Tuesday, March 4, 2014

थरार भाग १२..


राजवाड्यांना भारतात परत जाऊन देण्याचा निर्णय तिघांनी मिळून घेतला होता. परंतु आता भोसले काकांना राजवाड्यांची फार आठवण येऊ लागली होती. नंदन अगदी धडाडीचा आणि हिंमतवान असला तरी अनुभवी माणसाची गरज भोसलेकाकांना वाटत होती. नायलॉनच्या दोरीवाल्याचा पिच्छा ताबडतोब करावा असे भोसलेकाकांचे म्हणणे होते परंतु नंदन भुकेने कासावीस झाला होता. त्यामुळे नाईलाजाने भोसलेकाकांना सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर जेवायला जावे लागले.
वर्माच्या खुनानंतर गटातील सर्वजण अगदी हतबल झाले होते. वर्मा आणि मुलकानीच्या विधवा पत्नींना आपली दुःखे बाजूला टाकून स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी पावले उचलणे भाग पडले होते. रहस्य उघड झाल्याने सुप्रीमने ही पावलं उचलली असावी ह्या काही संशय नव्हता. सहा कुटुंबातील बाराजण आधी बेटावर आले होते आणि आता दहाजण उरले होते. उघडपणे पोलिसात गेलं तर सुप्रीम काय करेल ह्याची कोणालाच खात्री नव्हती. सुप्रीम आहे कोण हे ही कोणालाच माहित नव्हते. त्यामुळे जीवाच्या भीतीने सर्वजण भयभीत झाले होते. आपली नेहमीची राहण्याची ठिकाणे सुप्रीमला माहित असल्याची शक्यता ध्यानात घेऊन त्या सर्वांनी किनाऱ्यालगतचे अगदी घरगुती असे साधे हॉटेल राहण्यासाठी निवडले होते. त्यात जीव मुठीत ठेवून हे सर्व रहात होते.
एकदा अन्न पोटात गेल्यावर नंदनचे डोके ताळ्यावर आले. "अरे, आपण त्या दोघांचा ताबडतोब पाठलाग करायला हवा होता! काका तुम्हीपण ना, मला थांबवायचं ना?" नंदनच्या ह्या बोलण्यावर काय बोलण्यात अर्थ नाही हे काका चांगलेच जाणून होते. धावतपळत ते दोघे परत जोशीच्या सहलीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. जोशीने रात्री सर्वांसाठी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. नंदन आणि भोसलेकाका मोठ्या आवेशाने त्यात सहभागी झाले खरे पण त्यांची नजर त्या दोघांना शोधण्यात गुंग होती. परंतु काही केल्या ते दोघे दिसेनात तेव्हा जोशीला कोपऱ्यात घेऊन नंदनने विचारले, "सहलीतील सर्वजण इथे आले आहेत ना?" एकंदरीत सर्व पर्यटकांच्या गटाकडे लक्ष देत जोशी म्हणाला, "दोघे तिघे दिसत नाहीत!" आता त्या दोघांचा त्यात नक्की समावेश होता. "आम्हांला सर्व पर्यटकांचे भारतातील पत्ते मिळतील का?" ह्या भोसालेकाकांच्या प्रश्नावर जोशीने उघड नाराजी व्यक्त केली. आपल्या व्यवसायातील प्रतिमेला तडा जाईल असे ह्या दोघांना काही करू देण्याची जोशीला अजिबात इच्छा नव्हती. परंतु नंदनने जवळजवळ दडपशाही करत त्याच्याजवळून सर्वांच्या पत्त्यांचे पुस्तक मिळविले. त्यानंतर मात्र लगेचच काही मिनिटात हजारो मैलावर भारतात शांत झोपलेल्या राजवाड्यांना फोन आला आणि उत्तर भारतातील दोन पत्त्यांचा छडा लावण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
आता हे दोघे कोठे गायब झाले ह्याचा नंदन आणि भोसले विचार करीत असतानाच भोसलेना एक फोन आला आणि त्यांची मुद्रा अगदी गंभीर झाली. वर्माच्या खुनाची बातमी त्यांना मिळाली होती. आता ही अगदी आणीबाणीची परिस्थिती होती ह्यावर दोघांचे एकमत झाले. मुलकानीच्या बायकोचा पत्ता लावणे आवश्यक होते. कारण आता ह्या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक होते. नशिबाने भोसलेकडे तिचा नंबर होता. परंतु तिला लावलेला फोन एका रिंगमध्येच कट झाला. आणि त्यानंतर तो फोन बंद केला गेला. ताबडतोब जोशीच्या ढापलेल्या फोनवरून भोसलेनी सोमणला फोन लावला आणि मुलकानीच्या पत्नीचा बालीतील नक्की ठावठिकाणा काढून द्यायची विनंती केली. गाढ झोपेतून उठविल्या गेलेल्या सोमणने केवळ मैत्रीखातर ही विनंती मान्य केली. पाचच मिनिटात सोमणचा तिचा ठावठिकाणा सांगणारा फोन आल्यावर ह्याच्या संपर्कांना दाद द्यायला हवी अशी मनातल्या मनात ह्या दोघांनी कबुली दिली.
एक पळवलेली बाईक दामटवत दोघे समुद्रकिनाऱ्याजवळील त्या छोटेखानी घरगुती हॉटेलजवळ पोहोचले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. एकदम त्या हॉटेलात घुसण्याआधी काही मिनिटे बाहेरून निरीक्षण करावे असे दोघांचेही मत पडले. एक दोन मिनिटे ते बाहेरून त्या घरात काही हालचाल दिसते आहे का हे पाहत असताना अचानक कोपऱ्यातील खोलीतून त्यांना बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आले. नंदनने अगदी दचकून काकांकडे पाहिले. आपल्याकडे बंदूक आहे ह्याची काकांनी नजरेनेच ग्वाही देताच ते दोघे मागचा पुढचा विचार न करता त्या हॉटेलकडे जोरात धावले. खिडकी फोडून त्यांनी त्या खोलीत प्रवेश केला तर समोर चार पुरुषांचे मृतदेह पडले होते आणि बाजूच्या खोलीतून स्त्रियांचे ओरडणे ऐकू येत होते. सर्वत्र अंधार असला तरी ह्या दोघांची आवाजावरून लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता जबरदस्त होती.
नंदनने दरवाजा उघडून 'ऑल क्लियर' चा इशारा काकांना दिला. काका बाहेर पडताच त्यांना दोन खोल्यातील मार्गिकेत ठेवलेल्या मेजाच्या मागे काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी अंदाजाने त्या आवाज करणाऱ्या लक्ष्याचा एका क्षणात वेध घेतला. एक जोरदार किंचाळी ऐकू आली. आणि त्याच क्षणी एक काळी आकृती खिडकीतून उडी मारून पळत जाताना त्यांना दिसली. आता एकेक क्षण महत्वाचा होता. तत्काळ नंदनने अंधारातच विजेची स्विच शोधला. काकांनी वेध घेतलेला माणूस काही वेळापूर्वी जोशीच्या हॉटेलात पाहिलेल्या दोघातील एक होता आणि तो अगदी शेवटच्या घटका मोजत होता. दुसरा पळाला होता. काकांना किंवा नंदनला शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसाकडून कशी माहिती काढून घ्यायची ह्याचा अनुभव नव्हता. तरीही नंदनने "तुम्हांला कोणी पाठविले आहे" असा दरडावून प्रश्न त्याला केला. "राज्याचे गृह….…' त्याच्या नशिबाने उत्तर द्यायला लागलेल्या त्या  जखमी माणसाने अर्ध्या उत्तरातच दम सोडला होता.
दुसऱ्या खोलीत सहा विधवा स्त्रियांना तोंड देण्याची आणि त्याचवेळी त्यांना आपण मदत करण्यासाठी आलो आहोत हे पटवून देण्याची जबाबदारी ह्या दोघांवर होती. आणि त्या पळालेल्या एकाची चिंता न करणे त्यांना परवडणारे नव्हते!



No comments:

Post a Comment