Monday, February 17, 2014

ब्लॉगच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त !


आज ब्लॉगचा चौथा वाढदिवस! दीपकने २०१० ला हा आमच्या बॅचसाठी हा ब्लॉग स्थापन केला. सुरुवातीला दर्शन, अनघा ह्यांनी त्यात सहभाग घेतला. मग दर्शनने माझं मराठीवेड पाहत आपला इंग्लिशमधील प्रवासवर्णनाचा एक सुंदर ब्लॉग वेगळा सुरु ठेवला.
सुरुवातीला मध्यमवर्गीय संस्कृतीची शिकवणूक घेत वाढलेल्या आणि आता तिशी- चाळीशीत पोहोचलेल्या पिढीचे मनातील मानसिक संघर्षावरील लेख आले. आर्थिक प्रगतीचा मोह सोडवत नाही आणि त्यापायी विस्कटलेल्या नात्यांची स्थिती पाहवत नाही हे कुठेतरी पकडायचा प्रयत्न केला. विवाहसंस्थेवर सुद्धा काही ब्लॉग लिहिले. पत्नीची आधुनिकता आणि विचारस्वातंत्र्य समजून घेण्याचं प्रशिक्षण, सामंजस्य  किती आधुनिक नवरोजींकडे आहे हा प्रश्न! विवाहसंस्थेतील वेग जरा जास्तच वेगाने झाले हे माझे मत! मग हळूच एकदा मदिराप्राशनाच्या मला अजिबात न पटणाऱ्या परंतु झपाट्याने फैलावणाऱ्या रूढीवर एक ब्लॉग आला.
त्यानंतर आलं ते वसई. वसईच्या आठवणी, मग त्यात पांगारा, बावखल, होळीबाजार, लग्नात आनंद मानणारा वसईचा आमचा समाज, वसईची पिशवी, शाळेच्या आठवणी ह्या सर्वांना जसं आठवलं तसं लिहिलं.
मग आले ते दैनदिन दिवसात अनुभवावं लागणार व्यावसायिक जीवन आणि त्या जीवनातील संकल्पना! अशा संकल्पना ज्या प्रत्यक्ष जीवनात सुद्धा वेगळ्या स्वरुपात समोर येतात! व्यावसायिक जीवनानिमित्त अनुभवलेल्या काही देश परदेशातील आठवणी सुद्धा ह्यात समाविष्ट झाल्या. ब्लॉग हिटची संख्या पहाता लोकांना अशा आठवणी वाचायला आवडतात हे जाणवलं.
मग आलं ते काही प्रवासवर्णन! केरळ, सापुतारा, सासुरवाडीच्या मंडळीबरोबर केलेलं एकवीरा दर्शन! हे जणू काही आपली दैनंदिनी सर्वांसमोर मांडण्यासारखे झाले. ह्यात प्राजक्ताचे विशेष कौतुक! तिच्यावरील टिपण्णीला तिने न वैतागता दाद दिली!
मध्येच गणिताचा किडा वळवळला! मग त्यावर काही ब्लॉग लिहिले. बहुदा विद्यार्थ्यांनी ते वाचले असावेत. त्यांची हिट संख्या वाढली. अभ्यासपद्धतीवरील एक दोन ब्लॉग चांगले जमले असे माझे वैयक्तिक मत!
असंच एकदा अच्युत गोडबोले ह्यांचं मुसाफिर वाचलं. एव्हाना वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना ई मेलही पाठवलं. त्यांना ते आवडलं असावं असा अंदाज. त्यांच्या पुस्तकातील काही प्रकरणांचा सारांश त्यांची परवानगी घेत इंग्लिश ब्लॉगवर प्रसिद्ध केला. त्यावेळी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी प्रत्येक वाक्याचं परीक्षण केलं होत आणि त्यातून बऱ्याच सुधारणा सुचविल्या! आपण जे काही लिहितो त्यात परिपूर्णतेचा हव्यास हवा हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
त्यानंतर मध्येच सद्यस्थितीवर (आत्मक्लेश, सचिनची निवृत्ती, दिल्लीतील घटना, आप) ह्यावर लेख लिहिले. परंतु ह्यात सखोल अभ्यास हवा हे जाणवलं आणि त्याचा आपल्याकडे अभाव आहे ही मनातल्या मनात कबुली दिली.
शालेय मित्र अनुप एखादं चांगलं पुस्तक वाचलं की लगेच मला फोन करून कळवितो आणि बऱ्याच वेळा पाठवूनही देतो. ब्लॉगला पुढे विषय काय ही माझ्यासोबत त्यालाही पडलेली चिंता!
मग आल्या त्या काही कथा! पट मांडला, आभास, भेदी, तपोवन, जाणता अजाणता आणि आता थरार! काही चांगल्या जमल्या, काही चांगल्या सुरुवातीनंतर मध्येच ढेपाळल्या! ह्यात आभास आणि जाणता अजाणता ह्या काहीशा वाचकांना आवडलेल्या असाव्यात असे जाणवले!
मध्येच आत्मविश्वासाला उधाण आलं. लोकसत्तेला ह्यातील बरेच ब्लॉग पाठविले, पण एकही प्रसिद्ध झाला नाही! परंतु व्यावसायिक जगातील 'चलते रहो!' ह्या वाक्याला अनुसरून प्रयत्न चालू ठेवला! एकदा तर 'आली लहर आणि केला  कहर' नुसार मान्यवर प्रकाशकांना ह्या ब्लॉगचे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी फोन वगैरे केले. पुन्हा निराशा! बाकी 'होऊ दे खर्च!' ह्या उक्तीनुसार मी केव्हातरी ह्या ब्लॉगचे पुस्तक प्रसिद्ध करणारच! मध्येच आत्येबहीण प्राची आणि तिचे यजमान संदेश ह्यांनी ह्याबाबत प्राथमिक हालचाली सुद्धा केल्या होत्या!
प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी! परंतु त्यातील काही अगदी निष्ठावंत! प्रत्येक ब्लॉगला प्रतिक्रिया देणार! आणि त्यातील कोणतं वाक्य आवडलं हे ही सांगणार! "तुझ्या दोन ओळीच्या मध्ये बराच अर्थ दडलेला असतो" ही मला आवडलेली प्रतिक्रिया! मी तसा गंभीर माणूस. पण गंभीर लेख लोक वाचत नाहीत हे मनीचे शल्य. असाच एखादा गंभीर ब्लॉग मनासारखा उतरून सुद्धा ब्लॉग हिट संख्या कमी असते त्यामुळे नाराज मन एखाद्याच पण मनापासूनच्या प्रतिक्रियेने सुखावते. शाळेतील माझे आवडते भिडे सर ज्यावेळी तू चांगला लिहितोस असे सांगतात त्यावेळी मी धन्य होतो. माझी अमेरिकेत वास्तव्य करणारी बहिण निवेदिता (निऊ) "आदुदादा तुला हे सुचतं तरी कसं" असे अगदी गहिवरून सांगते. मग ती स्तुती करताना अगदी शब्दांचे भांडार मोकळे करते!  असेच एकदा "माझ्या मुलाचा अभ्यास" ह्या ब्लॉगवर आमच्या शाळेतील एका माजी विद्यार्थिनीने अभिनंदनाचा फोन केला हे ही लक्षात राहिले!
मध्येच माझे दोन शालेय मित्र बारमध्ये बसले असताना त्यांनी माझ्या ब्लॉगची चर्चा केली. हे ऐकून मला स्वर्ग दोन बोटे उरला! ऑफिसात एक आमचा डिनर ग्रुप आहे. त्यातील सुजित हे ब्लॉग जमेल तितके वाचतो आणि चांगल्या प्रतिक्रिया देतो. बाकीचे दोघं खट्याळ वर्गात मोडतात. माझा ब्लॉग न वाचता त्याची चांगलीच टर उडवितात!
ब्लॉग लिहिण्यात एक चांगली गोष्ट झाली. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या वेळी आपल्या मनात कोणते कोणते विचार आले होते ह्याची एक नोंद राहिली. बहुदा निवृत्त झाल्यावर वाचायला अजून मजा येईल!
पुढे किती वर्षे ब्लॉग लिहिणार? माहित नाही! परंतु एक गोष्ट खरी - बाकी सर्व माध्यमात थिल्लर गोष्टींचा कल्लोळ चालला असताना साध्या माणसाचे साधे विचार आत्मविश्वासाने मांडणारा हा ब्लॉग! साध्या माणसांनो, ह्या जगात अनाडी लोक आत्मविश्वासाने वावरतात तर आपण का वावरू नये! हाच संदेश मी देऊ इच्छितो!
सर्व वाचकांचे, दीपकचे आणि ह्या ब्लॉगमध्ये वेळ घालविणाऱ्या मला सहन करणाऱ्या प्राजक्ताचे आभार मानून हा पाचव्या वर्षात पदार्पण करणारा ब्लॉग इथेच आटोपता घेतो!

No comments:

Post a Comment