बाली बेटावरील एस्टेट दलाल व्हिक्टर खुशीत होता. गेल्या पाच महिन्यात त्याचे सात बंगले दीर्घ मुदतीच्या भाड्याने गेले होते. त्यातील काहींनी तर बंगले विकत घेण्याची इच्छा दर्शविली होती. आता त्याच्याकडे खूप काम होते. ह्या बंगल्यांच्या मूळ मालकांशी वाटाघाटी करून ह्या होतकरू मालकांना योग्य भावात हे बंगले मिळवून द्यायचे आणि त्यात आपला नफाही कमवायचा हे जरा डोक्याचे काम होते आणि ह्यात थंड डोक्याने वाटाघाटी करणारा माणूस हवा होता. आपला तापट स्वभाव इथे धोकादायक ठरू शकतो हे व्हिक्टर जाणून होता. म्हणून त्याने स्थानिक वर्तमानपत्रात एका सहायकाची जाहिरात दिली होती. परंतु आतापर्यंत थंड प्रतिसाद लाभला होता. हे सर्व होतकरू मालक भारताच्या विविध भागातून आले असल्याने त्याला भारतीय लोकांशी व्यवहार करण्याचा पूर्वानुभव असलेला माणूस मिळाला तर हवे होते.
असाच सकाळी आपल्या कार्यालयात व्हिक्टर बसला असताना एक पन्नाशीच्या आसपासचा माणूस त्याच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराशी आला. त्याला सहायकाच्या पदासाठी अर्ज करायचा होता. व्हिक्टरने त्याला आत बोलावले. माणूस तसा मोजके बोलणारा होता. त्याने हैद्राबाद, बंगलोर, कोची वगैरे भागात काम केले होते. आणि आता तो इंडोनेशियात आपले नशीब आजमावायला आला होता. त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. व्हिक्टर एकंदरीत त्याची निवड करण्याच्या मार्गावर होता. त्याचे सर्व भाडेकरू भारताच्या उत्तर भागातून आले असले तरी हा माणूस त्यांच्याशी सुद्धा चांगले संभाषण साधू शकेल असा व्हिक्टरला विश्वास वाटू लागला होता. त्याने त्या माणसाला त्याचे नाव विचारले. "रामलाल" तो इसम उत्तरला.
त्या संध्याकाळी बालीच्या एका कोपऱ्यातील त्या बंगल्यात पार्टी मोठी जोरात आली होती. तिवारी आणि त्याच्या पत्नीने ह्या पार्टीचे आयोजन केले होते. भारतातून ती बातमी आली होती. सर्व पुरावे नष्ट झाले हे मानायला आता काहीच हरकत नव्हती. तिवारीची पत्नी गेल्या आठवड्यातच बालीला आली होती. त्याची मित्रमंडळी आणि तिवारी कुटुंबीय एकदम खुशीत होते. खाणेपिणे, मदिराप्राशन आणि नाचगाण्याला अगदी उधाण आले होते. इतक्यात तिवारीचा फोन खणखणला. व्हिक्टरचा आवाज ऐकून तिवारी वैतागला. पण त्याने स्वतःला थोडे सावरले. "तिवारी, तू भी आजा पार्टीमें!" व्हिक्टरने मोठ्या खुशीत हे आमंत्रण स्वीकारलं. काही वेळातच तो पार्टीत येऊन पोहोचला. व्हिक्टर तसा मोठा धूर्त माणूस होता. पहिलं आपलं काम आणि मग बाकी धमाल हे यशस्वी व्यावसायिकाचे तत्व तो पुरतं जाणून होता. शेंगदाणे तोंडात टाकत टाकत त्याने चौघा पाच जणांना आपल्याभोवतीच्या कोंडाळ्यात एकत्र आणण्यात यश मिळविले. "सुनो, मुझे एक एकदम ब्रिलीयंट एजंट मिला है! जल्दही हम मालिकसे बात शुरू करेंगे!" त्याच्या ह्या प्रस्तावास बाकीच्या लोकांकडून जरी थंडा प्रतिसाद मिळाला तरी तिवारी मात्र ह्यात बराच उत्सुक दिसला. व्हिक्टरला एका कोपऱ्यात घेऊन त्याने लवकरात लवकर त्या एजंटबरोबर मीटिंग ठरवायला सांगितलं. तिवारीकडे भरपूर पैसा दिसतोय व्हिक्टरने अंदाज बांधला.
तिसऱ्याच दिवशी सकाळी रामलाल तिवारीच्या घरी पोहोचला होता. रामलालच्या हुशारीने तिवारी एकदम खुश झाला होता. मालकाची विचार करण्याची पद्धत, ह्या बंगल्याचा सद्य स्थितीतील बाजारभाव ह्याविषयी रामलाल पूर्ण अभ्यास करून आला होता आणि त्याने आपलं प्रपोजल त्या दोघांपुढे ठेवले. तिवारीची पत्नी शीतपेये आणायला आत गेली. परत येताना रामलालच्या हातात शीतपेयाचा ग्लास देताना तिला काहीतरी जाणवले. ती अगदी बेचैन झाली. तिने तिवारीला नजरेनेच आत येण्याची खुण केली. काहीशा नाखुशीनेच तिवारी आत गेला. ती संधी साधून रामलालने एक ध्वनीमुद्रण करण्याचे यंत्र सोफ्यामागे दडवले.
"मी ह्या माणसाला आधी कोठेतरी पाहिलं आहे!" तिवारीची पत्नी अगदी छातीठोकपणे सांगत होती. "अगं, असं कसं होईल? हा तर दक्षिण भारतात काम करीत होता आणि आता थेट इथे आला. आपण कधी त्या भागात गेलोच नाहीत तर!" तिची कशीबशी समजूत काढत तिवारी बाहेर आला.
रामलालने एव्हाना गॉगल घातला होता. तिवारी काहीसा आश्चर्यचकित झाला. परंतु रामलालने पुन्हा एकदा त्याचे लक्ष ह्या डीलच्या चर्चेकडे वळविले आणि दोन दिवसात मालकाबरोबर बैठक ठेवण्याचे आश्वासन देऊन रामलालने ठेवून काढता पाय घेतला.
दुपारी तिवारीची पत्नी झोपली होती. अचानक तिला रामलालचे डोळे आठवले, ती खडबडून झोपेतून उठली. आणि मग तिला आठवलं की ह्या इसमाला आपण पूर्वी कोठे पाहिलं आहे ते! तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता. घाबरीघुबरी होऊन तिने तिवारीचा शोध सुरु केला. तिवारी घरात नव्हताच!
मस्त चाललय. येऊ द्यात आणखीन.
ReplyDeleteमस्त अभिप्राय! आवडला! नववा भाग ह्या प्रतिक्रियेने प्रोत्साहित होऊन लिहिला!
Delete