Friday, March 28, 2014

पुन्हा आभास - भाग १


सितु हताश होऊन सिलिकॉन व्हॅली, बे एरियातील आपल्या फ्लैटमध्ये बसला होता. शुक्रवार संध्याकाळ होती आणि एक निराश वीकएंड समोर उभा ठाकला होता. साथीला केवळ एकटेपणा होता. अंधारात बसून सितु गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रम डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीत होता.
सितु गेले कित्येक महिने आभासी जगाचे मॉडेल बनवीत होता. सितुने विकसित केलेलं आभासी जगाचं मॉडेल त्याच्या अपेक्षेनुसार अगदी झकास उतरलं होतं. त्यात एका व्यक्तीला लॉगइन करण्याची सोय होती आणि मग एकदा का त्या आभासी जगात त्या व्यक्तीने प्रवेश केला की त्याला त्या जगातील विविध अनुभवांना सामोरे जावे लागत असे. आणि त्या विविध अनुभवांना व्यक्ती कशी सामोरे जाते त्यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावपैलूचे सर्व कंगोरे हे मॉडेल एका विश्लेषणरुपात मांडत असे. हे मॉडेल सितुने आज एका मोठ्या कंपनीसमोर सादर केले होते आणि जर ह्या कंपनीने त्याची निवड केली, तर सितुला त्या कंपनीतर्फे मिलियन डॉलर स्वरूपातील ऑफर मिळणार होती. सितुचा आत्मविश्वास जोरदार होता. आणि ही ऑफर मिळाल्यावर पुढे काय काय करायचे ह्याची मनोरथे उभारण्यास त्याने सुरुवात सुद्धा केली होती.
परंतु  आजची बैठक अगदी त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळी झाली होती. आज आलेल्या त्या कंपनीच्या मंडळींच्या अपेक्षा अगदी वेगळ्या होत्या. सुरुवातीला ज्याच्याशी बोलणी झाली होती आणि ज्याने अगदी उत्साहवर्धक चित्र सितुपुढे उभारलं  होतं तो उच्चपदस्थ माणूस कंपनी सोडून गेला होता आणि मग नवीन मंडळींच्या प्राधान्यक्रमात हे प्रोजेक्ट बसत नव्हतं.
पुढील आठवडाभर सितु अगदी निराश होऊन बसला होता. ह्या प्रोजेक्टच्या खुळापायी त्याने आपली चांगली नोकरी सोडली होती आणि गेले ६ महिने ह्या प्रोजेक्टवर काम केले होते. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. आपण ह्यात इतकं गुरफटून गेलो की दुसरा एखादा पर्याय समोर ठेवायचा आपल्याला सुचलंच नाही आणि आपल्याकडून ही मोठी चुक झाली हे त्याला कळून चुकलं होतं.
पुढच्या आठवड्यातील शनिवारची सकाळ उजाडली. एव्हाना सितु सावरला होता. आपलं हे मॉडेल इंटरनेटच्या अफाट जगात विकायला काढायचा त्याने निर्णय घेतला होता आणि त्याचबरोबर एखाद्या नोकरीसाठी अर्ज करण्याचा निर्णयसुद्धा! सकाळी आठच्या सुमारास त्याने आपल्या मॉडेलची जाहिरात टाकली आणि आपला बायोडाटामध्ये काही फेरफार करण्याच्या कामात तो गढून गेला. साधारणतः दोन तासात बायोडाटा बऱ्यापैकी आटोक्यात आला. त्याने हळूच एक नजर मॉडेलच्या जाहिरातीला काही प्रतिसाद मिळतोय का  ह्याकडे टाकली. असेच काही फुटकळ प्रतिसाद आणि तशाच स्वरूपाच्या टिपण्या होत्या. ह्याचसाठी आपण इंटरनेटचा मार्ग पत्करीत नव्हतो हे त्याला जाणवलं. पण आता त्याचा जास्त विचार न करण्याचे त्याने ठरवलं. बायोडाटा मात्र झकास बनला होता. दुपारच्या जेवणाआधी त्याने तो वेगवेगळ्या साईटवर अपलोड केलासुद्धा!
दुपारचे कामचलाऊ जेवण आटपून तो टीव्हीवरील चॅनेल्स धुंडाळीत बसला होता. त्यात कशी काय डुलकी लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्याची ही डुलकी फोनच्या रिंगने उडाली. नोकरीसाठी पहिला फोन होता तो! सितुने घड्याळाकडे पाहिले.  दुपारचे तीन  वाजले होते. "गिव्ह मी कपल ऑफ मिनिट्स, एण्ड आय विल बी बॅक!" पूर्ण अमेरिकन स्वरात सितु उत्तरला! तोंडावर खळबळून पाणी मारून सितु दोन मिनिटात परतला. त्यानंतर पुढील जवळजवळ सहा तास सितुचा फोन व्यग्रच होता. आपण सात की आठ मुलाखती दिल्या हे ही त्याला आठवत नव्हतं. पण आपल्याकडे १५० K आणि १३० K च्या दोन ऑफर्स आहेत हे मात्र त्याला नक्की आठवत होते. १३० K च्या ऑफरमधील कामाचे स्वरूप त्याला अगदी आवडलं होतं पण त्याचवेळी त्याला दुसऱ्या ऑफरमधील अधिकचे २०K खुणावत होते.
आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि सितु आजच्या दिवसातील घडामोडीवर खुश होता. त्याने एक मस्तपैकी पिझ्झाची ऑर्डर दिली. वीस मिनिटात पिझ्झावाला  दारावर येऊन धडकला सुद्धा! भरपूर चीझयुक्त पिझ्झाचा पहिला बाईट तोंडात विरघळत असतानाच वाचा बंद करून ठेवलेला फोन थरथरला! आजच्या दिवसात अजून अधिक फोन घेण्याची सितुची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे थरथरणाऱ्या फोनकडे त्याने दुर्लक्ष केले. पुढील दोन मिनिटात फोन  पुन्हा एकदा थरथरला! चीझयुक्त पिझ्झाचा आस्वाद घेण्यात मग्न झालेल्या सितुने त्याकडे लक्ष दिले नाही. दहा मिनिटात त्याचा पिझ्झास्वाद कार्यक्रम आटोपला आणि सर्व काही आवराआवर करून तो निवांतपणे सोफ्यावर बसला. आता एखादा मस्त चित्रपट केबलवर ऑर्डर करून पाहायचा त्याचा बेत होता. अचानक त्याला ते दोन फोन कॉल्स आठवले. त्याने सहजच गंमत म्हणून त्या नंबरवर फोन करण्याचं ठरवलं. "२०० K मागून पाहूयात" पिझ्झाने तृप्त झालेले मन त्याला सांगत होते. दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला. उच्चारावरून एखाद्या उच्चभ्रू अमेरिकन माणसाने फोन उचलला असावा अशी अटकळ सितुने बांधली. समोरच्या माणसाने मायकल म्हणून आपली ओळख करून दिली. आणि हा कॉल आपण सितुच्या मॉडेलच्या चौकशीसाठी करीत आहोत असे सांगितले. "अरेच्या आपण तर ह्या मॉडेलविषयी विसरूनच गेलो होतो!" सितुच्या मनात विचार आला. "ह्या चर्चेस वेळ लागेल आणि हवे असेल तर मी उद्या सकाळी फोन करीन" असे मायकल म्हणाला. आज सर्व काही मनासारखे होत असताना ही संधीसुद्धा का गमवावी असा सितुने विचार केला. "नाही नाही, आताच आपण बोलूयात! " सितु उत्तरला. "पण हे बोलणे फोनवर होण्यासारखे नाही!" मायकलच्या स्वरात काहीसा निग्रह होता. "मी इथल्या सेंट रेजीस हॉटेलात उतरलो आहे, तुला घेण्यासाठी मी कॅब पाठवतो!" मायकल म्हणाला. सितुच्या मनात थोडी शंका निर्माण झाली. 'अनोळखी माणसाला आपला पत्ता द्यायचा, त्याने पाठविलेल्या कॅबमध्ये बसायचे' त्याने मायकलच्या ह्या प्रस्तावाला नकार दिला आणि स्वतः तिथे येण्याचे सुचविले. मायकलने बहुदा त्याच्या मनातील शंका ओळखल्या असाव्यात आणि म्हणून त्याने काही न बोलता "मी वाट पाहतो" असे सांगून फोन ठेवला. इतक्या झकास हॉटेलात जायचे म्हणजे चांगली तयारी करून जायला हवे असे सितुने ठरविले आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी ठीकठाक तयारी करून सितु बोलाविलेल्या कॅबमध्ये बसला. अशा आलिशान हॉटेलला नेऊ शकेल अशी गाडी आपल्याकडे असली पाहिजे असे स्वप्नरंजन कॅबमध्ये करीत असताना कॅब कधी हॉटेलला पोहोचली हे त्याचे त्यालाच कळलं नाही. स्वागतकक्षात मायकलने निरोप ठेवलाच होता. त्यामुळे त्याला तात्काळ पंचविसाव्या मजल्यावरील मायकलच्या आलिशान सूटकडे नेण्यासाठी एक सेवक पुढे धावला. ह्या हॉटेलचे वैभव डोळ्यांनी साठवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना उद्वाहक पंचविसाव्या मजल्यावर पोहोचला देखील!
मायकल स्वागतासाठी पुढे आला. त्याचे व्यक्तिमत्व अगदी आकर्षक होते. श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावरून प्रकट होत होती. त्या आलिशान सूटच्या एका बाजूला एक भव्य बाल्कनी होती आणि तिथून सन फ्रान्सिस्को शहराचा नयनरम्य नजारा दिसत होता. त्या दिशेने एक छोटेखानी बार होता आणि मायकलने सितुला तिथेच आसनासाठी निमंत्रित केले. विविध उंची मद्याची तिथे कमतरता नव्हती! परंतु सितुला त्याचा काहीच उपयोग नव्हता. सितुने फळाचा रस स्वीकारला.
मायकल बोलू लागला. सितुच्या  मॉडेलने त्याला नक्कीच प्रभावित केले होते. परंतु त्याला त्याचे पुढचे रूप हवे होते.  ह्यामध्ये त्याला दोन व्यक्तीची माहिती स्वीकारण्याची तरतूद करून हवी होती आणि त्यांच्या स्वभावाचं विश्लेषण  करून मग ते एकमेकास अनुरूप आहेत की नाही हे ठरवता आले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. सितु अगदी खुश झाला होता, त्याच्याही मनात ही संकल्पना होतीच. "ह्या सुधारणेस किती वेळ लागेल ?" मायकल विचारीत होता. "किमान सहा महिने" सितु उद्गारला. आणि "त्यात माझे सहा महिने वाढव!" मायकल म्हणाला. "ते कशासाठी?" सितुने विचारलं. "मला  प्रत्यक्षातील दोन व्यक्तींवर ह्या मॉडेलचा वापर करून हवाय!" मायकल म्हणाला. सितुला अचानक १३० K आणि १५० K आठवले. "पण मला ह्यासाठी इतका वेळ देता येणार नाही! मला आजच दोन चांगल्या ऑफर्स आल्या आहेत!" "आणि जर आपण एका वर्षाचा करार करणार असू तर?" मायकलने विचारलं. "तर मग मी विचार करायला तयार आहे!" सितु म्हणाला. "तुझी अपेक्षा कितीची आहे?" मायकलने विचारलं. "एका वर्षासाठी - एक मिलियन डॉलर्स! - तिथल्या सप्ततारांकित वातावरणात एव्हाना रुळलेल्या सितुला मिलियन डॉलर्सपेक्षा कमी आकडा उद्गारणे म्हणजे मायकलचा अपमान होईल असे वाटलं आणि म्हणून त्याने हा आकडा सांगितला! "ठीक आहे, तुझ्या पुढील एका वर्षाच्या वेळेसाठी १ मिलियन डॉलर्स आणि जर त्या प्रयोगाचे भाकीत  यशस्वी होत राहिले  तर पुढच्या १०  वर्षासाठी प्रतीसाल १ मिलियन डॉलर्स!"मायकलच्या ह्या उद्गारावर सितुचे डोळे पांढरे व्हायचेच बाकी राहिले होते! "तू जर ह्या प्रस्तावास तयार असशील तर उद्या सकाळी दहा वाजता ये! मी कराराची कागदपत्रे तयार ठेवतो आणि करारावर सह्या झाल्याच्या क्षणी तुझा जॉईनिंग बोनस तुझ्या खात्यात जमा!" मायकल म्हणाला. "तो कितीसा?" न राहवून सितुने विचारलं. "१५० K" पक्का बिसिनेसमन असलेला मायकल उत्तरला.
पंचविसाव्या मजल्यावरून सितू उद्वाहकातून खाली उतरत होता. तिथून दिसणारे सन फ्रान्सिस्को शहर बऱ्याच प्रमाणात झोपी गेले होते. परंतु रस्त्यावरून मात्र मोटारींचे मिणमिणते दिवे दिसत होते. सितूचे मन मात्र त्या मॉडेलच्या सुधारणेच्या विचारात गुंगून गेले होते.


क्रमशः


(शीर्षकाविषयी बराच संभ्रम आहे सध्यातरी!)


3 comments:

  1. I keep on reading your blog though I had not posted any comment. The topics covered by you are versatile are enjoyable.

    ReplyDelete
  2. Thanks Gauri for nice words about my blog!

    ReplyDelete
  3. Hi Aditya,

    Nice and interesting start of new story. Waiting for next part....Sharing it on flipon.in... please call me as we discussed..

    ReplyDelete