Sunday, December 29, 2013

ब्रायटन वास्तव्य - भाग २



दुसरे दिवशी सकाळी लवकरच जाग आली. आदल्या रात्रीच्या झटापटीनंतर ज्यावर तज्ञता मिळविली होती त्या नळातून येणाऱ्या गरम पाण्याने परदेशातील पहिले स्नान आटोपलं. ह्या हॉटेलात सकाळचा नास्ता हॉटेलच्या भाड्यात समाविष्ट असला तरी तो सकाळी एका विशिष्ट वेळेपर्यंतच उपलब्ध असे. त्यामुळे सर्वांना उठवून त्यांना आम्ही नास्त्यासाठी खालच्या मजल्यावरील भोजनकक्षात बोलाविले. हवेतील मस्तपैकी गारवा जाणवत होता. तापमान १३ डिग्री सेल्सिअस मुंबईच्या उन्हाळ्यातून आलेल्या आमच्यासाठी अगदी थंडच होते. नास्त्यासाठी विखुरलेले अंडे (scrambled egg) आणि बेक्ड बीन्स असला काही प्रकार होता. रात्रीचे जेवण न मिळाल्याने आम्ही त्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला.
आता आम्ही प्रिमियर लॉजमध्ये जाणार होतो. रविवार सकाळचे मस्त वातावरण होते. ब्रायटन हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांची वर्दळ होती. आकाशात अचानक ढग येत आणि वातावरणात अजून थंडावा येई. धुकं अगदी रस्त्यापर्यंत येई.


प्रिमियर लॉजमध्ये आम्हाला वेगवेगळ्या मजल्यावर खोल्या मिळाल्या. बाकीचे सर्वजण दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर विभागले गेले होते आणि मी एकटाच पाचव्या मजल्यावर होतो. खोली क्रमांक ५२३! पुढील पाच- सहा आठवडे हे खोली माझी साथ देणार होती. बॅग खोलीत ठेवून आम्ही सर्वजण ब्रायटन दर्शनासाठी बाहेर पडलो. आमचा अजून एक सहकारी शिवा करुमाची एक आठवडा आधी आला होता. त्याचे वास्तव्यही ह्याच हॉटेलात होते. आपसूकच तो आमचा वाटाड्या बनला.  फारसा काही विचार न करता आमची पावले प्रथम ब्रायटन किनाऱ्याकडे वळली. ह्या स्वच्छ किनाऱ्याच्या दर्शनाने आम्ही अगदी प्रभावित झालो. ह्या किनाऱ्याचे वैशिष्ट्य असे की इथे वाळू नसून दगडी गोट्यांनी हा किनारा आच्छादिलेला आहे.


आम्ही ह्या सुंदर किनाऱ्याचे सौंदर्य न्याहाळत असतानाच अचानक स्कॉटिश नर्तकांचा एक समूह अचानक तिथे अवतरला. आणि बघता बघता त्यांनी आपआपल्या जागा ग्रहण करून एका सुंदर नाचाला आरंभ केला.


तो नाच पाच दहा मिनिटे चालला. तो सुंदर नाच संपल्यावर आम्ही उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला. परदेशातील पहिलाच दिवस अगदी अविस्मरणीय झाला होता. 'अ' आणि 'ब' ( आमच्यातील होऊ घातलेलं जोडपं) तर अधिकच खुश होतं. ह्यात एक गोष्ट. आमच्या व्हिसाला झालेल्या विलंबामुळे आमच्या आधी आमचे इतर सहकारी अमेरिकेला वगैरे जाऊन आले होते. आमच्यातील काहींच्या मनाला कोठेतरी ही गोष्ट लागून राहिली होती.  फिनिक्स हे त्यावेळचं अमेरिकन एक्स्प्रेसचे मुख्य ठिकाण असल्याने बरेचजण तिथे जावून आले होते. त्यांनी तेथील छायाचित्र वगैरे पाठविली होती. आमच्यातील एकजण उद्गारला, "थोडा विलंब झाला खरा पण चांगल्या ठिकाणी आलो, फिनिक्सपेक्षा तर चांगल्याच ठिकाणी!" वाक्याचा पहिला भाग जितका मनाला पटला तितकाच दुसरा खटकला! आनंद कसा निरपेक्ष असावा, दुसऱ्या कोणाशी तुलना नसावी!
दुपारचं जेवण मैकडोनाल्डमध्ये झालं. तिथे, हॉटेलच्या स्वागतकक्षात सदैव तत्कालीन इंग्लिश गाणी वाजवली जात असत. सुरुवातीच्या काळात ती कुठतरी माझ्या मनात अपुरेपणाची जाणीव निर्माण करीत. नंतर मग मला ब्रिटनी स्पिअर्सचे "उप्स आय डिड इट अगेन!" हे गाणे फार आवडू लागलं ही गोष्ट वेगळी!
शिवाने एका आठवड्यात एका बांगलादेशी माणसाचे टेक अवे शोधून काढलं होतं. म्हणायची गोष्ट अशी की सिंटेलच्या चेन्नई ऑफिसातून आलेले आमचे वीस पंचवीस सहकारी सुद्धा ह्याच हॉटेलात होते. त्यामुळे त्यांच्याकडून शिवाला बऱ्याच कामाच्या गोष्टी कळल्या होत्या. ह्या बांगलादेशीच्या दुकानात भात, दाल तडका, विंदालू वगैरे डिश मिळत. परंतु होम डिलिवरी नसल्याने वीसेक मिनिटाची पाय रपेट करून तिथे जावे लागे. सुरुवातीच्या काळी आम्ही सात आठ लोक मिळून एकत्र मेनू ठरवून ऑर्डर देत असू. त्यामुळे पदार्थांचे वैविध्य मिळे. पण नंतर पहिल्यांदा ज्यावेळी हिशेबाला मंडळी बसली तेव्हा एकेका पेनीच्या पातळीवर हिशेब करण्याची त्यांची खटाटोप मला आणि काही जणांना खटकली आणि मग आम्ही आमचा  एक छोटा गट स्थापन केला.
पहिल्या रात्री बांगलादेशियाच्या हातचं दाल भात आणि विंदालू खाऊन आम्ही गप्पा टप्पा मारीत असताना अ आणि वीपलबला आमच्या व्यवस्थापकाचा फोन आला. ऑफिसातील पहिल्या दिवशी ह्या दोघांनी सूट घालून यावे असे व्यवस्थापक साहेबांचं म्हणणं होतं. मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू आपल्याला बघावयास मिळतात. हे दोघेही आपल्याला हा फोन आला म्हणून जितके खुश होते तितकेच दुसऱ्यालासुद्धा आला म्हणून नाखूष! पहिल्या दिवशी ज्यांना सूट घालून यायला सांगितलं ते भावी व्यवस्थापक, हा गर्भित संदेश आमचा सद्य व्यवस्थापक देऊ इच्छित होता आणि त्याचवेळी तुम्ही ह्यासाठी एकटेच उमेदवार नाही आहात ही जाणीव सुद्धा! बाकी आम्हांला टाय वगैरे लावण्याचा संदेश ह्या दोघांनी दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन, टायशी झटापट करून आम्ही तयार झालो. अमेरिकन एक्प्रेसची तीन वेगवेगळी ऑफिसे होती. ह्यातील अमेक्स हाउस एका भागात तर नेपियर हाउस आणि लान्चेस्टर हाउस दुसर्यां भागात होती. आम्हांला लान्चेस्टर हाउसमध्ये हजर व्हायचं होते. तिथे आमचा पाच जणांचा हा गट हजर झाल्यावर सर्व नजरा आमच्यावर खिळल्या आहेत असा आम्हांला भास झाला. दोघं सूटमध्ये, बाकी तिघं टाय वगैरे लावून अगदी पांढऱ्या शर्टात वगैरे! आणि बाकी सर्वजण रंगीबेरंगी कपड्यात! आता झालं असं की ऑफिस इंग्लंडात तरी हा गट अमेरिकन कंपनीची संस्कृती पाळण्यावर विश्वास बाळगून होता. प्रश्न असा होता की तरीही माननीय व्यवस्थापकांनी असा आदेश आम्हांस का द्यावा? व्यावसायिक जगतातील एक धडा आम्ही त्यावेळी शिकलो - "बॉस नेहमीच बरोबर असतो!" ह्या धड्यातील खरा अर्थ असा की बॉसच्या निर्णयाशी उघडपणे वाद घालू नये पण जमेल तितकं आपल्या मनाप्रमाणे वागावं. त्यानुसार प्रसाधनगृहाच्या पहिल्या फेरीत टायला रामराम करून मी डेस्कवर परतलो तेव्हा कुठं मला माणसात आल्यासारखं वाटलं.
आता थोडी गडबड झाली होती. इतक्या सगळ्या धावपळीत मला स्वतंत्र डेस्क नेमून द्यायला, त्यावर चालू स्थितीतील संगणक येण्यास आणि माझं स्वतःचा आयडी बनायला एक दोन दिवसाचा विलंब लागणार होता. त्यामुळे मला अमेरिकेतून आलेल्या सिंटेलच्याच श्रीकांत कोंडमबरोबर पहिले दोन दिवस डेस्क शेयर करावा लागला. म्हणजे तो काम करायचा आणि मी ते पाहायचो! साहेब अमेरिकेतून वगैरे आलेले असल्याने त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हा अभूतपूर्व हल्ला असल्याची त्यांना जाणीव होऊ लागली! त्यामुळे मला लवकरात लवकर वेगळी चूल मांडता यावी ह्यासाठी त्यांनी व्यवस्थापकांची पाठ काढली!
पहिल्याच दिवशी श्रीकांतने एका चर्चाखोलीत (कॉन्फरन्स रूम) मध्ये माझ्याशी मीटिंग ठेवली. आम्हां दोघांची युरो रुपांतरणीय कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय आज्ञावली लिहिण्यासाठी नेमणूक झाली होती! वाचून तुम्ही अगदी प्रभावित वगैरे झाला असाल ना! मी ही त्या बैठकीला जाण्याआधी असाच भारावून गेलो होतो. Euro Conversion - Utility Programs असे वाचल्यावर कोण प्रभावित होणार नाही? पण पहिल्याच दहा पंधरा मिनिटात चित्र स्पष्ट झालं होत. ह्यात सर्व युरोपिअन देशांच्या चलनाविषयीची माहिती साठवून येणाऱ्या प्रोग्रॅमच्या विनंतीनुसार  त्यांला ती परत द्यायची होती. श्रीकांत अजून अगदी गंभीर चेहऱ्याने मला ही माहिती देत होता. माझं एक आहे, मी तसा गंभीर असलो तरी ज्यावेळी एखादा गंभीरपणाची गरज नसलेला विषय गंभीरपणे मांडला जातो त्यावेळी मला राहवत नाही! मी सोळाव्या मिनिटाला श्रीकांतला थांबवलं, म्हटलं "साहेबा, हे तर साधे कोबोल प्रोग्रॅम दिसतात! बाहेरच्या दुनियेशी ठीक आहे पण आपल्यात मान्य करण्यात काय हरकत आहे?" श्रीकांत हसला. एका दीर्घकालीन मैत्रीस सुरुवात झाली होती.
तिसऱ्या दिवशी सायंकाळी साडे पाच वाजता ऑफिसातून हॉटेलात परतल्यावर  एक झोप काढण्याची इच्छा झाली. मित्रांना रात्रीच्या  जेवणासाठी मला तुम्ही उठवा असा निरोप ठेवून मी झोपी गेलो. त्यादिवशी सूर्य अगदी प्रखरपणे तळपत होते. एका गाढ झोपेनंतर माझे डोळे उघडले. सूर्यकिरणांनी खोली उजळून टाकली होती आणि घड्याळ सव्वासातची वेळ दाखवत होते. माझी दिशेची जाणीव अजून विकसित झाली नव्हती. मी हे सकाळचेच सव्वासात झाले असा समज करून घेतला आणि माझा पारा चढला. अ च्या खोलीत फोन लावला आणि थेट त्याला मला रात्री न उठविल्याबद्दल त्याची कानउघाडणी करण्यास सुरुवात केली. त्याला काय झालं हे समजण्यास फार वेळ लागला नाही. त्याने माझा हा समज दूर करण्याची काही घाई केली नाही उलट झालं गेलं विसरून ऑफिससाठी लवकर तयार हो असे सुचविलं! काही वेळानं मला काय झालं हे समजल्यावर मात्र माझी अगदी दयनीय अवस्था झाली. पुढे हा किस्सा आमच्या कंपूला बरेच दिवस माझी खेचण्यासाठी पुरला.
ह्या हॉटेलचा फायर अलार्म अगदी संवेदनशील होता. आणि ह्या हॉटेलात येणारे मद्यपी लोक त्याची संवेदनशीलता अगदी तपासून पाहण्यासाठी टपून बसलेले असत. बाथरूमचे दार उघडे ठेवून सचैल स्नान करण्याची त्यांची खासियत होती. पहिल्याच आठवड्यात त्यांनी भल्या पहाटे अडीच वाजता असे परीक्षण करण्याचा मानस केला. कर्कश असा फायर अलार्म बोंबलू लागल्यावर गाढ झोपेत असलेल्या मला काय होतेय हे कळायला एखाद मिनिट गेलं असावं. जाड रजईच्या आत फक्त टी शर्ट आणि शॉर्ट्स असा वेश परिधान केलेल्या मला हॉटेलच्या नियमानुसार घाईघाईत खोली सोडण्याची प्रबळ इच्छा झाली. फक्त पासपोर्ट आणि चलन घेऊन मी त्याच वेशात अशा वेळी एकत्र येण्याच्या ठिकाणी गमन केलं. तिथे वीस पंचवीस लुंगीधारी चेन्नई ऑफिसातील सहकारी हजर होते. ही घटना आजच्या दिवशी घडती तर मी नक्कीच त्यांना 'लुंगी डान्स, लुंगी डान्स' ह्या गीतावर नाच करण्यास भाग पाडले असते. त्या दृश्याचा आनंद एक दोन मिनिटंच टिकला. थंडीने आपला प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आणि माझी बोलती बंद झाली. पुढे अर्धा तासभर सर्वजण हास्यविनोद करीत होते आणि मी मात्र कधी एकदा उबदार खोलीत परतायला मिळेल ह्याची कुडकुडत वाट पाहत होतो.
(क्रमशः )

No comments:

Post a Comment