१९९९ सालच्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करून आम्हां सर्वांना दीड ते पावणे दोन वर्षे होत आली होती आणि त्यावेळच्या व्याख्येनुसार आम्ही परदेशप्रवासासाठी पात्र झालो होतो. कंपनीने आमच्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले होते. आम्ही सर्व मेनफ्रेम तंत्रज्ञानातील कलाकार! परंतु अचानक एक VB मधील संधी कंपनीकडे आली. त्या प्रोजेक्टमधील कामाचे स्वरूप पाहता आणि कंपनीचा आमच्या बुद्धिमत्तेवर (?)असलेला अगाध विश्वास पाहता आम्ही हे धनुष्य पेलवू शकू असा विश्वास कंपनीतील निर्णयकर्त्यांना वाटला. आणि एका महिन्यात आम्हाला अमेरिकेला जावे लागेल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आमचे VB वर प्रशिक्षण सुद्धा सुरु झाले होते. आम्हांला VB शिकविणाऱ्या अनुभवी सहकारीला स्वतःला ह्या प्रोजेक्टवर अमेरिकेत जाण्याची इच्छा होती. त्यामुळे काहीशा नाखुशीनेच ती आम्हाला शिकवीत असे. पुढे क्लायंटने आमच्या एकंदरीत अनुभवाची (वा अननुभवाची) वगैरे छाननी करून आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला. बाकी सर्वजण जरी काहीसे निराश असले तरी मी मात्र सुटकेचा निःश्वास टाकला.
आम्हां सर्वाना Y2K कामाचा पूर्वानुभव असल्याने कंपनीने मग त्यासारख्या प्रोजेक्टवर आमची तज्ञ म्हणून वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी कंपनीस अमेरिकन एक्प्रेस ह्या कंपनीचे इंग्लंड आणि अमेरिकेत एक मोठे प्रोजेक्ट मिळाले. ह्या प्रोजेक्टची विविध ठिकाणे होती. त्यात इंग्लंडमध्ये ब्रायटनच्या युरो चलनाचे मोठे काम सुरु होते. त्यासाठी आमच्या नावाचा विचार सुरु झाला. विचार पक्काही झाला. आणि साधारणतः मार्च महिन्याच्या सुमारास आमचं वर्क परमिट बनविण्याचं काम सुरु झालं. वर्क परमिट बनविण्याची ही प्रक्रिया फार हळुवार चालली होती. आम्ही आमच्या आधीच्या प्रोजेक्टचे (रंजू साहेबाचे प्रोजेक्ट) काम आम्ही आटोपतं घेत होतो. त्याचवेळी नवीन प्रोजेक्टवर IMS माहितीभंडारावर काम करायचे असल्याने प्रकाश गद्रे ह्यांनी आमचे त्यावर प्रशिक्षण सुरु केले.
मधल्या काळात आमची विसासाठी इंग्लंडच्या वकिलातीत भेट आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी वगैरे झाली. हो नाही करता आमचा विसा आला आणि १५ मेला आमची इंग्लंड प्रवासाची तारीख मुक्रर करण्यात आली. आमच्या घरी माझ्या बाहेरगावी राहण्याच्या क्षमतेविषयी दाट शंका व्यक्त करण्यात येत होती. माझा ह्या आधीचा बाहेरगावी राहण्याचा अनुभव शून्य होता. अकरावी, बारावी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात जरी होस्टेलला राहत असलो तरी साप्ताहिक सुट्टीला मी घरी येत असे. घरापासून सतत दूर राहण्याचा माझा विक्रम बारावीच्या परीक्षेत २२ दिवसांचा होता. त्यामुळे मी जाण्याआधी माझे मोठे काका म्हणाले, "**(माझे केवळ खास घरातील टोपणनाव) एखाद महिन्यात परत येईल का काय?"
इंग्लंडला जाताना २० किलोच्या फक्त एकाच बॅगेला परवानगी होती. इंग्लंडमध्ये वास्तव्य असल्याने तेथील ऑफिसात परिधान करण्याच्या वेशाविषयी आमच्या मनात उगाचच दहशत बसविण्यात आली होती. फिक्या रंगांचे शर्ट आणि आणि गडद रंगांच्या पैंट असा ड्रेसकोड आम्हांला सांगण्यात आला होता. मी त्याहून पुढे जाऊन तीन पांढरे आणि दोन फिके निळे शर्ट आणले. बाकी मे महिना असल्याने जॅकेट आणि ग्लॉवजस् इंग्लंडमध्ये जाऊन विकत घेतले तरी चालेल असा सल्ला आम्हांला देण्यात आला. ठेपले, घरचे लाडू, घरचा खास मसाला असे जिन्नस २० किलोत घुसविण्यात आले.
आमची तिकिटे गल्फ एयर ह्या कंपनीतर्फे आरक्षित करण्यात आली होती. मुंबई ते बहारीन, मग सहा तासाचा थांबा आणि त्यानंतर बहारीन ते हीथ्रो असा आमचा प्रवास होता. आमचा सहा जणांचा कंपू होता. त्यातील रमेशचा वैद्यकीय परीक्षेतील अहवाल थोडासा प्रतिकूल आल्याने त्याचा प्रवास लांबणीवर पडला. मी, विपलब, शेषासाई, आणि अजून दोघे असे पाचजण राहिलो. हे दोघे (एक मुलगा आणि आणि मुलगी) माझे खास मित्र होते. ह्यांची एंगेजमेंट झाली होती. परंतु लग्नाच्या निर्णयाला दोघांच्या घरून विरोध असल्याने त्यांचे लग्न लांबणीवर पडलं होतं. ह्यातील मुलगा (त्याला 'अ' संबोधूया) हा परदेशवास्तव्य करून वगैरे आलेला होता. त्याच्या आधारावर इंग्लंडमधील सुरुवातीच्या दिवसात आम्हाला स्थिरस्थावर होण्यास मदत होईल अशी आशा आम्ही बाळगून होतो.
माझ्या आईला माझ्याविषयी फार चिंता असल्याने तू त्याला धरून राहा असा तिने मला सल्ला दिला होता. परंतु निघण्याआधी त्या दोघांच्या कंपूत काहीसे तंग वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रवासाविषयी सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली. आमचे विमान मुंबईहून सकाळी तीनच्या सुमारास निघणार होतं. बहिण अंधेरीला राहत असल्याने तिच्या घरी घरचे सर्वजण बॅगेघेऊन पोहोचले होते. सिंटेल परकीय चलन आणि पारपत्र अगदी शेवटच्या दिवशी देत असत. ते घेऊन आणि अगदी शेवटच्या क्षणाची खरेदी आटपून मी बहिणीच्या घरी साडेआठला पोहोचलो. जेवण आटपून दोन तीन तास झोपण्याचा अयशस्वी प्रयंत्न करून आम्ही सर्व विमानतळावर एक वाजेपर्यंत पोहोचलो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अ न आल्याने मी काहीसा आणि माझ्याहून अनेक पटीने आई चिंतेत होती. अगदी विमानतळावर प्रवेश करण्याच्या क्षणी ते दोघे आले आणि आईने सुटकेचा निःश्वास टाकला.
बाकी विमानप्रवासाचा माझा हा पहिला अनुभव. अ आणि विपलब सोडले तर बाकी सर्वांची हीच गत! त्यामुळे एकमेकासोबत राहून आम्ही विमानाच्या गेटपर्यंत मजल मारली. बाकी विमानाने गेटपासून ते मुख्य धावपट्टीपर्यंत काही काळ TAXIING केले. त्यावेळी हे आता कधीही उड्डाण करेल की काय असे मला सतत वाटत होते. अ मात्र शांत होता. एका क्षणी मात्र विमानाची गती थांबून ते स्थिरस्थावर झाले. अ कडे माझे लक्ष गेले. त्याने दोन्ही हात जोडले होते. मी ही मनातल्या मनात देवाला नमस्कार केला. आणि मग विमानानं उड्डाणासाठी जोरदार धाव घेतली. बहारीनपर्यंत प्रवास तसा शांत झाला. अ मला एकदा म्हणाला होता. तो ज्या ज्या वेळी विमानप्रवास करी त्यावेळी त्याचे वडील पूर्ण प्रवासाच्या दरम्यान टीव्हीवर बातम्यांचे चॅनेल लावून बसत असत. एकदा तो पोहोचल्याचा फोन आला की टीव्ही बंद!
बहारीनला आम्हाला पुन्हा एका सुरक्षातपासणीतून जावे लागले. त्यावेळी शेषासाईच्या बॅगेत अरब सुरक्षा अधिकाऱ्यांना काहीतरी सापडले आणि त्यामुळे त्याची तपासणी सुरु होती. आम्हांला थोडी भीती वाटली पण त्याला मग सोडून देण्यात आले. सहा तासांचा थांबा असल्याने हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता. शॉपिंग मॉल होते पण आताच खरेदी करण्यात काही अर्थ नव्हता. थोड्या वेळाने भूक लागल्यावर आम्ही सर्वांनी मैकडोनाल्डकड़े मोर्चा वळविला. मी पुढाकार घेऊन २० पौंडांची पहिली नोट मोडली. परकीय चलनातील माझा हा पहिला खर्च. बाकी विमानतळावरून बहारीनच्या रस्त्यावरील रहदारीचे दृश्य दिसत होते. शेवटी एकदा लंडनच्या विमानउड्डाणाची वेळ जवळ आली. तिथे काहीसा गोंधळ झाला होता आणि गेटवर तीन अरब तावातावाने काहीतरी बोलत होते. मला कधीएकदा ह्या अरबांच्या देशातून बाहेर पडतो असे वाटू लागले. शेवटी आम्ही एकदाचे निघालो. आता प्रवाशी बदलले होते. वातावरणात अभावितपणे उच्चभ्रूपणा आला होता.
लंडनला विमान पोहोचल्यावर तेथील ढगाळ वातावरणाने आमचे स्वागत केले. विजाही चमकत होत्या. एव्हाना सायंकाळ झाली होती. लंडनच्या त्या ढगाळ हवामानातील पहिल्या दर्शनाने मी त्याच्या प्रेमात पडलो. सुंदर, पारंपारिक पद्धतीच्या इमारती, आखीव रेखीव रस्ते, ढगांच्या मधून हेलकावे खात जाणारं आमचं विमान, मी एकदम खुश झालो. आम्हांला काही काळ हवेत घिरट्या मारायला लावल्यानंतर शेवटी एकदाची आम्हाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. तिथे आगमनकक्षात विविध अधिकारी येणाऱ्या प्रवाशांच्या कागदपत्राची पाहणी करून त्यांना इंग्लंडमध्ये अधिकृत प्रवेश देत होते. माझा रांगेचा अंदाज चुकला बहुदा! माझ्या सर्व सहकाऱ्यांची तपासणी पूर्ण होवून सुद्धा मी रांगेतच होतो. मग माझ्या आधीच्या कोरिया वगैरे भागातून आलेल्या महिलेच्या कागदपत्रात काहीसा गोंधळ निघाल्याने अजून वेळ झाला. त्यामुळे वैतागलेल्या त्या अधिकारी स्त्रीने माझ्याकडे इंग्लंडमधील वास्तव्याचा कायमचा पत्ता मागितला जो माझ्याकडे नव्हता. मग तिने आठवड्याभरात हा पत्ता पाठविण्याचे माझ्याकडून आश्वासन घेवून मला सोडलं. मी धावतच माझ्या बॅगेकडे गेलो. बिचारी ती एकटीच माझी वाट पाहत होती. ती घेतल्यावर बाहेर माझे सहकारी माझी वाट पाहत थांबले होते. आमच्याकडे दोन पर्याय होते. एक रेल्वेचा आणि दुसरा बसचा! आम्ही बसची निवड केली. सायंकाळचे आठ वाजले तरी आकाशात संधिप्रकाश व्यवस्थित होता. थोड्या वेळात एक अवाढव्य बस आली त्यात आम्ही बसलो. आमच्या बॅगा बसच्या पोटात टाकण्यात आल्या. मी खिडकीजवळची जागा पटकावली. शुक्लपक्षातील अष्टमीचा चंद्र आकाशात आपली प्रभा पसरविण्याचा प्रयत्न करीत होता. हीथ्रोचा पसारा इतका अवाढव्य की तिथून बाहेर पडण्यासच आमच्या बसला पंधरा वीस मिनिटं लागली. एकदा बसने विमानतळ सोडल्यावर तिचा वेगाने प्रवास सुरु झाला. काही वेळात लंडनही सुटलं, अजूनही संधिप्रकाश आणि उजळलेला अष्टमीचा चंद्र ह्यांची जुगलबंदी सुरूच होती. मध्येमध्ये थांबे येऊ लागले आणि प्रवाशी उतरू लागले. मला माझ्या प्रिय बॅगेची काळजी असल्याने मी खिडकीतून प्रत्येकवेळी कोणी माझी बॅग तर नेत नाहीये ना ह्याची शहानिशा करीत होतो. चिंतातूर जंतू तो चिंतातूर जंतू!
शेवटी एकदा बसने ब्रायटन मध्ये प्रवेश केला. ब्रायटनच्या रात्रीच्या अतिसुंदर दर्शनाने मी भारावून गेलो. शनिवार रात्र होती. नवयौवना आणि नवतरुण ह्यांचा रस्त्यावर उत्साहपूर्ण वावर सुरु होता.
ही लग्नाआधीची भेट असल्याने पुढील प्रत्येक भेटीत फोटो काढणारी प्राजक्ता माझ्यासोबत नव्हती. त्यामुळे ह्या भेटीचे माझ्याकडे फोटोच नाहीत! ही एक खंत ! इंटरनेटवरून काही फोटो मिळवून ते मी इथे टाकतोय!
पहिल्या रात्रीच्या हॉटेलच्या आरक्षणाचा गोंधळ झाला होता. चौघांचे आरक्षण एका हॉटेलात आणि पाचव्याचे दुसऱ्या हॉटेलात असला प्रकार होता. आम्ही चौघे आधीपासूनचे ओळखीचे आणि विपलब दुसऱ्या प्रोजेक्टमधून आलेला आणि तोही तसा अनुभवी. त्यामुळे त्याची इच्छा नसताना आम्ही त्याची त्या दुसऱ्या हॉटेलसाठी निवड केली.
आम्ही बस स्टॅंड ते हॉटेल अशी टॅक्सी केली ती भीतभीतच! पण तीन पौंडांच्या आत बिल आल्यावर आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. त्या हॉटेलात खालच्या मजल्यावर इंग्लिश मंडळी पबमध्ये मद्याचा आस्वाद घेत बसली होती. चेकइन नंतर त्यांच्या नजरांना दाद न देत आम्ही आमच्या बॅगा उद्वाहकात शिरविण्यात यश मिळविले. खोल्या अगदी प्रशस्त होत्या. हा एका रात्रीचाच मुक्काम होता दुसऱ्या दिवशी आम्हांला प्रिमियर लॉज मध्ये जायचं होतं. ह्या हॉटेलातील नळांची योजना काहीशी गडबडीची होती. गरम पाणी, थंड पाणी आणि शॉवर हे समजून घेताना मी थंड पाण्याच्या फवाऱ्याने ओलाचिंब झालो. तितक्यात मला शेषासाईचा फोन आला. "आदित्य, ये पानी का क्या चक्कर है रे?" एकदा ओलाचिंब झाल्यावर मी ज्ञानी झालो अशी समजूत करून घेत मी लगेच त्याच्या खोलीत गेलो. तिथे माझ्या अनुभवाचे बोल त्याला ऐकवले. दुर्दैवाने त्याच्या खोलीतील नळांची योजना थोडी वेगळी होती. त्यामुळे माझ्या मार्गदर्शनानुसार वागताना तोही ओलाचिंब झाला. "आदित्य, क्या रे इतने ठंड में तुमको मस्ती करने को होता? शेषाने आपल्या चेन्नई एक्स्प्रेस हिंदीत मला सुनाविले.
रात्री जेवण मिळण्याची आशा नव्हती. बॅगेतील एक ठेपला काढून आणि त्यावर त्या नळातील पाणी पिऊन मी साधारणतः साडेअकराच्या सुमारास निद्राधीन झालो!
No comments:
Post a Comment