Sunday, March 16, 2014

परीक्षामय - भाग २!


दिनांक १६ मार्च २०१४

दहावी बारावीच्या परीक्षाही सध्या सुरु आहेत. आम्ही ८८ - ९० साली दहावी बारावी दिली तेव्हा मामला सोपा होता. दहावीच्या परीक्षेचे सर्व पेपर रविवारची सुट्टी वगळता सलग असायचे. त्यामुळे शैथिल्य वगैरे यायचं नाही. सर्वांना एकाच प्रश्नपत्रिकेचा सामना करायला लागायचा. गेल्या काही वर्षात दहावी बारावीच्या परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झालेला दिसतोय.
दहावीच्या परीक्षेतील गुणवत्ता यादी पद्धत आपण काढून टाकली. का तर? शालेय मुलांना इतक्या वयात गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याचे दडपण येऊ नये. ह्या मुद्द्यावर माझं वेगळं मत आहे. आपण अजूनही गुणवत्ता यादी ठेवावयास हवी होती. असो, एस. एस. सी. बोर्डाचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा मुद्दा नाही म्हटलं तरी गौण बनत चालला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत वाढलेले टक्क्यांचे प्रमाण!  हे प्रमाण इतके वाढले ही पूर्वी ९० टक्क्यांचे जे अप्रूप होते ते आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे.
आता वळूयात अभियांत्रिकी पदवीसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरीक्षांविषयी.  हल्ली नक्की कोणती पद्धत अवलंबली जाते ह्याविषयी माझा बराच गोंधळ आहे. माझ्या सध्याच्या ज्ञानानुसार प्रथम बारावीतील भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयातील गुण आणि त्याचबरोबर IIT च्या MAINS ह्या परीक्षेतील गुण लक्षात घेतले जातील. आता हा सध्या नवीन आलेला बदल असावा. बारावीची परीक्षा मार्च महिन्यात तर IIT MAINS एप्रिल - मे महिन्यात! इतका काळ सतत परीक्षेचे दडपण मुलांना घ्यायला लावणे हे कितपत योग्य आहे? आणि सर्वच मुलांनी हे दडपण इतका काळ घेण्याची गरज आहे काय?
ज्यांना खरोखर IIT ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी IIT प्रथम MAINS मध्ये चांगले गुण मिळवावेत आणि IIT ADVANCED ला पात्र व्हावे. आता साध्या अभियांत्रिकी पदवीच्या परीक्षेला सुद्धा IIT ची मिती समाविष्ट केल्याने आता मामला क्लिष्ट बनला आहे. त्यामुळे असे काही संयुक्त (Integrated) शिकवणी वर्ग निघाले आहेत जे मुलांची बारावी आणि IIT ह्या दोघांसाठी एकदम तयारी करून घेतात. आता त्यांचे लक्ष असते ते IIT ADVANCED साठी मुलांची तयारी करून घेणे. परंतु ह्यात प्रवेश घेणारे काहीजण केवळ बारावी आणि IIT MAINS ह्या पहिल्या भागासाठीच उत्सुक असतात. परंतु त्यांना  नाहक संपूर्ण क्लिष्ट भागाचे दडपण घ्यावे लागते. आणि नक्कीच  IIT ADVANCED चे नुसते दडपण घेणे हे सुद्धा येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे! आता हा इतका सर्व अभ्यासक्रम  शिकवायचा असल्याने हे शिकवणी वर्ग मुलांची दहावी परीक्षा संपली की सुरु होतात. माझ्या माहितीतला एक शिकवणी वर्ग एकदा अकरावी सुरु झाली की अगदी रविवारीची सुद्धा सुट्टी देत नाही. सतत परीक्षा सुरूच राहतात. मुलांच्या उपस्थितीचा रिपोर्ट तत्काळ पालकांना जातो. सर्व मुलांना हे कितपत झेपते हा महत्वाचा मुद्दा! बाकी ह्यांचा दर्जा तसा चांगला! शिकवायला सर्व IIT मधून  पदवी घेतलेला शिक्षकवर्ग! आणि शंकानिरसन करण्यासाठी नियमितपणे खास सत्र!
ह्यात खटकण्याजोग्या काही गोष्टी! एखाद्या शिक्षकाची शिकविण्याची पद्धत जर मुलांना आवडली नाही तर लगेच ते त्याविषयी तक्रार करून शिक्षकवर्ग बदलून घेऊ शकतात. शिक्षकांना किती पॅकेज मिळते हे मुलांना माहित असते. एकंदरीत आपण एक ग्राहक आणि शिक्षकवर्ग हा आपल्याला सेवा पुरविणारा असा अयोग्य समज मुलांनी करून घेतलेला दिसतो.
अपरिहार्यपणे २५ वर्षापूर्वीची बारावीतील मुलांची (आमची) मानसिकता आणि हल्लीच्या मुलांची मानसिकता ह्याची तुलना मनातल्या मनात होते. त्यावेळी बारावीत सुद्धा शिक्षकांविषयी बराच आदर असायचा. कॉलेजात, शिकवणी वर्गात चांगलं इंग्लिश बोललं जायचं. WHATSAPP च्या भाषेने सर्वत्र धुमाकूळ घातला नव्हता. आता मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. मला यश मिळाले नाही तर ते केवळ मी मेहनत केली नाही म्हणून असाच समज बऱ्यापैकी पसरलेला आहे.
एकंदरीत आपल्याकडील हा फरक माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अजून काही वर्षे तेजीत राहणार ह्या गृहितकावर आधारित आहे असे माझे मत! परंतु ह्या क्षेत्रातील बाहेरचे चित्र काहीसे बदलते आहे! हे क्षेत्र पूर्वीइतके आकर्षक राहिले नाही. आणि बरेच अभियंते ह्या क्षेत्रात गेल्याने स्थापत्य, विद्युत आणि मेकॅनिकल (यांत्रिकी?) ह्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये दर्जेदार अभियंत्यांची चणचण भासत आहे! आपण बारावीनंतर ह्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी वेगळा प्रवेशमार्ग आखू शकतो का?
कोणत्याही यशस्वी कंपनीत बहुदा 'यशासाठी लागणाऱ्या गोष्टीची योग्य प्रकारे व्याख्या करून त्यासाठीचा मार्ग आखून ठेवला जातो'. ह्या तत्वाला 'Keep the things simple' असे म्हटले जाते. आपल्याकडे असा कोणी शिक्षणतज्ञ  आहे काय जो शिक्षणक्षेत्रात ह्या तत्वाची अंमलबजावणी करू शकेल?
होळीच्या सर्वांना शुभेच्छा!

No comments:

Post a Comment