Monday, December 16, 2013

साहेब ऊवाच!


समस्त भारतदेशाच्या ज्ञात इतिहासातील राजकारण्यांचा धुर्ततेच्या बाबतीत क्रम लावायचा म्हटला तर साहेबांचा नंबर बराच वर लागेल. साहेब प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतात ते केवळ वेळ मारून न्यावी म्हणून नव्हे तर त्यात काही अल्पकालीन आणि काही दीर्घकालीन हेतू असतात. काही विधानातील त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आपल्याला समजला असे जरी वाटले तरी तसे असते असेच नाही.
हल्ली साहेब कांदे, साखर ह्यांच्या बाजारभावाविषयी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी भाव त्याप्रमाणे हलतात. हा निव्वळ योगायोग असावा असं समजण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो! रविवारी लोकसत्तेत साहेबांचं विधान वाचलं - "शेतीवर अवलंबून राहू नका, विकसित देशात अवघी १० - १२ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून असते तर भारतात हेच प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे त्यामुळे इथे गरिबी बेकारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे". साहेबांची अभ्यासवृत्ती आणि आकडेवारीचे सखोल ज्ञान इथेही प्रतिबिंबित होतं. ते पुढे म्हणतात की भारतात ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. आणि ४९ टक्के शेतीला नियमित पाणीपुरवठा नाही त्यामुळे शेती किफायतशीर ठरत नाही.
देशाच्या सन्माननीय कृषीमंत्र्याकडून असा निराशावाद ऐकून माझी घोर निराशा झाली. ह्या निमित्ताने हे काही विचार!
१>  आपल्या देशात अजूनही बहुसंख्य भूभाग ग्रामीण आहे. एक लवासा आणि नवी मुंबई असे काही अपवाद वगळता नवीन शहर निर्मितीचा इतिहास आपणाकडे नाही. म्हणजे अधिकाधिक लोकसंख्येला आपण शहरात कोंडी करून बकाल अवस्थेत राहण्यास भाग पाडणार!
२> शेतीतील छोटा शेतकरी अस्तंगत झाला की मोठे शेतकरी किंवा उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात ह्या शेत्या विकत घेऊन तिथे बटाटे, मका, गहू ह्यासारख्या आधुनिक खाद्यपदार्थासाठी  (जसे की बर्गर, पिझ्झा) कच्चा माल पुरविणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणार! मला न राहवून गेल्या वर्षीच्या http://nes1988.blogspot.in/2012/12/stolen-harvest.html ह्या ब्लॉगची आठवण झाली.
३> छोटा शेतकरी हा छोट्या मोठ्या फुलझाडांचा , फळझाडांचा , कीटकांचा संरक्षक आहे. तो आपली परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे नेतो. त्याचे अस्तित्व नाहीसं झालं तर आपण आपला हा संस्कृतीचा अमुल्य ठेवा हरवून बसू.
४> छोटा शेतकरी गरीब असला तरी समाधानाच्या बाबतीत बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असतो. त्याची तब्येतही  चांगली असते. एकदा का तो शहरात आला की तो अगदी घुसमटल्या स्थितीत राहतो. निमित्त काढून गावाला पळतो.
लेखात आपण पुढे म्हटल्याप्रमाणे पर्यटन, फळलागवड आणि मस्त्यव्यवसाय ह्याकडे लक्ष केंद्रित करावे असे म्हटलं आहे ते अगदी योग्य आहे.
साहेब, आपल्याकडील दूरदृष्टीचा आणि द्रष्टेपणाचा गावातील छोट्या शेतकऱ्यांना लाभ होऊ द्यात. पुढील काही वर्षे आपण गावाच्या आणि तेथील शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य द्या! त्याचे शहरात विस्थापन होण्यापासून थांबवा! आपणच हे करू शकता, सर्वजण आपणास दुवा देतील!

No comments:

Post a Comment