हल्ली वसईत दोन तीन लग्नाला हजर राहिलो. पूर्वी मी लग्नाला जायला उत्सुक नसायचो. परंतु मग मला बऱ्याच गोष्टी समजावण्यात आल्या. जसे की प्रत्येक घराचा एक प्रतिनिधी गावातील लग्नाला उपस्थित असला पाहिजे. ही झाली आपली कौटुंबिक जबाबदारी. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मांडवाला शोभा आणण्यासाठी पुरुष उपस्थित हवेत. पुरुषांनी फक्त मांडवात जाऊन बसायचे. मग जे गावात चर्चा करणारे लोक असतात ते म्हणतात 'लग्नाला एवढा लोक आलेला, एवढा लोक जेवला' वगैरे वगैरे..तर ही झाली सामाजिक जबाबदारी. आपली सामाजिक जबाबदारी कोणती आणि ती आपणास पार पाडावयास हवी ह्याचे भान प्रत्येकास वेगवेगळ्या वेळी येते. मला ते थोडे उशिराने आले असो. तर असे मुद्दे ऐकल्यावर मी सुधारलो आणि आता लग्नाला जमेल तसे जातो. तरी जिच्या मुलाच्या लग्नाला मला उपस्थित राहता आले नाही अशा एका आत्याने मला शनिवारच्या लग्नात जोरदार ओरडा दिला. हल्ली कोणी हक्काने ओरडले की बरे वाटते, त्यामुळे मी दोन तीनदा तिच्यासमोर गेलो. तिसऱ्या वेळी मात्र ती शांत झाल्याने मी थोडा निराश झालो.
एकंदरीत शनिवारच्या लग्नात मस्त वातावरण होते. वसईची थंडी एकदम जोरात नसली तरी वातावरणात सुंदर गारवा होता. वाडीच्या भागात मोठा प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. शनिवारीची रात्र असल्याने सर्वजण फुरसतीत होते. प्रशस्त मंडपामुळे गर्दी विभागली गेली होती. पाटील कुटुंबियातील बरीच मंडळी ह्यावेळी भेटली. गावातील लोकांचे (आणि हल्ली माझेही) बरे असते त्यांना जीवनात आनंदी होण्यास फारसे काही लागत नाही. ओळखीची चार माणसे भेटली आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या की बरेच दिवस पुरणारा आनंदठेवा मिळतो. आणि ह्या गप्पांमध्ये बढाईचा लवलेशही नसल्याने आपण मोकळ्या मनाने गप्पा मारू शकतो.
एकंदरीत काय वयानुसार माणसाच्या आनंदाच्या संकल्पना बदलू लागतात. हळू हळू मी ही सामाजिक प्राणी बनू लागलो आहे. परंतु वयानुसार बदलण्यातच खरी मजा असते हे हल्ली मला हळू हळू जाणवू लागले आहे.
No comments:
Post a Comment