त्या दिवशी बराच वेळ भोसले काका सायलीच्या घरी थांबले होते. "अग पण त्या डेटाबेसवर केलेल्या चौकशीचे निकाल काय आले हे तर कळेल का? त्यांनी विचारले. "तुम्ही पण, काका! मी स्वतःची बॉसच्या चौकशीसत्रातून कशी सुटका करून घ्यायची ह्याच्या मागे होते, माझे लक्ष थोडेच त्या गोष्टीकडे असणार!" सायली उद्गारली. "थांबा, मी तुम्हांला चहा ठेवते, मी पण अशी ना, इतका वेळ मी तुम्हांला चहाशिवाय ठेवलं!" काहीशा अपराधी भावनेने सायली उद्गारली. चहा बनविण्यात सायलीचा हातखंडा होता. बॉसने तिची चौकशी केली होती त्यावेळचा घटनाक्रम आठवायचा ती प्रयत्न करू लागली. बॉसने केवळ अर्धा मिनिटभर तिच्याभोवती त्या डेटाबेस क्वेरीच्या पानाची छापील कॉपी तिच्यासमोर धरली होती. इतक्यात चहाच्या उकळत्या वाफांकडे तिचे लक्ष गेले.
आणि अचानक तिच्या मेंदूत एक चमक गेली. उकळत्या चहाखालील गॅस बंद करून धावतच ती भोसलेकाकांकडे गेली. "काका, त्या छापीलकॉपीत जावा हा शब्द होता! हा उकळता चहा पाहून मला आठवलं!" भोसले एकदम खुश झाले. त्यांना इतकी माहिती पुरेशी होती. त्यांनी तात्काळ आपला पुतण्या नंदनला फोन लावला. नंदन हा एकदम होतकरू तरुण, व्यावसायिक क्षेत्रातील सर्व संधी सोडून तो समाजाची सेवा करायला पोलिसदलात सामील झाला होता. अर्ध्या तासातच त्याचा परत फोन आला. मुलकानी आडनाव असलेल्या दोन व्यक्तींनी काही दिवसाच्या अंतरावर बंगलोर ते जकार्ता आणि पुढे जावा असा प्रवास केला होता. भोसले एकदम खुशीत होते. आणि सायली सुद्धा! "अग, मला एक तत्काळ उद्या सकाळचे जकार्ताचे तिकीट बुक करून देशील का?" त्यांनी तिला विचारलं. "नक्की काका!" सायली अगदी उत्साहित होऊन म्हणाली. तिकिटाचे आरक्षण करताना आपण दोन तिकिटाचे आरक्षण करीत आहोत हे थोडेच ती भोसलेकाकांना सांगणार होती! देवाच्या कृपेने भारतीयांना इंडोनेशिया सरकारने आगमनाच्या वेळीच विसा मिळवून देण्याची सोय करून ठेवली होती.
भल्या पहाटे भोसलेकाका निघाले आणि काही वेळात सायलीसुद्धा! विमानाच्या गेटपर्यंत सायली भोसलेकाकांना चुकवत होती. न जाणो ह्यांनी आपल्याला इथून परत पाठवलं तर! पण एकदा विमानात प्रवेश केल्यावर मात्र तिने आपल्या चेहऱ्यावरील ओढणी काढून घेतली. खिडकीजवळची आपली सीट पकडून तिने अगांथा ख्रिस्तीचे पुस्तक डोळ्यासमोर धरून बसली. त्या पुस्तकाच्या आडून भोसलेकाकांचा शोध घेत असतानाच एक देखणा तरुण तिच्यासमोर आपला बोर्डिंग पास घेऊन आला. "हीच C१२ सीट आहे का?" असे त्याने इंग्रजीतून सायलीला विचारले. जरा आगाऊच आहे कार्ट! मनातल्या मनात सायलीने विचार करत त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. पण तो तरुण काही हार मानण्यातल्यापैकी नव्हता. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. "सीट क्रमांक इथे लिहिला आहे!" सायलीने ठसक्यात उत्तर दिले. "बाकी दिसायला तसा बरा आहे!" मनातल्या मनात सायली म्हणाली. आता हा बाजूला बसला, कधी एकदा जकार्ता येईल ह्याचा ती विचार करू लागली.
विमानाने उड्डाण केल्यावर मात्र सायलीला राहवेना. आता भोसलेकाका तिला परत पाठवायची शक्यता कमीच होती. तिने उठून पाहिलं तर पुढच्या दोन सीट सोडून तिला भोसलेकाका दिसले. सायलीला पाहून त्यांना काय बोलावे तेच सुचेना! "तू थांब, मी तिथे येतो" असे तिला नजरेनेच खुणावून ते उठले! सायलीच्या सीटजवळ पोहोचल्यावर तिच्या बाजूला ब्लैंकेट ओढून झोपलेल्या तरुणाला पाहून त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का बसला.
नंदन, सायली आणि भोसलेकाकांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्व जावा बेटाचा तपास चालू ठेवला होता. परंतु तिथे काहीच सुगावा लागत नव्हता. संध्याकाळ होत होती, नंदनने आपले सर्व माहितगार मित्र कामाला लावले होते. बालीमध्ये काही भारतीय आले आहेत ह्या त्यांच्या माहितीनुसार ह्या तिघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बालीला प्रयाण केले.
तिवारीच्या बायकोने त्याच्या सर्व मित्रांना सळो की पळो करून सोडले होते. तिवारी बेपत्ता होऊन दोन दिवस होत आले तरी काही पत्ता लागत नव्हता. हे सर्व मित्र पोलिसात तक्रार नोंदवायला टाळत होते. आणि त्यांनी तिवारीच्या बायकोलाहि पोलिसात तक्रार न करण्याबाबत बजावून सांगितले होते. शेवटी ती बिचारी धाय मोकलून एकटीच घरात रडत बसली होती. पैशाचा मोह आपल्याला नडला हेच तिला समजून चुकले होते.
"मुलकानी तो कब का मर गया!" रामलालचे फटके खात खात तिवारी बोलत होता. "बेणं पक्कं बेरक दिसतेय!" रामलाल मनातल्या मनात म्हणत होता. शेवटी संध्याकाळच्या वेळेला तिवारीला चांगली पाजायची असा त्याने विचार केला. आणि रामलाल घराबाहेर पडला.
व्हिक्टर आपल्या चुकीला दोष देत बसला होता. रामलालचा पत्ता वगैरे घेण्याची त्याने तसदीसुद्धा घेतली नव्हती. आता रामलाल गायब होता आणि तिवारीसुद्धा! आधी चांगल्या भाषेत बोलणाऱ्या तिवारीच्या मित्रांनी त्याच्या शोधासाठी आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. आता आपली बेप्पता व्हायची वेळ आली आहे असे व्हिक्टर विचार करीत बसला होता.
दारूच्या बाटल्यांची नावे सांगताना रामलालच्या नाकी नऊ आले होते. शेवटी त्या दुकानादारापुढे शरणागती पत्करून त्याने तीन चार बाटल्या उचलल्या आणि तो दुकानाबाहेर पडला. समोरच समुद्रकिनारा होता. आणि सूर्यास्ताची वेळ झाली होती. रामलाल ची पावले आपसूक समुद्रकिनाऱ्याकडे वळली. अस्ताला जाणारे सूर्यबिंब अगदी झकास दिसत होते. घराच्या आठवणीने रामलाल भावूक झाला. आणि त्याचे लक्ष किनाऱ्याकडे केले. किनाऱ्यावर बनविलेले वाळूचे सुबक किल्ले आणि शिखराकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता पाहून थक्क होण्याची आता रामलालची पाळी होती!