Sunday, January 20, 2013

होळीबाजार - आनंदठेवा भाग २


विभक्त कुटुंबपद्धतीचा मोठा फटका नवऱ्यांना बसला. एकत्र कुटुंबात सतत उपलब्ध असणाऱ्या आई वडिलांचे संरक्षक कवच काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे नवरे लोकांना उत्क्रांतीमधून जावे लागले. अमेरिकेत जाऊन राहिलेल्या लोकांवर अजून दुर्धर प्रसंग ओढविला. मुलांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, यंत्राने घर साफ करणे, भाजी आणणे असे कामाचे अनेक पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले. आपआपल्या आवडीनुसार नवऱ्यांनी त्यातील काही कामांची निवड केली आणि वेळ निभावून नेली. त्यातील काहीजण परत भारतात आले. त्यावेळी अमेरिकेत अंगी लागलेल्या सवयी एकदम झटकून देणे त्यांना कठीण गेले. आता नवऱ्या-बायकोचे घरगुती कामाच्या बाबतीतील संबंध तसे मजेशीर असतात. ह्या बाबतीत बायकांचा शब्द प्रमाण मानण्याची बर्याच घरात पद्धत असते. त्याच प्रमाणे नवरे एकंदरीत कॉमनसेन्सच्या बाबतीत मठ्ठ असतात असा बर्याच घरात समज असतो. तुम्हास आश्चर्य वाटेल पण हा समज निर्माण करण्यात नवर्यांचा मोठा हात असतो. एकदा आपल्या नवर्याला मठ्ठ ठरविले (म्हणजेच आपणास चतुर), की बायकांच्या अंगात विलक्षण उत्साह संचारतो आणि त्या घरकामे हा हा म्हणता उरकून टाकतात. आता भारतात परत आल्यावर मुलांना सांभाळणे आणि घरसफाई ह्या दोन कामांचा धोका थोडा कमी झाला. राहता राहिली ती स्वयंपाक आणि भाजी आणणे. अमेरिकेत बायका नवर्याच्या हातचा स्वयंपाक खातात कारण तिथे सहज पर्याय नसतो. इथे परतल्यावर त्यांच्या अपेक्षा उंचावितात आणि त्याला तडा जाणारी कामगिरी एक दोन वेळा पार पाडली की हा धोका कायमचा नष्ट होतो. थेट नकार देण्यापेक्षा हा शांततामय उपाय केव्हाहि चांगला. राहता राहिले ते भाजी आणण्याचे काम!
वसईचा होळीबाजार हा ताज्या भाजीसाठी एकदम प्रसिद्ध! आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी कुटुंबातील प्रामुख्याने स्त्रिया आपल्या वाडीतील ताजा भाजीपाला घेवून इथे भल्या पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल होतात. ह्यात पालेभाज्या, दुधी, वांगी, गवार, कोबी, फ्लॉवर, पडवळ, शिराळा, गलका अशा नानाविध भाज्यांचा समावेश होतो. आमचे आधीच्या पिढीपर्यंत शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब, त्यातील आई वडील, काका, काकी ही मंडळी सुद्धा केळीचे लोंगर घेऊन अधून मधून येतात. सकाळच्या प्रसन्न वेळी हा बाजार कसा गर्दीने भरून जातो. भाज्यांचे भावही अगदी स्वस्त असतात. पालकाच्या जुड्या कधी पाच रुपयाला दोन, उन्हाळ्यात १० रुपयाला दोन दुधी अशा अगदी स्वस्त दरात भाज्या उपलब्ध असतात. भाजीचे हे भाव बघून ह्या बिचार्या विक्रेत्या स्त्रियांना काय फायदा होत असेल असा विचार मनात डोकावतो. परंतु ह्या स्त्रिया स्वाभिमानी असतात. आपण एखाद्या भाजीचे ५ - १० रुपये जास्त देऊ केले तर 'तुझ्या पाच रुपयाने मी काय श्रीमंत होणार नाही' असे सुनावून त्या ती नोट परत करतात. मी ह्या बाजारात सहसा भाजीचे भाव करीत नाही. घरी आल्यावर मला किती रुपयाला भाजी आणली हे विचारायचे नाही हा आमचा अलिखित नियम. दहा रुपयाला ओल्या कांद्याच्या दोन जुड्या असा भाव मला सांगताच मी थोडी घासाघीस करीन अशी समोरच्या भाजीवालीची अपेक्षा पण मी सरळ दहा रुपये देवून निघून जाताच, लगेच माझ्या मागे धावत येवून पिशवीत अजून एक जुडी टाकणारी भाजीवाली फक्त इथेच मिळू शकते. बाकी मला साठ वर्षांच्या वरील भाजी विक्रेत्या प्रेमाने अंकल हाक मारतात तेव्हा हल्ली मी जास्त राग मानीत नाही. उलट मला अंकल आठवतो.
होळीच्या आसपास राउत, घरत ही मोठी कुटुंबे. त्या कुटुंबातील बरीच माणसे सकाळी बाजारात दिसतात. त्यामुळे आपल्या सामान्यज्ञानात भर पडते. एकंदरीत नात्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत माझी बोंबच! पण सतत इथे लोकांना बघून माझी थोडीसुधारणा झाली आहे. आज भाई (माझ्या वडिलांचे टोपण नाव) नाही आले वाटते, असे सुरुवातीला मला विचारले जायचे परंतु आता त्यांनाही मला आणि बायकोला बाजारात बघण्याची सवय झाली आहे. समाजातील ताज्या बातम्याही इथे मिळतात, कोणाला प्रशीलच्या दवाखान्यात दाखल केले, कोणाच्या नणंदेच्या दिराचे चिंचणीला लग्न जमले ह्या सर्व बातम्या इथेच मिळू शकतात. लोंगर किती रुपयाला द्यायचे ह्याविषयी आई बाकीच्या ओळखीच्या लोकांशी सल्लामसलत करून मगच उत्तर भारतीय घाऊक विक्रेत्याला विकते. तो पर्यंत वडील बाहेर स्कूटर पार्क करून स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनांवर आपल्या मित्रांसोबत आपली मते नोंदवीत असतात. बाजार संपला की लक्ष्मीविलास, भगवतीविलास मधील गरमागरम वडे आणि जिलब्या ह्यांचा आस्वाद घ्यायला पावले आपसूकच वळतात. आठ वाजता मग हा शेतकऱ्यांचा होळी बाजार आटोपतो आणि मग व्यावसायिक विक्रेते हीच भाजी चढ्या दराने बाजूच्या मार्केट मध्ये विकू लागतात.
मध्येच एकदा वडिलांना शंभर रुपये गड्याला देऊन सकाळच्या थंडीत उठून दीडशे रुपयाचे लोंगर विकण्याचे अर्थशास्त्र समजून देण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले हे अर्थशास्त्राच्या पलीकडचे आहे. मग मला संगत लागली ती ह्या लोंगर किंमतीमागची, पाच रुपयातल्या पालकाच्या २ जुड्यांची. हा असतो इथल्या लोकांचा आनंदठेवा. समाजाशी असलेला त्यांचा संवाद. पैश्याने भले हे लोक श्रीमंत नसतील पण हा बाजार त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. इथे येणारा माणूस प्रसन्न होऊनच जातो. इथल्या लोकांपैकी कोणी जास्त तणावात असतील असे मला वाटत नाही. असे हे होळीबाजार टिकविणे आपले कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment