Wednesday, February 12, 2014

थरार भाग ४..


राजवाड्यांनी आपली सुटका केली म्हणून टॅक्सीवाला खुश झाला. त्यांनी दिलेले पैसे त्याने मोजूनही घेतले नाहीत. बहुदा त्यांनी पैसे दिले नसते तरीही त्याला चाललं असतं. त्यांचा विचार बदलायची संधी न देताच तो आपली टॅक्सी घेऊन विमानतळाबाहेर धूम निघाला. राजवाड्यांचे विचारचक्र सुरु होते. परतीचे मुंबईचे तिकीट होते. पण ह्या बाईचा पाठलाग करायचा तर ती जिथे जाईल तिथे जाणे आवश्यक होते.
आपल्याच विचाराच्या तंद्रीत असलेल्या राजवाड्यांचे लक्ष मुलकानीची पत्नी सोडता आजूबाजूला फारसे नव्हते. त्यामुळे त्यांच्या वावराची चाहूल लागलेल्या दोन इसमांची त्यांनी दखल घेतली नाही. राजवाड्यांच्या आगमनाची चाहूल लागताच मुलकानी कंपूत खळबळ उडाली. परंतु ही खळबळ फक्त भ्रमणध्वनीवरील चर्चेत होती. बाकी त्यांच्या वावरण्यात काही फरक दिसत नव्हता. त्यांची दुसरी योजना अमलात आणण्याचा विचार पक्का झाला.
मुलकानीची पत्नी महिला प्रसाधनगृहाकडे जाऊ लागली तसे राजवाडे थोडे निवांत झाले. त्यांनी पटकन थोडेसे खाऊन घ्यायचे ठरविले. जवळच एक पाश्चात्य उपहारगृह होते त्यातील एका विभागातून महिला प्रसाधनगृहाच्या बाहेर येण्याच्या मार्गावर लक्ष ठेवणे शक्य होते. राजवाड्यांनी तिथे जावून एक ऑर्डर दिली. त्यांचे विचारचक्र चालूच होते. आता ही बाई जिथे जाईल तिथे तिच्यामागे जाणे आवश्यकच होते. "बंगलोरला जाणाऱ्या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही शेवटची उद्घोषणा!" विमानतळावरील ह्या सुमधुर घोषणेकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्याचवेळी वेटरने त्यांनी ऑर्डर केलेली दिश समोर आणून ठेवली. क्षणभर त्यांचे प्रसाधनगृहाकडे दुर्लक्ष झाले. परंतु लगेचच त्यांनी आपली नजर तिथे वळवली. मुलकानीच्या पत्नीचा मागमूस तिथे नव्हता. एक बुरखाधारी स्त्री लगबगीने बंगलोरच्या विमानाच्या गेटकडे जाताना दिसली. "ह्या स्त्रियांना सगळीकडेच कसा उशीर होतो"' राजवाड्यांच्या मनात विचार डोकावलाच. पुन्हा त्यांनी आपले लक्ष आपल्या लक्ष्याकडे केंद्रित केले. विमानतळाच्या काचेच्या भिंतीतून त्यांना एक विमान उड्डाण करताना दिसले. "बहुदा हे बंगलोरचे विमान असावे आणि त्या बुरखाधारी स्त्रीला ते मिळाले असले  म्हणजे झाले" त्यांच्या मनात विचार डोकावला. त्याच क्षणी त्यांची ट्यूब पेटली. आपल्याकडून अशी कशी हयगय झाली ह्याचे त्यांना तीव्र दुःख झाले. पक्षी पिंजऱ्यातून निसटला होता. क्षणभर त्यांना निराशेने ग्रासले.
काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरले. तत्काळ त्यांनी तिकीटखिडकीवर जाऊन बंगलोरला गेलेल्या विमानातील प्रवाशांची यादी पाहू देण्याची विनंती केली. परंतु ही यादी त्यांना अशी सहजासहजी प्राप्त होणार नव्हती. त्यासाठी त्यांना बऱ्याच परवानग्या लागणार होत्या. "बंगलोरचे पुढील फ्लाईट केव्हा आहे?" त्यांनी आपल्या दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली. "रात्री दहा वाजता" ह्या काऊटरवरील स्त्रीच्या उत्तराने त्यांची घोर निराशा झाली. आपले मुंबईचे तिकीट वापरून तिथे जाऊन पुढील योजना आखुया असे त्यांनी ठरविले.
मुंबईपर्यंतच्या उड्डाणात राजवाडे स्वतःलाच दोष देत होते. ह्या सगळ्या मनःस्तापात मुंबई केव्हा आले ते त्यांना समजले सुद्धा नाही. मुंबईला उतरून बाहेर पडता पडता त्यांचे लक्ष टीव्हीवरील बातम्यांकडे गेले. मुंबईच्या एका वस्तीला मोठी आग लागली होती आणि सर्व घरांचा आगीत फडशा पडला होता. राजवाड्यांचे लक्ष तिथे वेधले गेले. त्यांच्या मनात त्या वस्तीतील रहिवाशांबद्दल सहानभुतीची भावना निर्माण झाली. "ह्या घटनेत जीवितहानी झाली नाही" टीव्हीवरील ह्या घोषणेने त्यांना हायसं वाटलं. अचानक त्यांना धक्का बसला. टीव्हीचा कॅमेरा आजूबाजूच्या वस्तीवर फिरत होता. "अरे ही तर गण्या शिंदेची वस्ती"! एकाच दिवसात आपल्याला इतके सगळे धक्के कधी बसले होते हे आठवण्याचा राजवाडे प्रयत्न करू लागले.

No comments:

Post a Comment