Saturday, February 22, 2014

थरार भाग ६..


राजवाड्यांच्या मनात विचारचक्र सुरूच होते. इतक्यात त्यांचा भ्रमणध्वनी पुन्हा खणखणला. पुन्हा अनोळखी नंबर. पहिल्या दोन रिंगला राजवाड्यांनी प्रतिसाद दिलाच नाही. शेवटी त्यांनी न राहवून फोन उचलला. पुन्हा एकदा भोसले! "राजवाडे कोठे आहात तुम्ही?" ते अगदी घाबरलेल्या स्वरात विचारत होते. "मी घराबाहेर पडलो आहे" राजवाडे आपल्या ठिकाणाचा किमान आपल्या बोलण्यातून सुगावा लागू नये ह्याची काळजी घेत म्हणाले. तसे म्हटले तर भ्रमणध्वनीच्या ठिकाणावरून त्यांचा माग काढणे आरामात शक्य होते ह्याची त्यांना जाणीव होती. "राजवाडे, तुमच्या घरावर हल्ला झाला आहे. मला तुमचीच काळजी वाटत होती. नशीब तुम्ही बाहेर आहात!" भोसले सुटकेचा निश्वास टाकून बोलत होते. राजवाड्याचा मेंदू आता अतिदक्षता पातळीवर काम करू लागला होता. त्यांनी ड्रायव्हरला गाडी बाजूला लावायला सांगितली. काही मिनिटातच त्यांचा निर्णय पक्का झाला होता. त्यांनी त्या ड्रायव्हरला गाडी परत घेऊन जायला सांगितले.
आपल्या बंगलोरच्या घरात सायली निवांतपणे सकाळचा चहा घेत बसली होती. इतक्यात तिचा फोन खणखणला. फोनवरील बातमी ऐकून ती सुन्नच झाली. तिच्या पायाखालील जमीन सरकली. तिचे मामा राजवाडे ह्यांच्या अपघाती निधनाची बातमी होती. राजवाडे हे भल्या पहाटे एकटेच बंगलोरला चालले असताना एका दरीत त्यांच्या मोटारगाडीचा अपघात होवून त्यांचे निधन झाले होते. गाडी खोल दरीत कोसळली होती.
पुढील काही दिवस सायलीसाठी अगदी कठीणच गेले. मामा एकटेच होते आणि त्यांनी अनाथ सायलीचे लहानपणापासून खूप लाड केले होते. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्चहि त्यांनी सांभाळला होता. आता बंगलोरला एका नामवंत कंपनीत सायली स्थिरस्थावर होत असल्याचे पाहून ते तिच्या मागे लग्नासाठी लागले होते. तुझे एकदा दोनाचे चार हात केले की माझी जबाबदारी संपली असे ते सांगत असत. आणि आता ही अशी बातमी! "देवा, मला तू कायमची अनाथच ठेवणार का रे?" मनातल्या मनात ती विचार करीत होती. दुःख करायला तिला वेळ नव्हता. सर्व सोपस्कार तिलाच पार पाडायचे होते. दरीत कोसळल्याने मृतदेह शोधण्याचे काम फार कठीण होवून बसले होते. राजवाड्यांनी अगदी १० मैलापूर्वीच गाडी भाड्याने घेतली होती. तिथल्या नोंदीवरूनच राजवाडे ह्या गाडीत होते हे निष्पन्न झाले होते. त्यांचा भ्रमणध्वनी सुद्धा अजून सापडला नव्हता. राजवाडे तिथपर्यंत पोहोचले कसे? पोलिसांना हा प्रश्न छळत होता. त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले शेवटचे दोन फोन कोठले हे ही शोधण्याचा पोलिस कसोशीने प्रयत्न करीत होते.
राजवाड्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात छापून आली. आणि भोसले अगदी नखशिखांत हादरले होते. राजवाड्यांच्या शेवटच्या दिवसातील हालचालींची माहिती फक्त त्यांना होती. आणि ज्या कोणी राजवाड्यांचा काटा काढला ते आता आपल्यावर नजर ठेवून असणार ह्याची त्यांनी मनोमन खात्री करून घेतली होती. राजवाड्यांनी ज्याच्याकडून गाडी आणि ड्रायव्हर घेतला होता, तो त्यांचा मित्रही खूप  दुःखी झाला होता. हे फार मोठे कारस्थान आहे असे राजवाडे त्या रात्री त्याला म्हणाले होते. आणि मग अचानक त्यांनी अर्ध्या वाटेवरून ड्रायव्हरला परत पाठवलं होते. त्या प्रवासात असे नक्की झाले ज्यामुळे राजवाड्यांनी आपला बेत बदलावा हे त्यांना कळत नव्हते. मध्ये आलेल्या फोनविषयी ड्रायव्हर त्यांना बोलला होता. परंतु राजवाड्याशी त्या रात्री झालेल्या बोलण्यावरून त्या मित्राने एकंदरीत गप्प बसणेच योग्य समजले होते.
दोन तीन दिवस झाले तरी मामाचा मृतदेहसुद्धा न मिळाल्याने सायली अगदी निराश झाली होती. परंतु शेवटी तिच्या मित्रमैत्रिणींनी तिची समजूत काढून तिला परत बंगलोरला नेले होते. परत एकदा आपल्या फ्लैटमध्ये प्रवेश करताना सायलीच्या मनात निराशेचे ढग दाटून आले होते.

No comments:

Post a Comment