सितु घरी परतला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. नावापुरती झोप काढून सकाळी सात वाजता तो उठला. त्याचा होकार तसा ठरलाच होता. उठल्या उठल्या त्याने आपल्या वकील मित्राला फोन लावला. वकील मित्र त्याच्या सोबत मायकलकडे यायला तयार झाला. करारपत्र व्यवस्थित झाल्यास काही धोका नाही असे त्या मित्राचे म्हणणे होते. सितुने फोन करून दहा वाजताची मायकलच्या भेटीची वेळ ठरविली.
ठरल्याप्रमाणे दोघेजण मायकलच्या सूटवर ठीक दहा वाजता पोहोचले. वकीलमित्राला पाहून मायकलच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या. "ह्याची आपल्या ह्या चर्चेत गरज नाहीये! त्याला ह्या हॉटेलात फिरून येऊन देत. तोवर आपण माझ्या सर्व आवश्यक तपशिलाची चर्चा करूयात." मायकल ठामपणे म्हणाला, त्याला हो म्हणण्यावाचून सितुकडे पर्याय नव्हता.
तो वकीलमित्र बाहेर पडल्यावर मायकलने छापील कागदपत्रे बाहेर काढली. "अशा आहेत माझ्या गरजा!" असे म्हणून त्याने दोन तीन कागदे मायकलपुढे ठेवली. सितु अवाक होऊन वाचू लागला. मायकलने इतकी तयारी केली असेल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती. मायकलने स्त्री आणि पुरुष ह्यांच्या एकंदर प्रवासातील खालील टप्पे ठरविले होते.
१) दोन काहीसे परिचित पुरुष आणि स्त्री.
२) त्या दोघांची खास ओळख
३) ओळखीचे मैत्रीत आणि मग प्रेमात रुपांतर आणि मग एकत्र फिरणे
४) विवाह
५) विवाह ते अपत्यआगमनापर्यंतचा काल
६) दोन्ही कडील नातेवाईक आणि मित्रमंडळीचा ह्या दोघांच्या जीवनावरील प्रभाव
७) दोघांचा नोकरी व्यवसाय - स्वरूप, आर्थिक प्राप्ती आणि नोकरीची ठिकाणे, वेळा
८) अपत्यांची संख्या आणि आगमनाचा कालावधी
९) अंतिम अपत्यआगमनानंतर दहा वर्षाचा कालावधी
१०) त्या नंतरचा कालावधी
"आता तू हे कसे हाताळणार ते सांग?" मायकलने विचारलं. सितुच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होते. त्यानेही झरझर कागदावर मुद्दे लिहावयास सुरुवात केली. मायकल एक कॉफी ब्रेक घेऊन आला तोवर सितु तयार होता. मधल्या वेळात त्याचा वकीलमित्र कंटाळून निघून गेला होता. सितुने दिलेला कागद मायकल वाचू लागला.
१) दोघांच्याही स्वभाववैशिष्ट्यांचे जमेल तितके पैलू ह्या मॉडेलमध्ये स्वीकारले जातील. जितकी अधिक आणि अचूक स्वभावपैलू गोळा करू शकतो तितका निकाल अधिक खात्रीशील!
२) दोघांनीही ऑनलाईन आभासी दुनियेत प्रवेश करायचा. त्यासाठी एका बंदिस्त खोलीची स्थापना केली जाणार. एकदा आभासी दुनियेत प्रवेश केला की मग काही काळ ह्या व्यक्तींना एका मंद संगीताच्या तालीवर झोपविले जाणार. आणि मग त्यांचा मेंदूचा ताबा संगणक घेणार. ह्या कालावधीत मॉडेलमध्ये टाकलेल्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांचा त्यांच्या मेंदूवर छापा उठणार.
३) प्रत्येक टप्प्यात ह्या दोघांच्या जोडीसाठी वरील यादीतील ६, ७, ८, ९ मधील घटकांचा प्रभाव कसा पडतो ह्याची तपासणी करणाऱ्या विविध चाचण्या आखल्या जाणार. आणि ह्या जोडीने लॉगइन केल्यावर ह्या सर्व चाचण्याची म्हणजे तिथल्या विविध प्रसंगांची त्यांच्यावर तपासणी केली जाणार. त्यांना ह्या विविध प्रसंगातून जावे लागणार. एका टप्प्यातील सर्व चाचण्या झाल्या की ह्या चाचणीचा विस्तृत अहवाल सादर केला जाणार. ह्या चाचणीत जर ह्यातील कोणाचेही अधिक स्वभावपैलू मिळाले तर ते परत ह्या मॉडेलमध्ये टाकून मॉडेल विकसित केले जाणार.
४) जसेजसे अधिकाधिक टप्प्यांचे परीक्षण होत जाईल तसतसे ह्या नात्याच्या भविष्याविषयी भाकीत केले जाणार!
मायकलच्या चेहऱ्यावरील ख़ुशी अगदी स्पष्ट दिसत होती. मध्येच त्याला एक शंका आली. त्याने विचारले, "जर आपण खरोखरच्या दोघांना ही परीक्षा द्यायला लावली तर?" "मग काय, निकाल अजून अचूक येतील" सितुने तत्काळ उत्तर दिले खरे, पण मायकलच्या हेतूविषयी त्याला नक्कीच शंका आली! त्या शंकेचा मनातील विचार बाजूला ठेवून सितुने आपली योजना पुढे स्पष्ट करणे चालू ठेवले. ह्या आभासी जगातील विश्व प्रत्यक्षातील युगुलाच्या दुनियेशी जमेल तितके मिळतेजुळते असणे निकालाच्या अचूकतेच्या दृष्टीने फायदेशीर होते. "ह्या दोघांचीही सर्वच माहिती मी देऊ शकणार नाही" मायकल म्हणाला. "ठीक आहे" सितु म्हणाला.
पुढे दोन दिवसात करारपत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. आपल्याला मिळालेल्या सहा महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी सितुने कंबर कसून सुरुवात केली होती आणि इथे मायकलने सर्व माहिती गोळा करण्यास! जॉईनिंग बोनस बँकखात्यात जमा झाल्याने आणि घरबसल्या काम असल्याने सितुच्या प्रकृतीत नको तितकी सुधारणा होत होती. पण वर्षाखेरीस जमा होऊ शकत असलेल्या १ मिलियन डॉलर्सकडे पाहत त्याने तब्येतीकडे सध्यातरी दुर्लक्ष करण्याचे ठरविले होते.
सहा महिने पाहता पाहता संपायला आले. सितुच्या मेहनतीला फळ येऊ लागले होते. मॉडेल तसे बऱ्यापैकी बनले होते. परंतु सितुला एकाच गोष्टीची खंत वाटत होती. ह्याचे परीक्षण करायला आपली एक मैत्रीण हवी होती! मोठ्या मुश्कीलेने त्याने हा विचार बाजूला सारला होता.
बे एरियातील अशाच एका ऑफिसात आज जरा जास्तच चहलपहल दिसत होती. कारणही तसेच होते. बॉस वाँग एका महात्वाकांशी प्रोजेक्टसाठी त्या ऑफिसातील एकाची निवड करणार होता. हे प्रोजेक्ट अगदी गोपनीय स्वरूपाचे होते आणि निवड झालेल्या कर्मचाऱ्यास सहा महिने एका विशिष्ट ठिकाणी काम करावे लागणार होते. ह्या प्रोजेक्टवर अगदी नवीन तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार असल्याने त्यावर काम करण्याची सर्वांचीच इच्छा होती. पाचजणांची गुणवत्तेनुसार अंतिम यादीत निवड झाली होती. आणि ते बऱ्यापैकी समान पातळीवर असल्याने त्यातील अंतिम एकाची निवड करण्यासाठी एका नवीन सॉफ्टवेयरचा वापर करण्यात येणार होता. लॉटरीसारखाच हा प्रकार होता. आणि सर्व कर्मचाऱ्यांना ही अंतिम निवड पाहण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
हे सॉफ्टवेयर जसजसे एकेका कर्मचाऱ्यांला वगळू लागले तसतसा पाहणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. शेवटी दोघेजण बाकी राहिले. रॉजर आणि सिंडी! केवळ गुणवत्तेनुसार पाहायला गेलं तर रॉजर नक्कीच उजवा होता. आणि शेवटची फेरी सुरु झाली, सॉफ्टवेयरने चित्रविचित्र आवाज आणि चित्र निर्माण केली. आणि शेवटी विजेता घोषित केला. सिंडीची निवड झाली होती. सर्वांबरोबर वाँगलाही आश्चर्य वाटलं. परंतु तो हाडाचा व्यवस्थापक होता. आपलं आश्चर्य बाजूला ठेवत त्याने सिंडीचे अभिनंदन केले. रॉजर काहीसा खिन्न झाला होता. परंतु त्यानेही मोकळ्या मनाने निर्णय स्वीकारला. मग सर्वजण आपापल्या कामाला लागले.
संध्याकाळी सात वाजता आपलं काम आटपले तेव्हा वाँगने सहज म्हणून ह्या सॉफ्टवेयरचे पुन्हा एकदा ह्या पाचजणांच्या यादीवर परीक्षण करून पाहायचे ठरवलं. आणि अहो आश्चर्यम! पुन्हा सिंडीचीच निवड झाली. "कमाल आहे बुवा!" वाँग स्वतःशीच म्हणाला. अजून एकदा हे सॉफ्टवेयर वापरायचा मोह त्याला टाळता आला नाही. आणि पुन्हा सिंडीचीच निवड झाल्यावर मात्र तो काहीसा साशंक झाला. ह्या सॉफ्टवेयरच्या प्रत्येक वापराची नोंद होत आहे हे त्या बिचाऱ्याला कोठे माहित होते!