डिसेंबर महिन्यात मराठी कलाजगताने आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे हे गुणी कलाकार मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघातात गमावले. त्यानंतरही हे द्रुष्ट चक्र कायम राहिले आहे. कालच एक बातमी वाचली की अक्षयचा भाऊ तन्मय आणि आनंद ह्यांची मुलगी सानिका ह्यांनी पुढे असे अपघात होऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्यांचे हे प्रयत्न सफल होवोत अशी माझी मनापासूनची इच्छा!
ह्या संदर्भातील काही मुद्दे!
१> रस्ता दुभाजक कसे असावेत? - सिमेंट कॉंक्रिटचे दुभाजक उभारल्यास वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत होवू शकते आणि गाडी आदळून परत आल्यावर ती गाडी दुसर्या वाहनावर पुन्हा आपटून अजून एक अपघात होऊ शकतो. त्यामुळे ब्रायफेन रोप्स (हा काय प्रकार आहे हे मी जाणून घेतोय!) तंत्रज्ञान वापरण्याचा विचार केला जात आहे.
२> एक्स्प्रेस महामार्गावर प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या स्थितीची तपासणी करण्याची यंत्रणा आणि त्यासाठी खास परवाना असण्याची तरतूद.
३> एक्स्प्रेस महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लायसन्सची तरतूद. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लेन कशा वापरायच्या ह्याचे खोल ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्वात उजवी लेन सर्वात जास्त वेगाने जाणार्या वाहनांसाठी आहे ह्याचे भान ह्या चालकास असावे. आपण जर गाडी वेगाने चालवत नसू तर गपचूप मधल्या किंवा डाव्या लेन मध्ये यावे. मागून वेगात येणाऱ्या चालकास वैतागवु नये. मुंबईत उजव्या बाजूने सायकल चालविणाऱ्या अनाडी लोकांना धडा शिकविण्याचा मार्ग अजून मला सापडला नाही. तसेच लेन (मार्गिका) बदलताना घ्यावी लागणारी काळजी (Blind Spot विषयीचे ज्ञान) हे ही आवश्यक आहे.
४> मद्यपी चालक ह्या महामार्गावर शिरूच शकणार नाही ह्याची कडक यंत्रणा!
आता हे सर्व उपाय लागू होण्यास काही काळ जाईल. तोवर ज्यांना बर्याच वेळा ह्या मार्गावरून जावू लागते अशांनी काय करावे?
१> रात्रीचा प्रवास जमेल तितका टाळावा! रात्री माणसांची जागरुकावस्था कमी असते आणि अधिक अनाडी चालक रस्त्यावर असतात. ह्यातील काही चालक संगणकातील गाड्यांच्या खेळांचा रात्री प्रत्यक्ष रस्त्यावर अनुभव घ्यायचा प्रयत्न करीत असतील असा माझा संशय आहे.
२> शक्यतो मोठ्या गाड्यांतून प्रवास करावा.
३> मागून वेगात येणारे वाहन दिसल्यास त्याला शांतपणे पुढे जावून द्यावे. त्याच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करून नये. त्याचप्रमाणे एखादे संथ चालक समोर असल्यास आपण चिडू नये.
बाकी मला ह्या महामार्गावर गाडी चालविण्याचा अनुभव नाही परंतु ज्यांचा आहे त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे असल्यास सर्वांसोबत वाटून घ्यावीत हीच विनंती!
इतके सर्व म्हटले तरी नशीब हा घटक तर असणारच! अजूनही अक्षयच्या दोन वर्षांच्या मुलाचे चित्र मात्र डोळ्यासमोरून जात नाही!
No comments:
Post a Comment