Monday, January 7, 2013

व्यावसायिक दुष्परिणाम आणि मराठी मालिकेतील कलाकार



प्रत्येक व्यवसायाची चांगली तशी वाईट बाजूही असते. आपण ज्या व्यवसायात असतो तिची वाईट बाजू आपल्यास सतत दुःख देत असते आणि दुसर्यांच्या व्यवसायातील चांगल्या बाबींचा आणि त्या दुसऱ्याचा आपण हेवा करीत राहतो. उदाहरण द्यायची झाली तर माहिती आणि तंत्रज्ञान व्यवसायातील लोक बक्कळ पैसा कमवितात असे बाकीच्यांना वाटते परंतु त्या व्यवसायातील लोकांनी अकाली पिकेलेले केस, पडलेले टक्कल, सुट्टीच्या दिवशी संगणकावर बसल्यावर बायकोने केलेली कटकट ह्यांचा सामना करावा लागतो. डॉक्टर लोकांना बाकीचे लोक, नातेवाईक वेळी अवेळी फोन करून सतावतात. क्रिकेटर लोकांना आपल्या कुटुंबियांसमवेत कमी वेळ मिळतो, ते आपल्या मुलांच्या बालपणाला मुकतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना दोन पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो, तर फक्त गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना समाजमान्यता कमी प्रमाणात मिळते आणि त्यांना लवकर वैफ़ल्य येवू शकते. नवलेखकांची बाकीचे लोक टर उडवितात तरीही त्यांना आपला दांडगा आत्मविश्वास कायम ठेवावा लागतो वगैरे वगैरे..ही यादी न संपणारी आहे.
आज हा विषय सुचायचे कारण म्हणजे त्या दिवशी झी मराठी वाहिनीवर बघितलेला वार्षिक गौरव समारंभ! रविवारी संध्याकाळी असे गौरव समारंभ मी आवर्जून पाहतो. सगळे कसे चकचकीत आणि सुंदर असते. सेट, निवेदक, मंचावर येवून आपल्या कला सादर करणारे कलाकार आणि प्रेक्षक वर्गही. आयुष्यातील सर्व समस्या माझ्याभोवती रविवारी संध्याकाळी पिंगा घालायच्या. तशा अजूनही घालतात, पण असे गौरव समारंभ बघितल्यावर मात्र माझे मन गोंधळून जाते. बघ जग कसे सुंदर आहे, जगात कसा आनंद आहे आणि तू वेडा समस्यांचा विचार करीत बसला आहेस. असे मनाला गोंधळून टाकल्यावर रविवार संध्याकाळ निघून जाते.
असो लेखाचा विषय थोडा बाजूला पडला. त्या वार्षिक गौरव समारंभात होणाऱ्या अनेक नृत्यांमधील काही नृत्यांत मला कुलवधुची नायिका पूर्वा गोखले, कळत नकळत ची नायिका ऋजुता देशमुख दिसल्या. गेल्या वर्षी एकदम प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या ह्या नायिका आज फारशा कोठे दिसत नाहीत. मग आठवला तो आपली डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ अभिनयात शिरलेला निलेश साबळे आणि त्यानंतर कुंकुची गुणी नायिका मृण्मयी देशपांडे. ही सर्व गुणी कलाकार मंडळी, पण सतत नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या मराठी वाहिन्यांच्या धोरणामुळे ही कलाकार मंडळी आज थोडी मागे सारली गेली आहेत. आता नवीन कलाकार खरोखर गुणी आहेत की नाही हा वादाचा मुद्दा. असो बिचारे हे गुणी कलाकार आपले सर्वस्व ह्या अभिनयाच्या क्षेत्राला वाहून देतात आणि एक वर्ष दोन वर्षात नजरेआड जातात. बाकीच्या व्यवसायात तुमची साथ देण्यासाठी HR खाते तरी असते. इथे ह्या कलाकारांना तसे कोणी नाही असला तर वार्षिक गौरव समारंभ!

No comments:

Post a Comment