पहिल्या आठवड्यात गुरुवारी वगैरे श्रीकांत आणि माझी रवानगी बाजूला असणाऱ्या नेपियर हाउस मध्ये झाली. आम्हांला ली बार्नेट नेतृत्व करीत असलेल्या अमेरिकन एक्स्प्रेसच्या 'Development Center' संघाचे सदस्य बनविण्यात आले होते. अशा मोठ्या कंपन्यांचा कारभार मजेशीर असतो. युरो प्रोजेक्टचे व्यवस्थापन बघणाऱ्या अमेरिकन एक्स्प्रेसच्या गटाने ह्या बहुउद्देशीय आज्ञावलीच्या विकसनाचे काम 'Development Center' कडे सोपविले होते. त्यासाठी 'Development Center' ने गाय बैमफोर्डला आमचा व्यवस्थापक नेमले होते. युरो प्रोजेक्टचा स्वतःचा एक व्यवस्थापक होता आणि आम्हांला सिंटेलचा एक व्यवस्थापक होता. इकडे तिकडे चहूकडे आनंदी आनंद गडे!
नेपियर हाउस मध्ये स्थलांतर झाल्याचा एक फायदा झाला. आमच्या सिंटेलच्या व्यवस्थापकाची आमच्यावरील करडी नजर हटली. श्रीकांत वाक्चातुर्य वाखाणण्याजोग होत. त्याची अमेरिकेतील काही बिलं त्याला भरावी लागतं. त्यासाठी त्याने आधी एकदा सिंटेलकडे इंटरनेट अकाउंट मिळावे ह्याची विनंती केली होती. परंतु कंपनीच्या धोरणात हे बसत नसल्याने ती विनंती नाकारली गेली होती. त्याने एका आठवड्यात लीशी बोलणी करून इंटरनेट अकाउंट मिळविले सुद्धा! आता त्याला मिळालं म्हणून मलाही मिळालं! आमचे बाकीचे सहकारी आमच्याकडे काहीशा असुयेनेच पाहू लागले होते.
सुरुवातीच्या गरजेनुसार आम्हांला ६ प्रोग्रॅम्स लिहायचे होते. युरो प्रोजेक्टच्या व्यवस्थापक बॅरी गोसडेन बरोबर झालेल्या बैठकीनुसार फक्त २ प्रोग्रॅम लिहिण्यासाठीच्या बजेटला मान्यता मिळाली होती. त्यामुळे आमच्या कामाची व्याप्ती २ प्रोग्रॅम लिहिण्यापर्यंत मर्यादित झाली होती. २ प्रोग्रॅमर, ३ महिन्यांचा प्रोजेक्ट आणि फक्त दोन प्रोग्रॅम! बहुत नाइंसाफी हैं! साधारणतः पहिल्या शुक्रवारी मला ह्या सुखद बातमीचा अंदाज आला होता. त्या खुशीत मी त्या स्वरूपाचे आधी विकसित केले गेलेले प्रोग्रॅम आज्ञावलीच्या लायब्ररीत धुंडाळले. आणि ते काही मिनिटातच सापडले. ही अजून एक आनंद बातमी सांगण्यासाठी मी बाजूलाच बसलेल्या श्रीकांतला सांगण्यासाठी धावतच गेलो. साहेबाने ह्या क्षेत्रातील काही अधिक पावसाळे पाहिले होते. शांतपणे माझे बोलणे त्याने ऐकून घेतले. माझे, माझ्या चौकस बुद्धीचे कौतुकही केले. आणि मग मला त्याने अजून एक दोन प्रश्नही विचारले. त्यांची उत्तरे देऊन मी डेस्कवर आलो. क्षणभर विचार केल्यावर मला कळून चुकलं की साहेबानेही मी केलेला उद्योग केला होता. फक्त माझा उत्साह कायम राहावा म्हणून त्याने त्याची वाच्यता करण्याचं टाळल होतं! इंग्लंडातील पहिल्या शुक्रवारची संध्याकाळ होती. पुढील तीन महिन्याच्या कामाचं सोपं स्वरूप लक्षात येऊन चुकलं होतं. आयुष्य एकंदरीत मजेत चाललं होतं!
ब्रायटनच्या किनाऱ्याला लंब रेषेत धावणाऱ्या अनेक छोट्या गल्ल्या होत्या. ह्यातील एक दोन गल्ल्यांमध्ये बरीच भारतीय उपहारगृहे होती. ऑफिस सुरु झाल्यापासून तसे आमचे खाण्यापिण्याचे हालच चालू होते. सकाळी आईने दिलेल्या लाडू, ठेपला इत्यादी गोष्टींवर न्याहारी भागवून न्यावी लागत असे. आणि दुपारच्या वेळी ऑफिसातील कॅन्टीनमधील बटाटा, बेक्ड बीन्स, चिकन टिक्का अशा पदार्थांनी बनविलेल्या सैंडविचवर करावी लागत असे. त्यामुळे शुक्रवारी रात्री एखाद्या भारतीय उपहारगृहात चिकन किंवा कोलंबी बिर्याणी (७ ते ८ पौंडात मिळणारी) हादडण्याचा मी मनसुबा आधीपासून मित्रांना सांगितला होता. आणि माझ्या इच्छेनुसार आम्ही हे भोजन केले. तिथल्या बिर्याणीत मसाल्यांचे प्रमाण कमी असल्याचे मला जाणवले. आणि हो शुक्रवारी संकष्टी वगैरे नाहीये ह्याची खातरजमा मी आधीच फोन करून आईकडून करून घेतली होती.
हॉटेलातील खोली अगदी मस्तच होती. सुरुवातीचे एक दोन दिवस (का रात्र) मी जरा एकटा झोपायला घाबरलोच! कारण भूताखेतांचे नव्हतं. ह्या हॉटेलात राहणारे काहीजण मद्यपान करून आपला गमावून बसत. मग ते असेच विमग्न अवस्थेत जिन्यावर बसून राहत. दुसऱ्याच रात्री गप्पा मारून अकरा वाजता पाचव्या मजल्यावरील खोलीत परतत असताना अशाच एका ब्रम्हांडी टाळी लागलेल्या म्हाताऱ्याशी माझी गाठ पडली. साहेब अगदी रस्ता अडवून बसले होते आणि मला जाऊ देण्यास अजिबात तयार नव्हते. मग खाली परत जावून मी उद्वाहक पकडून मी खोलीत परतलो. ह्या खोलीत प्रवेश करण्यासाठी हॉटेलने दिलेल्या कार्डाचा वापर करावा लागत असे. बाकी कडी वगैरे प्रकार नव्हता. आपल्या खोलीला दिलेले कार्ड आपल्याच खोलीसाठी चालावे आणि दुसऱ्या कोणाचे कार्ड आपल्या खोलीसाठी चालू नये ही किमान अपेक्षा! पण माझी दारुड्याची गोष्ट मी सर्वांना सांगत असतानाच तिथे घाबराघुबरा झालेला वीपलब आला. तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत एका मद्यपी माणसाने त्या रात्री आपलीच खोली समजून प्रवेश केला होता. त्याची समजूत घालता घालता वीपलबच्या नाकी नऊ आले होते. अ च्या म्हणण्यानुसार ही बनावट कथा होती!
आणि मग नंतर एका रात्री माझ्या दारापाशी असाच एक मद्यपी कार्ड घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. मी मारुतीस्तोत्राचे स्मरण करीत स्वागतकक्षाला फोन लावण्याची तयारी ठेवली होती. सुदैवाने साहेब थकून निघून गेले. मारुती पावला होता!
बाथरूम मधील भला मोठा बाथटब मला आठवडाभर खुणावत होता. पण वेळ मिळत नव्हता. शनिवारी सकाळी मात्र ही संधी गमवायची नाही हे ठरवून मी त्यात गरमागरम पाणी भरून चांगला एक तासभर डुंबत राहिलो. अंघोळीनंतर आजूबाजूला असलेल्या दुकानातून बटर, चीझ ह्यांनी भरलेल्या सैंडविचवर आम्ही ताव मारला. त्यादिवशी हवामान अगदी मस्त होते. म्हणजे तापमान १७ डिग्री सेल्सिअस वगैरे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश. आम्ही एव्हाना ह्या तापमानाला चांगले सरावलो होतो. ब्रायटन पियर खुणावतच होता.
तिथे आमची पावले वळली. तिथे प्रकारचे जत्रेतील खेळ खेळून आम्ही मनाचे समाधान करून घेतले. त्यादिवशी आम्ही अगदी जोरात होतो. सकाळी दहा वाजता बाहेर पडलेले आम्ही सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हॉटेलात परतलो.
दुसरा आठवडा सुरु झाला होता. एकंदरीत कामाचे कमी प्रमाणातील स्वरूप गाय बैमफोर्डच्या ध्यानात आले होते, परंतु त्यानेही जास्त काही टेन्शन घेतलं नाही. तो माझी आणि श्रीकांत ह्यांची 'रूम विथ अ व्यू' असे सार्थक नाव असलेल्या रूम मध्ये दुपारी बैठक ठेवत असे. सुरुवातीच्या पाच दहा मिनिटात कामाची चर्चा आटोपली की चर्चेचा ओघ इंग्लिश प्रीमियर लीग (श्रीकांतचा प्रांत) आणि माझ्यासाठी क्रिकेट कडे वळत असे. ब्रायटनचे जुळे शहर असलेल्या होव शहरात १९९९ सालच्या विश्वचषकाचा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना झाला होता. गाय रात्रीच्या वेळी बारमधून बाहेर पडल्यावर त्याला सामना पाहून बाहेर पडलेले बरेच भारतीय दिसले होते आणि ते आनंदी दिसत होते असे त्याचे म्हणणे होते. परंतु तो सामना तर भारताने हरला होता अशी आठवण मी त्याला करून दिली होती. त्यामुळे ते आनंदी असण्याची शक्यता कमी होती. बहुदा बारमधून बाहेर पडलेल्या गायला सारे जगच आनंदी दिसत असावे अशी शक्यता मी त्याला बोलून दाखविल्यावर तो मनमुराद हसला. त्या सामन्यात उत्तम फलंदाजी करणाऱ्या कॅलिसने कालसुद्धा (साडे चौदा वर्षानंतर ) भारताची पुन्हा धुलाई करत काही गोष्टी शाश्वत असतात ह्याची जाणीव करून दिली.
साधारणतः दुसऱ्या आठवड्यात माझी आज्ञावली तयार होती. गंमत अशी की इंग्लंडने अजूनही युरो चलन स्वीकारण्यास संमती दर्शवली नव्हती. ह्या समान चलनाच्या नोटांवर राणीची छबी नसणार म्हणून हा प्रकार अशी माझ्या सामान्य ज्ञानात भर गायने घातली.
'Development Center' मध्ये अनेकजण होते त्यातील काही नमुने ह्या प्रकारात मोडणारे! बिजू थॉमस हा केरळीय भारतीय, जॉन, स्टेसी, डॉमनिक आणि अजून एक थॉमस हे आडनाव असलेला तरुण ब्रिटीश. तुलनेने शांत असलेला हा गट श्रीकांतच्या आगमनानंतर गप्पांमध्ये अधिकाधिक रमु लागला होता. इंग्लिश लोकांची टर उडविण्याची अमेरिकन लोकांची आवडती सवय पाच सहा वर्षांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात श्रीकांतने उचलली होती. ह्यातील बरेचजण चालतच ऑफिसला येत जात असत. डॉमनिक हा तसा खमका ब्रिटीश मध्यमवयीन गृहस्थ. बऱ्याच वेळी शुक्रवारी हे सर्व जण दुपारी ऑफिसच्या जवळच असणाऱ्या पबमध्ये जेवणासाठी म्हणून जात. आपसूकपणे मद्यप्राशनही केले जात असे. मग लीची परवानगी घेऊन बरेचजण घरी पळ काढीत. अशा वेळी डॉमनिक आपले मन मोकळे करीत असे. माझी आज्ञावली दुसऱ्या आठवड्यातच तयार आहे ह्याची गुप्तहेरगिरी त्याने करून ठेवली होती. अशाच एका शुक्रवारी दुपारी त्याने मला आणि श्रीकांतला ही बातमी दिली. आणि ही बातमी स्वतः पाशीच ठेवण्याचे आश्वासनही दिले! डॉमनिक सायंकाळी पाच वाजले रे वाजले की घरी पळ काढी! एके दिवशी तो साडेपाच झाले तरी ऑफिसात रेंगाळत होता. तेव्हा श्रीकांतला न राहवून तो डॉमनिकपाशी गेला. डॉमनिक काही केल्या रहस्य फोडण्यास तयार नव्हता. तितक्यात बिजू आणि स्टेसी तिथे आले आणि डॉमनिकच्या सासूबाई घरी आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. डॉमनिक बिचारा शरमेने चूर झाला! जॉन काहीसा निराशावादी होता. विम्बल्डन सुरु झालं की बरेच वर्षे इंग्लिश माणसाने ही स्पर्धा न जिंकल्याची खंत तो बोलून दाखवे! "This is that time of year. Delicious Strawberries are here, and no Brit in Wimbledon Quarterfinal" अशी प्रस्तावना करून त्याने आम्हाला सुंदर स्ट्रॉबेरी खाऊ घातल्या. श्रीकांत आपल्या पाककलेविषयी ह्या सर्वांकडे बऱ्याच बढाया मारीत असे. खमक्या डॉमनिकला ही त्याची गडबड सतत खुपत असे. त्यावेळी डॉमनिकचा दुसरा मुलगा अगदी तीन चार महिन्याचा होता. तरीही त्याने आपल्या पत्नीची घरी सर्व टीमला बोलाविण्याची परवानगी घेतली. श्रीकांत भारतीय स्वयंपाक करणार होता. सकाळी घर जसे असेल त्याच स्थितीत परत मिळाले पाहिजे ही अट घालून त्याच्या बायकोने ही परवानगी दिली!
(क्रमशः)