२०११ साली मार्च महिन्यात एक सहकुटुंब केरळ सहल करण्याची संधी मिळाली. मुन्नार, ठेकडी आणि अल्लेपी अश्या तीन ठिकाणांना आम्ही भेट दिली. त्यावेळी मी ह्यावर दोन ब्लॉग लिहिले होते. परंतु आता छायाचित्रासहीत ह्या ब्लॉगचे पुनर्लेखन करायचा हा प्रयत्न!
१९ मार्च रोजी सकाळी विमानाने आम्ही कोचीन विमानतळावर पोहोचलो. प्रथमदर्शनीच कोचीन विमानतळाच्या मी प्रेमात पडलो. इन मीन तीन विमाने होती तिथे. विरार पलीकडील रेलवे स्टेशनवर कशी एखादी गाडी येवून गेल्यावर पाच दहा मिनिटं वर्दळ असते आणि मग सर्व काही शांत होत. तसंच काहीसं इथं झालं. विमान उतरल्यावर दहा मिनिटात विमानतळ सामसूम झाला. फुरसतीत सामान ताब्यात घेतल्यावर बाहेर येताच आमचा चालक तयारच होता.
तेथून प्रथम आम्ही मुन्नार येथे प्रयाण केले. मुन्नारच्या वाटेवरील नागमोडी रस्ते, एका बाजूला दिसणाऱ्या दऱ्या आणि दुसर्या बाजूला हिरवाईने नटलेले विस्तीर्ण डोंगर असे अप्रतिम निसर्गसौदर्य डोळ्यात साठवत आम्ही जवळपास पाच तासांचा रस्ता कसा पार केला हे आम्हाला कळले सुद्धा नाही. ह्या रस्त्यावरील शांतता कानात साठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. आमचे हॉटेल सिएंना विलेज, हे मुन्नारच्या पलीकडे अधिक उंचीवर होते. तेथे पोहोचताच त्या हॉटेलच्या रमणीय परिसराने आम्ही भारावून गेलो.
प्रत्येक व्यक्तीची पर्यटनाची एक विशिष्ट पद्धत असते. आपण कधीकाळी फिरत असल्यास ही शैली ओळखण्यास आपणास संधी मिळत नाही. परंतु आम्हाला मात्र फारसे न फिरता ही पद्धत अचानक गवसली. मोजक्या दिवसात अधिकाधिक स्थळे पाहणे आम्हाला कधीच जमत नाही. मोजकी स्थळे आपल्या कलाने पाहणे आम्हाला जास्त रुचते. मुन्नारच्या रस्त्यावरील एखादी मनुष्यस्पर्शापासून मुक्त अशी जागा अनुभवण्यासाठी गाडी थांबविणे आम्हाला आवडते. मुन्नारच्या आसपास दोन तीन धरणे, Tea Factory अशी ठिकाणे आम्ही आटोपली. बाकी हॉटेलचा नास्ता मात्र भरपेट आणि अमर्यादित. थंड हवा आणि रुचकर अन्न याचा परिणाम शरीरावर दिसू लागला नाही तरच नवल.
त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार होता म्हणून चंद्राच्या दर्शनासाठी प्राजक्ता कॅमेरा घेऊन बाहेर सज्ज राहिली.
मध्येच आम्ही मट्टूपट्टी आणि अनाईरंगन धरणांना भेटी दिल्या.
तिसऱ्या दिवशी अजून वर जावून तेथील टी factory पाहण्याचे आम्ही ठरवले. हा रस्ता अधिक बिकट, साधी इंडिका तेथे तग धरणार नाही म्हणून खास जीप भाड्याने केलेली. थोड्याच वेळात रस्त्याची अवस्था पाहून आम्ही जीप एका कडेला थांबवली. बाजूलाच एक छोटी ठेकडी आणि त्यावर चहाची पाने खुडणाऱ्या कामगार. अचानक आम्ही त्या टेकडीवर कूच करण्याचा निर्णय घेतला. चहाची रोपे लांबून कितीही नाजूक दिसत असली तरीही असतात तशी खमकी. त्यांचा आधार घेत आणि प्रसंगी त्यांचे बोचकारे खात आम्ही त्या कामगारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आमच्या चालकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडासा आमचा प्रयत्न. तेथील एका वयस्क स्त्रीने सोहमला एका नातवाच्या मायेने जवळ ओढून घेतले. कधी नव्हे ते सोहमने सुद्धा ते लाड आनंदाने स्वीकारले.
अजून पुढचा रस्ता आम्ही स्वखुशीने टाळला आणि परतीच्या वाटेवर आलो. चार तासाची ही फेरी २ तासात आटपून सुद्धा जीपवाला मात्र नेहमीच्या भाड्यावर अडून बसला. व्यावसायिकता माणुसकीला टाळे लावते अशी आमची समजूत काढत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
वाटेत एक फुलांचे उद्यान लागले. तेथील ही नयनरम्य फुले!
प्रवासात आपण निसर्गरम्य ठिकाणे पाहतो, चांगल्या हॉटेलात राहतो, व्यवस्थित खातो पितो. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचे समृद्ध होणारे भावविश्व. नेहमीपेक्षा येणारे वेगळे असे अनुभव तो आपल्या पालकांबरोबर राहून अनुभवत असतो. प्रवास करणारे कुटुंब एक संघ म्हणून सर्व गोष्टींचे नियोजन करीत असते, मजा अनुभवत असते आणि कठीण परिस्थितींचा सामना देत असते. दैनंदिन जीवनात सुद्धा ह्या गोष्टी होत असतात परंतु त्यातील सांघिकपणाची भावना मुलास जाणविण्याइतपत नसते. एका सहलीत हे एका कुटुंबाचे बंध बळकट होत असतात. एरव्ही थंड पाणी पिऊ न देणारे बाबा प्रत्येक जेवणात आईसक्रीम खावून देतात हे कळल्यानंतरचा त्याचा आनंद शब्दात पकडण्यापलीकडचा असतो. तो त्याला धडा देवून जातो की जीवनात प्रत्येक गोष्टीला तर्काची कसोटी लावायचा प्रयत्न करू नये. आयुष्यात काही गोष्टी तर्कापलीकडे घडतात आणि त्या आपणास आनंदही देवू शकतात.
तिसऱ्या दिवशी आम्ही ठेकडीला प्रस्थान केले. हा रस्ता अगदी डोळ्याचं पारणं फिटवणारा होता.
ठेकडी येथील हॉटेलचा परिसर पाहून आम्ही बेहद्द खुश झालो. तेथून पेरियार येथील तलाव आणि त्या सभोवतालचे वन्य जीवन पाहण्यासाठी आम्ही निघालो. पेरियार जलाशयातील बोट दुपारी ३:३० वाजता निघणार होती. योग्य माहितीच्या अभावी आम्ही तेथे २ वाजताच जावून पोहचलो. तिकीटे घेतल्यावर आम्ही बोटींच्या धक्क्यावर जावून पोहोचलो. तेथे आजूबाजूंच्या झाडांवर माकडांनी वास्तव्य केले होते. जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसतसे माकडांनी झाडांवरून खाली उतरण्यास प्रारंभ केला. लोकांजवळील खाद्यपदार्थ हिसकावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळाने काळ्या माकडांच्या दुसर्या एका टोळीने ह्या आधीच्या समूहावर हल्ला करून त्यांना हिसकावून लावले. शेवटी एकदा तिथे बोटींचे आगमन झाले. जलतरींगिनी (चुकलो जलथरींगिनी) ह्या बोटीत आम्ही बराचश्या विदेशी पर्यटकांबरोबर बसलो. ह्या बोटीबरोबर अजून तीन बोटी होत्या. आम्हाला जबरदस्तीने संरक्षक jacket घालावी लागली. ही jacket म्हणा किंवा विमानातील प्राणवायूचे मास्क म्हणा, हे आपल्या किंवा त्या कंपनीच्या समजुतीसाठी! पुढील दोन तास आम्ही एका अवर्णनीय अनुभवाचे साक्षीदार होतो. जलाशयाभोवती घनदाट जंगल आणि ठिकठीकाणी जलाशयाच्या काठावरील विस्तीर्ण कुरणांमध्ये चरणारे, शहरीकरणाचा स्पर्श न झालेले वन्य प्राणी! हरणे, कोल्हे आणि हत्ती ह्या प्राण्यांचे आम्हाला दर्शन झाले.
वाघाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आम्हां सर्वांची मात्र थोडी निराशाच झाली. जंगलाचे वातावरण मात्र मला बरेच गूढ वाटले आणि मला त्याने मोहवून टाकले. शतकोशतके न बदललेली ही भूमी आणि त्यात फक्त अन्न ही मुलभूत गरज भागविण्यासाठी जीवन मरणाचा खेळ दररोज खेळणारे वन्यजीव आपल्याला आपल्या दररोजच्या संघर्षाच्या निरर्थकतेची जाणीव करून देतात. ह्या जलाशयात बरेच वठलेले वृक्ष आणि त्यावर वास्तव्य करणारे पक्षी आढळतात. हे पक्षी आपल्याला मासे पकडण्याची कसरत सुद्धा करून दाखवतात. बाकी मध्येच एका हत्तींचा समूह जवळून बघण्याच्या नादात आमच्या बोटीला बाकीच्या बोटींनी मागे टाकले. त्यामुळे सोहमची बैचैनी वाढली. आपण बाकीच्या बोटींना कधी एकदा मागे टाकतो असे त्याला झाले. त्या जलाशयाच्या दुसर्या टोकाला पोहचून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता बोटीचे सारथ्य दुसर्या माणसाने हाती घेतले, आता हा तरी दुसर्या बोटींना मागे टाकेल ही सोहमची अपेक्षा मात्र काही सार्थ झाली नाही. शेवटी मात्र फक्त आमच्याच बोटीला एका हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने जवळून दर्शन दिले आणि फोटोसाठी पोझही दिली.

हत्तीणीच्या पिल्लाने पोझ दिली मग सोहमने सुद्धा दिली!
मसाल्याची थोडीफार खरेदी करण्याच्या नादात थोडा वेळ झाला आणि रात्र उजाडली. परतीचा प्रवास २० किलोमीटर होता. अंधारातील निर्मनुष्य रस्ते पाहून सोहमने रात्रीचा प्रवास करणे कसे चुकीचे आहे हे आम्हाला समजावले आणि खरेदी वेळीच आटोपणे आवश्यक आहे असा सल्लाही दिला. बर्याच वेळा आपले गुण मुलामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यावेळी मन कुठेतरी सुखावते. वयानुसार आपण भावना मनातच ठेवून द्यायला सरावतो परंतु लहान मुलांचे मात्र तसे नसते. मनातील विचार ते बिनधास्त बोलून दाखवितात. बर्याच दिवसांनी विमानात बसल्यावर ज्यावेळी उड्डाणाची वेळ आली तेव्हा मनात थोडी धाकधूक असताना 'बाबा आपले विमान पडणार तर नाही ना? असा प्रश्न ऐकल्यावर मन धन्य होते. आमचा ड्रायव्हर दररात्री कारमध्येच झोपायचा. ही गोष्ट आपल्याला जशी खुपते तशी सोहमला ती पटली नाही. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण त्या बदलणे शक्य असूनही आपण त्या बदलत नाही.
हॉटेल कारमेलियाचा परिसर स्वर्गीय! ह्या परिसराचा आनंद लुटण्यासाठी किमान १ दिवस इथे थांबायला हवे होते असे राहून राहून वाटून गेले!



प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला. आजचे आकर्षण अल्लेपी येथील नावेतील प्रवास आणि रात्रीचे वास्तव्य हे होते. आतापर्यंत अतिशय शांतपणे कार चालविणारा आमचा ड्रायव्हर आज मात्र सुसाट सुटला होता. मल्याळम भाषेतील शेलके शब्द ऐकायची संधीही आम्हाला या निमित्ताने मिळाली. संधी मिळताच त्याला मी विचारले, काय रे बाबा आज काय झाले? तो तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तरला की आज तो त्याच्या अल्लेपी येथील घरी जाणार होता आणि पाच दिवसाने बाबा येणार म्हणून त्याच्या मुलाने शाळेला सुट्टी घेतली होती! बर्याच जणांकडून ऐकलेल्या केरळच्या backwater चा प्रवास सुरु झाला. नावेत सारथ्याने, त्याच्या मदतनीसाने आणि आचार्याने शहाळ्याचे पाणी देवून आमचे स्वागत केले. ही हाउसबोट तशी भव्य पण मस्त्यगंधाने सुगंधीत! दिवसाचा प्रवास तसा मजेचा! सर्वत्र जलाशय आणि काठावर झाडांमध्ये वसलेली केरळची गावे हे पाहण्यास मजा आली. संध्याकाळी साडेपाचनंतर ह्या बोटींना जलसंचार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे एका गावाच्या काठी ही बोट वास्तव्याला आली.
गावात एक फेरफटका मारण्याचा आमचा उत्साह थोड्याच वेळात मावळला! जलाशयाच्या काठी दात घासणारे, भांडी धुवणारे गावकरी पाहण्यास आम्ही सरावत होतो तितक्यात आमच्या समोरच आमच्या आचार्याने त्याच पाण्यात डुबकी मारून त्यांचे संध्याकाळचे स्नान आटोपले. ते पाहून आम्ही याची देही डोळा धन्य झालो! बाजूला अशा अनेक बोटी वास्तव्याला आल्या होत्या! त्यातील कुटुंबेही फेरफटका मारण्यासाठी निघत आणि मग थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारून जात. ही रात्र आता अशा ठिकाणी काढायची अशा विचाराने कंटाळलो असताना 'बाबा येथे रात्री डाकू तर येणार नाहीत, या सोहमच्या प्रश्नाने आमची करमणूक झाली. नावाड्याने विचारले हा काय विचारतो आहे? डाकू हा शब्द त्याला हिंदीत समजावू न शकल्याने मी शेवटी त्याला फुलनदेवी हा शब्द सांगितल्यावर त्याची हसताहसता पुरेवाट झाली. बाकी ह्या हाउसबोटीवर जेवण मात्र अगदी रुचकर होते. रात्री डासांचा मुकाबला करावा लागला. शेवटी एकदा बेडरूम मधला AC सुरु केल्यावर आम्ही सुखावलो. शेवटच्या दिवशी कोचीनच्या दिशेने आम्ही प्रस्थान केले. तिथे थोडीफार खरेदी करून भारताचा विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघण्यासाठी आम्ही विमानतळावर येवून दाखल झालो.
परतीच्या प्रवासातील एक विमानातून घेतलेले छायाचित्र!
रात्री बोरीवलीला परतल्यावर भारताने सामना जिंकला आणि एका छान सुट्टीची सांगता झाली.
No comments:
Post a Comment