बालीतील त्या छोटेखानी हॉटेलातील गोळीबार आणि चारजणांचा खून लपविणे सुप्रीम आणि कंपनीला सुद्धा कठीण गेले. ह्या घटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर (कु) प्रसिद्धी मिळाली. आणि मग मात्र पावले अगदी वेगळ्या दिशेने पडायला लागली. सोमणला वरिष्ठ मंडळीकडून फोन आला आणि ह्या सर्व कटकारस्थानाला मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश देण्यात आले.
सायलीच्या कंपनीत आज मोठी धामधूम होती. तिच्या कंपनीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होते आणि ह्या उद्घाटनाच्या समारंभाच्या संचालनाची जबाबदारी सायलीकडे सोपविण्यात आली होती. सर्व तयारीवर शेवटचा हात फिरविण्यात सायली अगदी व्यस्त होती.
छोटेखानी हॉटेलात जो एक मारेकरी मारला गेला त्याच्या फोनवरून भारतातील काही संपर्क क्रमांक मिळाले होते आणि त्यावर सोमण आणि मंडळीचे संशोधन चालू होते. अजूनही नंदन आणि भोसलेकाकांना उघडपणे बाहेर फिरू देणे धोक्याचे होते.
समारंभाच्या उद्घाटनासाठी मान्यवरांचे कंपनीच्या आवारात आगमन झाले आणि सायलीने पुन्हा एकदा सर्व हॉलवर नजर फिरवली. खिडकीतून गेटमधून प्रवेश करणारी मान्यवर आणि मंडळी दिसत होती. इतक्यात सायलीची नजर कोपऱ्यावरील चहाच्या टपरीकडे गेली. मामांची परिचित आकृती तिथे पाहून तिच्या काळजात धस्स झाले.
पुढील दहा पंधरा मिनिटं कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मान्यवरांचे स्वागत करीत होते. इतक्यात सायलीला तिच्या भ्रमणध्वनीवर एक लघुसंदेश आला. "सायली, क्षमस्व, तुझे प्रेसेंटेशन बदलले गेले आहे, परंतु एकंदरीत प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हे आवश्यक आहे! - तुझा मामा!" सायलीला एक क्षणभर तिथून पळून जावेसे वाटले. परंतु तिने स्वतःला लगेचच सावरले. मामाला मदत करणे किती आवश्यक आहे हे तिने स्वतःलाच बजावले.
समारंभ सुरु झाला. कंपनीच्या अध्यक्षांचे भाषण झाले आणि तो क्षण उगवला. सायली व्यासपीठावर आली आणि तिने मान्यवरांचे स्वागतपर भाषण सुरु केले. "मान्यवरांच्या कार्यांची महती शब्दात सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते महतकठीण काम आहे! त्यामुळे मी या चलतचित्रफितीच्या आधारे हे करू इच्छिते! समोरून तिच्या सहायकाने सर्व काही ठीकठाक असल्याची खुण केली! आणि आपल्या हृदयाच्या वाढत्या धकधकीला नियंत्रित करीत सायलीने इंटर बटन दाबले.
प्रेसेंटेशन सुरु झाले. परंतु बराच अंधार दिसत होता. हळूहळू त्या चित्रफितीतील व्यक्ती दिसू लागल्या, मान्यवरांच्या चेहऱ्यावर अचानक जबरदस्त तणाव दिसू लागला. आणि ज्या क्षणी मान्यवरांची आकृती स्पष्ट दिसली त्या क्षणी सर्व उपस्थितांमध्ये खळबळ माजली. एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या नियोजनाची ही चर्चा होती. आणि मान्यवर आणि अनेक मंडळी त्यात सहभागी होती. प्रथम कुजबुजीचे नंतर गडबडीत रुपांतर होत असतानाच मान्यवर आपल्या आसनावरून उठले आणि बाहेरजायच्या मार्गाकडे त्यांनी जोरात धाव घेतली. परंतु राजवाडे आणि गटाचे नियोजन अगदी व्यवस्थित होते. बाहेर जाण्याचे सर्व मार्ग रोखून धरण्यात आले होते. आणि जिथून पळून जाण्याचा मान्यवरांनी प्रयत्न केला तिथे दस्तुरखुद्द सोमण उभा होता.
एका मोठ्या कुटकारस्थानाचा छडा लावण्यात राजवाडे, भोसले, नंदन, सोमण आणि हो सायलीने यश मिळविले होते. सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक चालले होते. ह्या कौतुकाचा धुरळा खाली बसल्यावर राजवाड्यांनी सर्वांना आपल्या गावी आग्रहाचे निमंत्रण दिले.
मार्चमधील कोकणातील रम्य संध्याकाळ होती. राजवाड्यांच्या जुन्या घरी सर्वजण एकत्र जमणार होते. राजवाडे, भोसले आणि सोमण तर हजर होते परंतु सायली आणि नंदनचा पत्ता नव्हता. "ह्यांना फोन लावूयात" असे भोसले म्हणणार तितक्यात दोघेजण नंदनच्या बाईकवरून येताना दिसले. "या वेळेत आलात", भोसलेकाकांनी त्यांचे स्वागत केले. ते दोघे स्थिरस्थावर होणार इतक्यात राजवाडे म्हणाले, :ह्या आनंदाच्या प्रसंगी मला अजून एक गोड घोषणा करायची आहे!" "नाही, नाही! प्रथम मला एक घोषणा करायची आहे" नंदनने अचानक उठून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. "खबरदार! हे माझे घर आहे! आणि इथे माझाच हुकुम चालणार!" राजवाडे लटक्या आवेशात म्हणाले. नंदन मात्र खरोखर घाबरला आणि शांतपणे जागी बसला. सायलीच्या चेहऱ्यावर मात्र नंदनविषयी निराशेचे भाव उमटले. "उ उ हुम" राजवाड्यांनी वातावरणातील उत्सुकता अजून वाढविण्यात यश मिळविले. "मी माझी भाची सायली आणि माझे परममित्र भोसले ह्यांचा पुतण्या नंदन ह्यांच्या वाडनिश्चयाची इथे घोषणा करीत आहे!" आणि ते आपल्या स्थानावर आसन्न झाले. फक्त भोसलेच आश्चर्यचकित दिसत होते. त्यांना काय बोलावे ते कळेना! "आता, तुमची घोषणा येवुद्यात!" राजवाड्यांनी नंदनकडे बघून मिश्किलपणे इशारा केला. एव्हाना नंदन आणि सायली ह्यांनी पूर्ण शरणागती पत्करली. "मामा, तुम्हांला कळले कसे!" सायलीने शेवटचा प्रयत्न केला. "मी गुप्तहेर काय उगाच नाही!" मामा उत्तरले. "बाली ते भारत फक्त चांडाळचौकडीचेच फोन चालू नव्हते!" हसतहसत मामा उद्गारले! इतका वेळ गप्प बसलेले भोसलेकाका एव्हाना सावरले होते. "बाकी नंदन, हनिमूनसाठी मात्र जोश्यातर्फे बालीलाच जायचे हो!" आपणसुद्धा विनोदबुद्धीत कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. बैठकीच्या खोलीत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते!
रात्री जेवून झोपायला जवळजवळ मध्यरात्र झाली. बऱ्याच दिवसांनी शांतचित्ताने राजवाडे झोपी गेले.…
. . .
.
. .
.
दोनच्या सुमारास त्यांच्या फोनची घंटा किणकिणली… "राजवाडे बोलतोय!" एक दोन मिनिटे फोनवरून बोलून राजवाड्यांनी फोन ठेवला. पाचच मिनिटात आपली जीवनसाथी बाईक बाहेर काढून राजवाडे निघाले होते एका नवीन रहस्यभेदासाठी!
No comments:
Post a Comment