दिवेपुरच्या मतदारसंघाचे विस्तृत विश्लेषण देण्याची बातमी आश्लेषासाठी तशी अनपेक्षितच होती. मग तिला आठवला तो तिचा महाविद्यालयीन कालावधी. नगर जिल्ह्याच्याच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या गावात वाढलेली आश्लेषा गावात चांगले महाविद्यालय नाही म्हणून दिवेपुरला शिकण्यासाठी आली. कला शाखेत शिकणाऱ्या आश्लेषाला मराठीत फार रस होता, मराठीतील लिखाण, वक्तृत्व अशा दोन्ही पातळीत तिने लगेचच प्रसिद्धी मिळविली. कॉलेजातील स्पर्धांमध्ये तिने चांगलेच नाव कमावले होते. अशाच एका स्पर्धेत तिची ओळख बुजऱ्या संपतशी झाली होती. वाणिज्य शाखेतील संपत त्या स्पर्धेत स्वयंसेवकाचे काम करीत होता. ही ओळख हळूहळू मैत्रीत रुपांतरीत झाली. परंतु त्या पुढच्या पातळीवर हे नाते नेण्यासाठी ना बुजऱ्या संपतने पुढाकार घेतला ना आश्लेषाने धीटपणा दाखविला. आणि मग बघता बघता कॉलेजचे दिवस संपले आणि आश्लेषा लग्न करून मुंबईला निघून गेली. आणि आता दहा वर्षानंतर एका वळणावर आता हे दोघे परत भेटणार होते. हा बुजरा संपत अचानक इतका बंडखोर बनण्याइतपत धीट कसा झाला ह्याचेच आश्लेषाला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
जाधवांचा तपास जोरात चालू होता. रमाकांतनेच विजयरावांच्या जीपचे काम केले होते. त्या आधीच दोन दिवस विजयरावांनी जीपचे सर्विसिंग केले होते, आणि त्यात सर्व काही ठीकठाक असल्याचे कागदही जाधवांनी तपासून पाहिले. जीपच्या विश्लेषणानुसार तिचे ब्रेक फेल झाले होते. रमाकांतने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आणि रमाकांतला अन्नातून विषबाधा कोणी केली ह्याकडे आता जाधवांनी लक्ष केंद्रित केले. जाधवांची बाईक गराजमध्ये पोहचली. त्या दिवशी रमाकांत जीपवर काम करीत असताना त्याने जेवण कोठून घेतले ह्याचा त्यांनी तपास सुरु केला. रमाकांत घरूनच डबा आणायचा अशी माहिती त्यांना देण्यात आली. रमाकांतच्या घरी अजून शोकाकुल वातावरणच होते. परंतु जाधवांना आपले कर्तव्य बजावायचे होते, त्यांनी हळू हळू रमाकांतच्या बायकोकडे त्यादिवशीच्या घटनांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी रमाकांतच्या मुलानेच डबा नेवून दिला होता. मुलगा कोपऱ्यात पुस्तक घेवून बसला होता. जाधवांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. 'डबा नेवून देताना वाटेत कोठे थांबला होतास का?' जाधवांनी त्याला विचारले. मुलाने आठविण्याचा प्रयत्न केला. 'हो हो, मध्येच एक काका भेटले होते आणि त्यांनी मला बोलावून चॉकलेट दिले आणि एक लिफाफा समोरच्या दुकानदाराला द्यायला सांगितला'. तो म्हणाला. तू काय कोणीही सांगितले की ऐकतोयस का? जाधवांनी थोड्या रागाने विचारले. ' असं कसं, मी त्यांना नेहमी सभेला वगैरे बघतो आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते', मुलगा म्हणाला. 'लिफाफा दुकानदाराला देईपर्यंत तू डबा त्यांच्या हाती दिला असशील ना?' जाधवांच्या ह्या प्रश्नाला मुलाने होकारार्थी उत्तर दिले. जाधवांच्या ह्या भेटीची बातमी योग्य (अयोग्य) ठिकाणी पोहचली होती.
राज्यातील स्थिती एकदम दोलायमान होती. सत्ताधारी पक्षाला बहुमताची खात्री वाटत नव्हती आणि विरोधी पक्षांच्या युतीचे कडबोळे काही चांगल्या स्थितीत नव्हते. जितेंद्ररावांचा पक्ष युतीतील मुख्य घटक असला तरी जागावाटपात त्यांच्या पक्षाला मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर समीकरण कसे असणार ह्याचेच आडाखे बांधण्याचा जितेंद्रराव विचार करीत होते. इथे अण्णासाहेब आणि सुजितकुमारांची स्थिती काही वेगळी नव्हती. आपआपल्या गटाला कमीच जागा मिळाल्या असे दोघांनाही वाटत होते. युवाशक्तीला पुढे आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते आणि युवाशक्ती कितपत यशस्वी होणार ह्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्या बुजुर्ग नेत्यांना संपतरावांच्या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले होते.
संपतरावांच्या प्रचाराने हळूहळू वेग घेतला होता. विरोधी पक्षाची यंत्रणा तर त्यांच्या साथीला होतीच वर त्यांनी ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केले त्या कार्यकर्त्यांनीही पक्षांची बंधने झुगारून त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राहता राहिला प्रश्न तो निधीचा. थोड्या तंगीत सापडलेल्या संपतरावांना एके रात्री माहेरी जावून आलेल्या सगुणाबाईंनी एक सूटकेस दिली. ती उघडल्यावर त्यातील नोटांची पुडक्यांकडे संपतराव आ वासून बघतच राहिले!
Would have loved to see full story, it's so sad as you ended story in between.
ReplyDeleteVery nice. Keep up good work, shubhechha!!!