प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.
No comments:
Post a Comment