गाढ झोपेत असलेल्या राजवाड्यांचा फोन खणखणला. बातमी अगदी धक्कादायक होती. दामिनी एक्प्रेस शरयू नदीवरील पुलावरून जात असताना ह्या पुलावर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. आणि दामिनी एक्प्रेसचे पहिले दोन डबे खाली नदीत कोसळले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने शरयू नदीने रौद्र रूप धारण केले होते आणि त्यामुळे कोणी वाचण्याची शक्यता तर जवळजवळ नव्हतीच.
पाच मिनिटातच राजवाडे घराबाहेर पडले. ओल्या रस्त्यावरून बाईक जमेल तितक्या वेगाने दौडवत ते अर्ध्या तासातच घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासारख्या गेले वीस वर्षे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा समोरील दृश्य पाहण्यास कठीण होते. सकाळचे चारच वाजले असल्याने अंधारात बचावकार्य करण्यास बरीच अडचण येत होती. अजूनही ही बातमी प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचली नसल्याने किंवा नुकतीच पोहोचत असल्याने त्यांची गर्दी अजून झाली नव्हती. राजवाड्यांना पाहताच इन्स्पेक्टर भोसलेंच्या कपाळावर आठ्या पडल्या. "इथे मध्ये लुडबुड करू नका!" भोसलेंच्या ह्या उद्गाराची राजवाड्यांना सवय होती. हा माणूस गेले कित्येक वर्षे ह्याच वाक्याने आपले स्वागत करतो. काहीतरी नवीन वाक्य शोधा असे त्यांना सुचवायची खुमखुमी राजवाड्यांनी दाबून ठेवली.
प्रसारमाध्यमांची पहिली गाडी एव्हाना येवून पोहोचली होती. राजवाडे पुलाजवळ जाऊन पोहोचले होते. मोटरमनने जबरदस्त प्रसंगावधान दाखवून संतुलित ब्रेक लावला होता त्यामुळे केवळ दोनच डबे पुलावरून खाली गेले होते. गाडीचे बाकीचे डबे आणि त्यातील लोकं वाचले होते. इतक्या मोठ्या घटनेच्या धक्क्याने आणि आपले मरण केवळ काही फुटांच्या अंतराने वाचलं ह्या विचाराने त्यातील कोणीच बोलण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हतं. पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वाहनांना पाचारण केलं होतं आणि त्यांच्याभोवती दोन तीन पोलिस घुटमळत होते. राजवाड्यांची नजर एका कोपऱ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या मध्यमवयीन गृहस्थाकडे गेली. तो आपली ओली सिगारेट फुकण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. राजवाडे हळूच त्याच्याकडे पोहोचले. "आपण, ह्या गाडीत होतात?" राजवाड्यांनी आपला लायटर त्याच्यापुढे ठेवत प्रश्न केला. लगेच उत्तर न देता त्या इसमाने प्रथम आपली सिगार पेटवून घेतली. एक झुरका मारून अजूनही थेंब थेंब पाणी ओतणाऱ्या आकाशाकडे पाहत तो म्हणाला, "होय!" पुन्हा एक झुरका, आणि अजून एक दीर्घ उसंत! "मोटरमनने लावलेल्या करकच ब्रेकने मी जागा झालो, बहुदा त्याच्यासमोर पूल कोसळला असावा आणि जीवाच्या आकांताने त्याने आपला आणि प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी ब्रेक लावला. परंतु उशीर झाला होता." तो गृहस्थ बोलत होता. "हो, पण त्याच्या त्या ब्रेकने आमचा जीव मात्र वाचला!" दोन तीन झुरक्यानी तो मनुष्य बोलू लागला होता.
त्याच्याशी बोलता बोलता राजवाड्यांच्या मनात विचारचक्र चालू होते. ही जागतिक पातळीवरील बातमी होती. दहशतवादी संघटनांचा ह्यात हात असावा ही खात्रीच होती. आता केव्हाही केंद्रीय गुप्तचर विभागाचे अधिकारी, आणि उच्च पोलिस अधिकारी ह्या ठिकाणाचा ताबा घेणार होते. त्यांनी गृहस्थाचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला.
अचानक पुलाजवळ गडबड ऐकू आली. दोन्ही डबे खाली पडताना काहीशा कमी वेगाने खाली गेले होते. नदीचे पात्र पुढे अरुंद झाले होते आणि त्यात प्रवाहाचा वेग कमी झाला होता. त्यामुळे तिथे काहीजण अडकून बसले होते. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. राजवाडे तत्काळ तिथे पोहोचले. परंतु आता तिथे पोलिसांनी पूर्ण कब्जा घेतला होता. नदीच्या पात्रात बचावकार्यासाठी जवान उतरले सुद्धा होते.
राजवाड्यांनी पटापट काही फोटो काढून घेतले. एव्हाना संपूर्ण जागेला पोलिसांनी वेढले होते. आपल्याकडे पाहणाऱ्या भोसलेंच्या आश्चर्यपूर्ण नजरेकडे दुर्लक्ष करणे योग्य असे ठरवून आपली बाईक काढून घेत ते तिथून निघाले.
पुन्हा झोप लागणं तर शक्य नव्हतच! राजवाड्यांनी बातमी देणाऱ्या वाहिन्या सुरु केल्या. सर्वत्र हीच बातमी होती. नशिबाने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील वाहिन्यांनी थोडा संयम दाखवला होता आणि त्यांचे संवाददाते कमी आरडओरड करीत होते. त्यांच्याकडून काही फारसं गवसत नाही हे पाहून राजवाडे आंतरराष्ट्रीय बातमी वाहिन्यांकडे वळले. धीरगंभीर स्वरात त्यांचे विश्लेषण चालू होते. अचानक एका वाहिनीवर घरून बोलणाऱ्या स्फोटतज्ञाच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. "मी जरी प्रत्यक्षघटनास्थळी नसलो तरी उपलब्ध माहितीनुसार ह्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा सहभाग असण्याची शक्यता कमी दिसतेय! हे कोण्या नवशिक्याचे काम असावे!" राजवाडे काहीसे अचंबित झाले. त्या तज्ञाचे अधिक बोलणे ऐकायची त्यांची इच्छा होती पण लगेचच त्या वाहिनीवर आर्थिक घडामोडीच्या चर्चेचा कार्यक्रम सुरु झाला. राजवाड्यांनी त्या तज्ञाचे नाव मात्र नोंदवून घेण्याची दक्षता घेतली होती.
राष्ट्रीय वाहिन्यावर मात्र गदारोळ सुरु झाला होता. घटनास्थळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गुप्तचर पथक ह्यांचे आगमन झाले होते.
पुढील दोन तीन दिवस अगदी गोंधळाचे वातावरण होते. सुदैवाने जीवितहानी फारच कमी झाली होती. बॉम्ब तुलनेने कमी शक्तीशाली होता आणि त्यामुळे पूल कोसळताना त्याचे तुकडे वगैरे झाले नव्हते आणि गाडीचे पहिले दोन डबे जरी खाली कोसळले तरी मोटरमनच्या कौशल्याने त्यांचा वेग कमी झाल्याने त्यातील काही प्रवाशांना बाहेर पोहून जायची संधी मिळाली होती. शेवटी जीवितहानीचा विसाच्या आतल्या आकड्याचा अंदाज हाती आला तेव्हा राजवाड्यांना बरं वाटलं. परंतु मनात संशयाची पाल चुकचुकत होती. अजून कोणतीही दहशतवादी संघटना ह्या घटनेची जबाबदारी घेण्यास पुढे येत नव्हती.
कोणताच पुरावा मिळत नसल्याने राजवाडे आणि पोलिससुद्धा बेचैन होते. प्रसारमाध्यमाचे पोलीसावरील दडपण वाढत होते. शेवटी भोसलेंनी राजवाड्यांना फोन करून बोलावले. नेहमी भोसलेकडून फोन आला की राजवाडे खुश होत असत. "कशी जिरली ह्याची!" असे त्यांना वाटे. परंतु ह्या वेळी मात्र असे काही नव्हते. परंतु भोसलेकडे जाणे क्रमप्राप्तच होते.
"या, बसा!" एका उपहारगृहातील आतल्या खास खोलीत भोसलेंनी राजवाड्यांचे स्वागत केले. हा माणूस आपणास कधीच पोलिस स्टेशनात बोलावत नाही ह्याची खंत सुरुवातीची वर्षे राजवाड्यांना वाटायची. परंतु आता त्यांनाही अशा भेटीच आवडू लागल्या होत्या. गुप्तहेराला उगाच नको ती प्रसिद्धी नको हे त्यांना कळून चुकले होते. "बाकी काय मग लिंबू सरबत घेणार की पन्हे!" भोसलेंच्या ह्या खोचक प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत राजवाड्यांनी साध्या पाण्याचा ग्लास उचलला. मद्यपानाची सवय त्यांनी जाणीवपूर्वक टाळली होती.
बाकी भोसलेंकडे काही ठोस पुरावे नव्हते. चर्चेतून काही निष्पन्न होत नाही हे पाहून राजवाड्यांनी बैठक आटोपती घेतली. निघता निघता भोसलेंनी अपघातातील मृतांची यादी राजवाड्याकडे सोपवली.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment