Monday, December 9, 2013

आँखों में हमने आप के सपने सजाये हैं!

 व्यावसायिक जगात सतत वावरून माझा भाबडा आशावाद किमान पातळीवर पोहोचला आहे. आणि बाकीच्यांच्या बाबतीत सुद्धा तसेच घडले असावे असे निराशावादी गृहीतक मी करतो. परंतु कधी कधी ह्या गृहितकाला सुखद धक्का देणाऱ्या घटना घडत असतात. आप (आम आदमी पक्ष) चे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लक्षणीय यश ही अशीच एक घटना. काल ऑफिसच्या कॅंटीनमधील चर्चेत आलेले काही सर्वज्ञात असलेले मुद्दे!
 
१> 'आप' चे यश नक्कीच आश्चर्यकारक!
२> हे यश मिळविणे खूप कठीण असले तरी एकंदरीत अंतिम ध्येय (भारतीय राजकारणात सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य मिळावे आणि भ्रष्टाचार दूर व्हावा!) मिळविण्याच्या एकंदरीत प्रवासातील ही फारतर १० टक्के मजल!
३> दिल्लीत सरकार बनविण्यात भाजप आणि काँग्रेस पुढाकार घेण्याची शक्यता फार कमी. अशा परिस्थितीत सरकार बनविणे म्हणजे तारेवरची कसरत! एखाद्याने ९९ चांगल्या गोष्टी केल्या आणि एक चूक केली, तर आपण भारतीयांना ही एकच चूक अधिक लक्षात राहते. भाजपला सध्या निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण खराब करायची इच्छा नसणार आणि तळाला पोहोचलेल्या काँग्रेसला तिथे अजून चुका करून चिखल निर्माण करायची इच्छा नसणार. न जाणो तिथेही अजून एखादे कमळ उगवलं तर!
४> मग सर्वाचे लक्ष आप कडे जाणार! सरकार बनविण्यात आप ने पुढाकार घ्यावा का? आपणा सर्वांना मान्य करावे लागेल की सरकार स्थापनेच्या दृष्टीने विचार करता आप ची तयारी अगदी तुटपुंजी आहे. दरबान खेळपट्टीवर स्टेन आणि मंडळींना तोंड द्यायला गेलेल्या रैना आणि मंडळीपेक्षा खराब! आणि त्यांची मजा बघायला आणि त्यांना गोंधळून टाकायला बाबू लोक वाट पाहत आहेतच. सरकार चालविण्यासाठी ज्या प्रशासकीय कौशल्याची गरज लागते त्याची आज आप कडे कमतरता आहे. 
अशा वेळी आप दोन प्रकारे विचार करू शकतं. 
अ> सर्व भाबड्या भारतीयांचा आशावाद आपल्या कामगिरीवर पणाला लागला असताना आता आपण जर अपयशी ठरलो तर असा प्रयत्न पुन्हा होण्यासाठी फार कठीण जाणार! त्यामुळे सावधतेचा पवित्रा घेऊन सरकार न स्थापणे हेच इष्ट!
ब> जनतेने आपल्यावर इतका विश्वास दाखविल्यावर ऐन वेळी कच खाऊ नये. हीच वेळ आहे काही करून दाखविण्याची! त्यामुळे सरकार स्थापन करून प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत! लोकसभा निवडणुका तोंडाशी आल्या असता हे सरकार पाडण्याचे धारिष्ट्य भाजप किंवा काँग्रेस करणार नाहीत. कारण त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील!
पाहूयात अ आणि ब मधील कोणत्या पर्यायाची आप निवड करतो ते!
बाकी सामान्य जनतेला धडा, त्रिशंकू लोकसभेने आपले खूप नुकसान केलं आहे, लोकसभेसाठी मतदान करताना ज्या पार्टीला बहुमत मिळंण्याची शक्यता असेल तिलाच मतदान करा!
 

No comments:

Post a Comment