Tuesday, February 11, 2014

थरार भाग ३..




मोठ्या उत्साहाने सकाळच्या  विमानाने राजवाडे दिल्लीला जाऊन थडकले. मुलकांनीचा घरचा पत्ता होताच, तो शोधण्यात फारशी काही अडचण आली नाही. वॉचमन त्यांना इमारतीत सोडण्यास आधी तयारच नव्हता. शेवटी आपण मुलकानीचे खास दोस्त आहोत आणि आपल्याला त्याच्या कुटुंबियांना भेटणे खूप गरजेचे आहे हे त्याला बराच वेळ सांगितल्यावर त्याने त्यांना आत जाण्याची परवानगी दिली. परंतु दहा मिनिटात तुम्ही परत यायला हवे असे बजावण्यास तो विसरला नाही. घरात  गेल्यावर एकंदरीत दुःखाचेच वातावरण दिसले. घरात बरेच नातेवाईक होते. परंतु राजवाड्यांनी आपण मुंबईहून मुलकानीचे परिचित आलो आहोत असे सांगितल्यावर बोलण्यात फारसा कोणी रस दाखविला नाही. उलट त्यांनी लवकर घराबाहेर निघावे अशीच सर्वांची वागणूक होती. राजवाड्यांनी कसोशीचा प्रयत्न करून मुलकानीच्या विधवा पत्नीशी भेट घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी ती एका मिनिटासाठी बाहेर आली. राजवाड्यांनी सुरु केलेली प्रस्तावना मध्येच तोडत "जो हुआ सो हुआ! आपसे हम पहेले कभी मिले नही" असे बोलून ती परत आत गेली. आता मात्र तिथून निघणे राजवाड्यांना क्रमप्राप्त झाले. मुलकानीच्या पत्नीने आपण ह्यांना ओळखत नाही हे सांगितल्यावर सर्वजण राजवाड्याकडे संशयाने पाहू लागले. दोन तीन पुरुष मंडळी कोपऱ्यात जाऊन चर्चा करू लागली. हे पाहताच राजवाडे ताडकन उठले आणि त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. ती पुरुष मंडळी त्यांच्याकडे पाहतायेत तोच राजवाडे बाहेर पडले सुद्धा !
राजवाड्यांनी आता पोलिस स्टेशनची धाव घेतली. इन्स्पेक्टर शर्मानी त्यांचे स्वागत केले. मुलकानीचा अंत्यविधी विद्युतदाहिनीत करण्यात आला होता. तेव्हा सरकारी साक्षीदारही हजर होते. एकंदरीत मुलकानी प्रत्यक्ष मरण पावला असेच मानण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे सुद्धा शर्मांनी त्यांना दाखविली. "सरकारी साक्षीदारांची नावे मिळतील का?" राजवाड्यांनी अजून एक प्रयत्न करायचं ठरविले. "साब, आप को हमने इतनी मदद की! अभी हमें हमारा काम करने दो!" शर्मांनी त्यांना समजुतीच्या स्वरात सांगितले. इशारा समजून घेऊन राजवाडे गप्प बसले आणि पाच मिनिटात बाहेर निघाले सुद्धा! परतीचे विमान संध्याकाळचे होते.  अजून बराच वेळ बाकी होता. राजवाड्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी पुन्हा एकदा मुलकानीच्या घराभोवती फेरफटका मारायचे ठरविले. टॅक्सीवाल्याला मुलकानीच्या इमारतीच्या बाहेर काही अंतरावर थांबवून ठेवून राजवाडे बाहेर पडले. त्यांनी एका झाडाचा आडोसा शोधला आणि ते सर्व परिसराची आणि इमारतीची पाहणी करू लागले. पंधरा वीस मिनिटे गेली होती. राजवाड्यांचे लक्ष  टॅक्सीवाल्याकडे गेले. तो बिचारा कंटाळला होता. त्याने नजरेनेच त्यांना आपण निघूया असे खुणावले. राजवाड्यांनी विचार केला. फारसे काही निष्पन्न होत नव्हते. शेवटी त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. अचानक त्यांचे लक्ष इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या आधुनिक पेहराव घातलेल्या एका मध्यमवर्गीय स्त्री कडे गेले. ती दोन मोठ्या बैगा खेचून आणत होती. हिला आपण कोठेतरी पाहिले आहे असे त्यांना वाटून गेले. परंतु त्यांना नक्की लक्षात काही येईना. इतक्यात पार्किग लॉट मधून एक आलिशान गाडी त्या स्त्रीजवळ येऊन थांबली. त्यातून एक इसम उतरला आणि त्याने त्या दोन्ही बैगा गाडीच्या ट्रंक मध्ये ठेवल्या. त्या स्त्रीने एकवार इमारतीच्या दिशेने पाहिले. तिने ज्या दिशेने पाहिलं त्या दिशेलाच मुलकांनीचा फ्लैट होता. अचानक राजवाड्यांची ट्यूब पेटली. सकाळी जिला अगदी पारंपारिक वेशात पाहिली होती ती मुलकांनीची पत्नीच आता ह्या रुपात होती. कारमध्ये बसता बसता तिने आपल्या डोळ्यावरील गॉगल काढला आणि राजवाड्यांची खात्री झाली. तिची कार पुढे जायची वाट पाहत ते क्षणभर थांबले. ती कार थोडी पुढे जाताच ते तात्काळ टॅक्सीत बसले आणि  टॅक्सीवाल्याला कारचा पाठलाग करण्याचा आदेश त्यांनी दिला. आपण ह्या कोणत्या मुसिबतमध्ये पडलो असे भाव बिचाऱ्या  टॅक्सीवाल्याच्या चेहऱ्यावर उमटले. अपेक्षेनुसार कार विमानतळाच्या दिशेनेच निघाली होती. रहदारी खूप होती पण  टॅक्सीवाला तसा कुशल होता. आजूबाजूच्या बाकीच्या गाड्यांना हूल देत त्याने मुलकानीच्या पत्नीच्या कारला नजरेत ठेवण्याचे काम कुशलतेने पार पाडले.
विमानतळावर मुलकानीच्या पत्नीला बैग्स उतरवून घेण्यास थोडा वेळ लागला. ही बया आता आंतरराष्ट्रीय टर्मिनलचा रस्ता पकडेल ही राजवाड्यांची अटकळ मात्र तिने चुकीची ठरविली. ती स्थानिक टर्मिनलच्या दिशेने चालू लागल्यावर राजवाडे थोडे आश्चर्यचकित झाले. परंतु आलिया भोगाशी असावे सादर असे मनाशी म्हणत त्यांनी तिच्या पुढच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे ठरविले.



No comments:

Post a Comment