद्धा जुळतात हे आपण अधूनमधून अनुभवत असतो, त्यातलाच हा एक प्रसंग!
आदित्य खिडकीतून दिसणाऱ्या ठिकाणांची अधूनमधून माहिती देत होता. असंच सिमल्याच्या विमानतळाविषयी सुद्धा त्याने माहिती दिली. ह्या विमानतळाचा कारभार हवामानामुळे कसा बेभरवशाचा आहे आणि विमानाची तिकिटे विना -परतावा (non-refundable) असतात हे सांगितलं.
प्रवास चालू होता. क्रमांक १ च्या बालकाची विकेट पडली होती. त्यामुळे बसच्या मागील भागात थोडी गडबड उडाली होती. सुदैवाने मागची मोठी सीट रिकामी होती आणि त्यामुळे काही प्रवाशांचे तिथे स्थलांतर होऊ शकले. प्लास्टिक पिशव्यांसोबत जुन्या पेपरची रद्दी सुद्धा बसमध्ये असायला हवी हा धडा आम्ही शिकलो.
रस्त्याला एका बाजूला ड्रायव्हरला मॅकेनिकचे दुकान दिसलं. बसच्या चाकांना ग्रीस लावायचं केव्हापासून त्याच्या मनात घोळत असावं. त्यामुळे तिथे बस थांबविण्यात आली.
काहीशा दहशतीच्या वातावरणात बसलेली बालके ह्या संधीचा फायदा घेऊन तत्काळ बसमधून बाहेर उतरली. माझं वाहनांविषयीच ज्ञान अगाध! त्यामुळे वाहनांच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा सुरु झाली की मी एकतर त्यापासून चार हात दूर राहतो किंवा जी जाणकार मंडळी बोलत असतात त्यांच्या ज्ञानाची सतत मान डोलावून दाद देत राहतो. इथे डोंगरावरील रस्ता असल्याने पहिल्या पर्यायाला फारसा वाव नव्हता, म्हणून मी दुसऱ्या पर्यायासोबत मानेचे व्यायाम झाल्याचे समाधान करून घेत होतो. इतक्यात आमच्या चौकस सौंचे लक्ष बाजूला बांधकामासाठी आणून टाकलेल्या वीटाकडे गेले. तिच्यातील जाणकार जागा होऊन ह्या विटांच्या कणखरपणाविषयी तिने सहप्रवाशांना दोन शब्द सांगितले. बसच्या चाकांना लावण्यात येणाऱ्या ग्रीसच्या दीर्घ कार्यक्रमाला वैतागलेली मंडळी  तत्काळ इथे आली. त्यामुळे जोशात येऊन मला आणि कुलकर्णी ह्यांना ह्या विटा उचलण्याची विनंती करण्यात आली. आम्हीसुद्धा ह्या विटा आपल्या महाराष्ट्रातील विटापेक्षा चांगल्याच जड आहेत असे बळेच सांगितले. आता महाराष्ट्रातील वीट मी शेवटी केंव्हा उचलली असेल हे देव जाणो!
असो ह्या वीट प्रकरणाचा पुरावा म्हणून केलेलं हे जबरदस्त छायाचित्र! ह्यालाच जबरदस्ती छायाचित्रण असेही म्हटले जाते. छायाचित्रातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभावावरून जाणकारांनी निष्कर्ष काढावाच!







थोड्या वेळाने हे ग्रीस आणि विटा प्रकरण आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये शिरलो. रस्त्याच्या कडेने स्थानिक लोकांची देवाची पालखी जात होती. पालखी घेवून जाणारे सेवेकरी आपल्या खांद्याच्या हालचालीने पालखीला एक विशिष्ट गती प्राप्त करून देत होते.




 

त्यानंतर थोड्याच वेळात चहापानाचा ब्रेक आला. आतापर्यंत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, केवळ वॉश बेसिन ह्या प्रकाराचा अभाव. जे काही वॉश बेसिन असायचं ते टॉयलेटच्या बाहेर असायचं. हा मला काहीसा खटकणारा प्रकार. परंतु इलाज नव्हता. आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल मंडळी बसमधून उतरायच्या आतच किती चहा, कॉफी आणि शीतपेय ह्याची मोजणी करून घेत आणि त्यानुसार झटपट व्यवस्था करीत. त्यांचे कौतुक करावे तितकं थोडं!


चहापानानंतर आदित्य आणि अमोल ह्यांनी बसला दोन गटात विभागलं. आणि अंताक्षरीचा खेळ सुरु झाला. पुढील अर्धा भाग 'अ' गट आणि मागचा अर्धा भाग 'ब' गट. सोहम आणि प्राजक्ता 'अ' गटात आणि मी 'ब' गटात अशी काहीशी धर्मसंकट निर्माण करणारी परिस्थिती उद्भवली. 'अ' गटात श्री. चुरमुरे, त्यांचा मुलगा अद्वैत ह्यांच्याकडे अनुक्रमे जुन्या आणि नवीन गाण्यांचा चांगलाच खजाना होता. प्राजक्ताने सुद्धा गेल्या काही वर्षात  विकसित केलेल्या आपल्या जुन्या गाण्यांच्या जाणकारितेचा प्रत्यय आणून दिला. आमच्या गटात सौ. कुलकर्णी ह्यांनी आपल्या सुमधुर सुरात पूर्ण गाणी गाऊन प्रवाशांना मंत्रमुग्ध केले. सौ. वेळासकर, मोरे मॅडम ह्यांनी सुद्धा गाण्यांचा चांगला पुरवठा केला. 'ब' गटाने अगदी ६० - ७० च्या काळापासूनची सुंदर गाणी गायली. परंतु 'अ' गट त्याबाजूला काहीतरी गुणगुणे आणि 'ल' हे अक्षर 'ब' गटाला आणून देई. मी दोन वेळा 'लाजून हासणे' आणि 'लुंगी डान्स' (इथे थोडी फसवेगिरी करीत) भेंडी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु 'ल' ह्या अक्षराच्या सततच्या माऱ्यापुढे आम्ही हतबल झालो. आणि हा हा म्हणता आमच्यावर तीन भेंड्या चढल्या. परंतु पूर्ण गाणी म्हणणे, गाण्याचा दर्जा पाहता आमच्या संघांची कामगिरीच श्रेष्ठ होती असे म्हणावं लागेल. आणि आदित्य 'अ' गटात असल्याने अमोल त्याला 'दादा' 'दादा' म्हणत त्याचेच ऐके. ह्याचासुद्धा अंतिम निकालावर परिणाम झाला. 

दहा ते एक असे तीन तास भेंड्या खेळल्यावर दुपारच्या भोजनाचे ठिकाण आले. ह्या भेंड्यामुळे सहप्रवाशी एकत्र येण्यास खूप मदत झाली. औपचारिकतेची उरलीसुरली बंधनं गळून पडली. आणि हो बालकांचे लक्ष उलटीच्या प्रकारापासून विचलित होण्यास बराच फायदा झाला. 

दुपारच्या जेवणाचे ठिकाण बरेच प्रशस्त होते. इथे केवळ शाकाहारी जेवण होते. परंतु आजूबाजूच्या भव्य परिसरामुळे मस्त वाटलं. भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी फोटो काढला पाहिजे ह्या शिरस्त्यानुसार इथेही थोडीफार फोटोग्राफी झालीच. हल्ली ब्लॉगला उपयोगी पडेल म्हणून मीसुद्धा फारसा विरोध करीत नाही. 







भरपेट जेवण करून सुस्तावलेल्या देहांना 'वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड' ह्या घोषाने जड पावलानी बसकडे येण्यास भाग पाडलं.  ह्यापुढील रस्ता खरतर अगदी निसर्गरम्य होता आणि त्याचप्रमाणे अगदी धोकादायक वळणावळणाचा सुद्धा. राठी आणि  वेळासकर ह्यांच्या छोट्या मुली एकमेकींच्या खास मैत्रिणी. त्यांच्या मजेशीर बोलण्याने बस जागी रहात असे. परंतु इतक्या दीर्घ प्रवासात त्यांनी झोपावं म्हणून त्यांच्या मातांनी त्यांना बळेच झोपवलं. ह्या प्रवासात सतलज, बियास ह्या दोन मोठ्या नद्या आपल्या भव्य दर्शनाने आमचे मन मोहवून टाकत होत्या. त्यांची ही काही छायाचित्रे!



 

मग एका अरुंद ठिकाणी मेंढ्यांच्या समूहाने आमचा रस्ता अडवला. धावत्या बसमधून काढल्याने फोटोच्या दर्जात थोडी घसरण जाणवेल परंतु ह्या फोटोवरून आमच्या छायाचित्रणाच्या कौशल्याविषयी निष्कर्ष काढण्याची घाई करू नये!!









मध्येच एक अंदाजे तीन मिनिटांचा एक बोगदा येवून गेला.  अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करताना सर्वांनी अपेक्षेप्रमाणे आरडओरडा केला. आता ह्या ठिकाणी आम्ही छायाचित्रे का काढली नाहीत अशी शंका सुज्ञ लोकांच्या मनात आली असल्यास ती रास्त आहे इतकेच मी म्हणू इच्छितो. बाकी आदित्याच्या म्हणण्यानुसार हा उत्तर भारतातील / भारतातील / आशियातील (ह्यातील योग्य पर्याय निवडा) किमान क्ष मीटर उंचीवर असलेला सर्वात लांब बोगदा होता. 

बाकी आमचे छायाचित्रण सुरूच होते. काही चित्रात (जसे की ह्या) निसर्गासमवेत एखादी पांढरी आकृती दिसल्यास तो कोणी परग्रहवासी वगैरे असल्याचा संशय मनात येऊन देऊ नये. आमच्या समोरच्या सीटवर घातलेलं कव्हर असंच अधूनमधून फोटोत दिसत राहणार!  


एव्हाना आम्ही कुलूच्या आसपास येऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या प्रदेशाच्या सौंदर्याने मी भारावून गेलो होतो. हिमालयाची आकाशाशी स्पर्धा करणारी शिखरे, त्यातून आपला मार्ग शोधणारा वळणावळणाचा रस्ता. रस्त्याच्या कडेला असणारी जीवनरसाने मुसमुसलेले हिरवेगार उंच डेरेदार वृक्ष आणि मधूनच दिसणारी इवली इवली घरे!  ह्या गावांतून राहणाऱ्या लोकांकडे नुसतं बसमधून जरी पाहिलं तरी त्यांच्या मनातील जीवनाविषयी संतृप्तता कशी जाणवते! जीवन जगावं तर ते आपल्या आणि निसर्गाच्या मर्जीनुसार! उगाचच आर्थिक प्रगतीच्या भ्रामक संकल्पना निर्माण करून त्याच्या मागे धावत धावत आपली शांतता गमावून बसण त्यांना मंजूर नसावं.  



पार्वती आणि बियास ह्या दोन नद्यांच्या संगमाचे हे छायाचित्र!






आता आम्ही कुलू शाल फॅक्टरीत येवून पोहोचलो होतो. अगदी उंच पर्वतांनी वेढलेल्या अशा विभागात असणाऱ्या सपाट भागात ही शाल फॅक्टरी आहे.


प्रथम तिथल्या एका महिलेने आम्हाला शाल विणण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याची ही चित्रफीत. तिच्या पायाखाली चार पट्ट्या होत्या. डावा पाय एक आणि तीन क्रमांकाच्या पट्ट्यांवर आणि उजवा पाय दोन आणि चार क्रमांकाच्या पट्ट्यांवर ती आळीपाळीने दाबत होती.








ह्या प्रात्यक्षिकानंतर प्रत्यक्ष खरेदीची वेळ होती. तिथे उत्तमोत्तम शाली, स्वेटर्स, जैकेट्स विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ह्या खरेदीला विशिष्ट वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर चहा देण्यात येणार होता. वेळेच्या बाबतीतील  ही शिस्त मला खूपच भावली. तुम्हांला एका विशिष्ट वेळेत खरेदीचा निर्णय घेत यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या दुकानात असणाऱ्या वस्तू दर्जा, विविधता, किंमत ह्या बाबतीत एका विशिष्ट रेंज (पट्ट्यात) मध्ये असतात. पहिला निर्णय म्हणजे ह्या रेंज मधील गोष्ट खरेदी करायची आहे की नाही हा घ्यायचा असतो. नसेल घ्यायची तर आपला, दुकानदाराचा आणि आपल्या सोबतच्या लोकांचा उगाच वेळ घालवू नये. आणि समजा खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर एक लक्षात ठेवावे एक त्या रेंजमधील सर्वात उत्तम गोष्ट आणि सर्वात खराब गोष्ट ह्यात काही फारसा फरक नसतो. निर्णय घेण्यातील चोखंदळपणा आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाच्या बाबतीत जमला तर दाखवावा!

असो वीस मिनिटात तीन शाली घेऊन आम्ही बाहेर पडलो. ह्यानंतरच्या प्रवासातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे ही माझ्या पामराच्या आवाक्यातील गोष्ट नव्हे. एव्हाना हिमाच्छादित शिखरे काहीशी जवळून दर्शन देऊ लागली होती. सफरचंदाच्या झाडांचे जवळून दर्शन होऊ लागले होते. ह्या सफरचंदांचे दोन प्रकार, रॉयल आणि गोल्डन. ह्या दोन प्रकारातील एक निर्यात केला जातो. आता नक्की कोणता हे जरी आदित्य / जितेशने सांगितलं असलं तरी मला आठवत नाही. मध्येच गुलाबाची फुलांनी अगदी बहरून गेलेली झाडं डोळ्याला अगदी सुखावून जायची. एका झाडावर इतकी फुले असू शकतात हे पाहून मन थक्क होऊन जायचं. 











असाच एक स्वर्गीय अनुभव देणारा प्रवास चालू असताना अचानक आमचं हॉटेल आलं. हे मनालीच्या बाहेरील भागातील हॉटेल होते. आजूबाजूला साधं गाव होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मेला हिमाचल मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. तरीही गावातील शांतता अगदी वाखाणण्याजोगी होती. आमची आणि बऱ्याच जणांची खोली चवथ्या मजल्यावर होती. पुन्हा एकदा जड बॅगा थेट खोलीत पोहोचविणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार मानावे तितके थोडे!

चौथ्या मजल्यावरील खोलीतून समोर दिसणारा नजारा जबरदस्त होताच. पण त्याहून जबरदस्त होता तो मार्गिकेतून दिसणारा हा हिमाच्छादित शिखरांचा आणि त्यातून जमिनीकडे धाव घेणाऱ्या ह्या सरितेचा! त्यातच हे गाव वसलं होतं. नंतर संध्याकाळी ह्या गावातील घरांतील मिणमिणते दिवे आणि रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे दिवे ह्याचे दृश्य मनःपटलावर कायमचे राहील. 

रात्रीचे जेवण देखील वैविध्यपूर्ण होते. हॉटेलचे नाव होते सार्थक रिसोर्ट! सहलीचा हा तिसराच दिवस होता पण ही सहल, हे वातावरण ह्यामुळे एकंदरीत खरोखर ही ट्रीप सार्थक वाटत होती. आयुष्यातील एक अविस्मरणीय सहल म्हणून ही लक्षात राहील ह्याचे आतापासूनच नक्की वाटायला लागलं होतं. आपल्या भारतमातेचा अभिमान द्विगुणित झाला होता. एकंदरीत एका प्रसन्न मनःस्थितीत मनालीच्या पहिल्या रात्री आम्ही निद्राधीन झालो. पुढील तीन दिवसाच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता मनात भरली होती. बऱ्याच दिवसांनी मनात खऱ्याखुऱ्या आनंदाचं भरत आलं होतं. 

(क्रमशः)

Monday, May 12, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग २


सकाळी जाग आल्यावर खिडकीबाहेर नजर गेली तर फटफटीत उजाडलं होतं. मी दचकून जागा झालो, निद्रामोड कॉल करायला मंडळी विसरली की काय अशी शंका मनात डोकावली. घड्याळात पाहिलं तर साडेपाचच वाजले होते. त्यामुळे थोड्या बिनधास्तपणे आम्ही आंघोळ वगैरे आटपून घेतली. नियोजित वेळी साडेसातला आम्ही नास्त्यासाठी हजर झालो. तिथे पोहे, प्रिय मित्र आलूची आमटी आणि भटुरे असा मोहविणारा बेत होता. आलुचा अतिरेक आता सर्वांना जरा खटकायला लागला होता. पोटभर नास्ता करून आम्ही बाहेर पडलो. बस निघायला अजून थोडा वेळ होता. बाहेरच आम्हांला पुण्याचे जतिन चुरमुरे कुटुंबीय भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना ते मुळचे वसईचे असल्याचे कळले. गावचा माणूस भेटल्याने मला खूप आनंद झाला.
सव्वा आठ वाजता आम्ही प्रयाण केले. आज सकाळी आमच्या बसमध्ये आदित्य भोईटे हे व्यवस्थापक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिल्लीहून येणारा ग्रुप बसने आणला होता. काही कारणामुळे त्यांच्या बसला उशीर झाल्याने तो गट रात्री बाराच्या सुमारास हॉटेलात पोहोचला होता. तरीसुद्धा तो ग्रुप सकाळी वेळेवर हजर होता. चंदीगडहून आणि दिल्लीहून आलेल्या अशा दोन गटाच्या बसेस बरोबरीने नाल्देहरा गोल्फ कोर्सच्या दिशेने सुटल्या.


प्रत्येक वेळी बस सुटताना बस व्यवस्थापकाच्या बरोबरीने आम्ही
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
उंदीर मामा की जय!
असा घोष करीत असू.


गोल्फ कोर्सचा प्रवास अगदी वळणावळणाचा होता. भरपेट न्याहारी केलेल्या बालकांना ह्या वळणावळणाच्या रस्त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बालकांभोवतीचा भाग अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला. पूर्व दक्षता म्हणून घेतलेल्या गोळ्यांचा काहीजणांना फायदा झाला तर काहींना नाही.  व्यवस्थापकांनी सर्वांना प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा करून ठेवला होता. इतक्या उंचीवर संतुलितपणे गाडी हाकण्याचे ड्रायव्हरचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.








शेवटी एकदाचे आम्ही  नाल्देहराला पोहोचलो. तिथला इतिहास सांगणारा हा बोर्ड!


गोल्फ कोर्सचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते.
इतक्या उंचीवर १ वर्षापूर्वी  गोल्फ कोर्स निर्माण करणाऱ्या ब्रिटिशांचे कौतुक करावे की त्या काळात सामान्य जनतेवर अन्याय करीत असे श्रीमंती चोचले करणाऱ्या त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा अशा मनःस्थितीत मी सापडलो होतो. गोल्फ कोर्सचा प्रत्यक्षातील वापर फक्त सभासदांपुरता मर्यादित असल्याने आम जनतेसाठी तिथे झीपिंगचा प्रकार आयोजित करण्यात आला होता. प्राजक्ता आणि सोहम ह्या दोघांनी ह्या साहसी क्रीडाप्रकारचा आनंद लुटला. ह्या प्रकारात एक हात वरच्या पुलीवर ठेवायचा होता आणि दुसरे टोक आल्यावर हा हात त्या झिप वायरवर आणून वेग नियंत्रित करायचा होता. परंतु काहीजणांना ह्या वायरवर हात आणायच्या भागाचे महत्व न कळल्याने दुसऱ्या टोकाशी त्यांना काही क्षणापुरता उलट्या स्थितीचा अनुभव करावा लागला.











ह्याच ठिकाणी हिमाचलीय पारंपारिक वेशात फोटो काढून घेण्याची सोय होती. हे फोटो रूमपोच केले जाणार होते. त्यामुळे तिथेही उत्साही लोकांची रांग लागली होती. तिथल्या एका हिमाचलीन युवतीच हे छायाचित्र!





वीणा वर्ल्डचा चहा, कॉफीचा आम्ही आस्वाद घेतला. त्यानंतर आम्हांला फ्रुट प्लेटचा (फळ थाळी) सुद्धा आनंद लुटता आला. ह्यात सुद्धा आमचा मित्र बटाटा आल्याचे पाहून आम्ही सर्द झालो. उत्साही गणांनी बटाटा हे फळ आहे काय यावर बौद्धिक चर्चेस सुरुवात केली. 


ह्यानंतर आम्ही पावसाळी वातावरणात आम्ही जंतरमंतर अर्थात Amusement पार्कच्या दिशेने कूच केले. पावसाने जोर पकडला होता. ह्या जंतरमंतर पार्कला जायचा मार्ग अगदीच अरुंद होता. आमच्या कुशल ड्रायव्हरने तो लीलया पार केला आणि आम्हांला तिथे पोहोचवले. पावसामुळे बाह्य विभागातील करण्यासारख्या लीला (Outdoor Activities) जशा की गो कार्टिंग बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे जाणकार बालगोपाल मंडळी नाखूष झाली. ह्याच ठिकाणी दुपारच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. इथले भोजनालय आकाराने काहीसे छोटेसे असल्याने आणि त्याचवेळी केसरीचा अजून एक गट तिथे आल्याने काहीशी गर्दी झाली होती.
आता काहीसं पर्यटकांच्या प्रकाराविषयी. पर्यटकांचे विविध प्रकार असू शकतात हे ह्या सहलीत आम्हांला जाणवलं. २०११ मधील केरळ सहल असो की गेल्या वर्षीची सापुतारा सहल असो, आम्ही एकट्यानेच प्रवास केला होता. ह्या प्रकारात आपण बहुदा उत्तमोत्तम हॉटेल्स बुक करतो, जेवणखाण्याची उत्तम सोय असते. परंतु समुहाचा भाग बनून एखाद्या स्थळाचा आनंद लुटण्याची संधी आपण गमावतो. समूहातील लोकांनी केलेल्या गंमतीजंमती, त्यांचे विनोदी संवाद, काही जणांच्या मजेशीर सवयी ह्यातदेखील धमाल असते हे ह्यावेळी आम्हांला  जाणवलं. त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी सवंगडी मिळतात आणि त्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा कमी होते. त्यामुळे लांब ठिकाणच्या सहलीत आता अशा गटाने प्रवास करण्याकडेच आमचा कल राहील. त्याचबरोबर आमच्या गटातसुद्धा विविध व्यवसायातील यशस्वी माणसे होती. थोडसं निरीक्षण केलं तर प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असं बरंच काही होतं. केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण असे म्हणतात त्यात हा भागही आलाच की! अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा असं काही शेयर करण्याची, काहीशी गैरसोय सहन करण्याची सवय असावयास हवी. नाहीतर अगदी लहानपणापासून त्यांच्यात स्वतःला सर्व काही उत्तमोत्तम मिळावयास हवं अशी जी भावना निर्माण  होते ती पुढे धोकादायक ठरू शकते.
असो पण काही लोक खरोखर एकलकोंडे ह्या प्रकारात मोडतात. त्यांना अनोळखी माणसांचा अगदी जवळचा सहवास फारसा खपत नाही. त्यांनी आपली एकट्याने प्रवास करण्याची सवय कायम ठेवणेच योग्य.
बाह्यलीला बंद असल्याने जंतरमंतर पार्कातील अंतर्गत लीलांकडे मंडळी वळली होती. तिथे ५D राइड, टक्करकार आणि भयमहाल असे तीन प्रकार होते. ह्या प्रत्येक प्रकाराचे वैयक्तिक भाडे २०० रुपये असले तरी वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना सवलतीच्या दरात ह्या तिन्ही प्रकारांची एकत्रित फी ३०० रुपये होती. आता बालक जायचे म्हटले की पालकाला अजिबात इच्छा नसली तरी जावे लागणारच हे ओघाने आलेच की! आमचा प्राधान्यक्रम चुकला आणि आम्ही ५D राइडच्या रांगेत बराच वेळ तिष्ठत उभे राहिलो. ही राईड तशी ठीक होती. हलणाऱ्या खुर्चीवर आम्हाला बसविण्यात येऊन आमच्यासमोर गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम झुगारून देणारी आणि केव्हाही उंचावरून जमिनीवर आपटू शकण्याची शक्यता निर्माण करणारी दृश्ये दाखविण्यात येत होती. पायाजवळ पाण्याचा फवारा वगैरे मारण्यात येत होता. हल्लीच्या मुलांना ह्या प्रकारात काही भीती वाटत नसली तरी केवळ मजेपोटी ती किंचाळ्या वगैरे मारीत होती. अशा दोन वेगवेगळ्या राईड नंतर हा प्रकार संपला. एव्हाना वीणा वर्ल्डवाले आमच्या नावाने शंख करू लागले होते. त्यामुळे बाकीच्या दोन लीलांकडे दुर्लक्ष करून आम्ही बसमध्ये जाऊन बसलो.


आता आमची बस हिमालयन झूच्या मार्गी लागली होती. ह्या झूच्या अगदी शेवटापर्यंत जाण्याचा रस्ता नसल्याने एका विशिष्ट बिंदूपाशी आम्हांला सोडून तिथून सुमो, तवेरा इत्यादी वर्गातील गाड्यांमधून झू मध्ये जाण्याची सोय करण्यात आली होती. भ्रमणध्वनीच्या कॅमेरावर निशुल्क फोटोग्राफीची मुभा असली तरी खऱ्या  कॅमेरावर छायाचित्रणासाठी पंचवीस रुपये शुल्क होते. ते आम्ही भरले. वातावरण अगदी कुंद झालं होते. छत्री घेऊन नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या ह्या प्राण्यांना पाहणे हा एक नक्कीच आनंददायी अनुभव होता. तिथल्या विविध प्राण्यांची ही छायाचित्रे!












हे मात्र प्राणी नव्हेत! :)




अशा प्रकारे जवळपास अर्ध्या तासाचा झूचा प्रवास आटपून आम्ही जवळच असलेल्या इंदिरा गांधी स्मारकाला भेट दिली. हा सिमलामधील सर्वात उंच बिंदू असून (समुद्रसपाटीपासूनची उंची अंदाजे २६०० मीटर) सिमल्यात सर्वात पहिली हिमवर्षाव ह्या भागात होतो अशी माहिती आदित्य भोईटे ह्यांनी दिली. ह्याच ठिकाणी इथेच इंदिरा गांधी आणि झुल्फिकार (बहुदा) भुत्तो ह्यांची भेट झाली होती. त्यावेळी सिमलावासियांची ह्या ठिकाणी गर्दी उसळली होती. ही गर्दी ह्या मातबर राजकारण्यांना पाहण्यासाठी नसून भुत्तो ह्यांच्यासमवेत आलेल्या त्यांच्या अतिसुंदर कन्येला पाहण्यासाठी होती असा खुलासा ज्यावेळी आदित्याने केला तेव्हा आमच्या गटात हास्याची खसखस पिकली. चहा, कॉफीपानाचा कार्यक्रम आटपून आम्ही पुन्हा छोट्या गाड्यांत बसून बसच्या दिशेने निघालो. छोट्या गाड्यांत बसण्याआधी याकचे दर्शन झाले.


आता आम्ही सुप्रसिद्ध सिमला मॉल रोडवर जाणार होतो. काही बालके भिजल्याने त्यांच्या मातांनी हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला. सिमला मॉल तीन पातळ्यांवर विभागला गेला आहे आणि प्रत्येक पातळीची स्वतःची अशी खासियत आहे. आदित्य आम्हांला हे अत्यंत विस्तृतपणे समजावून देत होता. परंतु माझे त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. आम्हांला सोडून बस हॉटेलकडे रवाना झाली. दोन उद्वाहकांचा वापर करून आम्ही मॉलरोडवर आलो. तिथे आम्हां सर्वांना वीणावर्ल्ड तर्फे पॅटीस, बर्गर अशा पदार्थांची छोटेखानी ट्रीट देण्यात आली. वातावरण अगदी थंड झाले होते. त्यामुळे तिथल्या चहा, कॉफीने बरे वाटले. इथे उतरण्याआधी खरेदी करण्यासाठी कुलू शाल  फॅक्टरी आणि मनाली मार्केट उत्तम असा प्रेमळ सल्ला आम्हांला देण्यात आला होता. वीणा वर्ल्डचे हे अनुभवी बोल नवरेलोकांनी मोठ्या खुशीने मानले.


आम्ही आणि कुलकर्णी कुटुंब ह्यांनी आपला मोर्चा वरच्या पातळीवर असणाऱ्या चर्चकडे वळविला. ह्या चर्चच्या मार्गावरून सिमल्याचे दिसणारे हे विहंगम दृश्य.











हे चर्च उत्तर भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात जुने चर्च आहे. त्याची ही काही छायाचित्रे!









इथेच इंदिरा गांधीचा एक सुंदर पुतळा आहे! पुन्हा काही वेळ कौटुंबिक छायाचित्रणासाठी!
















खाली उतरल्यावर चेरी खरेदी करण्यात आली.


ह्या रस्त्यावर स्थानिक खाद्यपर्दाथांची रेलचेल होती. पण बर्गर, पॅटीसने पोट भरली असल्याने त्याचा आस्वाद घेण्याची आमची फारशी इच्छा झाली नाही. साडेसात वाजेस्तोवर आदित्य, जितेश ह्यांनी सर्व कुटुंबियांची हजेरी (चांगल्या अर्थाने!) घेत सर्वजण परत आल्याची खातरजमा करून घेतली. एव्हाना ह्या हजेरी प्रकरणामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो. वेळा सकर आणि राठी कुटुंबियातील फक्त यजमान ह्या ठिकाणी आले  होते. त्यांनी वैविध्यपूर्ण फळांची (अप्रीकोट वगैरे) खरेदी करून आपल्या गृहकृत्यदक्षतेचा आम्हाला अनुभव आणून दिला!
आमची बस हॉटेलवर गेल्याने आता आमची सोय हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बसमध्ये करण्यात आली. त्यात आम्ही सर्व बसल्यावर त्या बसच्या ड्रायव्हरने मुक्तपणे बस चालवीत आम्हांला हॉटेलवर आणून सोडले. ह्यात वीणा वर्ल्डच्या आयोजन कौशल्याची दाद द्यावी इतकी थोडी! त्यांनी हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बस उपलब्ध करून देण्याची दक्षता घेतली होती.


हा दिवस जितेशने म्हटल्याप्रमाणे बराच लांबला होता. अजून स्वपरिचयाचा  (introduction) कार्यक्रम बाकी होता. ठीक साडेआठ - पावणेनऊच्या सुमारास हा कार्यक्रम सुरु झाला. दोन्ही बसचा मिळून एक मोठासा गट बनला होता. ह्यात डॉक्टर, पी. एच. डी धारक, ज्येष्ठ पोलिस अधिकारी, भ्रष्टाचारविरुद्ध काम करणारे, आयकर विभागात  काम करणारे अशा विविध लोकांचा समावेश होता. भ्रष्टाचारविरुद्ध काम करणाऱ्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक जाणून घेण्यात सर्वांनी रस दाखविला, तर आयकर विभागात काम करणाऱ्या गृहस्थांना आम्ही आमचा नंबर देणार नाही असे मजेत सांगितलं!


मग वीणा वर्ल्डच्या टीमने आपली ओळख करून दिली. आदित्य गेली दहावर्षे ह्या क्षेत्रात आहे तर जितेश गेली पाच वर्षे! आदित्याची ही हिमाचल प्रदेशाची एकशेएकतिसावी सहल तर जितेशची पस्तिसावी! अशा अनुभवी लोकांसोबत आपण प्रवास करतो आहोत ही भावना सुखदायक होती! शेवटी त्यांनी पुढील दिवसाचा कार्यक्रम समजावून सांगितला. दुसऱ्या दिवशी आम्ही मनालीला कूच करणार होतो. हा प्रवास २७५ किमी इतका होता. त्यामुळे काहीसे लवकर निघावे लागणार होते. सकाळी पाच वाजताच गरम पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आदित्यने आम्हांला जेवणासाठी मोकळे केले. आता थोडंच खाल्लं पाहिजे असा केलेला निर्धार समोरील सुग्रास जेवण पाहून पुन्हा एकदा मोडून पडला!!!




Sunday, May 11, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग १

गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
उंदीर मामा की जय!




साधारणतः  फेब्रुवारी - मार्च महिन्यातील गोष्ट, सोहमच्या परीक्षेची  तयारी सुरु असताना यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचे विषयी  घरी चर्चा सुरु होती. मे महिन्याचा उन्हाळा आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी असह्य होत असल्याने तसे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. अशातच वीणा वर्ल्डची मे महिन्यातील सहलींची जोरदार जाहिरात घरी वाचनात आली. आमचं एक तसं बरं असतं, आमचे बरेच महत्वाचे निर्णय फारसा विचार न करता होत असतात, अशाच प्रकारे हा निर्णय सुद्धा आम्ही झटकन घेतला आणि सुरुवातीची रक्कम भरली सुद्धा. आता मे महिन्यातील नक्की कोणत्या आठवड्यातील सहल बुक करायची हा प्रश्न लग्नाच्या वाढदिवसाने सोडविला.
मुंबईतील आयुष्य किती धकाधकीचे असतं हे पुन्हा एकदा इथे मी सांगू इच्छित नाही. एखादी गोष्ट अगदी गळ्यापर्यंत येऊन पोहोचली की मग आपण तिच्या मागे लागतो. सहलीच्या तयारीचे सुद्धा असेच झाले. प्राजक्ता आणि वीणा वर्ल्ड ह्यांचा सुसंवाद चालूच होता. आमचं तसं ठीक असतं. म्हणजे मी मोजक्या मोठ्या गोष्टींची चिंता करतो आणि ती सर्व गोष्टींची काळजी घेत असते. ह्या सहलीच्या तयारीत माझा सहभाग तिला वेळेवर पैसे भरण्याची आठवण करून देणे, ई तिकीट वीणावाले आधी का देत नाहीत हा प्रश्न विचारणे आणि आधार कार्ड तयार ठेवणं ह्या पुरता मर्यादित असल्याची समजूत मी करून ठेवली होती. पण शुक्रवारी संध्याकाळी अचानक एक नवीन बॅग खरेदी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. सुदैवाने ऑफिसच्या कामाने शनिवारी दगा न दिल्याने ही जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली. मे महिन्याच्या  सुट्टीचा वसईला आनंद लुटत असलेल्या सोहम आणि प्राजक्ता ह्यांचे वसईहून शनिवारी सायंकाळी बोरीवलीला आगमन झाले. आणि मग बॅगा भरायच्या कार्यक्रमाला जोर चढला. हा कार्यक्रम साडेनऊ - दहापर्यंत आटोपला.
सकाळी साडेसहा वाजता विमानतळावर हजर व्हावे असे वीणा वर्ल्डने सुचविले / सांगितलं होते. त्यामुळे पावणेसहाची टॅक्सी मी आरक्षित करून ठेवली होती.
चारच्या गजराला सोहम स्वतःहून उठला. ऑफिसात काम करताना महत्वाच्या मोजक्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय मला लागली आहे. परंतु ह्या बाबतीतील प्राजक्ताच्या संकल्पना वेगळ्या आहेत. सकाळी चार वाजता उठून सैंडविच बनविण्याच्या तिच्या प्रस्तावाला विरोध करण्यात अर्थ नाही हे इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी शिकलो आहे आणि त्यामुळे ह्या प्रस्तावावर उद्बोधक चर्चा करण्याचे मी टाळले! पण कौतुकाची गोष्ट म्हणजे ह्यानंतर सुद्धा आम्ही पावणेसहा वाजता तिघेजण तयार होतो. सव्वापाच वाजता मला टॅक्सी कंपनीचा SMS आल्याने मी तसा निर्धास्त होतो. परंतु नियोजित वेळी म्हणजे पावणेसहा वाजले तरी चालकाचा मागमूस दिसत नसल्याने मी त्याला त्याच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर संपर्क करण्याचे ठरविलं. मुंबईत तुम्ही टॅक्सी आरक्षित केली असेल तर आपल्या उत्तर भागातील देशवासीय तुमचा चालक असल्याची शक्यता ९८ टक्क्याच्या वर असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे. गडी झोपेतून नुकताच उठला असावा. तो नक्की कोठे आहे आणि माझे घर नक्की कोठे आहे ह्यावर चर्चा करण्यात आम्ही काही वेळ घालविला. मग काही प्रयत्नानंतर आमची इमारतीच्या खाली भेट झाली. अरविंदकुमार यादव ह्यांनी आम्हाला पुढील वीस ते पंचवीस मिनिटात विमानतळावर पोहोचवलं. 'On the edge of the seat' ह्या इंग्रजी म्हणीची त्याने आम्हांला ह्या प्रवासात आठवण करून दिली. तो वाटेतील बहुतेक सर्व गाड्यांना मागे टाकीत असल्याने सोहम आनंदित होता. नोंदीसाठी ह्या प्रवासाचे भाडे ३६७ रुपये झाले. शंभर वर्षानंतर कोणी हा ब्लॉग वाचला तर त्याने अचंबा व्यक्त करावा म्हणून ही नोंद! अरविंदकुमार ह्यांच बिल चुकतं करून आम्ही विमानतळावर प्रवेश करण्याच्या तयारीत असतानाच वीणा वर्ल्डच्या जोशी ह्यांनी आम्हांला आमच्याकडील बॅगावरून ओळखले. आता आमची तिकिटांची चिंता मिटली होती. सोहम आता चेकइनच्या बॅगा खेचण्याइतपत मोठा झाल्याने आम्ही एकंदरीत मजेत होतो. चेकइनच्या रांगेत मोदीराज्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातील बहुतेकांकडे आंब्यांच्या पेट्या दिसत होत्या. पुन्हा जेव्हा कधी मे महिन्यात भारतात फिरायची वेळ येईल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवण्याचा मानस प्राजक्ताने व्यक्त केला. सुरक्षातपासणीच्या आधी पाणी आणि सैंडविच संपविणे आवश्यक असल्याने आम्ही ते काम तत्परतेने पार पाडले.
गो एयरच्या छोटेखानी विमानातील स्वच्छता वाखाणण्याजोगी होती.  सुटण्याआधी एका अतरंगी वेष परिधान केलेल्या प्रवाशाला कर्मचारी विमानाबाहेर घेऊन गेले त्यावेळी आम्ही चिंतीत झालो. तो बहुदा चुकीच्या विमानात शिरला असावा अशी समजूत आम्ही करून घेतली. विमानाच्या कप्तान सोनिया ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. ह्या प्रवासासाठी एकंदरीत अडीच तास लागतील असे त्यांनी घोषित केले. विमान बऱ्यापैकी वेळेवर निघाले. सोहमने खिडकीची जागा पटकावली होती. परंतु खाली दिसणारा गुजरात, राजस्थान (हा आमचा अंदाज) रखरखीत भाग त्याला काहीसा आवडला नाही आणि त्यामुळे मला खिडकी देण्यात आली. ह्या रखरखीत भागाचे एक छायाचित्र!







जसजसं चंदीगड जवळ येऊ लागलं तसतसं शालेय जीवनात शिकलेल्या 'चंदीगड हे एक सुनियोजित शहर आहे' ह्या विधानाची आठवण देणारी दृश्य खिडकीतून दिसू लागली.


 प्राजक्ताला वीणा वर्ल्डने सांगितल्याप्रमाणे विमान पावणेअकरा वाजता म्हणजेच सव्वादोन तासाच्या प्रवासानंतर चंदीगडला उतरलं. विमानतळावर उतरल्यावर आमच्या बॅगा मिळवण्यात फारशी अडचण आली नाही. ह्या विमानतळावरील वातावरण सोनियाच्या अपेक्षित आगमनाने भारून गेलेलं होते. एका वैमानिक कप्तानाच्या आगमनासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था का असा प्रश्न मला पडण्याआधीच ही सोनिया म्हणजे बाळ राहुल ह्यांची माताश्री असल्याचं आम्हांला सांगण्यात आले. वीणा वर्ल्डचे जितेश हे ह्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आत येऊ शकले नाहीत. आम्ही वीणा वर्ल्डच्या सदस्यांनी जमेल तितका एक गट करून बाह्यविभागात प्रवेश केला. तिथे पिवळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये जितेश हे वीणा वर्ल्डचा झेंडा घेऊन हजर होते.


पुढे आठ दिवस हा टी शर्ट आणि  झेंडा ह्यांनी आम्हांला 'ये पिला रंग अब मुझे छोडे ना!' ह्या गाण्याची (लाल ऐवजी पिवळा रंग वापरण्याची मुभा आम्हाला असावी!) आठवण करून दिली.


सोनियाप्रभावामुळे बस पार्किंग लॉटमध्ये असल्याने आम्हांला तिथपर्यंत  बॅगा न्याव्या लागल्या. ह्या क्षणापासून ते पुढील रविवारी ह्याच विमानतळावर प्रवेश करेपर्यंत आम्हांला एकदाही ह्या जड बॅगा परत उचलाव्या लागल्या नाहीत. वीणा वर्ल्डचे ह्या बाबत आभार मानावे तितके थोडे!


बसमध्ये सर्व मंडळी स्थानापन्न झाल्यावर जितेश ह्यांनी सर्वांचे स्वागत करून त्या दिवसाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती करून दिली. प्रत्येकाला दिलेले आसनक्रमांक आठ दिवसाच्या प्रवासात कायम राहणार होते. दररोज प्रत्येक सदस्याला एक बिसलेरीची पाण्याची बाटली सकाळी देण्यात येणार होती. बाहेरील पाणी प्यायचं टाळा असा प्रेमळ सल्ला द्यायला जितेश विसरला नाही. बसमध्ये पडदे नव्हते. दिल्लीतील १६ डिसेंबरच्या निर्भया प्रकरणानंतर दिल्ली, पंजाब, हरयाणा ह्या राज्यांत सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये पडदे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जितेशने दिली. ह्या भागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे अशी काहीशी आश्चर्यकारक माहिती आम्हांला मिळाली.


दहा मिनिटातच आमची बस जेवणासाठी एका चांगल्या हॉटेलात थांबली. तिथे थोड्या वेळातच आमच्यासाठी एका स्वतंत्र विभागात बुफे पद्धतीचे जेवण मांडण्यात आले. पदार्थांमध्ये विविधता होती आणि मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. पुढील आठ दिवसात मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्याची पद्धत कायम राखण्यात आली. अमेरिकेत असताना बुफे पद्धतीत आपण जेव्हा पुन्हा पदार्थ वाढून घ्यायला जातो त्यावेळी नवीन प्लेट घेण्याची एक उत्तम पद्धत आहे. उष्टं घेवून परत जाऊ नये हा हेतू! भारतात सुद्धा काही ठिकाणी ही पद्धत अवलंबितात. ही पद्धत सर्वत्र अंमलात आणावयास हवी. म्हणजे पहा ना, ज्यात मांसाहारी पदार्थ खाल्ले गेले तीच प्लेट घेऊन एखादा भाजी घेण्यास परत गेला, तर ते नक्कीच कट्टर शाकाहारी माणसास आवडणार नाही!


जेवणानंतर बस येण्यास पाच दहा मिनिटे उशीर झाला. तितक्या वेळात सोहम आणि बच्चेमंडळीनी फिश टँक मधील  माशांचे परीक्षण / विश्लेषण करून मग त्यांच्यासोबत फोटो काढून वेळ सार्थकी लावला!




केसरी ग्रुपचा एक प्रवासी गट ह्याच हॉटेलात जेवण्यासाठी उतरला होता. बसची वाट पाहता पाहता नव्यानेच ओळख होत असलेल्या सह्प्रवाशांसोबत सिमला मनालीत तापमान किती असेल ह्याच्या गप्पा झोडण्यात मजा आली. बसमध्ये प्रवेश केल्यावर जितेशनं सिमल्याचा प्रवास एकंदरीत १२२ किमी असून मध्ये फक्त एकदा बस चहासाठी थांबेल अशी माहिती देईल. त्याआधी हिमाचलच्या हद्दीवर टोल भरण्यासाठी चालक उतरेल हे ही सांगण्यास तो विसरला नाही.


बसचा प्रवास सुरु झाला होता. आखीवरेखीव चंदीगड शहर आणि विविध सेक्टर नजरेआड होत होती. रस्त्यावर  चालणारी माणसे अगदी अभावानेच दिसत होती. आम्ही आणि नाशिकचे कुलकर्णी कुटुंबीय ह्या दोघांचेही तीन तीन सदस्य. बसमध्ये दोन दोन सीटच बाजूबाजूला असल्याने आई-मुलगा अशा दोन जोड्या आणि मी व अमोल कुलकर्णी अशी बैठक व्यवस्था सुरुवातीला करण्यात आली. बसमधून दिसणाऱ्या चंदीगड शहराच्या एकंदरीत दृश्यावरून ह्या शहरातील सर्वच लोकांची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही ह्यावर आम्हां दोघांचे एकमत झाले. बस आजूबाजूच्या  एखाद्या  महत्वाच्या ठिकाणाजवळून जात असेल तर जितेश तत्काळ सर्वांना माहिती देई.  पिंजोर येथील कौशल्या धरण, HMT चा ट्रॅक्टर कारखाना आणि सुप्रसिद्ध गार्डन ह्यांची माहिती जितेशने आम्हांला दिली. आता माहितीमायाजाळावर ह्या स्थळांची गुगलदेवता तपासणी केल्यावर ही सुद्धा सुंदर ठिकाणे असल्याचे जाणवलं. पण वेळेअभावी त्यांना भेट देणे शक्य नव्हतं.
१:५० च्या सुमारास टोलनाका येऊन गेला आणि हळूहळू चढ सुरु झाला. सुरवातीला माझा उत्साह असल्याने ह्या सगळ्या स्थळांच्या नोंदी मी ठेवल्या आहेत हे सांगू इच्छितो!


आता चढ चांगलाच स्थिरावला होता. बस नागमोडी वळणे घेत होती आणि खिडकीतून दिसणारं खोल दरीच विहंगम दृश्य जसं मनाला सुखावत होत त्याचप्रमाणे हृदयाचा ठोकाही चुकवत होत.




समजा चुकून ड्रायव्हरकडून एक चूक झाली तर? हा प्रश्न सतत मनात उद्भवत होता. आमचा ड्रायव्हर मात्र जबरदस्त होता. त्याचे बसवर व्यवस्थित नियंत्रण होते. उगाच वेगाने बस चालवायची त्याची सवय नव्हती. आणि समोरून वेगाने येणाऱ्या चालकांमुळे आपली स्थितप्रज्ञता तो गमावून बसत नव्हता. मुंबईत रिक्षावाला आणि बेस्ट ड्रायव्हर ह्यांच्या सोबत कार चालविताना ह्या ड्रायव्हरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची नोंद मी मनातल्या मनात केली.


मध्येच एकदा टिंबर ट्रेल हे हॉटेल उजव्या बाजूने गेलं. ह्या हॉटेलची जी रस्त्याबाजुला इमारत होती तिथून दरीवरून उंच शिखरात एक केबल कार गेली आहे. उंच शिखरात ह्या हॉटेलचा दुसरा भाग आहे. लोकांना ह्या उंच शिखरातील वास्तव्य खूप भावतं. बडे लोक बडी पसंद! बाकी काय?


हिमाचल प्रदेशात ह्या डोंगराळ भागात सलग असा सपाट भाग मिळत नाही. त्यामुळे थोडा थोडा सपाट भाग निर्माण करून पायऱ्यापायऱ्यांची शेती (Step Farming) केली जाते, ही माहिती जितेशने दिली.
मध्येच ड्रायव्हरने बसला प्रती लिटर ५४.४६ ह्या दराचे २५७. ४४ लिटर डीजेल पिऊ घातले. एकूण बिल १४०२० रुपये झाले. पुन्हा एकदा ही नोंद १०० वर्षानंतरच्या वाचकांसाठी!


पुढे मग कालका सिमला टॉय ट्रेनचा ट्रॅक बाजूने गेला. १९०३ साली कोण्या ब्रिटीश अधिकाऱ्याने दोन वर्षात मनुष्यबळाच्या मदतीने ह्या ट्रॅकचे काम केले आहे. अजून एकदाही ह्यावर मोठा अपघात झाला नाहीय! अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Kalka%E2%80%93Shimla_Railway


आम्ही सोलन जिल्हा, थाना धर्मपुर इथे प्रवेश केला आहे असे रस्त्यावरील पाटी सांगत होती. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ होता.
आजूबाजूचा मार्ग आमच्यासमोर नयनरम्य दृश्यांचा नजराणा सातत्याने पेश करीत होता. धावत्या बसमुळे हा नजराणा कॅमेरात पकडायला कठीण जात होते.
परंतु बसमधील जिद्दी मंडळी आपले प्रयत्न चालूच ठेवत होती.
अशाच एका नयनरम्य ठिकाणी जितेशने गाडी दुपारच्या चहासाठी थांबविली. पावसाळी ढग आकाशात जमा झाले होते आणि थंडीचा प्रभाव जाणवू लागला होता. बसमधून उतरलेली मंडळी आपल्याजवळील गरम कपड्याचा हिशोब लावण्यात गर्क होती आणि हे कपडे कोठे मिळतील ह्याची चौकशी सुरु होती.
जितेशने एव्हाना गल्ल्याजवळील सीट पटकावली होती आणि बच्चेमंडळीच्या चॉकलेट , बिस्कीटच्या मागण्या पूर्ण करण्यात तो गुंग झाला होता. आपलाच माणूस गल्ल्यावर पाहून बच्चेमंडळींचा आत्मविश्वास दुणावला होता.
रस्त्याच्या कडेला मधूनच माकडं दिसत होती. त्यांच्या दर्शनाने कुलकर्णी ह्यांचा पहिलीतील मुलगा निशाद ह्याला खूप आनंद होत होता. न राहवून तो म्हणाला, "माकडांचा बाजार भरला की!"












चहापानानंतर बस सिमल्याच्या दिशेने धावू लागली. पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता. सिमला जवळ येत चाललं होतं आणि बाजूच्या दरीची खोली अजूनच वाढत चालली होती. अशा वातावरणात जेव्हा ढगांशी लपाछपी खेळणारा सूर्य मधूनच आपल्या पिवळ्याजर्द किरणांसहित आपल्याला दर्शन देतो त्यावेळी मन कसं प्रसन्न होते. मध्येच डोंगरात सपाटी निर्माण करून बनविलेला सिमला विमानतळ सुद्धा आम्हांला दुरून दाखविण्यात आला. हॉटेल  जवळ येत चाललं होतं, जितेशने प्रत्येकाच्या खोल्या घोषित केल्या आणि बॅगा रूमवर पोहोचविल्या जातील हे सांगितले.सिमला इथे आम्ही 'हॉटेल आशिया द डॉन (Dawn)' ह्या हॉटेलात उतरलो होतो. त्याच्या बाह्यदर्शनाने आम्ही काहीसे खट्टू झालो. आत वेलकम ड्रिंकने आमचे स्वागत करण्यात आले. खोलीमध्ये प्रवेश केल्यावर थंडावा खूप जाणवत होता. स्वच्छतेला काहीसा वाव होता. बऱ्याच कुटुंबियांच्या गृहमंत्र्यांनी स्वागतकक्षाला फोन लावण्याची नवरोबांना आज्ञा केली किंवा स्वतः फोन लावले. थोड्याच वेळात स्थिती काहीशी सुधारली. रूममधून दिसणारे हे विहंगम (?) दृश्य!



रात्रीचे जेवण व्यवस्थित होते. आमचा मित्र बटाटा विविध डिशमध्ये वेगवेगळी अनपेक्षित रूपे घेऊन हजर होता. जितेश प्रत्येक टेबलवर येऊन दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती देत होता आणि कोणाला काही अडचणी असल्यास त्यांचे निवारण करीत होता. दुसरा दिवशीचा कार्यक्रम अगदी गच्च भरलेला असणार असे त्याने आधीच आम्हांला बजावलं. सकाळी साडेसहा वाजता निद्रामोड कॉल करण्याचे आश्वासन देऊन त्याने आमचा निरोप घेतला.
सिमल्याच्या त्या थंडीत थकलीभागली शरीरे केव्हा निद्राधीन झाली ते कळलेच नाही!
(क्रमशः)