Sunday, February 23, 2014

थरार भाग ७..


सायली मोठ्या मुश्किलेने दिवस ढकलत होती. पाच सहा दिवस गेले असतील आणि मग ती बातमी आली. दरीमध्ये एक छिन्न विछिन्न झालेला मृतदेह सापडला होता. सायलीला ओळख पटवून देण्याच्या पलीकडची त्या देहाची स्थिती होती. आणि सायलीला केलेल्या केवळ एका फोनवर  पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार करून टाकले. सायली आता पुरती अनाथ झाली होती. निदान अंत्यदर्शन घ्यायला मिळायला हवे होते असे तिला राहून राहून वाटत होते. परंतु आता कोणाशीही संघर्ष करण्याच्या पलीकडे तिची स्थिती होती.
सायलीची मनःस्थिती आता खूप खराब झाली होती. रात्र रात्र ती जागून काढायची. अशाच एका रात्री तिला मामांबरोबर कोकणात घालविलेल्या सुट्टीची खूप आठवण आली.  सायंकाळी मामा तिला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जायचे. वाळूत किल्ले बनविण्यात मामांचा हातखंडा होता. असाच एकदा त्यांनी बराच वेळ घालवून मोठा वाळूचा किल्ला बनविला होता. आणि त्या किल्ल्याच्या भोवतालच्या बाजूने वरवर जाणारा एक रस्ता. तो रस्ता किल्ल्याच्या शिखरावर पोहोचला होता. तिथे एक झेंडा रोवून मामा म्हणाले होते, "सायली, तुलाही असेच यशाचे शिखर काबीज करायचं आहे. जे काही क्षेत्र निवडशील त्यात!" ह्या आठवणीनंतर तिला काहीसं बरं वाटलं. "होय मामा, मी तुमचं स्वप्नं पुरं करीन!"
त्या आठवड्याच्या शुक्रवारी सायली ऑफिसात गेली त्यावेळी वातावरण गंभीर होते. सर्वजण चुपचाप संगणकासमोर बसून काम करीत होते. सायलीच्या बॉसने सायलीला केबिनमध्ये बोलावलं. त्यांचा प्रोजेक्ट बंगलोर विमानतळावरून सुटणाऱ्या सर्व विमानाच्या माहितीसंबंधित बनविलेल्या डेटाबेसचा होता. सायलीच्या  घरच्या संगणकावरून कोणीतरी ह्या डेटाबेस मधील माहिती मिळविण्याचा परवाच्या दिवशी प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला होता. बॉसने तोवर माहिती काढून ठेवली होती. त्यावेळी सायली ऑफिसातच होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय दूर झाला होता. पण आता तिचा घरचा संगणक  कोणी वापरला ह्याकडे सर्व लक्ष केंद्रित झालं होतं. ताबडतोब सर्वांची घरून काम करण्याचे सोय बंद करण्यात आली होती. सायलीचा संगणक कंपनीला तपासणीसाठी हवा होता त्यामुळे सायलीला घेऊन एक सुरक्षाअधिकारी तिच्या घरी आला. त्याच्या हाती संगणक सोपवून सायली घरीच थांबली. घोटभर चहा घेत ती सुन्न होऊन बसली होती. इतक्यात तिचे लक्ष मेजावरील एका कापडाच्या फडक्याकडे गेले. "अरे, हा फडका इथे आला कोठून?" ती स्वतःशीच विचार करू लागली. तिने जवळ जाऊन तो फडका बाजूला केला आणि तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्या फडक्याखाली समुद्रकिनाऱ्यावरील किल्ल्याची प्रतिकृती होती आणि अगदी न जाणवेल असा शिखराकडे जाणारा रस्ता!
राजवाडे ह्यांचा मृतदेह सापडला अशी बातमी भोसलेच्या कानी पडली तेव्हा मात्र त्यांना राहवले नाही. त्यांनी कसाबसा सायलीचा पत्ता मिळविला. आणि रविवारी ते सायलीच्या घरी दाखल झाले. प्रथम सायली त्यांना घरात येऊ देण्यास तयार नव्हती पण भोसलेंनी बाहेर उभे राहूनच तिला इतक्या आठवणी सांगितल्या की तिलाही राहवेना. तिने त्यांना आता येण्याची विनंती केली. मायेचे कोणी माणूस मिळाल्यावर सायलीचे भावनाबंध मोकळे झाले आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. "काका, ह्याच वेळी माझ्या ऑफिसात सुद्धा गडबड झाली आहे हो" असे सांगत तिने भोसलेकाकांना सर्व हकीकत सांगितली. आता भोसलेंचे कान टवकारले होते. "अग, त्या डेटाबेसवर कोणत्या प्रकारची चौकशी करण्यात आली होती, हे तरी माहित आहे का?" सायलीचे उत्तर भोसलेंच्या अपेक्षेनुसारच होते, "मुलकानी ह्या आडनावाच्या माणसांनी कसा प्रवास केला ह्यावर!"

No comments:

Post a Comment