Thursday, January 17, 2013

जिद्दी लढवय्या सौमिक चटर्जी



बहुतांशी भारतीय लोक क्रिकेटचे चाहते असतात. त्यातील बरेचजण कडवे चाहते असतात. लोकांचा क्रिकेटमधला रस विविध कारणांसाठी असतो. काहीजण विशिष्ट संघाचे चाहते असतात, IPL नंतर चाहत्यांचा हा वर्ग थोडा गोंधळून गेला आहे. काहीजण विशिष्ट खेळाडूंच्या खेळाचे चाहते असतात. तर काही महिला चाहत्या विशिष्ट खेळाडूंच्या चाहत्या असतात. माझ्या माहितीतला असा सद्यकालीन खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. असे खेळाडू सामान्य पुरुषवर्गाच्या मनात असूया निर्माण करतात. काही चाहत्यांना क्रिकेटच्या आकडेवारीत बराच रस असतो. अमोल मुझुमदार हा रणजी मधला सर्वकालीन अधिक धावा जमविणारा खेळाडू आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर हे चाहते छातीठोकपणे देऊ शकतात.
मी १९८५ च्या अझहरच्या खेळाचा, १९९६ मधील विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या खेळाचा चाहता होतो. ipl येण्याआधी मी भारतीय संघाचा जबरदस्त चाहता होतो. परंतु माझा मुख्य प्रकार क्रिकेटच्या आकडेवारीचा! १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत विन्स्टन डेविसने ५१ धावात ७ बळी घेतले किंवा पाकिस्तानच्या जलालुद्दीनने एक दिवसीय सामन्यात पहिली HATTRIK घेतली हे मला लहानपणापासून लक्षात ठेवायला आवडते. बाकी HATTRIK ला मराठी प्रतिशब्द शोधायला हवा. पूर्वी क्रिकेट जरा कमी खेळले जायचे तेव्हा ही आकडेवारी लक्षात ठेवायला सोपे जायचे. आता कसं, जवळजवळ दर वर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारतात येतो आणि भारतीय संघ लंकेत जातो. त्यामुळे २००७ च्या भारताच्या लंका दौऱ्यात काय झाले आणि २००९ मध्ये काय झाले हे लक्षात ठेवायला बराच गोंधळ उडतो.
क्रिकेटच्या चाहत्यांचा अजून एक प्रकार म्हणजे ते रणजी सामने भक्तिभावाने FOLLOW करतात. FOLLOW ला सुद्धा मराठी शब्द हवा. अशा चाहत्यांसाठी क्रिकइन्फो हे संकेतस्थळ म्हणजे देवघर आहे. भारतीय घरगुती हंगामातील १९०० सालापासूनच्या सामन्यांची आकडेवारी त्यांनी उपलब्ध ठेवली आहे. त्यामुळे गावस्कर रणजीमध्ये सुद्धा कसा दादा होता हे आपण तिथे जाऊन पाहू शकतो. मुंबई दिल्ली ह्यांच्यातील अंतिम सामना म्हणजे पूर्वी पर्वणी असायची. दोन्ही संघाचे पहिले डाव सुद्धा पाच दिवसात पूर्ण व्हायचे नाहीत. एकदा बहुदा त्यांनी सहा दिवसांचा अंतिम सामना ठेवला होता. एकदा संदीप पाटील खेळत असताना संध्याकाळी सात वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत सामना चालू राहिला आणि मुंबईने तो अगदी जरया करता सामना हरला. ९० च्या आसपास कपिलच्या हरयाणाने मुंबईला अंतिम सामन्यात एका धावेने हरविले ह्याचे अजूनही मला वाईट वाटते. पूर्वी मुंबई ब वर मुंबईच्या रणजी सामन्यांचे धावते वर्णन असायचे आणि पुणे केंद्रावर महाराष्ट्राच्या सामन्यांचे! राजू भालेकर आणि मिलिंद गुंजाळ हे फार मोठे खेळाडू आहेत असा हे धावते वर्णन ऐकून झालेला समज अजूनही कायम आहे. बाकी मराठी समालोचना मुळे झालेला एक विनोद मी लहानपणी ऐकला होता. तो खरा की काल्पनिक हे माहित नाही. 'यष्टीरक्षकाने गलथान पणा दाखविला आणि त्यामुळे जिथे प्रतिस्पर्धी संघाला एकही बाय मिळाली नसती तिथे चार बाया मिळाल्या!
असो स्टार क्रिकेट रणजी सामन्याचे हल्ली थेट प्रक्षेपण करते. मी ते घरी शांतताभंग होणार नाही ह्याची काळजी घेत बघतो. तसा माझा मित्र चारुहास खामकरहि पाहतो. मुंबईने मध्य प्रदेशला गेल्या महिन्यात ६ धावेने हरविले त्यावेळी आमच्या दोघांचा आनंदाने कंठ दाटून आला. बाकी आर्थिक सुबत्तेने भारतीय मैदाने आता हिरवीगार झाली आहेत त्यामुळे सामना बघण्यास खूप मजा येते. मध्य प्रदेशचा पांडे हा गोलंदाज पुढे चमकेल ह्याचा मी आणि चारू ह्यांच्यासारख्या स्वयंघोषित जाणकार लोकांना आत्मविश्वास आहे. काल मुंबईच्या आदित्य तरे आणि पूर्वीचा होतकरू खेळाडू अजित आगरकर ह्यांनी सेनादलाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद शतके झळकविली. क्रिकेट कसा खेळ आहे पहा ना, आगरकरचे ह्या पूर्वीचे एकमेव प्रथम श्रेणीतील शतक क्रिकेटच्या मक्केवर लॉर्डसवर होते. आणि मुंबईच्या संघातील दुसरा महान खेळाडू सचिन ह्याला मात्र लॉर्डसवर शतक नोंदविता आले नाही.
रणजीच्या उपांत्यपूर्व एका सामन्यात सेनादलाने उत्तर प्रदेशचा अनपेक्षितरित्या पराभव केला. उत्तर प्रदेश संघाने साखळी सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व गाजविले होते आणि ते ह्या उपांत्य सामन्याचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. परंतु सेनादलच्या गोलंदाजांनी कमाल करून उत्तर प्रदेशला रोखले. तरीही चौथ्या डावात शंभरच्या आसपासचे लक्ष्य गाठताना सेनादलाची ५ बाद ५४ अशी नाजूक स्थिती झाली होती. त्यावेळी त्यांचा लढवय्या कप्तान सौमिक चटर्जी ह्याने जखमी अवस्थेतही उत्तर प्रदेशच्या संघाच्या गोलंदाजांना रोखून धरले. रनर बहुदा मिळाला नसावा त्याला, हल्लीच्या बदलेल्या नियमांमुळे. परंतु तो धावला, त्यांच्यावर गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा मारा केला तर त्याने त्या चेंडूंना सीमापार भिरकावून दिले. अशा जखमी अवस्थेत त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. अशा ह्या सेनादलाच्या जिद्दी खेळाडूला माझा सलाम.
आजचा हा ब्लॉग एकूणच भारतीय सेनादलाच्या जिद्दी जवानांना समर्पित. देशाने आदर्श ठेवायचे असतील, तर ह्या जिद्दी जवानांचे ठेवावेत!

 

No comments:

Post a Comment