Tuesday, December 24, 2013

मुंबईचा संभ्रम

marathiblogs
Marathi
 
 
कार्यालयात गेले एक दोन महिने अगदी व्यग्र गेले. मेंदूला म्हणावी तशी विश्रांती मिळाली नाही. त्यामुळे ह्या नाताळच्या सुट्टीची डोळे लावून वाट पाहत होतो. सुट्टीच्या पहिल्या दोन दिवसात सुद्धा कामाने घुसखोरी केली. आता मात्र थोडी शांतता! पण अजून मनातील कार्यालयातील कामाचे विचार पूर्ण निघाले नाहीत. ह्याच विचारांचा थोडा दैनंदिन दिवसात वापर करायचा म्हटला की मग काहीतरी भन्नाट सुचतं. आता ते भन्नाट असं मला वाटतं, तुम्हांला काय वाटत ते माहित नाही. पण हो सतत लेखन चालू ठेवायचं म्हणजे आत्मविश्वास कसा दांडगा पाहिजे! :)
कार्यालयात कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीतील पुढील वाटचालीची चर्चा appraisal च्या काळात केली जाते. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला एखाद्या विषयात खोलवर जाण्यात रस आहेत की एकमेकांशी संबंधित असलेल्या अनेक विषयांचे जुजबी (अगदीच जुजबी नव्हे!) ज्ञान घेऊन  व्यवस्थापक वगैरे बनण्यात रस आहे ह्याविषयी चर्चा होते. म्हणजे Deep की wide! मराठीत म्हणायचं झालं तर सखोल की विस्तृत!
हा विचार सुट्टीच्या चौथ्या आणि खऱ्याखुऱ्या पहिल्या दिवशी असाच मनात डोकावत राहिला होता. मग असंच मन मुंबईसारख्या महानगरात जीवन जगणाऱ्या (की ओढत नेणाऱ्या) मध्यमवर्गीय माणसाकडे वळलं. ह्या माणसाच्या मनात अशाच अनेक भावना असतात, त्याला अनेक कर्तव्य पार पाडायची असतात मग तो एखाद्या भावनेत खोल जातो की असाच अनेक भावना आणि कर्तव्य ह्यांच्या गर्दीत हरवून जातो?
माणसाचे कार्यालय आणि प्रवास हे सोडून बाकी मिळणारा वेळ म्हणजे त्याचा फुरसतीचा वेळ. ह्या वेळेवर हक्क मागणाऱ्या अनेक गोष्टी. ह्यातील काही कर्तव्य म्हणून पार पाडाव्या लागतात तर काही मनाला पुन्हा नव्या जोमाने जीवनसंघर्षाला तोंड देण्याचा उत्साह देतात. पहिल्या प्रकाराला केवळ कर्तव्य आणि दुसऱ्याला स्फूर्तीदायक असे म्हणूयात. 
१> सांसारिक जबाबदाऱ्या - ह्यात घरातील बिले भरणे, किराणा माल भरणे, मुलांचा अभ्यास घेणे अथवा त्यांना शिकवणीला किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु असलेल्या उपक्रमांना आणणे - सोडणे ह्यांचा समावेश होतो. हल्ली त्यात मॉल भेट ह्या गोष्टीचा समावेश झाला आहे. मॉल भेट हा महिलावर्गाचा छंद असला तरी ते  पुरुषमंडळींचं कर्तव्य बनू पाहत. 
२> नातेवाईक भेट, समारंभाला उपस्थिती - ह्या गोष्टी  कर्तव्य आणि स्फूर्तीदायक ह्यांच्या सीमारेषेवर रेंगाळत असतात. 
३> मित्रमंडळी भेट - ही नक्कीच स्फूर्तीदायक प्रकारात मोडते. 
४> सामाजिक कार्य - हे आपल्या मनाला बरेच समाधान मिळवून देतात. 
५> छंद - हे फार महत्वाचे असतात. कार्यालयातील, वैयक्तिक जीवनातील संघर्षापासून आपणास हे काही अलौकिक क्षण मिळवून देतात. ह्यात आपल्याला आपल्या मनाशी खोलवर संवाद साधता येतो. 
 
माझ्या मतीनुसार केलेल्या ह्या वर्गवारीकडे पाहता असे जाणवते की मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या बहुतांशी मध्यमवर्गीयांचा ९० टक्के मोकळा वेळ हा पहिल्या दोन प्रकारात मोडतो. सुदैवी लोकांना मित्रमंडळीचा सहवास मिळतो. पण त्यात मदिराप्राशनाने प्रवेश केल्याने मी नाराज आहे!
 
लेखाचा खरा मुद्दा! मुंबईसारखं महानगर सामान्य माणसाला सामाजिक कार्य आणि छंद ह्या मनाला नवी उभारी देणाऱ्या गोष्टी करू देण्याची संधी देत का? किती लोक गायन, वाचन, लिखाण, भटकंती ह्या गोष्टी शहरात राहून जोपासू शकतात? आणि गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट अशी की ही परिस्थिती गेल्या काही वर्षात निर्माण झालेली आहे. एकतर शहर भयानक प्रमाणात गर्दीचं बनलंय आणि लोकांच्या नोकऱ्या अधिकाधिक तणावाच्या होत चालल्यात. हे सर्व नोकरीला सर्वस्व मानणारे आणि चित्रपट पाहणारे , महागड्या हॉटेलात चवीचे पदार्थ हादडणारे लोक पाहिले की त्यांना एकच जाणीव करून द्यावीशी वाटते की बाबांनो साठीनंतर ह्यातील एकही गोष्ट तुमच्या साथीला नसणार! तुमचा मोकळा वेळ तुम्हांला खायला उठणार!
आता शहराच्या वाढीमध्ये शहरातील नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांना असा फुरसतीचा वेळ मिळवून देण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सांस्कृतिक वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी शासनकर्त्यांनी पार पाडावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे काय?
 
असो त्यामानाने वसईतील परिस्थिती थोडीफार बरी. आठवडाभर लोकल प्रवासाने दमलेला वसईकर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र राजा असतो! त्याच्या मनाला उभारी देणारे नातेवाईक, मित्र ह्यांना कोणत्याही रहदारीत न सापडता भेटण्याची मुबलक संधी अजूनही त्याला उपलब्ध आहे. एकंदरीत काय तर महानगरातील मानसिक  स्वास्थ्य  ही एक दुर्मिळ बाब बनत चालली आहे.
 
 
 

No comments:

Post a Comment