Friday, March 21, 2014

आधुनिक नाती!


आजच्या लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील सुचित्रा कुलकर्णी ह्यांचा 'आपली मुलगी, आपली वैरीण ?' हा अतिशय सुंदर लेख वाचला. शीर्षक आधी काहीसं खटकलं तरी लेखातील विचार मात्र खूप आवडले. त्या लेखातील काही मुद्दे आणि त्या अनुषंगाने माझे विचार असे -
हल्ली मुली, (अगदी चांगल्या घरातील सुद्धा) लहान वयात प्रेमात पडण्याचे प्रमाण वाढलं आहे, जवळजवळ अमेरिकेला गाठण्याइतकं! आता चांगलं घर ह्या संकल्पनेचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझ्या मतानुसार चांगलं घर म्हणजे ज्यात आई- वडिलांसोबत आजी- आजोबा, काका- काकी, भावंडांचा गोतावळा असतो ते गोकुळ! मुलांच्या विविध वयोगटातील विविध भावनिक गरजा असतात. एकटे आई वडील त्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यावेळी हे बाकीचे नातेवाईक चित्रामध्ये येतात. परंतु ज्यावेळी काळाच्या गरजेनुसार हे गोकुळ आणि त्यातील बालगोपाल विखुरले जातात त्यावेळी त्यांच्या अनेक भावनिक गरजा अपूर्ण राहतात. ही मंडळी जरी समाजव्याख्येप्रमाणे म्हटल्या जाणाऱ्या चांगल्या घरातून आली असली तरी त्यांना चांगल्या घरातील त्या पोषक वातावरणास मात्र मुकावे लागलेले असते.
ह्यातील एक मुख्य गरज म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची गरज, स्वतःला कोणीतरी खास वाटून देण्याची गरज. आई वडील ह्या बाबतीत कठीण स्थितीत असतात. एक तर वेळ कमी असतो आणि त्यात ही जी खास वाटून घेण्याची गरज असते ती लहान वयापेक्षा वेगळी असते आणि बिचाऱ्या पालकांना ह्या बदलत्या गरजेला समजून घेऊन त्यानुसार आपल्या अपत्याबरोबर असलेले आपले नाते बदलायची मेहनत घ्यायला एकतर वेळ नसतो किंवा हे बदलते नाते समजून घ्यायची क्षमता कमी पडते. मग ही गरज पूर्ण करायला आजूबाजूच्या मित्रमंडळीकडे पाहिले जाते आणि मग त्यातल्याच एखाद्याविषयी प्रेमभावना निर्माण झाली आहे असे वाटू शकते.
स्वतःकडे लक्ष वेधून घेणे ही केवळ वयात येणाऱ्या मुलांचीच गरज नव्हे तर ती प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची गरज आहे. आणि ही गरज पूर्वीसुद्धा होती. पण पूर्वीच्या जमान्यातील स्त्रियांनी ह्या भावनेचे त्याग ह्या भावनेत रुपांतर केले. आपण कुटुंबातील सर्वांची काळजी घेवूयात म्हणजे आपल्या ह्या जन्माचं चीज होईल असा विचार करून त्यांनी समाधान मिळविले आणि त्यामुळे कुटुंबसंस्था टिकली. अशा कुटुंबातील पुरुषांचे काय? बहुतेक उदाहरणात त्यांनी आपली लक्ष वेधून घ्यायची गरज भागविण्यासाठी मित्रमंडळीचा आधार घेतला.
ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रेम करणे म्हणजे अगदी चुकीचे आणि जमवून केलेला विवाह चांगला असं होईल असेही सांगता येत नाही. विवाह हे एकप्रकारचे व्रत आहे. आयुष्यभर निभावायला लागणारं! लग्नाचे समाजमान्य वय विशी - तिशीतील. पतीपत्नीच्या अनुरुपतेचा आयुष्यभराचा आलेख काढण्याचा प्रयत्न केला तर? एक जोडपं आयुष्याच्या प्रत्येक कालखंडात  एकमेकाला अनुरूप असेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीत वयानुसार बदल होत जातात. मध्येच पत्नी प्राजक्ता म्हणाली की वयाच्या पस्तीशीनंतर आपले अनुवांशिक गुण उफाळून येतात. व्यक्तीची समाजात मिसळण्याची गरज वाढू लागते आणि बऱ्याच वेळा ही गरज आपण लहानपणी ज्या समाजात , संस्कृतीत वाढलो त्या समाजाशी, संस्कृतीशी निगडीत असते. मला बऱ्यापैकी हे विधान पटले. बहुदा तिने माझ्या उदाहरणावरून हे विधान केले असावे आणि म्हणून ते मला पटले असावे! आणि इथे आंतरजातीय, धर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना कठीण परिस्थितीचा मुकाबला करावा लागू शकतो. इथे एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण बदलत्या वयानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, आपल्या जीवनसाथीच्या स्वभावानुसार स्वतःला किती बदलू शकतो? पूर्वीच्या काळात पुरुषांना स्वतःचे व्यक्तिमत्व कायम ठेवण्याची मुभा एकत्र कुटुंबपद्धतीने दिली होती. कारण स्त्रिया आपला स्वभाव, वागणे आपल्या पतीनुसार बदलत असत. आता तसे नाहीये, आधुनिक स्त्रियांना तसे जमणार नाही त्यामुळे पुरुषांना हा मानसिक बदल करावा लागेल.  त्याच वेळी स्त्रियांनी देखील पुरुषांचा ह्या बाबतीतला इतिहास पाहता त्यांना थोडी संधी देणे, त्यांच्यावर संस्कार (!) घडवून आणणे आवश्यक आहे!
लेखातील अजून विचार करण्याजोगा मुद्दा! आपल्याकडे हल्ली लहान वयात प्रेम करण्याची अक्कल आली असली तरी आर्थिकदृष्ट्या मात्र पालकांवर असलेली अवलंबिता! ह्या बाबतीत लेखिकेने अमेरिकेचे उदाहरण दिलेय, अमेरिकत मुलं लवकर प्रेम करतात पण त्यावेळची जी स्थिती असेल त्याच स्थितीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे राहतात. नक्कीच धडपडतात, पण वेगळी राहतात. मला असं वाटतं की आपण अपत्य आणि पालक ह्या दोन्ही घटकाच्या बाबतीत स्थित्यंतराच्या कालावधीतून जात आहोत. हल्लीचे किती पालक आपल्या मुलांना असे आर्थिकदृष्ट्या धडपडत असताना एकटे राहून देतील? त्याचवेळी मुले जरी कळत नकळत प्रेमात पडली असली तरी त्यांनी आतापर्यंत कधी असे एकटे राहणे अनुभवले नसणार! पण आता ही जी मुलांच्या भूमिकेत असलेली पिढी ज्यावेळी पालक बनेल त्यावेळी मात्र बहुदा ती त्यांच्या अपत्यांना वेगळे राहू देईल.
बदलांचे बघा कसं असतं एकदा का हा बंद पेटारा उघडला की मग त्यातून काय काय बाहेर येईल ते फक्त अचंबित होऊन पाहत राहायचं!
लेखाच्या शेवटच्या भागातील एक काहीसा मजेदार मुद्दा! १९८० च्या आधी मुलगे असणाऱ्यांना भाव होता मग सुनांना सांभाळणे कठीण आहे हे समजल्यावर पुढील दोन दशके मुलीवाल्यांचा भाव वधारला! त्यानंतर काहीसा गंभीर मुद्दा; हल्ली मुली लग्नाआधी आणि नंतरही बरेच प्रश्न निर्माण करत असल्याने ही सर्व समीकरणे बदलली गेली आहेत.
लेखाचा शेवट काहीसा हतबल होऊन केल्यासारखा वाटतो. हल्ली ज्याप्रमाणे कर्तृत्ववान मुलींची संख्या वाढली आहे त्याचप्रमाणे मुल्यविरहीत शिक्षणाचा रुबाब आणि मिळविणाऱ्या पैशाचा तोरा मिळविणाऱ्या मुलींनी पालकांचा भ्रमनिरास करायला सुरुवात केली आहे. आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने मुली स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष तर वाढवून घेताहेत पण पालकांचे जगणेही मुश्किल करीत आहेत. तर अशा आई बाबांनी करायचं तरी काय?
मला ह्याच एकच उत्तर वाटत! पालकांनी आपल्या लग्न झालेल्या किंवा लग्नाचे वय झालेल्या मुलींविषयीच्या भावनिक गुंतवणुकीची सीमारेषा स्वतः आखून घ्यावी. ह्या सीमारेषेपर्यंत मदत करावी, त्यापलीकडे परिस्थिती गेल्यास स्पष्ट नकार द्यावा! हा जर नकार देण्याचे धारिष्ट्य जर तुमच्याकडे नसेल तर मात्र समोर असेल ती परिस्थिती मुकाट्याने स्वीकारावी! शेवटी व्यावसायिक जग असो वा वैयक्तिक, तुमच्याकडे स्पष्ट विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची क्षमता हवी. ती जर नसेल तर दैवाला दोष देत रडगाणे गायला तयार राहावं!
जरा नंतर सुचलेला मुद्दा! हा लेख केवळ मुलींच्याच बाजूने का लिहिला गेला बरे? जशा मुली लहान वयात प्रेमात पडतात त्याचवेळी त्यांच्या प्रेमात पडणारी बऱ्याच वेळा मुलेसुद्धा लहानच असतात? म्हणून मला शीर्षक जरा खटकलं!
एका सुंदर लेखाबद्दल सुचित्राताईचे अभिनंदन!

No comments:

Post a Comment