Sunday, March 9, 2014

आपले विश्व आणि आयुष्यातील टप्पे!




स्वतःला केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येकजण आपले विश्व स्थापन करीत असतो. ह्या विश्वात समाविष्ट असतात आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि जीवनरहाटीच्यानिमित्ताने संपर्कात येणारी लोकं! ह्यातील प्रत्येकाशी आपले लौकिकार्थाने लिखित / अलिखित असे नाते असते. आता ह्या नात्याकडे बघण्याचा दोन्ही बाजूंचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक दिवसागणिक ही नाती बदलत जातात, दररोज बदलणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे!

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने असे काही टप्पे मानता येतात. माझ्या बाबतीत शालेय जीवनाचा टप्पा, १२ वी पर्यंत रुपारेलचा टप्पा, सरदार पटेल महाविद्यालयात अभियांत्रिकीतील पदवी आणि त्यानंतरच्या शिक्षणाचा एक टप्पा, त्यानंतर स्थापत्य क्षेत्रातील काहीसा अस्थिर काळ, मग माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशानंतरचा उमेदवारीचा काळ, पहिली परदेशवारी, लग्न, २००७ पर्यंतचा सततचा परदेशप्रवास आणि त्यानंतर काहीसा मध्यमवयात प्रवेश केल्यानंतरचे भारतातील वास्तव्य!

ह्या प्रत्येक टप्प्यात आपण अनेक वेगवेगळी लोक, ठिकाणे पाहतो. ह्यातील काहीजणांशी, ठिकाणांशी  आपलं दृढ नातं बनतं. काळ पुढे सरकतो, माणूस शिक्षणानिमित्त , नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतर करतो. एका नव्या विश्वात आपले एक स्वतःचे नवीन विश्व निर्माण करतो. त्यात गुंगून जातो. आधीचे विश्व काहीशा प्रमाणात विसरतो. व्यक्तीने आयुष्यभर अनुभवलेली ही अनंत विश्वे, नाती  त्याच्या मनाच्या कोपर्यात कोठेतरी अडगळीत पडलेली असतात.

कधीतरी कोणत्यातरी क्षुल्लक निम्मिताने ह्या अनंत विश्वातील एखादे विश्व उफाळून बाहेर येते. मनाला अस्वस्थ करून सोडते. ह्या विश्वाला आपण परत आणून शकत नाही ही जाणीव आपल्याला बोचत राहते, मग आपण शोधतो त्या विश्वातील आपल्याला, तो तरी आपणास नक्की सापडेल असा आपणास विश्वास असतो. पण हा शोध घेता घेता आपणास जाणवते की त्या विश्वातील स्वतःला आपण हरवून बसलो आहोत!  मागच्या विश्वातील एखादी व्यक्ती अचानक समोर येते आणि आपणास नक्की कसे वागावे हे कळत नाही. आपण अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे त्या व्यक्तीशी वागतो! आपण त्या व्यक्तीशी अनोळखी असतो की आपल्या स्वतःशी हा न उलगडणारा प्रश्न! आपण आपल्याशीच त्या वागण्याचे समर्थन द्यायचं प्रयत्न करतो परंतु त्या व्यक्तीचं काय? त्या व्यक्तीला स्पष्टीकरण कोण आणि केव्हा देणार!

काल रात्री असेच बसलो असता ह्याच संदर्भातील काही सुंदर गाणी ऐकायला मिळाली! पहिलं १९६६ च्या चित्रपटातील दिलीपकुमार आणि वहिदावर स्वतंत्रपणे चित्रित केले गेलेलं 'दिल दिया दर्द लिया' ह्या चित्रपटातील 
'फिर तेरी कहानी याद आयी, फिर तेरा फसाना याद आया'
'फिर आज हमारी आँखों में, एक ख्वाब पुराना याद आया!'

त्यानंतर १९८१ च्या उमराव जान मधील रेखावर चित्रित केले गेलेलं 
'ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दायर हैं
'हद हैं निगाह तक जहाँ गुबार ही गुबार हैं!

आणि मग पुढे 'तमाम उम्र का हिसाब माँगती है जिंदगी!"

अशीच गाणी ऐकल्यावर १९८५ साली १० मार्चला भारताने जिंकलेला बेन्सन आणि हेजेस कप आठवतो. भारताचा एक खरोखर गुणवान संघ त्या स्पर्धेत उतरला होता आणि भारत पूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला!
असो रविवार संध्याकाळी आलेल्या आठवणी सोमवारी सकाळी कागदावर (ब्लॉगवर) उतरविल्यावर भूतकाळात रमलेले मन वर्तमानकाळात परत आणायला हवे!
बाकी ह्या ब्लॉगमधील काही भाग माझ्याच जुन्या ब्लॉगमधून उचलला आहे! :)


No comments:

Post a Comment