Thursday, December 19, 2013

मेड (Maid) इन अमेरिका ते मेड (Maid) इन बोरीवली!


देवयानी प्रकरणावर मतप्रदर्शन करावे असे ठरवून बसलो तर 'Random Thoughts' वर ह्याच विषयावर लिहिलेला अतिशय सुंदर लेख वाचनात आला. त्यात ह्या विषयावर अगदी सखोल विश्लेषण दिले गेले आहे. त्यामुळे त्यावर मी मोजके लिहीन असे म्हणतो.
मुद्दा असा की अमेरिकेत कोणत्याही क्षेत्रात प्राथमिक पातळीवर काम करणारे लोक अगदी यंत्रमानवाप्रमाणे दिलेल्या नियमानुसार काम करीत असतात. फारसं डोक लढविण्याचा प्रयत्न करीत नाहीत आणि बरेचसे जण थोडीजरी वेगळी परिस्थिती निर्माण झाली तरी गांगरतात. आता देवयानीची ज्या महिला अधिकाऱ्याने झडती घेतली तिला सामान्य गुन्हेगाराची अशा पद्धतीने झडती घेण्याचे आदेश असतील. त्यानुसार तिने ही झडती घेतली असावी. आपण जिची झडती घेत आहोत ती कोणी राजनैतिक अधिकारी आहे आणि तिच्यासाठी आपण वेगळे नियम वापरावेत इतकी तसदी घेण्याचा तिने त्रास घेतला नसावा. ही झाली एक शक्यता. किंवा मग 'Random Thoughts' मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन मोठ्या राष्ट्रांच्या बुद्धिबळाच्या खेळातील ही अमेरिकेने विचारपूर्वक केलेली खेळी असावी. आता अमेरिकेने ह्या विषयावर वक्तव्य देण्यासाठी भारतात जन्मलेल्या अमेरिकन अटर्नी पद भूषविणाऱ्या प्रीत भरारा ह्यांचीच निवड करावी ही अजून एक लक्षात घेण्यासारखी बाब! असो आधी म्हटल्याप्रमाणे मी इथे ह्या विषयावर आटोपते घेतो!
अमेरिकेत ही घडामोड होत असताना बोरिवलीत सुद्धा एक मेड (maid) नाट्य घडत होते. झालं असं की गेल्या आठवड्यात ३ दिवसाची दीर्घ साप्ताहिक सुट्टी घेऊन आम्ही बोरिवलीला परतलो, त्यावेळी चपाती, भाजी करायला येणाऱ्या कामवालीवर (ह्या पुढे तिला तारणहर्ती संबोधूया!)  भिस्त ठेवून प्राजक्ताने बरेच बेत आखले. अगदी गाजरहलव्यापर्यंत! त्यात घरी दोन दिवस पाहुणे सुद्धा येणार होते. रविवार संध्याकाळपासून तारणहर्तीने फोन उचलणे बंद केले तेव्हाच संशयाची पाल चुकचुकली. "हिला मी हजार वेळा सांगितलं, यायचं नसेल तर आधीच सांगायचं, म्हणजे मग मला तसं आधीपासून तयारीत राहता येत!" "आता मी दहा वेळा फोन केला पण उचलायला होत नाही तिला!" " आता बघ मी ह्या महिन्यात ह्या सर्व सुट्ट्यांचे पैसे कापते की नाही"
मला ह्या सर्व संवादाची सवय असल्याने मी शांतपणे हे ऐकत होतो. सोमवारी जमेल तशी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, जसे की एक महाकाय सुरण अगदी बायकोच्या सूचना तंतोतंत पाळून कापून दिला! बायको धन्य आणि मी ही धन्य!
तारणहर्ती तशी मनाची राणी! पैसे कापणे वगैरे धमक्यांना दाद न देणारी! साडेआठची वेळ ठरली असताना नऊच्या आत कधी न उगविणारी! एकंदरीत बायको आणि तिचे नाते 'तुझ्याशी जमेना पण तुझ्यावाचून चालेना!" ह्या प्रकारात मोडणारे! बायको पण तशी हुशार, तारणहर्ती वर इतकी मेहनत घेतल्यावर आणि तिला आपल्या घरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला शिकवल्यावर तिची सर्व अनियमितता सहन करण्याची तिने मानसिक तयारी केली असते. मध्येच वाचलेल्या एका विनोदाची आठवण झाली. "भारतीय स्त्रिया सात जन्मासाठी एकच नवरा का मागतात? - अरे वा इतक्या मेहनतीने त्याला पहिल्या जन्मात  format केल्यावर पुन्हा प्रत्येक जन्मात कोण पुन्हा पुन्हा मेहनत करणार!"
अमेरिकेतील मेड नाट्य अजून चालू आहे. आमचे काल थोड्या नाटकीय घटनानंतर संपले. म्हणजे आमच्याकडे येण्याआधी तारणहर्ती अजून एका घरी जाते. तिथेही तिने तीन दिवस सुट्टी मारल्याने तिच्याकडून काल तिथे नेहमीच्या एका तासाऐवजी दीड - पावणे दोन तास काम करून घेण्यात आलं. ह्या कालावधीत तारणहर्तीने बायकोचे फोन घेणे बंद केले. वातावरण पुन्हा अधिक विस्फोटक होण्याच्या मार्गावर होते. पण सुदैवाने तितक्यात तारणहर्तीचे आगमन झाले. मग आमच्याकडे सुद्धा सव्वा तासाचे दोन तास काम निघाले. बहुदा तारणहर्तीने तिसऱ्या कामाला कालसुद्धा दांडी मारली असावी. आपत्कालीन व्यवस्थापन काय फक्त मोठ्या लोकांनाच करावं लागत असं थोडंच आहे? बाकी आज सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत! ह्या नाट्याचा पुढील अंक बहुदा नाताळ सुट्टीनंतर!
गेल्या आठवड्यात मोठ्याकाकीने  (मोठीआई) बोलता बोलता तिच्या वडिलांची (नानांची) आठवण काढली. ते आंघोळीनंतर स्वतःचे कपडे टाकीवर जाऊन स्वतः धुवीत. त्यांचा वक्तशीरपणा इतका होता की शेजारी त्यांच्या कपडे धुण्याचा आवाज आला की इतके वाजले असावे अशी अटकळ बांधीत! मोठीआईने नानांचे एक वाक्य सांगितलं "स्वतः कपडे धुण्याने, दोघांचंही आयुष्य वाढत - आपलं आणि कपड्याचंही!"
ह्या दोन्ही मेडने व्यापलेल्या ह्या आठवड्यात हे वाक्य किती खरं आहे ह्याचाच विचार मनात राहून राहून डोकावत होता!
 

No comments:

Post a Comment