तिवारी गायब होऊन तिसरा दिवस झाला होता आणि तिवारीच्या बायकोच्या सोबतीला दोन कुटुंबे येऊन राहिली होती. तिवारीच्या बायकोची राजवाडे थिअरी कोणालाच पटत नव्हती. इतक्यात त्यातील एकाला भारतातील संकेतस्थळावर एक बातमी दिसली. त्याने मोठ्या खुशीने ती सर्वांना दाखविली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गुप्तहेर राजवाडे जे मागील आठवड्यातील अपघातात मरण पावले असा सर्वांचा समज झाला होता ते जखमी अवस्थेत त्या दरीतल्या एका कुटुंबांच्या घरी पोहोचले होते. आणि त्या कुटुंबाने त्यांना स्थानिक पोलिसांपर्यंत सोपवले होते. नंदन आता चांगलाच सक्रिय झाल्याने राजवाडे लगेचच त्यांच्या घरी पोहोचले होते.
मुलकानीची माहिती ऐकून नंदनने लगेचच आपल्या वरिष्ठांना सर्व खबर दिली होती. आणि केंद्रीय गुप्तहेरांचे पथक तातडीने बालीत बोलावले होते. हा आंतरराष्ट्रीय मामला असल्याने इंटरपोलला सुद्धा सहभागी करून घेण्यात आले होते.
थकलेभागले नंदन आणि भोसलेकाका बिछान्यावर पडल्या पडल्या झोपेच्या आधीन झाले होते. भोसलेकाकांची सकाळी उठण्याची सवय इथेही कायम राहिली होती. सकाळी पाचच्या सुमारास त्यांना जाग आली. मुलकानीच्या खोलीत एक नजर टाकायला म्हणून ते गेले आणि ते दृश्य पाहून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मुलकानी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची अगदी निष्ठूरपणे हत्या करण्यात आली होती. भोसले काका इतके अनुभवी पण ते ही हादरले होते. "नंदन, नंदन उठ लवकर!" "काय आहे काका! जरा झोपू द्या आता!" असे म्हणणाऱ्या नंदनला त्यांनी तत्काळ मुलकानीच्या खोलीत नेले. तिथले दृश्य पाहून नंदनही हादरला. पण लगेच त्याचा मेंदू सक्रिय झाला. पटकन त्याने भोसलेकाकांना खुण केली. दोघांनी मिळून सर्व घराची तपासणी केली. घर सुरक्षित आहे ह्याची खात्री करून घेतली. आपल्या फोनवरच्या बोलण्यातून कोणाला तरी सुगावा लागला हे त्या ही परिस्थितीत नंदनने जाणले. दोघेजण सुन्न होऊन बसले असतानाच बाहेर कसला तरी आवाज झाला. नंदनने खिडकीजवळ जाऊन पाहिले त्यांच्या घराला बाली पोलिसांच्या गाड्यांनी घेरले होते!
No comments:
Post a Comment