Saturday, February 15, 2014

थरार भाग ५..


राजवाड्यांना आता अजून दगदग करण्याचं त्राण शिल्लक राहिलं नव्हतं. कसं बसं घरी पोहोचून त्यांनी बिछान्यावर अंग झोकून दिले. सकाळी केव्हातरी उशिरा त्यांना जाग आली. झटपट तयार होऊन त्यांनी गण्या शिंदेची वस्ती गाठली. सर्व वस्तीची राखरांगोळी झाली होती. सुदैवाने टपरीवाला शाबूत होता. "साहेब, काय सांगायचं! दुपारच्या सुमारास अचानक एका घरातून आग सुरु झाली आणि पाहता पाहता पूर्ण वस्ती डोळ्यादेखत भस्मसात झाली! अग्निशामक दल येईपर्यंत सर्व खेळ खल्लास!" टपरीवाला राजवाड्यांना सांगत होता. "मग गण्याचे कुटुंबीय गेले कोठे?" राजवाड्यांनी विचारलं. "साहेब, मदत शिबिरात जाऊन पहा!" टपरीवाल्याच्या ह्या सल्ल्यावर राजवाडे तत्काळ निघाले आणि मदत शिबिरात जाऊन पोहोचले. मदत शिबिरात गण्याच्या कुटुंबियांचा पत्ता नव्हता. राजवाड्यांना हे काहीसे अपेक्षितच होते.
आता भोसले ह्यांच्याबरोबर संपर्क करणे राजवाड्यांनी इष्ट समजले. आपल्या नेहमीच्या ठिकाणी दोघे भेटले. राजवाड्यांनी आपली सर्व कहाणी भोसलेंना सांगितली. भोसलेंना सुद्धा ह्या कहाणीत आता रस वाटू लागला होता. आता मोटवानीच्या पत्नीचा बंगलोरचा पत्ता काढणे आवश्यक होते. त्यासाठी हवे ते सहकार्य करण्याची भोसलेंनी तयारी दाखवली.
भोसलेंशी भेटून राजवाडे घरी परतले. संध्याकाळी बंगलोरला जायची त्यांनी तयारी चालवली होती. फ्लाईटचे तिकीटसुद्धा आरक्षित करून झाले. सहज म्हणून त्यांनी टीव्ही सुरु केला. "ब्रेकिंग न्यूज... दामिनी एक्प्रेसच्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार सापडला!" वृत्तवाहिन्यांची आरडओरड चालू होती. एका माथेफिरूचे चित्र सतत वाहिन्यांवर दाखविले जात होते. त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली होती. त्याच्याबरोबर ह्या कटात कोण सहभागी आहे ह्याची आता अधिक चौकशी सुरु होती. त्याने एका संघटनेचे नावसुद्धा घेतले होते, परंतु त्याविषयी फारशी कोणालाच माहिती नव्हती. राजवाड्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ भोसलेंना फोन लावला. ते फोनवर उपलब्ध नव्हते. राजवाडे तत्काळ पोलिस स्टेशनात गेले.  भोसलेंना वरिष्ठ साहेबांनी एका महत्वाच्या बैठकीला बोलावलं आहे असे त्यांना सांगण्यात आले. राजवाडे विचारात पडले होते. एकंदरीत सर्व प्रकरण अगदी गुंतागुंतीचे बनत चालले होते. संध्याकाळी बंगलोरला जायचा प्लान राजवाड्यांनी तात्पुरता रहित केला.
अचानक त्यांना घटनास्थळी भेटलेल्या माणसाची आठवण झाली. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांनी शोधून काढला. बराच वेळ फोन वाजत होता, परंतु कोणी उचलला नाही. शेवटी राजवाड्यांनी त्याचा नाद सोडून दिला. रात्रीचे जेवण आटपून ते झोपायचा बराच वेळ प्रयत्न करीत होते. शेवटी त्यांना कधीतरी झोप लागली.
गाढ झोपेत असलेल्या राजवाड्यांची झोप फोनच्या आवाजाने मोडली गेली. अनोळखी फोन क्रमांक पाहून ते काहीसे वैतागले. परंतु आता उठलो तर आहोतच तर फोन घेवूयात असा विचार करून त्यांनी फोन उचलला. समोर भोसले होते. "राजवाडे माझी जळगावला बदली करण्यात आली आहे. मला रात्रीच्या रात्री तिथे पोहोचावे लागत आहे. एकंदरीत काहीतरी मोठा घोटाळा आहे इथे! राजवाडे तुम्ही सांभाळून राहा! मी तिथे जाऊन पाहतो आणि जमेल तितकी तुम्हांला मदत करीन!"
राजवाड्यांची झोप पूर्णपणे उडाली होती. भोसलेसारखा माणूस काहीतरी मोठा घोटाळा आहे म्हणतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होती. बॉम्बस्फोटाचा सूत्रधार सापडणे, गण्या शिंदेची वस्ती आगीत भस्मसात होणे आणि भोसलेची बदली होणे ह्या सर्व गोष्टी म्हटल्या तर एकमेकाशी संबंधित नव्हत्या पण त्यात एक समान सूत्र राजवाड्यांना दिसत होते. हे आपण दिल्लीला गेल्यापासून चालू झाले म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी धागा होता. अचानक त्यांना सहा महिन्यापूर्वीच्या आर्थिक घोटाळ्याची आठवण झाली. त्या संबंधी उपलब्ध असलेल्या मुलकानीच्या सर्व बातम्या त्यांनी इंटरनेटवरून गोळा करण्यास सुरुवात केली. मुलकानीविरुद्ध सबळ पुरावे होते आणि त्याला प्रदीर्घकाळ तुरुंगात जावे लागणार हे नक्की होते. ह्या सर्व माहितीतील बातम्या होत्या. अचानक एका काहीशा अपरिचित बातमीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. मुलकानीला बळीचा बकरा बनविण्यात आले असावे असा संशय त्यात व्यक्त करण्यात आला होता. आणि त्यामागे एखादी बडी असामी असावी असा कयास बांधण्यात आला होता.
झोपेतून आता पूर्णपणे जाग्या झालेल्या राजवाड्यांचे विचारचक्र जोरात चालू होते. "मुलकानीला अडकविताना त्याच्या सुटकेचीही जबाबदारी घेण्यात आली असणार. पण त्यासाठी इतका मोठा अपघात?" राजवाड्यासारख्या ह्या क्षेत्रात इतके पावसाळे घालविलेल्या माणसाला सुद्धा ह्यावर विश्वास ठेवायला कठीण जात होते. आता त्यांना वेगळीच काळजी वाटायला लागली होती. आपल्याविषयी सुद्धा ह्या लोकांना माहिती असणार आणि … पुढचा विचार करण्याचीही त्यांची तयारी नव्हती. ते अचानक उठले आणि आणि दहा मिनिटात तयार होऊन त्यांनी आपली बाईक काढली.
पुढच्या अर्ध्या तासात आपल्या एका विश्वासू मित्राची कार आणि ड्रायव्हर घेऊन राजवाड्यांनी बंगलोरच्या रस्त्याने मागर्क्रमण सुरु केले. आता त्यांना आपला पत्ताही कोणालाच लागू द्यायचा नव्हता. पहिल्यांदाच त्यांना भोसलेची कमतरता वाटू लागली होती.










No comments:

Post a Comment