Friday, December 6, 2013

दोन समारंभांची एक गोष्ट!


डिसेंबरचा हा मोसम मला तसा भावतो. अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित असे तुमच्या कामाचे स्वरूप असल्यास तुम्हाला ह्या महिन्यात बऱ्यापैकी फुरसत मिळू शकते. आमचा समाज तसा उत्सवप्रिय! पत्नीला ह्या महिन्यात जवळजवळ दररोज एका समारंभाचे आमंत्रण! मम्मीच्या मावसबहिणीच्या दिराचे लग्न - ही आमची जवळच्या लग्नाची व्याख्या! आणि मामाकडील सर्वजण भेटतील हे कोणत्याही समारंभाला अगत्याने हजर राहण्याचे मुख्य कारण. असाच एक समारंभाला  मी हल्लीच हजर राहिलो. म्हटलं तर वाडनिश्चयाचा हा समारंभ! एकदा वधूकडे हा समारंभ झाल्यावर हा समारंभ परत वरपक्षाकडे करण्याची नवीन प्रथा रूढ झाली आहे. हा समारंभ आयोजित करण्यातील दोन्ही पक्षातील काहीशी अदृश्य स्पर्धा अशा ठिकाणी जाणवते.

अशा समारंभात जुन्या लोकांची आवर्जून उपस्थिती जाणवते. जुन्या लोकांना ह्या अशा समारंभात समवयस्क लोकांना भेटून मानसिक समाधान लाभत. आधुनिक काळात वावरताना सतत जाणवणाऱ्या मानसिक अधुरेपणावर ह्या समारंभातील उपस्थिती हा एक उपाय असतो. नवीन पिढी अशा समारंभातील उपस्थितीच्या बाबतीत काहीशी दुभागलेली असते. काहींना ह्या समारंभात मनापासून येऊन जुन्या पिढीतील लोकांशी भेटणे फार भावते. काही वर्षानंतर समारंभाचा हा वारसा नवीन पिढीतील हीच लोक बिनबोभाट चालवतील ह्याविषयी माझ्या मनात संशय नाही.  नवीन पिढीच्या मानसिकेतून पाहिलं तर त्यातील काही जणांना हा वेळेचा अपव्यय वाटू शकतो. ह्या सर्व समारंभातील मदिराप्राशनाचा झालेला अधिकृत प्रवेश ही सुद्धा मला खटकलेली गोष्ट! त्यावर मी आधी एकदा लिहिलं होतं.

आमच्या समाजाने गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रगती केली.  प्रामुख्याने कृषिप्रधान असणाऱ्या ह्या समाजातील काहीजणांनी, काही गावांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीच्या आसपास शिक्षणाचे महत्त्व ओळखलं. शिक्षणाच्या जोरावर स्वतःची प्रगती करून घेतली. शिक्षणाने मिळणारा पैसा सरळ रेषेत आर्थिक समृद्धी मिळवून देतो. त्यामुळे उत्सवप्रियता मर्यादित राहिली. नव्वदीच्या आसपास समाजातील काही जणांनी उद्योगधंद्याची वाटचाल धरली. ह्यातील काही उद्योग काहीजणांना झटपट प्रगतीकडे घेऊन गेले. गगनभेदी आर्थिक समृद्धी आली. ह्या आर्थिक संपत्तीचे काही ठिकाणी अवास्तव प्रदर्शन होऊ लागले. समाजाचं आर्थिक दृष्ट्या आता विभाजन झालं आहे हे तर उघड सत्य आहे. हे आर्थिक विभाजन समाजाला सांस्कृतिक विभाजनाकडे घेऊन चालल्याची लक्षणे मला प्रकर्षाने जाणवत राहतात.

मी ब्लॉग सुरु करण्याच्या वेळची गोष्ट. माझा शालेय मित्र अनुप म्हणाला होता की शक्यतो विशिष्ट धर्म, जात, भाषिक समूह ह्यांचा उल्लेख ब्लॉगमध्ये टाळावा. वादविवादापासून दूर राहण्यास मदत होते. आतापर्यंत बर्यापैकी त्याचा सल्ला मानला. आज थोडेसं उल्लंघन करायचं म्हणतोय!

त्या समारंभाला हजेरी लावुन सायंकाळी भावाकडे गेलो होतो. भावाच्या इमारतीच्या मागे एका लग्नाचा मंडप घातला होता. पुतणीची परीक्षा असल्याने वहिनीने त्या लग्नात होऊ शकणाऱ्या संभाव्य आवाजाचा धसका घेतला होता. पण संध्याकाळपर्यंत लग्न आटपून सुद्धा अजिबात आवाज न झाल्याने वहिनी अगदी खुशीत होती. होय लग्न ब्राह्मणाकडचे होते! लग्न कधी आटपल हे तिला समजलं सुद्धा नव्हत!

गेल्या काही वर्षात ह्या ज्ञातीचा महाराष्ट्रातील राजकारणातील आणि सामाजिक जीवनातील सहभाग बराच कमी झाला आहे. आणि त्याचे काही दुष्परिणाम आपण अनुभवतोय! ह्या कालावधीपूर्वी काही चुका झाल्या ज्याचा परिणाम  म्हणून काहीसं जाणीवपूर्वक हे घडविण्यात आल असाव. ह्या ज्ञातीने अजूनही विद्येची कास सोडली नाही. आर्थिक प्रगती झाली तरी तिचे अवास्तव प्रदर्शन करण्याचे बऱ्याच प्रमाणात टाळले. ह्या समाजाकडून अजूनही बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बाकी सर्व समाजांनी प्रगतीपथाची वाट धुंडाळण्यात यश मिळवलं असलं तरी सर्व काही आलबेल आहे असे नाही. तुमचा संस्काराचा पाया भक्कम असलाच पाहिजे. हा पाया भक्कम करण्यासाठी ब्राह्मण समाजाचे काही गुण उचलणे ही आजही काळाची गरज आहे!

No comments:

Post a Comment