आठवडाभर बोरीवली आणि मग साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वसई केल्याने सोहम आणि माझ्यावर बऱ्याच वेळा होळीला केस कापण्याची वेळ येते. होळीवर तशी दोन तीन केशकर्तनालये आहेत, आम्ही लहानपणी जगदीश ह्यांच्या केशकर्तनालयात जायचो. परंतु आता छगन आणि विकास दोघां भावांच्या केशकर्तनालयात जातो. त्यांचे दुकान होळीत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. केशकर्तनालयात गेल्या गेल्या आपला नंबर लागला असे कधी होत नाही. त्यामुळे आपण प्रथम एक नजर आधीपासून येवून बसलेल्या लोकांकडे टाकतो आणि आपला क्रमांक कधी लागेल ह्याचा विचार करू लागतो. पूर्वी लोक आपला नंबर आधी लागावा म्हणून "मला लवकर मुंबईला जायचे आहे" असे बोलत. मग त्या माणसाच्या वजनानुसार आणि वाट पाहत असलेल्या माणसांच्या प्रतिक्रियेनुसार त्याचा नंबर आधी लावला जात असे. हल्ली असे काही होत नाही. बाजूलाच पेपर पडलेले असतात. अशा दुकानात शक्यतो लोकसत्ता, टाईम्स (केवळ मुख्य पेपरविषयी बोलतोय मी!) वगैरे गंभीर पेपर ठेवण्याची पद्धत नसावी. त्यामुळे अशा ठिकाणचे पेपर हलक्या फुलक्या बातम्यांनी भरलेले असतात. पूर्वी वाचलेल्या बातम्या जशा की 'शेजाऱ्याशी झालेल्या बाचाबाचीत दारुड्याला बेदम मारहाण!, 'अमुक अमुक गावात दोन डोक्याचा साप सापडला" अशा बातम्या वाचून माझी करमणूक व्हायची. केस कापताना, डोक्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या (किंवा शिरता शिरत नसलेल्या) गंभीर बातम्या केसांबरोबर बाहेर जायला नकोत हा ह्यामागचा सद्हेतू असावा. हे पेपर साधारणतः पाच मिनिटात चाळून झाले की मग नजर टीव्हीवर जाते. प्रत्येकवेळी जनतेचे टीकाटिपण्णी करण्यासाठी एक आवडतं व्यक्तिमत्व असतं. हल्ली ते केजरीवाल हे आहे. त्यामुळे कालसुद्धा माझ्यासारख्या आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असलेल्या सर्वांनी केजरीवालवर आपली मते प्रदर्शित केली. ह्यात एक कॉंग्रेसचे समर्थक होते. त्यांनी काँग्रेसची चांगली कामे लोकांना कशी दिसत नाहीत आणि हा सर्व प्रसारमाध्यमाचा खेळ आहे असे विधान केले. ते शांत झाल्यावर मी जागा झालो. बेपत्ता मलेशियन विमानाद्वारे भारतीय शहरांवर ९/११ स्वरूपाचा हल्ला करण्याची योजना असू शकते असे वक्तव्य करणाऱ्या माजी अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्याचा मी खरपूस समाचार घेतला. त्याच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने प्रसारमाध्यमासमोर असे विधान करताना थोडेतरी तारतम्य बाळगायला हवे होते असा सात्विक संतापही मी व्यक्त केला. तो बिचारा जर तिथे हजर असता तर पुरेपूर पश्चातापदग्ध झाला असता ह्यात तिळमात्र शंका नाही. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या संघातर्फे T२० विश्वचषक स्पर्धेत निवड झालेल्या आणि मुळचा वसईकर असलेल्या स्वप्नील पाटीलचे काका तिथे दुकानात आले. त्यामुळे चर्चेचा ओघ त्याच्याकडे वळला. स्वप्नीलला ह्या विश्वचषक स्पर्धेसाठी आम्हां सर्व वसईकरांतर्फे हार्दिक शुभेच्छा!
ह्या दुकानाच्या मागच्या खिडकीतून गावठी कोंबड्या विकायला बसलेल्या विक्रेत्या स्त्रिया दिसतात. त्यांच्याशी बरेचजण येऊन योग्य भावासाठी घासाघीस करीत असतात. एकदा का सौदा झाला की मग दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसतात.
ह्या दोन्ही भावांचे संभाषणकौशल्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक माणसाचा व्यवसाय आणि आवडीचे मुद्दे ते व्यवस्थित लक्षात ठेवून असतात. सोहम आल्यावर त्यांनी बाकी उपस्थित लोकांना हा बोरीवलीवरून केस कापायला इथे येतो अशी ओळख करून दिली. त्यामुळे सोहम तर खुश झालाच आणि उपस्थित ग्राहकांचा ह्या बंधूविषयी आदर दुणावला. क्रिस्ती भावंडांची एक जोडी दुकानात बसली होती. 'मामारा कवा जायचा?" असा त्यातील मोठ्याला प्रश्न केल्यावर त्याची कळी खुलली आणि तो खुशीत आला. त्या दोघांना बसवून त्यांचे वडील बाजार आटपायला गेले होते. ह्या मोठ्याने आपले केस जास्त कापू नयेत ह्यावरून छगनकाकाशी बरीच चर्चा केली. परंतु तुझ्या वडिलांनी जसे सांगितले त्याचप्रमाणे मी केस कापणार असे सांगून छगनकाकाने त्याला फेटाळून लावले. मलाही साधारणतः कामाचा तणाव कसा आहे? ऑफिस मालाडलाच आहे का असे प्रश्न ते विचारतात. बाकी एकदा त्यांनी जेपी मोर्गन जोरात आहे असे वगैरे सांगितल्यावर मी सावरून बसलो. जेमी डायमनशी भेटलास वगैरे का, तिमाही अहवालात कसे आकडे आहेत असे पुढे प्रश्न ते मला विचारतील अशी उगाचच भीती त्यावेळी मला वाटली होती!
रविवारची होळीवरील गर्दी वाढत होती. त्यात एकाने आपली कार रस्त्याच्या कडेला लावून तो बाजूला निघून गेला. तितक्यात एक अर्नाळा बस आली त्यामुळे तिथे थोडा छोटा ट्रैफिक जैम झाला! दुकानातील सर्वांनी त्या कारवाल्यावर इथेच्छ वाकसुख घेतले.
वेळ बरा चालला होता. आणि मग माझा नंबर लागला. मागून पुढून लावलेल्या आरशांनी माझ्या विरळ झालेल्या केसांचे अगदी भेदक चित्र डोळ्यासमोर ठेवले. आणि त्यामुळे निमुटपणे मी उरलेसुरले केस कापून घेण्यास सज्ज झालो. "केस कसे कापायचे? बारीक की मिडीयम?" ह्या छगनच्या प्रश्नाला मी केविलवाणे हास्य केले. तो ही समजला आणि केस कापण्याचा उपचार पार पाडण्यास त्याने सुरुवात केली!
This comment has been removed by the author.
ReplyDelete